आपण खूप जीवघेण्या अपघाताच्या केसेस बघतो. कुणाला कायमचे अपंगत्व येते, कुणी आयुष्यभरासाठी अंथरूणाला खिळते, कुणाच्या मागे आयुष्यभरासाठी उपचार, पथ्ये लागतात. काही अपघातांमध्ये माणसे विद्रुप होतात, कधी अवघड जागीसुद्धा गंभीर जखमा होतात,...किती काय काय होते.
पण या सगळ्या केसेसमध्येही जो मानसिक आघात होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त आघात बलात्काराच्या केसेसमध्ये होतो.
असे का होते?
बलात्कार या घटनेबद्दल समाजाच्या मनात नेमक्या कशा भावना असतात? व्यक्तीच्या मनात काय भावना असतात? समाजाचा जो दृष्टिकोन आहे, त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर भावना जास्त टोकदार होतात का?
जीव गेला तरी चालेल, पण बलात्कार वाट्याला येऊ नये असे स्त्रीला का वाटते? इतर कुठल्या हिंसेत, अत्याचारात, हल्ल्यात असे वाटते का?
आपल्या दृष्टीने काय व्याख्या असते बलात्काराची?
एक हिंसक, विकृत हल्ला; आपल्या सद्य सामाजिक संरचनेत ज्या अवयवांना अतिशय खाजगी मानलेले आहे त्यांना बळजबरी हाताळणे, इच्छेविरुद्ध त्यांचा उपभोग घेणे?
कायदेशीर व्याख्या गुगलवर उपलब्ध आहेच.
अशी एक घटना, एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवते. का?
या हल्ल्याला जर इतर शारीरिक हल्ल्यांहून खूप वेगळं मानलं नाही तर काय होईल?
रेप व्हिक्टीम हा शब्द वापरतो आपण; ते लेबल लागलं की असंख्य वेळा ती त्या यातनेतून परत परत जाते. पंचनामे, केस, साक्षी पुरावे, बातम्या, तिच्या शिलाची चिरफाड... शेवटी काही वर्षांनी जी काय शिक्षा होत असेल, कधी नसेल; तोवर तिच्या आयुष्याचे काय होत असेल?
आजकाल अशा केसेसची बरीच चर्चा होते, अर्थात हेतू न्याय मिळावा असा असतो; पण प्रत्यक्षात काय होते त्यामुळे? कुणाची चर्चा होते, गुन्हेगाराची की पीडितेची? इतकी चर्चेत आल्यावर तिला नॉर्मल जगता येतं का पुन्हा? कीव करणाऱ्या नजरांनी जास्तच विद्ध नसेल होत ती? तिने सगळं विसरायचे ठरवले तरी आपण समाज म्हणून सतत हेच ठसवत असतो की लैंगिक अत्याचार ही प्रचंड भयंकर गोष्ट आहे, त्या आघातातून माणूस कधीच सावरू शकत नाही. आपण खूप स्तोत्म माजवलंय का नकळत ?
बलात्कारात होणारा आघात निःसंशय भीषण असतो. आणि खरं सांगायचं तर हे त्या व्यक्तिशिवाय दुसरं कुणीच समजू शकत नाही. अशा घटनांमधून गेलेल्या मुली, बायका म्हणतात त्यांना स्वतःच्या शरीराची घृणा वाटते, किळस येते. पण एक दोन अवयवांपलीकडे एखाद्या स्त्रीचे काही अस्तित्व नसते का?
आपल्या अंगाला कधी घाण लागते , कधी एखाद्या अपघातात धातूचे, काचेचे तुकडे घुसतात अंगात; पण म्हणून स्वतःची घृणा वाटत नाही. मग एखाद्या मानवी मर्यादा संपलेल्या क्षणात, माणूसपण न उरलेल्या एखाद्या हिंसक कलेवराने जो काही शारीरिक अत्याचार केला, त्याने आपलं अस्तित्व घृणास्पद का व्हावं? आणि हे सहसा सगळ्या बायकांना वाटतं.
अपराध्यांना शिक्षा होऊ नये असे मी अजिबात म्हणत नाहीय हे कृपया लक्षात घ्या. पण या एकूण प्रकाराला मृत्यूपेक्षा भयानक असं नको समजू या.
बऱ्याचशा घटना पोलिसांपर्यंत जात नाहीत. कधी बदनामीच्या भीतीने, कधी अपराधी जवळचाच कुणीतरी असतो म्हणून.
मला आधी खूप राग यायचा, मी कन्व्हिन्स करायला बघायचे, न्यायाच्या गोष्टी करायचे.
एकदा एक आई म्हणाली काय न्याय न्याय लावलंय हो, पोरीचं पुढं जगणं महत्वाचं; हात पाय मोडले ऍक्सिडेंटमध्ये तर आधी दवा दारू करता की गाडीच्या ड्रायव्हरच्या मागे लागता? लग्नानंतर काय जबरदस्ती होत नसती? गोळ्या औषध द्या आणि मोकळं करा. थोड्या दिवसात जाईल विसरून. मी स्तब्ध.
ती येत राहिली नंतरही; मी काऊन्सलर नसले तरी त्या संदर्भातली पुस्तकं वाचून मला शक्य होतं तितकी मदत केली. हळूहळू सावरली ती; मग लग्न झालं, मुलं झाली. बाकी सगळं मागे पडलं.
अजून एका केसमध्ये न्याय मिळालेला बघितला, पण वैयक्तिक आघाडीवर त्रास झाला, ससेहोलपट झाली.
हे असे दोनच असमाधानकारक पर्याय का असावेत समोर?
न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत ज्याच्यावर अन्याय झालाय तोच होरपळून निघत असेल, तर तो न्याय म्हणता येईल? नकोच असा न्याय म्हणणारे कुणी असेल तर त्याला कसे समजवायचे?
या सगळ्या प्रक्रियेत अपराध्याला शिक्षा नक्कीच व्हावी; पण जी रेप सर्व्हायव्हर आहे, तिला आपल्या बाबतीत अतिशय भयानक असे काहीतरी घडलंय, ही भावना कशी कमी करता येईल? या सगळ्या प्रकारातला भावनातिरेक कमी करायला हवा.
बलात्कार नक्की गंभीर गुन्हा आहे, जसा एखादा जीवघेणा हल्ला असतो तसाच; पण अत्म्यावर जखम, कधीच न भरून येणारा मानसिक आघात असे चित्र नको.
मी पुन्हा सांगते, मी बलात्काराच्या नृशंसतेला कमी लेखत नाहीय; पण ती अधोरेखित करत असताना जे नॅरेटिव्ह तयार होत आहे, ते त्यातून वाचलेल्या मुलींसाठी डिप्रेसिंग, आपल्यात कायमचे न्यूनत्व आले आहे असे वाटायला लावणारे
आहे.
स्त्रियांवर, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला सत्तेचा गैरवापर, भावनांवर नियंत्रण नसणे, क्षणिक तोल जाणे, दुर्बलतेचा गैरफायदा घेण्याची वृत्ती, दमन केलेल्या लैंगिक भावनांमुळे उद्भवलेली विकृत मानसिकता, पुरुषत्वाच्या भ्रामक कल्पना, लहान मुलांच्या बाबतीत काही अंधश्रद्धा, असे वेगवेगळे पैलू आहेत.
या सगळ्या केसेस मध्ये पीडित व्यक्तीचे मानसिक पुनर्वसन सगळ्यात महत्वाचे आहे, आणि एखाद्या घटनेमुळे तिला निम्मं जग नालायक आहे असे नं वाटू देणे हेसुद्धा..
न्याय मिळणे ही प्रक्रिया किचकट आहे.
घटनेची शारीरिकदृष्ट्या तीव्रता बघितली जाते. कायद्याचा व्याख्या काटेकोर असतात, आणि बऱ्याच गैरवर्तनाच्या केसेस त्या चौकटीत सिद्ध होणं कठीण..त्यात बऱ्याचदा परिचित किंवा नातेवाईक गुंतलेले असतील तर कायद्यापर्यंत जाणे ही टाळले जाते.
समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे अपघात होऊन शारीरिक दुखापत झाली तर आपण ते प्रकरण जसे हाताळू त्याच पद्धतीने हेही हाताळावे.
पुरुष म्हणजे सदा सर्वकाळ वखवखलेले जनावर असते, पुरुषी मानसिकता भयानक वाईट, अशी इमेज तयार केल्याने त्याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो ..
ही लढाई काही ठराविक वृत्तींच्या विरोधात आहे, आणि उद्देश्य अशा प्रवृत्ती नष्ट करणे , हा असायला हवा.
यात पुरुषांचा सहभागही तितकाच, किंबहुना जास्त महत्वाचा आहे.. तेव्हा women v/s men असे या लढ्याचे स्वरूप असू नये (आपल्या स्वतःच्या कुटुंबातले सगळे पुरुष कुठल्या मानसिकतेचे असतात ?).
दुसरे म्हणजे शारीरिक सुरक्षेचा एक पैलू, असे याकडे बघायला शिकवावे. अर्थातच victim ने प्रतिकार, विरोध करावाच पण दुर्दैवाने ती गर्भगळीत झाली किंवा घाबरल्यामुळे विरोध करू शकली नाही तर खूप भयंकर, आयुष्यभर न भरून येणारी जखम झाली असे खरंच मानू नये. पुढे वेगवेगळ्या भूमिकेत जीवनात पुरुष येणार असतात, अशावेळी enemy centred approach मुळे खूप नुकसान होते .

या विषयाबद्दल घरातून संवाद सुरू करणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबातील लहान मुलं, महिला या गोष्टींना बळी पडू नयेत म्हणून त्यांना प्रतिकार करायला, तिथल्या तिथे विरोध करायला शिकवायला हवे.
आणि त्याचवेळी आपल्या कुटुंबातले कुणी शोषक होऊ नये म्हणूनही प्रयत्न करायला हवेत...कारण गुन्हेगार काही परग्रहावरून येत नसतात. एखाद्याच्या मर्जीविरुद्ध कसल्याही प्रकारची जवळीक साधणे अमानुष आहे, अक्षम्य चूक आहे हा आपल्या घरातल्या मूल्यशिक्षणाचाही भाग असावा.
सगळा समाज एकाचवेळी प्रगल्भ होत नसतो.
तेव्हा अशा गैरप्रकारांना बळी पडू नये म्हणून सुरक्षित राहण्याचे व्यवहारिक उपाय, अपघात घडलाच तर त्यातून व्रण न राहू देता बाहेर पडणे याबद्दल जागरूक असावे.
असे प्रकार एखाद्याकडून घडू नयेत म्हणून शक्य तिथे लैंगिक शिक्षण, नकार म्हणजे नकारच हे मान्य करायला शिकवणे, गैरवर्तन करणाऱ्याला जरब बसावी असे वातावरण, अशा गोष्टी उघडकीस आल्यास victim ला नव्हे तर गैरवर्तन करणाऱ्याला त्रासदायक होईल अशी सामाजिक प्रतिक्रिया, या सगळ्या गोष्टी नेटाने चालवायला हव्यात .
इथे गुन्हेगार आणि पीडित हे सगळेच एका यंत्रणेचे अविभाज्य भाग आहेत , त्यामुळे व्यक्तींपेक्षा प्रवृत्तींवर मात करणे जास्त आवश्यक आणि परिणामकारक राहील.

# अत्याचार मुलांवरदेखील होतात , पण स्त्रियांचे प्रमाण जास्त म्हणून त्यांचा उल्लेख करत लिहिले आहे. मुलांच्या बाबतीतही हेच लागू आहे .
# प्रत्येक समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो, या multiple approaches मधल्या मंथनातूनच एक सर्वमान्य मार्ग दिसायला लागतो. म्हणून अमुक पद्धत महत्वाची वाटणे म्हणजे इतर पद्धतींना विरोध आहे असे मानायचे कारण नाही.
No comments:
Post a Comment