Wednesday, 11 December 2019

कव्वाली नामा...बदलते अंतरंग

परवा एका मैत्रिणीने खुसरोच्या एका रचनेचा उल्लेख केला आणि त्या अनुषंगाने थोडं वाचत असताना बदलत चाललेल्या कव्वाली या संगीत प्रकाराबद्दल एक विस्तृत लेख वाचण्यात आला. आणि त्यावर विचार करता करता सूफीजम आणि कव्वाली याबद्दल मला असलेल्या मर्यादित ज्ञानाची उजळणी झाली.
कव्वाली या संगीतप्रकाराचा उगम सूफी संप्रदायात झाला; क़ौल म्हणजे कथन, प्रवचन... ते सांगीतिक भाषेत  सांगणारा तो कव्वाल आणि तो जी रचना गातो ती कव्वाली.
सूफीजम हा इस्लाम धर्मातला गूढ पंथ.
ईश्वराविषयी अत्यंतिक भक्ती आणि प्रेम भावनेला महत्व देणारा. इश्क(समर्पण) हा आत्मज्ञान(मरीफत)/देव/मोक्ष  प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे असे मानणारा.
 जग हे ईश्वरीय तत्वाचे प्रतिबिंब आहे आणि मनुष्य त्या ईश्वरी तेजाचे सगुण रूप. या परमज्ञानाची अनुभूती घेण्याचा आणि त्या तेजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न प्रत्येक जीव करत असतो.
स्वतःला सगुण साकार रुपात अनुभवण्यासाठी 'त्याने' मनुष्य नावाचे साधन निर्माण केले; त्या साधनाला परत त्या निर्मात्यापर्यंत प्रवास करता येतो, 'त्याला'  अनुभवता येते. त्यासाठी स्व चे अस्तित्व पूर्णपणे विलीन करावे लागते ... हे विसाल(जिवा शिवाचे ऐक्य) साधण्यासाठी, त्या ईश्वराशी एकरूप होण्यासाठी कव्वालीतून निर्माण होणारा ट्रान्स( हाल) मदत करतो.
(सूफीजम मधली ही संकल्पना आत्मा परमात्मा कल्पनेशी साधर्म्य दाखवते, आणि त्यातले इश्क आपल्या भक्ती योगाशी.)

कव्वाली आधी फक्त दर्ग्यांमध्ये तिथे येणाऱ्या भाविकांसाठी सादर केली जात असे. ताल वाद्य आणि रूपके पेरलेली शब्दयोजना वापरून कव्वाल पार्टी अशी वातावरण निर्मिती करायची की ऐकणारे भाविक  तल्लीन व्हायचे आणि ब्रह्मानंदी टाळी लागणे, याचा प्रत्यय त्यांना यायचा. निष्णात कव्वाल विशिष्ट शब्दांची आवर्तने घेत, आलापांचा आणि ठेक्याचा वापर करत श्रोत्यांना एका वेगळ्या प्रतलावर आनंदातिरेकाच्या स्थितीत न्यायचे(ecstasy). त्या स्थितीत मग आत्मज्ञानाची अनुभूती होणे अपेक्षित असायचे.
अशी ही पारंपारिक कव्वाली सादर करणारी कव्वालांची घराणी असतात, आणि ती बहुतांश वेळा एखाद्या सूफी संताचा वारसा सांगतात. कव्वाल पार्टीतले साथीदार सहसा एकमेकांचे नातेवाईक असतात.
पारंपारिक कव्वालीच्या कार्यक्रमात सादर केल्या जाणाऱ्या कव्वाल्यांचे प्रकार असतात:
हम्द: यात अल्लाहची स्तुती असते(उदा. अल्लाह हू ही कव्वाली). कार्यक्रमाची सुरुवात याने होते.
नात: यात प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची स्तुती असते.
मन्कबत: यात इमाम अली किंवा एखाद्या सूफी संताची स्तुती असते.
मर्सिया: यात इमाम हुसेन यांच्या करबलाच्या युद्धात झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जातो. ही शिया पंथियांच्या कार्यक्रमात सादर होते.
गझल: इतर वेळी गझल प्रेमगीत असली तरी कव्वालीच्या कार्यक्रमात सादर होताना 
यातली माशुक प्रतिकात्मक असून प्रत्यक्षात वर्णन ईश्वराचे आणि त्याच्याशी मिलन होण्यासाठीच्या तळमळीचे असते.
पारंपारिक कव्वालीत काही शब्दांची बरीच आवर्तने घेतली जातात. त्यात त्या शब्दांचे वरवरचे अर्थ गळून जाऊन रुपकांत दडलेले मूळ अर्थ उलगडत जावेत, हा हेतू असतो.
या दृष्टीने पाहिलं की मग प्रेमगीत प्रेमगीत राहात नाही; त्यातले छुपे अर्थ दिसू लागतात..उदा. 'ये जो हलका हलका सुरूर है' चा हा भाग...
ना नमाज़ आती है मुझको,
न वजू आता है
सजदा कर लेता हूँ,
जब सामने तू आता है
मैं अज़ल से बन्दा-ए-इश्क हूँ
मुझे ज़ोह्द-ओ-कुफ्र का ग़म नहीं
मेरे सर को दर तेरा मिल गया
मुझे अब तलाश-ए-हरम  नहीं
मेरी बंदगी है वो बंदगी
जो बा-कैद-ए-दैर-ओ-हरम नहीं
मेरा इक नज़र तुम्हें देखना
बा खुदा नमाज़ से कम नहीं..

अशी ही अध्यात्मिक अनुभवाचे वाहन असणारी कव्वाली कालौघात बदलत गेली.
संपर्क क्रांती झाली आणि दर्ग्याचा उंबरठा ओलांडून कव्वालीचा मैफिलींमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांत प्रवेश झाला. ध्वनिमुद्रिका निघू लागल्या.
या स्थित्यंतरासोबत कव्वालीचे रूपही बदलले. ती आटोपशीर होत गेली. स्थळ काळाचे बंधन राहिले नाही; घरबसल्या कुणालाही कव्वालीचा आनंद घेणे शक्य झाले.
बऱ्याचदा शब्दशः अर्थ घेतले गेले, त्यामुळे काही कव्वाल्या प्रेमगीत म्हणून प्रसिद्ध झाल्या; 'दमादम मस्त कलंदर' सारख्या रचना तर डान्स नंबर म्हणून स्थापित झाल्या. कलाकार, सांगीतिक बाजू, सादरीकरण , सोपी शब्दरचना, ग्राहक यांना महत्व आले.
हिंदी चित्रपटांमध्ये तर कव्वाली तिच्या मूळ रुपात क्वचित आली. 'निगाहें मिलाने को जी चाहता है', 'अल्लाह, ये अदा' सारखी ती कधी खट्याळ मूड घेऊन आली, तर 'राज की बात कह दू तो'  सारखी कधी कलगीतुऱ्याच्या स्वरूपात.
एकुणात अध्यात्मिक संदर्भ हळूहळू दूर गेले आणि कव्वाली रंजक संगीतप्रकार म्हणून जास्त ओळखली जाऊ लागली.

 कव्वालीवरच्या त्या लेखात या सगळ्या स्थित्यंतराबद्दल खंत जाणवत होती; मलाही वाटली. आपल्याकडचे लुप्त होत चाललेले कलाप्रकार आठवले, त्याचबरोबर कालानुरूप खूप बदलत गेलेले काही कलाप्रकारही... काळाच्या रेट्यासमोर एखादी गोष्ट शुद्ध स्वरूपात टिकणं कठीण आहे याची जाणीव झाली. मूळ स्वरूप काटेकोरपणे जपून नामशेष होण्याचा धोका पत्करायचा, की काळासोबत स्वतःत बदल घडवत हिणकस स्वरूपात टिकून राहायचे, हा पेच तसा कठीण.
डोक्यात हाच विषय घोळत होता आणि त्यामुळे फोनवर प्लेलिस्टही नुसरत फतेह अली खान यांचीच सुरू होती.
(कव्वाली हा विषय यांच्याशिवाय खरोखर अपूर्ण; तिला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे श्रेय यांनाच. जगभर कंसर्ट्स करणारे नुसरतसाहेब दर्ग्यांमधल्या पारंपारिक कव्वाली कार्यक्रमांमध्येही न चुकता सहभागी व्हायचे.)
'अल्लाह हू' चे एक संक्षिप्त व्हर्जन झाले; मग त्याचेच एक जुने दीर्घ रेकॉर्डिंग सुरू झाले. मी आवराआवर करत होते; गाणे पुढे पुढे सरकू लागले तसे काम करणे अशक्य झाले. कंप सुटला; तो थंडीचा शहारा नक्कीच नव्हता. मी डोळे मिटून स्तब्ध बसून राहिले, नकळत डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. 'समा' नावाची एक संकल्पना आहे कव्वालीत, ती बरीच वाचूनही कळली नव्हती; पण त्या काही क्षणांमध्ये ती प्रचिती आली.
    मग लेख वाचताना वाटलेली खंत नाहीशी झाली. संपर्कमाध्यमे नसती तर माझ्यासारख्या असंख्य लोकांना हा स्वर्गीय अनुभव कसा घेता आला असता? हा कलाप्रकार तरी या स्वरूपात कसा ऐकता आला असता? The lost soul हे त्या लेखाचे शीर्षक मग तितके चपखल वाटेना... आत्मा फक्त रूप बदलतो, हरवत नाही; हा सिद्धांत जास्त पटला!
-----    -------    -------  ------   ------   -------

( कव्वालीने रूप बदलले आहे हे मात्र खरे; वानगीदाखल 'ये जो हलका हलका' ची दोन व्हर्जन्स कमेंटमध्ये दिली आहेत. अध्यात्मिक अँगल बाजूला ठेऊन musical brilliance साठी ही गीते आवडू शकतात.  हे ऐकून अजून खोल जावं वाटलंच, तर तो बोनस... 😊)

.... मुखी तुझे नाम

शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तार विवादाबद्दल नुकतंच ऐकलं, वाचलं आणि लक्षात आलं की काही इतिहासपुरुषांना आपण आदरार्थी नावाने संबोधतो आणि काहींचा एकेरी नावाने उल्लेख करतो.
स्वातंत्र्य संग्रामातल्या नेत्यांना आपण एकेरी संबोधत नाही, अपवाद झाशीच्या राणीचा.
त्याहून मागे गेलो की तुकाराम, ज्ञानेश्वर हे ग्यानबा, तुकाराम, तुकोबा या एकेरी नावाने जास्त प्रसिद्ध आहेत. एकनाथ महाराज आणि स्वामी समर्थ मात्र आदरार्थी. साईबाबा, अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज हेही आदरार्थी.
राजांमध्ये चंद्रगुप्त, अशोक पासून राणा प्रताप,अकबर, औरंगजेब सगळ्यांचा एकेरी उल्लेख.
 इतिहासात साधारण किती मागे गेलो की आदरार्थी मागे पडून एकेरी उल्लेख सुरू होत असतील?
आणि यातही शंकराचार्यांसारखे अपवाद आहेत. महाराज, स्वामी, आचार्य अशी उपाधी असली की बहुतेक एकेरी संबोधन रूढ होत नाही.
शिवाजी महाराज चौथीच्या पुस्तकातून भेटीला यायचे, पण शिवबा म्हणून जास्त लक्षात राहायचे. रामायण महाभारताच्या गोष्टी सांगणारे कुठलेही मराठी आजी आजोबा शिवाजीच्याही गोष्टी सांगायचे आणि त्या गोष्टींतल्या शूर, हुशार, कर्तबगार शिवाजीचा देवांसारखा एकेरी उल्लेखच व्हायचा. आपला सगळ्यांचा शिवाजीराजा, महाराज होऊन विशिष्ट चौकटीत कधीपासून बंदिस्त व्हायला लागला काय माहित... "जो दिल में है वो 'तू' है; 'आप' कहना महज तकल्लुफ़ है", असा काहीतरी एक शेर आहे...

देव सुदैवाने अजून अहो जाहो कॅटेगरीत गेले नाहीयत.
 हिंदीत रामजी, देवो के देव महादेव आहेत, पण कृष्ण मात्र लाडका कान्हा आहे. मधुराभक्तीत तर थेट प्रियकर आहे( सूफी साहित्यात मात्र उलट आहे; भक्त प्रियकर आहे आणि ईश्वर प्रयेसी..)  सर्व स्त्रीदेवतांचा मात्र सगळीकडेच एकेरी उल्लेख आहे.
आपल्या मायमराठीत देवांचे उल्लेख एकेरीच केलेले आहेत. राम, कृष्ण, शंकर, गणपती, अंबाबाई, तुळजा भवानी.... 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' काय आणि 'ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा' काय, सबकुछ एकेरी.
दत्त मात्र कधीकधी गाणगापूरचे दत्तमहाराज  म्हणवले जातात.
विठ्ठल तर अगदी घरातला देव. विठू माऊली, विठोबा, मायबाप, विठ्या सुद्धा असतो तो. आमच्या आईंचा तर फार जिवलग, अगदी शिव्या सुद्धा खाणारा. कुठे काही वाईट घडलं की आई सुरू करतात... "या विठोबाला तर ना आजकाल काही कळेनाच झालंय, बहिरा झालास की डोकं कामातून गेलं बाबा? इकडं एवढा जाळ होतोय अन हा कुठं जाऊन लपलाय काय माहित!"
मी एकदा हसत सांगितलं की इरावती कर्वे म्हणून एक लेखिका आहेत, त्यांनी एका लेखात विठ्ठलाला बॉयफ्रेंड म्हटलंय. खुदुखुदू हसायला लागल्या, म्हणे तुम्ही शिकलेल्या बाया येड्याच असता जरा, काहीही बोलता ...
मला आईंचा सूक्ष्म हेवा वाटतो पण; बुद्धीचा खडक फोडून निखळ भावनेचा झरा वहावा आणि हक्काने भांडता येईल असा विठ्ठल आपल्यालाही सापडावा, असं वाटत राहतं...

Sunday, 1 December 2019

पीडितेलाच शिक्षा?



आपण खूप जीवघेण्या अपघाताच्या केसेस बघतो. कुणाला कायमचे अपंगत्व येते, कुणी आयुष्यभरासाठी अंथरूणाला खिळते, कुणाच्या मागे आयुष्यभरासाठी उपचार, पथ्ये लागतात. काही अपघातांमध्ये माणसे विद्रुप होतात, कधी अवघड जागीसुद्धा गंभीर जखमा होतात,...किती काय काय होते.
पण या सगळ्या केसेसमध्येही जो मानसिक आघात होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त आघात बलात्काराच्या केसेसमध्ये होतो.
असे का होते?
बलात्कार या घटनेबद्दल समाजाच्या मनात नेमक्या कशा भावना असतात? व्यक्तीच्या मनात काय भावना असतात? समाजाचा जो दृष्टिकोन आहे, त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर भावना जास्त टोकदार होतात का?
जीव गेला तरी चालेल, पण बलात्कार वाट्याला येऊ नये असे स्त्रीला का वाटते? इतर कुठल्या हिंसेत, अत्याचारात, हल्ल्यात असे वाटते का?
आपल्या दृष्टीने काय व्याख्या असते बलात्काराची?
एक हिंसक, विकृत हल्ला; आपल्या सद्य सामाजिक संरचनेत ज्या अवयवांना अतिशय खाजगी मानलेले आहे त्यांना बळजबरी हाताळणे, इच्छेविरुद्ध त्यांचा उपभोग घेणे?
कायदेशीर व्याख्या गुगलवर उपलब्ध आहेच.
अशी एक घटना, एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवते. का?
या हल्ल्याला जर इतर शारीरिक हल्ल्यांहून  खूप वेगळं मानलं नाही तर काय होईल?
रेप व्हिक्टीम हा शब्द वापरतो आपण; ते लेबल लागलं की असंख्य वेळा ती त्या यातनेतून परत परत जाते. पंचनामे, केस, साक्षी पुरावे, बातम्या, तिच्या शिलाची चिरफाड... शेवटी काही वर्षांनी जी काय शिक्षा होत असेल, कधी नसेल; तोवर तिच्या आयुष्याचे काय होत असेल?
आजकाल अशा केसेसची बरीच चर्चा होते, अर्थात हेतू न्याय मिळावा असा असतो; पण प्रत्यक्षात काय होते त्यामुळे? कुणाची चर्चा होते, गुन्हेगाराची की पीडितेची? इतकी चर्चेत आल्यावर तिला नॉर्मल जगता येतं का पुन्हा? कीव करणाऱ्या नजरांनी जास्तच विद्ध नसेल होत ती? तिने सगळं विसरायचे ठरवले तरी आपण समाज म्हणून सतत हेच ठसवत असतो की लैंगिक अत्याचार ही प्रचंड भयंकर गोष्ट आहे, त्या आघातातून माणूस कधीच सावरू शकत नाही. आपण खूप स्तोत्म माजवलंय का नकळत ?
बलात्कारात होणारा आघात निःसंशय भीषण असतो. आणि खरं सांगायचं तर हे त्या व्यक्तिशिवाय दुसरं कुणीच समजू शकत नाही. अशा घटनांमधून गेलेल्या मुली, बायका म्हणतात त्यांना स्वतःच्या शरीराची घृणा वाटते, किळस येते. पण एक दोन अवयवांपलीकडे एखाद्या स्त्रीचे काही अस्तित्व नसते का?
  आपल्या अंगाला कधी घाण लागते , कधी एखाद्या अपघातात धातूचे, काचेचे तुकडे घुसतात अंगात; पण म्हणून स्वतःची घृणा वाटत नाही. मग एखाद्या मानवी मर्यादा संपलेल्या क्षणात, माणूसपण न उरलेल्या एखाद्या  हिंसक कलेवराने जो काही शारीरिक अत्याचार केला, त्याने आपलं अस्तित्व घृणास्पद का व्हावं? आणि हे सहसा सगळ्या बायकांना वाटतं.
अपराध्यांना शिक्षा होऊ नये असे मी अजिबात म्हणत नाहीय हे कृपया लक्षात घ्या. पण या एकूण प्रकाराला मृत्यूपेक्षा भयानक असं नको समजू या.
बऱ्याचशा घटना पोलिसांपर्यंत जात नाहीत. कधी बदनामीच्या भीतीने, कधी अपराधी जवळचाच कुणीतरी असतो म्हणून.
मला आधी खूप राग यायचा, मी कन्व्हिन्स करायला बघायचे, न्यायाच्या गोष्टी करायचे.
एकदा एक आई म्हणाली काय न्याय न्याय लावलंय हो, पोरीचं पुढं जगणं महत्वाचं; हात पाय मोडले ऍक्सिडेंटमध्ये तर आधी दवा दारू करता की गाडीच्या ड्रायव्हरच्या मागे लागता? लग्नानंतर काय जबरदस्ती होत नसती? गोळ्या औषध द्या आणि मोकळं करा. थोड्या दिवसात जाईल विसरून. मी स्तब्ध.
ती येत राहिली नंतरही; मी काऊन्सलर नसले तरी त्या संदर्भातली पुस्तकं वाचून  मला शक्य होतं तितकी मदत केली. हळूहळू सावरली ती; मग लग्न झालं, मुलं झाली. बाकी सगळं मागे पडलं.
अजून एका केसमध्ये न्याय मिळालेला बघितला, पण वैयक्तिक आघाडीवर त्रास झाला, ससेहोलपट झाली.
हे असे दोनच असमाधानकारक पर्याय का असावेत समोर?
न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत ज्याच्यावर अन्याय झालाय तोच होरपळून निघत असेल, तर तो न्याय म्हणता येईल? नकोच असा न्याय म्हणणारे कुणी असेल तर त्याला कसे समजवायचे?
या सगळ्या प्रक्रियेत अपराध्याला शिक्षा नक्कीच व्हावी;  पण जी रेप सर्व्हायव्हर आहे, तिला आपल्या बाबतीत अतिशय भयानक असे काहीतरी घडलंय, ही भावना कशी कमी करता येईल? या सगळ्या प्रकारातला भावनातिरेक कमी करायला हवा.
बलात्कार नक्की गंभीर गुन्हा आहे, जसा एखादा जीवघेणा हल्ला असतो तसाच; पण अत्म्यावर जखम, कधीच न भरून येणारा मानसिक आघात असे चित्र नको.
मी पुन्हा सांगते, मी बलात्काराच्या नृशंसतेला  कमी लेखत नाहीय; पण ती अधोरेखित करत असताना जे नॅरेटिव्ह तयार होत आहे, ते त्यातून वाचलेल्या मुलींसाठी  डिप्रेसिंग, आपल्यात कायमचे न्यूनत्व आले आहे असे वाटायला लावणारे
आहे.
स्त्रियांवर, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला सत्तेचा गैरवापर, भावनांवर नियंत्रण नसणे, क्षणिक तोल जाणे, दुर्बलतेचा गैरफायदा घेण्याची वृत्ती, दमन केलेल्या लैंगिक भावनांमुळे उद्भवलेली विकृत मानसिकता, पुरुषत्वाच्या भ्रामक कल्पना, लहान मुलांच्या बाबतीत काही अंधश्रद्धा,  असे वेगवेगळे पैलू आहेत.
या सगळ्या केसेस मध्ये पीडित व्यक्तीचे मानसिक पुनर्वसन सगळ्यात महत्वाचे आहे, आणि एखाद्या घटनेमुळे तिला निम्मं जग नालायक आहे असे नं वाटू देणे हेसुद्धा..
न्याय मिळणे ही प्रक्रिया किचकट आहे.
घटनेची शारीरिकदृष्ट्या तीव्रता बघितली जाते.  कायद्याचा व्याख्या काटेकोर असतात, आणि बऱ्याच गैरवर्तनाच्या केसेस त्या चौकटीत सिद्ध होणं कठीण..त्यात बऱ्याचदा परिचित किंवा नातेवाईक गुंतलेले असतील तर कायद्यापर्यंत जाणे ही टाळले जाते.
समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे अपघात होऊन शारीरिक दुखापत झाली तर आपण ते प्रकरण जसे हाताळू त्याच पद्धतीने हेही हाताळावे.
पुरुष म्हणजे सदा सर्वकाळ वखवखलेले जनावर असते, पुरुषी मानसिकता भयानक वाईट, अशी इमेज तयार केल्याने त्याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो ..
ही लढाई काही ठराविक वृत्तींच्या विरोधात आहे, आणि उद्देश्य अशा प्रवृत्ती नष्ट करणे , हा असायला हवा.
यात पुरुषांचा सहभागही तितकाच, किंबहुना जास्त महत्वाचा आहे.. तेव्हा women v/s men असे या लढ्याचे स्वरूप असू नये (आपल्या स्वतःच्या कुटुंबातले सगळे पुरुष कुठल्या मानसिकतेचे असतात ?).
दुसरे म्हणजे शारीरिक सुरक्षेचा एक पैलू, असे याकडे बघायला शिकवावे. अर्थातच victim ने प्रतिकार, विरोध करावाच पण दुर्दैवाने ती गर्भगळीत झाली किंवा घाबरल्यामुळे विरोध करू शकली नाही तर खूप भयंकर, आयुष्यभर न भरून येणारी जखम झाली असे खरंच मानू नये. पुढे  वेगवेगळ्या भूमिकेत जीवनात पुरुष येणार असतात, अशावेळी enemy centred approach मुळे खूप नुकसान होते .
या विषयाबद्दल घरातून संवाद सुरू करणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबातील लहान मुलं, महिला या गोष्टींना बळी पडू नयेत म्हणून त्यांना प्रतिकार करायला, तिथल्या तिथे विरोध करायला शिकवायला हवे.
आणि त्याचवेळी आपल्या कुटुंबातले कुणी शोषक होऊ नये म्हणूनही प्रयत्न करायला हवेत...कारण गुन्हेगार काही परग्रहावरून येत नसतात. एखाद्याच्या मर्जीविरुद्ध कसल्याही प्रकारची जवळीक साधणे अमानुष आहे, अक्षम्य चूक आहे हा आपल्या घरातल्या मूल्यशिक्षणाचाही भाग असावा.
सगळा समाज एकाचवेळी प्रगल्भ होत नसतो.
तेव्हा अशा गैरप्रकारांना बळी पडू नये म्हणून सुरक्षित राहण्याचे व्यवहारिक उपाय, अपघात घडलाच तर त्यातून व्रण न राहू देता बाहेर पडणे याबद्दल जागरूक असावे.
असे प्रकार एखाद्याकडून घडू नयेत म्हणून शक्य तिथे लैंगिक शिक्षण, नकार म्हणजे नकारच हे मान्य करायला शिकवणे, गैरवर्तन करणाऱ्याला जरब बसावी असे वातावरण, अशा गोष्टी उघडकीस आल्यास victim ला नव्हे तर गैरवर्तन करणाऱ्याला त्रासदायक होईल अशी सामाजिक प्रतिक्रिया, या सगळ्या गोष्टी नेटाने चालवायला हव्यात .
इथे गुन्हेगार आणि पीडित हे सगळेच एका यंत्रणेचे अविभाज्य भाग आहेत , त्यामुळे व्यक्तींपेक्षा प्रवृत्तींवर मात करणे जास्त आवश्यक आणि परिणामकारक राहील.
# अत्याचार मुलांवरदेखील होतात , पण स्त्रियांचे प्रमाण जास्त म्हणून त्यांचा उल्लेख करत लिहिले आहे. मुलांच्या बाबतीतही हेच लागू आहे .
# प्रत्येक समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो, या multiple approaches मधल्या मंथनातूनच एक सर्वमान्य मार्ग दिसायला लागतो. म्हणून अमुक पद्धत महत्वाची वाटणे म्हणजे इतर पद्धतींना विरोध आहे असे मानायचे कारण नाही.