Friday, 24 July 2020

लेक वयात येताना २


लेक वयात येताना भाग 2 रा
मागील भागात आपण पौगंडावस्थेत होणारे शारीरिक बदल आणि त्या वयात लावायच्या सवयींबद्दल माहिती घेतली.
या भागात आपण मुलींमध्ये होणारे भावनिक/ मानसिक बदल आणि त्याला कसे सामोरे जायचे  याबद्दल माहिती  घेऊ या .
वयाच्या या टप्प्यांवर मुलींमध्ये खूप शारीरिक आणि मानसिक स्थित्यांतर होत असतात , आणि या काळात बऱ्याच वर्तणूक समस्या उद्भवतात.
   * गोंधळलेपणा, आत्मविश्वास कमी होणे* :
पौगंडावस्थेत मुलींमध्ये अनेक शारीरिक व हॉर्मोनल बदल वेगाने  होत असतात . त्यामुळे त्या गोंधळतात, selfconcious होतात. त्याचवेळी अनेक प्रकारचे विचार डोक्यात घोळत असतात. त्यामुळे एकाग्रता कमी होते; परिणामी शालेय प्रगती वर ही परिणाम होऊ शकतो .या सगळ्यामुळे मुली संभ्रमित होऊ शकतात, काही जणांमध्ये आत्मविश्वास ही खालावतो. तसेच स्वतः मधल्या शारीरिक बदलांची तुलना (उंची, वजन,  इ.)इतर मुलींसोबत केल्याने, अथवा कुणी चिडवल्यामुळे  काही मुलींमध्ये न्यूनगंड ही निर्माण होतो
अशावेळी मुलींमधले बदल त्यांना समजावून सांगणे,हे बदल नैसर्गिक आहेत याबद्दल त्यांना आश्वस्त करणे आणि धीर देणेे खूप गरजेचे आहे. शाळेतील कामगिरी खालावली तरी त्यांना धारेवर धरू नका, किंवा सर्वांसमोर टीका अथवा इतरांशी तुलना अजिबात करू नका; त्याने त्यांचा स्वतःवरचा विश्वास अजून खालावेल .
* हळवेपणा/ अती भावनाशीलता*:
छोट्या छोट्या गोष्टींवरून मुली रडवेल्या होतात, अतिभावनिक होऊन काहीतरी बोलतात. पालकांना समजत नाही की क्षुल्लक गोष्टींवर आपली  मुलगी अत्यंतिक प्रतिक्रिया का देत आहे .
मुलीच्या शरीरात दरमहा हॉर्मोन्स ची तीव्र आंदोलनं सुरू असतात ; शरीर, मन, पूर्णपणे सरावलेले नसते, त्यामुळे असे होते. तिची थट्टा करू नका, त्याचवेळी तिने  थोडं खंबीर राहायला पाहिजे हे न दुखावता प्रेमाने, पण ठामपणे सुचवा.
* चिडचिडेपणा/रागावर ताबा न राहणे / आक्रमकता* :
असे कुठलेच आई वडील नसतील, ज्यांना teenage tantrums ची झळ बसली नसेल. वस्तू, दार आपटणं, चिडचिड करणं, सांगितलेलं न ऐकणं, उलट उत्तरं देणं, असे बरेच प्रकार या वयातली मुलं, मुली करतात.
आपण चिडलो की ते अजून आक्रमकपणे react होतात.
प्रत्यक्षात होतं काय,  की या काळात मुलांना स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव होत असते आणि त्यांना स्वतःची ओळख हवी असते. ती ते नेहमीच्या चाकोरी विरुद्ध वागून ठसवायचा प्रयत्न करत असतात. त्याचवेळी त्यांचा सामाजिक जाणिवा ही मूळ धरत असतात. पुस्तकात, शाळेत, शिकवलेले आदर्श, आणि प्रत्यक्ष जगातला मोठ्यांच्या वागण्यातला व्यावहारिक दृष्टिकोन , यातील विसंगती त्यांच्या लक्षात यायला लागते. आणि त्यांचा भाबडा विश्वास कमी होतो व बंडखोरी वाढते .
या परिस्थितीत पालकांनी संयम ढळू न देणे हे सगळ्यात जास्त आवश्यक असते. शांत आणि ठाम रहा. प्रत्येक बाबतीत त्यांना dictate करू नका; त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या.. त्याने त्यांचा आत्मविश्वास ही वाढेल आणि विद्रोह ही कमी  होईल.
काही बाबींना मात्र ठामपणे नकार द्या ; जसे की लायसन्स नसताना वाहन चालवणे, न विचारता घरातून पैसे घेणे, न कळवता  कुठल्याही पार्टी ला जाणे, कायदा मोडणे , इ .
घरात एखादी मिटिंग घेऊन मर्यादा स्पष्ट कराव्यात आणि त्या ठामपणे पाळाव्यात .
* नैराश्य*:
शरीर-मनातील बदल आणि त्याबद्दल अर्धवट किंवा चुकीची माहिती, लैंगिक शिक्षणाचा अभाव, मनात येणारे लैंगिक विचार आणि त्यामुळे येणारा अपराधबोध, तसेच शैक्षणिक आघाडीवर असलेली आव्हाने, अपेक्षांचा होणारा भडिमार,  या सगळ्यामुळे मुलांमध्ये नैराश्य येऊ शकते. नेहमीचे भावनिक चढउतार आणि हे नैराश्य यातील फरक समजणे फार गरजेचे आहे.
नैराश्याची लक्षणे ओळखणे आणि वेळीच उपचार करणे गरजेचे आहे ... खूप जास्त किंवा कमी झोपणे, खाणे कमी होणे,सतत एकटं राहणे, कायम निरुत्साही असणे,सातत्याने शाळेतली कामगिरी ढासळणे,  मरणाविषयी बोलणे किंवा तसे कार्यक्रम बघणे, पुस्तके वाचणे... ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.
मुलांमध्ये नैराश्य टाळण्यासाठी त्यांच्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नका, त्यांना सांघिक खेळांसाठी प्रोत्साहित करा, त्यांना एखादा छंद जोपासू द्या , त्यांच्याशी संवाद कायम ठेवा . आपण चुकलो, हरलो, तरी आपल्या आई वडीलांचे आपल्यावर नेहमी प्रेम असेल हा विश्वास त्यांना वाटू द्या .
आणि तरीही परिस्थिती गंभीर वाटली तर मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकाचा सल्ला घ्यायला अजिबात संकोच करू नका .
*सोशल मीडिया*:
इंटरनेट चा अतिवापर हे अवघड दुखणे होऊन बसले आहे. बरेच पालक स्वतःच आहारी गेलेले असल्यामुळे मुलांना काही बोलण्याची सोय नसते. आणि प्रोजेक्ट्स, इतर  महत्वपूर्ण माहिती, यासाठी आंतरजालाची मदत तर घ्यावीच लागते. पण व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टाग्राम,मोबाईल गेम्स सारख्या गोष्टींमुळे वेळ ही खूप वाया जातो. सोशल मीडिया addiction , त्यातून येणारी अस्वस्थता, नैराश्य, याचा धोका ही आहेच. हे सगळे वापरताना तारतम्य बाळगावे, आहारी जाऊ नये यासाठी प्रयत्न करा.काही आक्षेपार्ह साईट्स ब्लॉक करून टाका.  मुळात स्वतःही या गोष्टी पाळा.दिवसभरात ठराविक  No media time ठरवा आणि तो पाळा.निसर्ग ट्रेक, मैदानी खेळ,  यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन द्या.
* व्यसनाधीनता* :
मोठे झाल्याची भावना, काहीतरी थरारक करण्याची इच्छा, सवंगड्यांचा दबाव (peer pressure),कुटुंबातील व्यक्तींना व्यसन करताना पाहणे,  अशा अनेक गोष्टींमुळे किशोरावस्थेतील मुले मुली व्यसनाकडे वळतात. यात मुलांचे प्रमाण जास्त असले तरी मुलींमध्ये ही हे लक्षणीयरित्या वाढत आहे .घरात सहज उपलब्ध असेल तर उत्सुकतेपोटी  ही व्यसनांना सुरुवात होते.
फक्त एक झुरका, फक्त एक घोट, फक्त एक शॉट, असा "एकदाच करून बघू" म्हणून झालेली सुरुवात कधी कधी सवय आणि नंतर व्यसन बनून जाते .
ही अतिशय नाजूक आणि क्लिष्ट समस्या आहे. मुलांना त्यांच्यावर पाळत ठेवलेली अजिबात आवडत नाही; तेव्हा त्यांच्या नकळत त्यांच्यावर थोडं लक्ष ठेवले पाहिजे. आपल्या मुलीचे मित्र मैत्रिणी घरी येतील तेव्हा त्यांच्याशी संवाद साधा, त्यावरून ती कोणत्या गटात वावरत आहे हे लक्षात येईल. एक इमर्जन्सी डायरी करा, आणि त्यात जवळचे पाहुणे , मित्र, मुलीच्या ही मित्र,मैत्रिणी यांचे नाव, पत्ते,  फोन नंबर लिहून ठेवा.आपल्या मुलीच्या मित्र मैत्रिणींच्या पालकांशी ही संपर्क ठेवा; जमल्यास एखादा ग्रुप बनवा, म्हणजे काही वेगळे, संशयास्पद वाटल्यास सगळे मिळून लक्ष घालता येईल.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रसंगी थोडी मवाळ, नमती भूमिका घेऊन संवाद कायम ठेवा, म्हणजे काही विपरीत घडल्यास ती तुम्हाला ते न बिचकता सांगू शकेल .आपण जी चौकशी करतो, ती काळजी आणि भीतीपोटी करतो आणि ती आजच्या काळात रास्त आहे , हे तिच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे.
एकूण पाल्याचे teenage हाताळणे ही खरच पालकांसाठी तारेवरची कसरत आहे. हे थोडेसे दुचाकी चालवायला शिकवण्यासारखे आहे; हँडल त्यांच्या ताब्यात दिलेच पाहिजे, त्याशिवाय ते शिकू शकणार नाहीत, पण त्याच वेळी तोल गेला, धडपडले, तर सावरायला आई वडील सदैव सोबत, पाठीशी आहेत हा विश्वास त्यांना वाटला पाहिजे.कुंभार होऊन घडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा माळी होऊन जोपासना करा.
ही माहिती सर्वसाधारण किशोरावस्थेतील सामान्य स्थित्यंतराबद्दल आहे . काही विशिष्ट  समस्या असतील( तीव्र नैराश्य, हिंसक वर्तणूक, व्यसनाधीनता, लैंगिक अत्याचार, इ) तर तज्ज्ञांची मदत घ्या.
सगळ्यात महत्वाचे... क्वालिटी टाइम ही संकल्पना किती ही गोंडस असली तरी मुलं ही व्हाट्सअप्प फेसबुक सारखी नसतात, की आपल्याला मोकळा वेळ मिळाला म्हणून ते लगेच ऍक्टिव्हेट होतील आणि संवाद साधतील. भरपूर वेळ एकत्र घालवल्यावर थोडा संवाद साधला जातो. मुलांसोबतचा प्रत्येक क्षण इव्हेंटफुल आणि दिवसातला सगळं वेळ happening नसतो. त्यांना काहीही न करता शांत बसण्यासाठी वेळ मिळू द्या ..... त्यातून त्यांचा संवाद वाढेल, तुमच्याशी, आणि स्वतःशी ही...
Sitting quietly, doing nothing, Spring comes, and the grass grows, by itself.
--- Basho Matsuo






लेक वयात येताना १


लेक वयात येताना भाग १
आज बहुतांशी घरात मुलगी जन्माला येणं हा हर्ष सोहळा, आणि तिचे संगोपन हा आनंदाचा ठेवा आहे...
मुलगा मुलगी समान असली, तरी सारखी नसतात; मुलींच्या काही आरोग्यविषयक गरजा, समस्या वेगळ्या असतात, आणि साधारणपणे preadolescent (९ते१२)वयापासून याबद्दल  सजग असावे लागते.
स्त्रीत्वाच्या दृष्टीने मोठे शारीरिक, भावनिक बदल होण्यापूर्वीचा हा तयारीचा काळ असतो.
या काळात काही सर्वसाधारण गोष्टींची, आणि काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
आहार:  साधारण नवव्या दहाव्या वर्षांपासून मुलींमध्ये वयात येण्याची चाहूल लागते व तशी बाह्यलक्षणे हळूहळू दिसू लागतात . या वयात सकस आणि चौफेर आहाराची नितांत गरज असते, आणि याच वयात दुर्दैवाने मुलांमध्ये बाहेरचे खाणे, जंक फूड, याविषयी आकर्षण वाढू लागते .
या वयात लागलेल्या खाण्याच्या सवयी आयष्यभर साथ देतात, म्हणून घरगुती संपूर्ण आहार द्या; स्वतःही त्याचं पालन करा.

स्वच्छता: आता मुली स्वतःचं सगळं आवरायला लागलेल्या असतात. सकाळी शाळेच्या घाईत नीट ब्रश करण्याचे टाळतात; त्यांना योग्य पद्धतीने ब्रश करायला शिकवा, दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावा.(भारतात दात किडण्याचे प्रमाण प्रचंड आहे, आणि ते वाढतच आहे).
नीट घासून अंग, केस, धुवायला शिकवा. तसेच कानातला मळ नियमितपणे काढत जा. जननेंद्रियांची स्वच्छता ठेवायला सांगा.
ह्या गोष्टी वाचायला क्षुल्लक वाटत असतील, पण मूलभूत स्वच्छतेकडे खरच खूप दुर्लक्ष केले जाते, आणि नंतर वय वाढल्यावर नवीन सवयी लावणे फार जड जाते. तसेच वाईट सवयींमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते
व्यायाम : मुलींमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करा ; व्यायाम त्यांना आयुष्यभर साथ देणारी अतिउत्तम सवय आहे, ती या वयातच त्यांच्यात रुजू द्या. त्यांना सोबत घेऊन आऊटडोअर ऍक्टिव्हिटीज प्लॅन करा; त्यानिमित्ताने तुम्हालाही चांगली सवय लागेल .सकाळी करण्यासाठी15- 20 मिनिटांचे सोपे व्यायाम प्रकार शिकवा (योगासने, सूर्यनमस्कार).
( सद्य परिस्थितीत शक्य तिथे सोसायटीच्या आत चालणे/ जॉगिंग किंवा घरातल्या घरात व्यायाम हे पर्याय आहेत. व्यायामामुळे शारीरीकच नव्हे मानसिक फिटनेसही टिकायला मदत होईल)
झोप: तज्ञांच्या मतानुसार पौगंडावस्थेतील मुलांना साधारण नऊ तासांची झोप गरजेची आहे, पण प्रत्यक्षात  खूप कमी मुले इतकी विश्रांती घेतात. वाढलेला शाळेचा, अभ्यासाचा वेळ,इतर उपक्रम या सगळ्या मध्ये झोपेची वेळ कमी होते; पण शरीराला त्याची खूप गरज असते.
टीव्ही बघणे, एखादा क्लास, यात जाणारा वेळ कमी करून आपल्या  मुलीला पुरेशी विश्रांती घेऊ द्या .
*शारीरिक बादल* :
या वयात मुलींच्या शरीरात बदल व्हायला सुरुवात होते .अचानक ऊंची खूप वाढू शकते (growth spurt). प्रत्यक्ष पाळी सुरू होण्यापूर्वी साधारण दीड दोन वर्षे आधी स्तनांची वाढ, तसेच पायावर, काखेत,  योनीवर केस येणे, हे बदल सुरू होतात.
हे बदल नैसर्गिक आहेत, या बद्दल मुलींना आश्वस्त करणे आवश्यक आहे . तसेच योग्य मापाची ब्रा(सुरुवातीला स्पोर्ट्स ब्रा) घालायला देणे, पोक काढून चालू नये म्हणून सांगणे, या गोष्टी कराव्या लागतील.
काही मुली पिंपल्स च्या त्रासाने खूप बेजार होतात, त्यांना बेसिक सूचना(पिंपल्स फोडू नये, चेहरा स्वच्छ ठेवावा,  इ)आणि आवश्यक वाटल्यास उपचार द्यावे  लागतात .
*सांवेगिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता (EQ आणि SQ)* :
या वयात मुलींना स्वतःच्या स्त्री असण्याची नकळत जाणीव होऊ लागते . शाळांमध्ये मासिक पाळी बद्दल ही माहिती दिली जाते. कधी कधी मुली या गोष्टींनी थोड्या बिचकतात, त्यांचं सामाजिक वर्तन ही थोडे बदलू शकते; अशा वेळी त्यांच्याशी संवाद असणे खूप महत्वाचे आहे. मुलींनी पाळी विषयी, मुलं होण्याविषयी, त्यासंबंधित एखाद्या टीव्ही जाहिरातीविषयी प्रश्न विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देऊ नका; त्यांना जमेल तसं समजावून सांगा, वाटल्यास वेळ मागून घ्या, थोड्या वेळाने विचार करून उत्तरे द्या, पण टाळू नका. हा संवादाचा पूल फार आवश्यक आहे; विशेषतः  त्या पौगंडावस्थेत पोहोचल्यावर हे फार फायदेशीर होईल...
गुड टच, बॅड टच, बद्दल vdeos आहेत, ते मुलींना दाखवू शकता; पण त्याचवेळी मुली घाबरून जाणार नाहीत, त्यांचं निरागस बालपण गढूळणार नाही याचीही काळजी घ्या; जगात अत्यल्प प्रमाणात वाईट लोक असतात आणि त्यांच्यापासून सावध राहायला हवे, पण त्याचवेळी खूप सारी चांगली लोक ही असतात, हे आवर्जून सांगा.
*Adolescence(वयात येणे )* :
*पाळी*  : साधारण 12- 13 व्या वर्षी मुलींना पाळी येते , त्यांचे मासिक चक्र सुरू होते ; एखादा वर्ष पुढे मागे होऊ शकते.
सुरुवातीला पाळी अनियमित असणे, जास्त स्त्राव होणे,जास्त दिवस स्त्राव होणे, अशा समस्या उद्भवू शकतात, पण हळूहळू नियमित पाळी सुरू होते. रक्तस्त्राव खूप जास्त होत असल्यास, किंवा दैनंदिन काम न करू शकण्याइतका त्रास होत असल्यास, एकदा डॉक्टरांना दाखवून घ्यावे .काही मुलींमध्ये रक्तक्षय (रक्तात हिमोग्लोबीन कमी होणे)होतो, तो गोळ्या देऊन बरा करता येतो.
मुलगी आता पौगंडावस्थेत येते; तिच्या शरीरात आणि मनोवस्थेत अनेक बदल होत असतात; त्याच वेळी शैक्षणिक आघाडीवर ही वर्ष महत्वाची असतात. हा सगळा काळ अस्वस्थतेचा असतो, आणि पालकांच्या मानसिक आधाराची तिला गरज असते. टीनेज मुळे ती ते दाखवत नाही, खूप स्वावलंबी, कणखर असल्याचे दाखवते; अशावेळी तिचा स्वाभिमान न दुखावता तिच्याशी मैत्री टिकवणं, आपण पाठीशी आहोत हा विश्वास तिच्यात रुजवणे गरजेचे आहे.आजकाल शाळांमध्ये मुलींना पाळीविषयी  सांगितले जात असते, पण लैंगिक शिक्षण दिले जात नाही; पालक, विशेषतः आई, काही गोष्टी तिला सांगू शकते ; सुसंवाद असेल तर हे इतके कठीण होत नाही.
आपल्या मुलीतून एक उत्साही, सकारात्मक व्यक्तिमत्व घडवण्याची ही वेळ असते, आणि आताची जडण घडण पुढे आयुष्यभर कायम राहते .
ही सर्वसाधारण ढोबळ माहिती आहे; विशिष्ट, किंवा गंभीर आरोग्य समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पौगंडावस्थेत आणि तरुण वयात स्त्रियांना भेडसावणाऱ्या काही आरोग्याशी निगडीत आणि भावनिक समस्यांबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ...