काही वर्षांपूर्वी जनकाची एक कथा वाचली किंवा ऐकली होती. जनक राजा असला तरी अध्यात्मिक ज्ञानासाठीही प्रसिद्ध होता.
जनकाकडे एक राजा येतो आणि म्हणतो, राजपदावर राहूनही जगण्याला अध्यात्मिक बैठक कशी द्यावी हे मला सांग. जनक म्हणतो आपण उद्या बोलू, आज रात्री विश्रांती घे.
एका उंची कक्षात राजाच्या झोपण्याची सोय केली जाते. रात्री राजाला कसल्याशा चाहुलीने अचानक जाग येते; त्याला जाणवते की सैनिकांनी त्याला मंचकाला बांधून टाकले आहे.
" सूर्योदयाला आम्ही येऊन तुम्हाला मुक्त करू", असे म्हणून, हतबुद्ध राजाला काही विचारायची संधी न देता ते निघून जातात.
आता त्याला दिसते की त्याच्या मंचकाच्या वर छताला एक तलवार टांगलेली आहे जिचे टोक त्याच्यावर रोखलेले आहे आणि तिला ज्या दोरीने बांधले आहे तिच्या दुसऱ्या टोकाला एक वालुकापात्र आहे. जशी वाळू झरत जात आहे तशी ती तलवार खाली खाली येत आहे.
जीव मुठीत धरून राजा रात्रभर तळमळत राहतो. सकाळ आधी होईल की वालुकापात्र आधी रिते होईल या विचाराने त्याचा थरकाप होतो.
भीतीचा भर ओसरल्यावर त्याच्या मनात विचारांची गर्दी होते. सगळं आयुष्य त्याच्याभोवती फेर धरायला लागतं. किती गोष्टी गृहीत धरल्या, किती सल्ले धुडकावून लावले, कधी बेपर्वा वागलो, कधी मैत्री अव्हेरली, कधी प्रेम धुडकावले, कधी अन्याय केला, कधी धर्मात कसूर केली. स्वतःच्या सत्तेचा किती गर्व केला, स्वतःला अजिंक्य मानलं, ... आणि ध्यानी मनी नसताना हे क्षणात संपण्याची वेळ आली?
खुद्द राजा असूनही अंत माझ्या ताब्यात नाही?
सुदैवाने वालुकापात्र रिते होण्याआधी सूर्योदय होतो आणि सैनिक येऊन त्याला तातडीने मुक्त करतात. थोड्या वेळात स्वतः राजा जनक त्याच्या कक्षात येतो आणि त्याची विचारपूस करू लागतो.. "झोप लागली राजन?"
राजा फार क्रोधीत होतो आणि रात्रीचा सगळा प्रसंग सांगतो. जनक परत तेच विचारतो, " झोप लागली राजन?"
राजा चिडून म्हणतो," झोप कशी लागेल? टक्क जागा होतो मी.."
" हे इतकंच आहे राजन. मी जागा असतो; हीच अध्यात्मिक बैठक."
तेव्हा मला हे कळलं नव्हतं. सतत शेवट डोळ्यासमोर असेल, सरणारा काळ दिसत असेल, तर माणूस किती घाबरेल...भीतीच्या सावटाने झाकोळून जाईल. काही गोष्टी अगदी शाश्वत नसल्या तरी त्यांची दीर्घकालीनता गृहीत धरून तर आपण जगत असतो, जगण्याचे नियोजन करत असतो, निर्णय घेत असतो. भावना बदलत नसतात हे गृहीत धरून प्रेम, मैत्री करतो; नाती तयार करतो, ती जतन करतो...
सगळंच क्षणभंगुर असेल तर जगायचं कशासाठी ? जे जवळ आहे ते कधीही नाहीसे होऊ शकते, हा विचार आहे ते सुखही भोगू देणार नाही.
परवा एका बाबतीत शेवटाची पुसट चाहूल लागली (ही एक गंमत, चाहूल लागते पण आपण दुर्लक्ष करतो; एक्झिटचा इशारा मिळत असतो पण मन लोचटपणे घुटमळत राहतं..), आणि आधी भीती वाटली. थोड्या वेळाने मात्र विचार सुरू झाले; दुःख झालेच, पण भीती संपून विचार सुरू झाले हे खरं.
आणि मग ही कथा आठवली... आणि वाटलं, नश्वरता आणि काळाचे भान येणे म्हणजे जाग.
भीती हा त्यातला पहिला टप्पा; तो हिंमत करून ओलांडला की मग या जागे असण्याचे इतर पैलू दिसतात.
आहे ते कायमचे नाही, त्यामुळे काहीही गृहीत धरू नये, जे सांत आहे त्यातून अनंताची अपेक्षा करू नये. नश्वरतेत शाश्वतता शोधू नये, जाणाऱ्या गोष्टींना धरून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये.
मिळाले त्या क्षणांशी कृतज्ञ राहावे... काळ थांबवण्याचा अट्टाहास करू नये.
स्वतःला एका उंचीवर पाहतो तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तोलून धरणारे बरेच हात आहेत हे लक्षात ठेवावे, आणि हे हात देखील शाश्वत नाहीत हेही विसरू नये.
लटकती तलवार अशाश्वततेची आहे; तोवर हाताशी असलेल्या वेळेचा कसा वापर करतो ते महत्वाचं ...
ही जाग असली, की मग अट्टाहास कमी होतो; आणि जगणं अनुभवता येतं. भीतीविरहित आनंदात रमता येतं, दुःखालाही स्वीकारता येतं...

No comments:
Post a Comment