Tuesday, 24 September 2019

मिस्टर रॉजर्स नेबरहूड


  मुलांसाठी टेलिव्हिजन शो करणारा, शांत मवाळ भाषेत चार चांगल्या गोष्टी सांगणारा, मुलांच्या मनात आत्मविश्वास जागवणारा फ्रेड रॉजर्स हा सहृदय माणूस..
'मिस्टर रॉजर्स नेबरहूड' या लहान मुलांसाठी असलेल्या पण सगळ्यांनाच बघायला आवडेल अशा त्यांच्या कार्यक्रमात नाट्यमयता फारशी नसायची, गिमिक्स नसायचे.  मिस्टर रोजर्स त्यांच्या घरात असायचे आणि थेट प्रेक्षकांशी एखाद्या विषयावर सहज गप्पा मारायचे, सकारात्मक पैलू दाखवायचे; त्यात एखादी सोपी सुरेख कविताही असायची. बघता बघता, ऐकता ऐकता डोळ्यात आंसू आणि ओठांवर हसू अशी अवस्था व्हायची.

 दहावीचा निकाल ही आपल्याकडे मुलांना जोखण्याची फुटपट्टी असते... निकाल लागला आणि मुलाचे सगळ्यांकडून कौतुक सुरू झाले; त्याचवेळी धाकटीला उद्देशून आता तुलाही चांगले मार्क्स मिळवावे लागतील बरं, अशी प्रेमळ तंबी मिळायला लागली. लेक भाषाविषयांत रमणारी पण गणितात खूप एक्सपर्ट नसणारी... दादाचे मात्र गणित विज्ञान हे विषय पक्के.
एरव्ही बडबडी हसरी असणारी पोरगी अचानक एका दिवशी उदासच झाली, I am not good enough, मला दादासारखं काहीच जमत नाही म्हणत डोळ्यात पाणीच आणलं.
तेव्हा  मिस्टर रॉजर्स माझ्या मदतीला आले. तिच्या बॅगेत मी ही कविता ठेवली आणि ती घरी आल्यावर याचा व्हिडिओही दाखवला.

I Like You As You Are
Lyrics by Josie Carey | Music by Fred Rogers.

I like you as you are
Exactly and precisely
I think you turned out nicely
And I like you as you are

I like you as you are
Without a doubt or question
Or even a suggestion
Cause I like you as you are

I like your disposition
Your facial composition
And with your kind permission
I'll shout it to a star

I like you as you are
I wouldn't want to change you
Or even rearrange you
Not by far

I like you
I-L-I-K-E-Y-O-U
I like you, yes I do
I like you, Y-O-U
I like you, like you as you are
________________________________
(Appearances:Mister Rogers' Neighborhood)

त्या दिवशी  "You've made this day a special day, by just your being you. There's no person in the whole world like you; and I like you just the way you are." असे आपल्या शोच्या शेवटी  म्हणणाऱ्या या माणसाविषयी मनात फार कृतज्ञता दाटून आली.

  आपण किती सुदैवी आहोत की असे कलाकार आपल्या आयुष्याचा भाग असतात.
जगाच्या पाठीवर कुठेतरी, कुठल्यातरी  काळात कुणाला काहीतरी स्फुरते आणि शब्दबद्ध होते, आणि आपण दुसरीकडे, कधी दुसऱ्या कुठल्यातरी काळात ते वाचतो, पाहतो आणि त्यातून आपल्याला आपली उत्तरे मिळतात... शब्दांची ही क्षमता किती अद्भुत आहे!
(   Mister Rogers' Neighborhood चे बरेच भाग आधी you tube वर दिसायचे, पण आता दुर्दैवाने त्यातले बरेच भाग दिसत नाहीत, कदाचित चित्रपट येत असल्यामुळे काही व्यावसायिक गणितं असतील. पण जे काही उपलब्ध आहे तेही आवर्जून पाहण्यासारखे आहे)








इस मोड से जाते हैं

काल गुलजार यांच्या वाढदिवसामुळे रात्री  आँधीमधल्या गाण्यांची उजळणी झाली, आणि आज मेमरीत मी शेअर केलेली सुधीर मोघे यांची ही कविता दिसली( कवितेच्या या शैलीला त्यांनी 'स्वगत-संवाद' हे सार्थ नाव दिलंय).
"इस मोड से जाते हैं," आणि
"तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं",  या दोन्हींच्या मधला टप्पा म्हणजे ही कविता आहे !
             ************
एक सांगशील,
आपले रस्ते अवचित कुठे; कसे जुळले?
आपल्याच नादात चालताना
हे देखणे वळण कसे भेटले?

क्षणाभोवती
ही कसली रंगत खुलते आहे?
जगणं व्हावं गाणं
अशी स्वरांची संगत जुळते आहे
पण खरं सांगू?
या वाटांचं हे असं भेटणं बरं नव्हे
जीवघेणं उत्कट असेल
तरीही ते खरं नव्हे

तुझी दिशा पूर्वीच निश्चित
ती बदळणं हिताचं नाही
माझ्यापुरतं बोलायचं
तर मला माझी दिशाच नाही

तुझ्या संगतीत
आनंद आहे. आश्वासन आहे, दिलासा आहे.
माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात
भंगण्याचाच वसा आहे

म्हणून म्हणतो,
अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
जीव जडवून, चटका लावून,
निदान दूर होणं तरी असू नये

पण अशा वेळी कळून येतं
आपण आपले मालक नसतो
रस्ते आपली दिशा आखतात
आपण फक्त चालत असतो.
- सुधीर मोघे
      *****************
आपापल्या मार्गाने सुखनैव जाणाऱ्यांच्या वाटा अवचित एकमेकांना छेद देतात; आणि सगळे व्यवहारिक शहाणपण बाजूला ठेवत कुठल्या प्रेरणेने एक व्हायला बघतात...
पण शेवटी प्रवास असतो तो, थांबवता येत नसतो... आणि वाटांना उचलून हवे त्या दिशेला वळवता येत नाही. फार तर काही काळ एकत्र धावतात त्या; तशा आखलेल्या असतील तर...
 तेही चांगलं की वाईट? कारण न भेटणं आणि भेटून हरवणं यातलं काय जास्त त्रासदायक, कोण जाणे...

प्रवासाची आणि वाटा न जुळण्याची अपरिहार्यता मान्य करून मग कुणी फैज
"यूँ न था, मैनें फ़कत चाहा था यूँ हो जाये," म्हणतो;
किंवा एखादा राजेंद्र कृष्ण
"न तुम बेवफा हो, ना हम बेवफा हैं
मगर क्या करें अपनी राहें जुदा है"
असा निवाडा करतो.
" इन रेशमी राहों में, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहूँचती है", म्हणणारा गुलजारही नंतर " तुम गर साथ हो, मंजिलों की कमी तो नहीं" म्हणताना साथ हवी असेल तर  मंजिल बदलावी लागेल हे मान्य करतो ....




ऐकावे कुणाचे?

कॉलेजमध्ये असताना एकदा मैत्रिणीसोबत एक वाद बरेच दिवस चालला होता(म्हणजे सध्या फेसबुकवर असतो तसा नाही, मुद्दे धरून चर्चा होत होती); नंतर आम्ही अधून मधून भेटतो तेव्हाही हा विषय निघतोच...
विषय असा होता की स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहायचं आणि त्याप्रमाणेच वागायचं; की नाती सांभाळण्यासाठी, जवळच्यांची मनं राखण्यासाठी स्वतःला थोडी मुरड घालायची? यातला कुठला दृष्टिकोन योग्य?
मैत्रीण म्हणायची स्वतःशी प्रामाणिक राहावं, उगीच मनाविरुद्ध वागणं हा स्वतःशी खोटेपणा होईल, आणि ती आपली माणसं असतील तर त्यांनी आपल्याला समजून घेऊन आपण जसे आहोत तसे आपल्याला स्वीकारायला हवे.
मी म्हणायचे नुसतं विचारांच्या सोबतीने जगता येत नाही; एखाद्याचं मन/मान राखण्यासाठी थोडं ऍडजस्ट करायला काय हरकत आहे... आणि ती आपली माणसं असतील तर आधी आपण त्यांना समजून घ्यायला हवे, त्यांच्या वेगळ्या मतांसकट आपणही त्यांना स्वीकारायला हवे.
गेल्या वीस वर्षांत आम्ही दोघी आपापल्या मार्गाने चालत राहिलो, जो स्टँड घेतला होता त्याची आपापल्या आयुष्यात पुरेपूर किंमतही मोजली, दोन्ही बाजूचे फायदे तोटेही कळले. या दोन्ही पद्धतीची टोकाची उदाहरणेही बघितली, ज्यांची परिणिती फार आनंददायी नव्हती.
आता मात्र वाटतं की मैत्रिणीचा मुद्दा बरोबर होता, पण पद्धत चुकत होती आणि माझी पद्धत बरोबर असली तरी मुद्दा चूक होता.
सहजीवन हा एक भाग असतो, आणि स्वभाव हा एक; सहजीवनासाठी स्वभाव बद्दलण्याला मर्यादा असतात, आणि त्या बदलांचे ओझे कुरूप असते. त्याचवेळी स्वभावानुसार जगण्यालाही मर्यादा असतात आणि एकटेपणही सुखावह नसते.
स्वतःशी प्रामाणिक राहताना त्याचा आक्रमक एल्गार पुकारणं आवश्यक असते का? आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे आपल्याहून स्टबर्न असतात, अशावेळी बदल व्हायला फार वेळ लागतो. बायकांच्या बाबतीत तर दुहेरी अडचण असते कारण लग्नामुळे तिला अजून वेगळ्या वातावरणात स्वतःला रुजवावं लागतं. पण रुजता रुजता आपले मूळही त्यात मिसळावे लागते; तेही तुटेपर्यंत न ताणता. समोरच्याने आपल्याला समजून घ्यावे अशी अपेक्षा करणे पुरेसे नाही; त्यासाठी सक्रिय आणि चिवटपणे, न चिडता प्रयत्न करावे लागतात; प्रसंगी दोन पाऊलं मागेही जावे लागते.
दुसऱ्याचं मन राखण्यासाठी स्वतःला बदलणं हे सुरुवातीला कौतुकास्पद वाटतं, पण नंतर घुसमट व्हायला लागते. आपल्याला मनाविरुद्ध वागावं लागत आहे याची घुसमट नैराश्यात बदलते आणि बऱ्याचदा स्वभावातही कटुता वाढते, आणि ज्यांच्यासाठी आपण बदललो त्यांच्याच वाट्याला ती येते. त्यामुळे महान होण्याच्या ट्रॅपमध्ये न अडकता आपण खरे काय आणि कसे आहोत याचे स्मरण ठेवावे लागते, आणि आपल्या ऍडजस्ट करण्याला मर्यादा आहेत याची जाणीव बाकीच्यांना करून द्यावी लागते.

 अडमुठेपणा न करता काही बाबतीत ठाम राहणंही गरजेचं असतं, आणि त्याचसोबत स्वतःला तपासत राहणंही... काही बदल योग्य असतील, चांगले असतील तर ते स्वीकारण्याची आपलीही तयारी हवी.
त्याचवेळी स्वतःच्या विचाराची, आचरणाची जबाबदारी घ्यायला हवी.
सगळ्यात महत्वाचे, प्रत्येक गोष्टीचे सरसकट एकच उत्तर नसते. वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, फक्त आपलाच बरोबर असे नसते;
 हे स्वीकारण्याची तयारी हवी.
 प्रत्येकाने आपण म्हणू त्या मार्गानेच चालावे हा अट्टाहास नको, हे आपण स्वतःला आणि भोवतालच्यांनाही सांगत, समजावत राहायला हवे...
स्वत्वही राखायचे आणि नातीही; ही तारेवरची कसरत आहे हे मात्र खरं.





आठवणीतली पंचमी

सकाळी सकाळी थोरल्या चुलतीचा फोन आला; भावाच्या हाती पाठवलेली शिदोरी, साडी-बांगड्या व्यवस्थित पोहोचल्या का,  विचारत होती. सगळे काय करतायत विचारलं तर म्हणाली ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा फस्त करतायत....
  श्रावण सुरू झाला की पहिला सण असायचा नागपंचमीचा. बायकांच्या खास जिव्हाळ्याचा सण. आमच्याकडे सासुरवाशिणी माहेरी यायच्या. साडी खरेदी, जिथं ते शक्य नाही तिथं किमान चांगलं ब्लाउजपीस घेतलं जायचं.
मेंदीचे कोन नव्हते, पण ठिपक्यांची मेंदी लावायच्या सगळ्या, काहीजणी पूर्ण तळवा रंगवायच्या.
बांगड्या भरणे मात्र सगळ्यांसाठी अनिवार्य सोहळा होता.
पंचमीच्या आदल्या दिवशी कासार यायचा आणि आमच्या खालच्या ओसरीत बसायचा. गावातल्या बायका तिथे गोळा व्हायच्या. काही तालेवार घरं होती, तिकडे बोलवायला जावं लागायचं. त्यांच्याकडे निरोप देत देत आम्ही बाकी लोकांसाठीही
"गौडुर मनिगे बळगार बंदेना, येल्लारू बर्ररी..." ( पाटलांच्या घरी कासार आलाय, सगळे या ) अशी हाळी देत रस्त्याने जायचो.
कासार कासारीण जोडीने यायचे; पण बांगड्या भरण्याचे काम चच्चाचे, बीबी फक्त बांगड्या काढून द्यायची आणि आलेल्या पोरी बाळींशी गप्पा मारायची. सगळे पैसे द्यायचे असे नाही. आमच्याकडून धान्य दिले जायचे, काही जणांच्या घरी घाणे होते, तिकडून तेल दिले जायचे. नंतर नंतर मात्र सगळा व्यवहार पैशात व्हायला लागला. तीन चार रंगाच्या चमकीचे ठसे असणाऱ्या काचेच्या बांगड्या असायच्या.. जास्तीत जास्त लहान साईझ चढवा ही मागणी असायची, कारण बांगड्या सैल असल्या की घरकाम करताना वाढायच्या. लहान मुलींसाठी प्लास्टिकच्या बांगड्या असायच्या. काचेची बांगडी येण्याइतका हात मोठा झाला की बीबी ओरडायची, "इसका इस साल देखो पाटलीन, छोकरी बडी हुई देखो".  छोकरी कुणाचीही असली तरी जबाबदारी पाटलीनीकडेच दिली जायची. मग माझी थोरली चुलती लगेच चौकशी सुरू करायची; सगळ्यांच्या माहितीतल्या स्थळांची उजळणी व्हायची. छोकरी उगीच गोरीमोरी व्हायची .
पंचमीच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असायचा, पण पोळ्या करण्याऐवजी पुरणाचे कानवले/ दिंडे केले जायचे.
आमच्याकडे वारुळाला जायची पद्धत नव्हती.
आजोबा भट्टीला ज्वारी न्यायचे आणि त्याच्या लाह्या करून आणायचे.
घरातल्या देव्हाऱ्यात शंकराची पिंड होती आणि त्याच्या डोक्यावर मोठा पितळी नागोबा.. पंचमीच्या दिवशी यांना फार महत्व यायचं. पूजा करून त्यांच्यावर दूध लाह्या वाहिल्या जायच्या. मग समस्त बहिणींचा उपवास सुटायचा (पंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठीचा उपवास असायचा; भाऊ असणाऱ्या सगळ्या हा उपवास करायच्या).
मोठे वाडे असणाऱ्यांच्या अंगणात झोके बांधले जायचे, आणि दुपारी सगळ्या मुली, बायका नवीन साड्या नेसून तिथे गोळा व्हायच्या.
लहान मुलींना परकर पोलके असायचे, काही शहरात राहणाऱ्यांचे फ्रॉक असायचे.
 सगळ्या फेर धरून भुलई खेळायच्या, त्यात काही मराठी तर काही कन्नड गाणी असायची. माहेरची आठवण, आई वडिलांचं आणि भाऊ वहिनीचं कौतुक, सासरी असलेले कष्टाचे जीवन, अशी साधारण गाण्यांची गोष्ट असायची. माझी आजी एक गाणं म्हणायची ; मूळ गाणं आठवत नाही पण साटंलोटं झालेली(एका घरातल्या बहीण भावाचं लग्न दुसऱ्या घरातल्या भाऊ बहिणीशी करतात) एक माहेरी आलेली मुलगी आपल्या भावजय कम नणंदेला विनवते की तिने हिच्या आईवडिलांची नीट काळजी घ्यावी, बदल्यात ही आपल्या सासूचे रोज पाय चेपेल.
झोक्यासाठी गर्दी व्हायची, किरकोळ भांडाभांडी सुद्धा, पण मग एखादी ताई पुढे यायची आणि शिस्तीत सगळ्यांचे नंबर लावून द्यायची.
अंधार पडला की मग सगळ्या पांगायच्या.

पंचमीच्या दुसऱ्या दिवशीची आम्हा मुलांना फार उत्सुकता असायची. ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा हा नाश्ता त्यादिवशी सकाळी मिळायचा. पॉपकॉर्न हा पदार्थ माहीत नसलेला तो काळ होता; त्या चिवड्याचं प्रचंड अप्रूप होतं. आणि तेव्हा असे पदार्थ अगदी त्या सणापुरतेच मर्यादित असायचे. मुलांना आवडतात तर ठेऊ घरात वर्षभर, ही कन्सेप्टच नव्हती. त्या लिमिटेड एडिशन देशी पोपकॉर्नवर अक्षरशः तुटून पडायचो आम्ही सगळे.
मग आळसावत चुलीवरचा निरश्या दुधात केलेला चहा पीत कुणाची मेंदी फिक्कट झाली, कुणाचे नखपॉलिश निघाले ते बघत ओसरीवर बसायचो. झोपाळा बाजूला रिकामा असायचा, कालच्यासारखे नंबर लागलेले नसायचे; पण आज कुणाला झोके घ्याचा फारसा उत्साह नसायचा ...



Saturday, 21 September 2019

मनुजा जाग जरा...

काही वर्षांपूर्वी जनकाची एक कथा वाचली किंवा ऐकली होती. जनक राजा असला तरी अध्यात्मिक ज्ञानासाठीही प्रसिद्ध होता.
जनकाकडे एक राजा येतो आणि म्हणतो, राजपदावर राहूनही जगण्याला अध्यात्मिक बैठक कशी द्यावी हे मला सांग. जनक म्हणतो आपण उद्या बोलू, आज रात्री विश्रांती घे.
एका उंची कक्षात राजाच्या झोपण्याची सोय केली जाते. रात्री राजाला कसल्याशा चाहुलीने अचानक जाग येते; त्याला जाणवते की सैनिकांनी त्याला मंचकाला बांधून टाकले आहे.
" सूर्योदयाला आम्ही येऊन तुम्हाला मुक्त करू", असे म्हणून, हतबुद्ध राजाला काही विचारायची संधी न देता ते निघून जातात.
  आता त्याला दिसते की त्याच्या मंचकाच्या वर छताला एक तलवार टांगलेली आहे जिचे टोक त्याच्यावर रोखलेले आहे आणि तिला ज्या दोरीने बांधले आहे तिच्या दुसऱ्या टोकाला एक वालुकापात्र आहे. जशी वाळू झरत जात आहे तशी ती तलवार खाली खाली येत आहे.
जीव मुठीत धरून राजा रात्रभर तळमळत राहतो. सकाळ आधी होईल की वालुकापात्र आधी रिते होईल या विचाराने त्याचा थरकाप होतो.
 भीतीचा भर ओसरल्यावर त्याच्या मनात विचारांची गर्दी होते. सगळं आयुष्य त्याच्याभोवती फेर धरायला लागतं. किती गोष्टी गृहीत धरल्या, किती सल्ले धुडकावून लावले, कधी बेपर्वा वागलो, कधी मैत्री अव्हेरली, कधी प्रेम धुडकावले, कधी अन्याय केला, कधी धर्मात कसूर केली. स्वतःच्या सत्तेचा किती गर्व केला, स्वतःला अजिंक्य मानलं, ... आणि ध्यानी मनी नसताना हे क्षणात संपण्याची वेळ आली?
खुद्द राजा असूनही अंत माझ्या ताब्यात नाही?
सुदैवाने वालुकापात्र रिते होण्याआधी सूर्योदय होतो आणि सैनिक येऊन त्याला तातडीने मुक्त करतात. थोड्या वेळात स्वतः राजा जनक त्याच्या कक्षात येतो आणि त्याची विचारपूस करू लागतो.. "झोप लागली  राजन?"
राजा फार क्रोधीत होतो आणि रात्रीचा सगळा प्रसंग सांगतो. जनक परत तेच विचारतो, " झोप लागली राजन?"
राजा चिडून म्हणतो," झोप कशी लागेल? टक्क जागा होतो मी.."
" हे इतकंच आहे राजन. मी जागा असतो;  हीच अध्यात्मिक बैठक."

तेव्हा मला हे कळलं नव्हतं. सतत शेवट डोळ्यासमोर असेल, सरणारा काळ दिसत असेल, तर माणूस किती घाबरेल...भीतीच्या सावटाने झाकोळून जाईल. काही गोष्टी अगदी शाश्वत नसल्या तरी त्यांची दीर्घकालीनता गृहीत धरून तर आपण जगत असतो, जगण्याचे नियोजन करत असतो, निर्णय घेत असतो. भावना बदलत नसतात हे गृहीत धरून प्रेम, मैत्री करतो;  नाती तयार करतो, ती जतन करतो...
सगळंच क्षणभंगुर असेल तर जगायचं कशासाठी ? जे जवळ आहे ते कधीही नाहीसे होऊ शकते, हा विचार आहे ते सुखही भोगू देणार नाही.

परवा एका बाबतीत शेवटाची पुसट चाहूल लागली (ही एक गंमत, चाहूल लागते पण आपण दुर्लक्ष करतो; एक्झिटचा इशारा मिळत असतो पण मन लोचटपणे घुटमळत राहतं..), आणि आधी भीती वाटली. थोड्या वेळाने मात्र विचार सुरू झाले; दुःख झालेच, पण भीती संपून विचार सुरू झाले हे खरं.
 आणि मग ही कथा आठवली... आणि वाटलं, नश्वरता आणि काळाचे भान येणे म्हणजे जाग.
भीती हा त्यातला पहिला टप्पा; तो हिंमत करून ओलांडला की मग या जागे असण्याचे इतर पैलू दिसतात.
आहे ते कायमचे नाही, त्यामुळे काहीही गृहीत धरू नये, जे सांत आहे त्यातून अनंताची अपेक्षा करू नये. नश्वरतेत शाश्वतता शोधू नये, जाणाऱ्या गोष्टींना धरून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये.
 मिळाले त्या क्षणांशी कृतज्ञ राहावे... काळ थांबवण्याचा अट्टाहास करू नये.
 स्वतःला एका उंचीवर पाहतो तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तोलून धरणारे बरेच हात आहेत हे लक्षात ठेवावे, आणि हे हात देखील शाश्वत नाहीत हेही विसरू नये.
लटकती तलवार अशाश्वततेची आहे; तोवर हाताशी असलेल्या वेळेचा कसा वापर करतो ते महत्वाचं ...
ही जाग असली, की मग अट्टाहास कमी होतो; आणि जगणं अनुभवता येतं.  भीतीविरहित आनंदात रमता येतं, दुःखालाही स्वीकारता येतं...

तू कौन है तेरा नाम है क्या..

जग फार तटस्थ असतं, आणि निरपवाद.
आपण स्वतःला आणि स्वतःच्या आयुष्याला फार खास समजायला लागतो कधी कधी;  आपल्याला उगीच वाटतं की आपण काही वेगळे, अपवादात्मक आहोत; आणि आपल्या बाबतीत वेगळे नियम, वेगळा न्याय लावला जाईल.
पण तसे काही नसते... भ्रमनिरास करण्याच्या बाबतीतही जग फार निःपक्षपाती असते.