Saturday, 30 November 2019

कोडं सुटताना..



माझ्या जुन्या क्लिनिकच्या खिडकीतून एक आंब्याचे झाड दिसायचे. तेव्हा मुलं लहान होती; खूप धावपळ करत, घरचं सगळं आवरून मी क्लिनिकला यायचे. इथलं काम उरकत आलं की मग मात्र दहा पंधरा मिनिटं अगदी शांत बसायचे. खाली चहाटपरी चालवणाऱ्याचा मुलगा चहा घेऊन यायचा.
हातात चहाचा कप घेऊन दरवाज्याला खुर्ची पाठमोरी करून मी त्या झाडाकडे बघत राहायचे ते क्षण फार रिलॅक्सिंग असायचे. रोज शांतपणे झाडाचा तो खिडकीतून दिसणारा भाग बघणं; दुसरं काहीच डोक्यात नसायचं.
 आंब्याला हळूहळू मोहोर आला, मग फळं आली, मग त्यावर पोपटांचे थवे यायला लागले. झाड रहदारीच्या रस्त्यावर अंग चोरत वाढलेलं, फार डेरेदार नव्हतं; आणि धुळीनं माखलेलं असायचं...रस्त्यावरून पटकन फळं दिसायचीही नाहीत. कुणी दगड वगैरे मारणंही शक्य नव्हतं, आणि कुणी कधी चढलंही नाही झाडावर, विजेच्या तारा होत्या जवळच. आंबे निर्धास्त वाढत होते. पोपटांनी अर्धवट खाल्लेली फळं उन्हात पाहिली की 'पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले', चे प्रात्यक्षिक बघतोय असं वाटायचं.
एका दिवशी वळीवाचा जोरदार पाऊस आला, सोबत सुसाट वाराही... झाड खूप दिवसांनी अंघोळ करून अगदी लखलखीत झालं, आणि फांद्या झोके घ्यायला लागल्या; पण ते हिरवे-पिवळे आंबे गायब झाले एकदम. पाऊस थांबल्यावर घरी जायला निघाले तर खाली झाडाभोवती त्या हिरव्या पिवळ्या आंब्यांचा रसदार खच पडलेला... काय वाटलं नेमकं कळलं नाही, पण तो सडा पाहून 'आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो' या ओळी मात्र खूप वेळ आठवत राहिल्या होत्या... घरी जाऊन लेकीलाही या ओळी शिकवल्या होत्या आणि त्या उन्हाळ्यात ती सारखं म्हणत असायची हेही आठवतंय.
एखादं चित्र नीटसं कळू नये पण कायमचं स्मरणात  राहावं, तसं त्या दुपारी पाहिलेलं ते दृश्य मनात कोरलं गेलं .
आता आठ नऊ वर्षांनी या अनुभवाशी मिळता जुळता अनुभव वाचायला मिळाला, त्या ओळींसकट, आणि तेही अशा किमयागाराचा, की स्तिमित व्हायला झालं.
त्या चित्राची न लागलेली संगतीही आपुसकच लागली. 

त्या लेखकाच्या लेखाचा तो भाग खाली देत आहे:

" 'आंबा पिकतो...रस गळतो' ही ओळ माझ्या मनात पूर्ततेची वाट पाहत पडलेली होती.
तो पिकलेला आंबा, त्याचा तो अंतर्यामातून
बाहेर फुटू पाहणाऱ्या आनंदासारखा गळणारा रस.... आणि मग कोकणचा हा झिम्मा खेळणारा राजा कोण? दुसरा कोण? तो आंबाच! तोच झिम्मा खेळतोय. मला हे सत्य खुद्द एका आंब्याच्या झाडाकडूनच कळलं. वर्षानुवर्षे अपूर्त राहिलेली ही समस्यापूर्ती माझ्या दारातल्या एका आंब्यानंच केली.---
---- आंबा मात्र लुटून लुटून किती लुटाल?- असं म्हणत राहिल्यासारखा स्तब्ध उभा. शिवाय, तसा तो कोणाचाच नव्हता, त्यामुळे या फळांवर कोणी राखण्या ही नव्हता. फळं पाडाला आल्यावर लांब काठीला जाळ्याची पिशवी लावून त्या आंब्यावरची असंख्य फळं कुणी आस्थेनं उतरवणाराही येत नाही. आज इतकी वर्ष मी पाहतोय निम्म्याहून अधिक फळे झाडावरच राहतात. आंधळ्याच्या गाई देव राखतो म्हणतात, तशी आमच्या या आंब्याची फळं आपोआप राखली जातात. बरं, हा आंबाही हापूस पायरी वगैरे नामांकित आंबाही हापूस, पायरी वगैरे नामांकित वंशातला नाही. फळ मात्र रेखीव आहे. पुणेरी पगडीला असे तशी त्याला कोचही आहे. ते लटकलेले घोस पाहत बसावे असे असतात
 आणि मलाही आश्चर्य वाटतं म्हणजे लांबशा काठीने त्या फळांचा घोस सहज काढता येण्यासारखा असून मलाही कधी त्या फळाची चव घ्यावीशी वाटली नाही. मला वाटतं, त्या प्रत्यक्ष आस्वादाची इच्छा नसलेल्या प्रेमालाच 'प्लॅटॉनिक लव' म्हणत असावेत. त्या आंब्याच्या साहचर्यातच सारं काही मिळतं. आणि केवळ मोसमातलं साहचर्य नव्हे; प्रत्येक दिवसाचं साहचर्य.
ते घोस तसेच लटकत राहतात. आणि मग पोपटांच्या कानी ती वार्ता जाते. 'किर्र किर्र' करत ती कीर-धाड येते तेव्हा कळतं की वरून फारसा पिवळा न दिसणारा हा आंब्याचा घोस आता पिकलाय. त्या हिरव्या पानांत ते राघो भरारी कुठं लपून आणि कसे ते आंबे खातात ते त्यांनाच ठाऊक. पोपट आलेले दिसताहेत, म्हणत गॅलरीत यावं तर एक पोपट दिसत नाही आणि मग आंब्याच्या त्या पानांनाच पंख फुटावेत तसा एकदम तो हिरवा जथा भरारी घेऊन पाहता पाहता दिसेनासा होतो.
 पिकलेल्या आंब्यांचे घोसच्या घोस मिरवत आता आमचा अंबा उभा असतो. क्वचित वळिवाचा पाऊस येऊन त्याला दणदणीत शॉवरबाथ देऊन जातो. पाच-पन्नास फळं खाली पडतात. पण आंबा मात्र धुंदीत असतो. त्याच्या नसानसांतून वाहणारा रस त्या फळांतून गळताना त्याला दिसत असतो. आणि वळीवाच्या वादळी वाऱ्याबरोबर तो झुलायला लागला की ते घोसही झुलायला लागतात. आता कोणी न खुडताच एक एक फळ दबकन खाली पडतं.त्या झुलण्यात आपण सफल झाल्याची एक कृतार्थता असते गॅलरीत आपण सफल झाल्याची एक कृतार्थता असते. गॅलरीत पावसाची झड येत असते, तरीही मला ते झुलणं पाहण्याचा मोह आवरत नाही. दहा वेळा मी चष्मा पुसतो.
 'आंबा पिकतो...रस गळतो... कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो' ह्या झिंग आणणाऱ्या झिमम्यातल्या पहिल्या साक्षात एका अलौकिक अनुभवानंच समस्या-पूर्ती झालेली असते."
-- पु.ल. देशपांडे.

एखादं माणूस आयुष्यात आल्यावर "काश, तुम मुझे बहुत पहले मिले होते!" असं म्हणावं वाटतं... पुलंच्या बाबतीत तसं झालंय !
प्रेमाला वयाची अट नसते म्हणे... सिम्पली लव्हिंग धिस आजोबा 😊😊

No comments:

Post a Comment