Wednesday 10 March 2021

बालके आणि लैंगिक गुन्हे २

 मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे पॉक्सो कायद्यानुसार पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी गुन्ह्याची माहिती मिळाल्याच्या चोवीस तासांच्या आत करण्याचे बंधन पोलिसांवर असते. 

डॉक्टरांनी तपासणीविषयी सविस्तर माहिती देऊन बालक आणि पालकांची तपासणीसाठी संमती घ्यायची असते. मुलाला कमीत कमी त्रास होईल, प्रायव्हसी जपली जाईल, याची व्यवस्थित काळजी घेऊन तपासणी केली जाते. मुलगी असेल तर महिला डॉक्टर तपासणी करते. बालकाला त्याला कळेल अशा भाषेत तब्येतीच्या तक्रारी विचारल्या जातात. मग शरीरावर कुठे जखमा असतील तर त्यांची सविस्तर नोंद केली जाते. लघवीची जागा काळजीपूर्वक तपासली जाते; इन्फेक्शनची लक्षणे, फॉरेन बॉडी नाही ना, याची खातरजमा करतात. तसेच फॉरेन्सिक तपासणीसाठी सॅम्पल घेतले जातात. कपड्यांवर डाग असल्यास तेही फॉरेन्सिक लॅबला पाठवले जातात. शी ची जागा तपासली जाते. तसेच तोंडही जखमांसाठी तपासले जाते. ही सगळी तपासणी हळुवारपणे, मुलाला जास्त वेदना होणार नाहीत याची काळजी घेत केली जाते. मूल घाबरल्यास, नकार देत असल्यास थोडं थांबून, समजूत घालून थोड्या वेळाने तपासणी पूर्ण करतात. मुलासोबत धीर देण्यासाठी पालक थांबू शकतात.

तपासणी झाल्यावर इजेनुसार उपचार केले जातात. इन्फेक्शनची शक्यता दिसल्यास त्यानुसार औषधं दिली जातात. तसेच मुलगी जननक्षम वयाची असेल तर गर्भ राहण्याची शक्यता लक्षात घेऊन इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. एखादी जखम मोठी असल्यास टाके घातले जातात. 

सिंगल इंसिडन्स, म्हणजे एकदाच गुन्हा घडला असेल आणि लगेच मूल तपासणीसाठी आणलं गेलं असेल तर निदान तुलनेने सोपे असते आणि तपासणीत, सॅम्पलमधून  पुरावेही सापडतात.

पण गुन्हा जुना असेल, वारंवार घडत आलेला असेल तर गुंतागुंत वाढते. ताज्या जखमांएवजी जुने व्रण दिसू शकतात. कधी कधी इन्फेक्शनची लक्षणे असतात, लघवीला जळजळ होते अशी तक्रार असते, तर कधी काहीच सब्स्टँशियल सापडत नाही. मुलगी असेल तर हायमेन टियर वरून कल्पना येऊ शकते. अशा केसेसमध्ये फार काळजीपूर्वक तपासणी करावी लागते.

मूल मानसिक धक्क्यात असेल तर मानसोपचार तज्ज्ञाची सोय केली जाते. 

तपासणीचा अहवाल काटेकोरपणे भरून तपास अधिकाऱ्यांना दिला जातो जे तो पुढे मॅजिस्ट्रेटकडे सादर करतात.


दुर्दैवाने मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार जास्त करून रिपीटेड ऑफेन्स प्रकारातले असतात आणि ओळखीच्या, संपर्कातल्या व्यक्तीकडून केले जातात. अशावेळी पालकांना हे कळल्यानंतर कितीही वेदनादायी परिस्थिती असली तरी त्यांनी मुलांसमोर भीती प्रकट करू नये. मूल आधीच दहशतीखाली वावरत असते; बहुतांश वेळा गुन्हेगार, "तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन", अशी धमकी देतात. अशावेळी आई वडील घाबरलेले दिसले की मुलं काहीच बोलत नाहीत, कोषात जातात. मुलांना आधी सगळे सुरक्षित आहेत, आई वडील स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना कुणी इजा पोहोचवू शकत नाही असा विश्वास  वाटावा लागतो, मग ते ओपन अप होतात. 

दुसरं म्हणजे कधीच भरून न येणारं नुकसान झालं, असा दृष्टिकोन ठेवू नये, आणि मुलांसमोर तर कधीच तसं व्यक्त होऊ नये. मुलं संभ्रमित असतात, दुखावलेली, घाबरलेली असतात, पण त्याचवेळी आपला दृष्टिकोन सकारात्मक, बळ देणारा असेल तर ती लवकर सावरतात सुद्धा. आपल्या बाबतीत काहीतरी भयंकर किळसवाणा प्रकार घडला आहे, आपलं शरीर कायमचं  pollute झालं असं त्यांना वाटलं तर मानसिक समस्या वाढतात.

लहान मुलांच्या बाबतीत कुठलाही लैंगिक व्यवहार घडला की गुन्हा दाखल होतोच; इथे पालक आम्हाला तक्रार करायची नाही अशी भूमिका घेऊ शकत नाहीत. आपल्या कुटुंबात, किंवा नातेवाईक, मित्रपरिवारात  कुणाच्याही बाबतीत असा प्रसंग उद्भवल्यास पॅनिक मोडमध्ये न जाता शांतपणे आणि चौकसपणे सगळी प्रक्रिया नीट फॉलो केली जातेय याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच मुलांसमोर धीरोदात्त राहणे अतिशय गरजेचे आहे. 

एरवीही जर कुठले मूल खेळकरपणा सोडून अचानक अबोल झाले असेल, बाहेर जायला घाबरत असेल, विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट व्यक्तीसोबत जायला काहीतरी कारणं सांगून नकार देत असेल, लघवीला त्रास होत असल्याची वारंवार तक्रार करत असेल, तुम्ही न आणलेली नवीन खेळणी किंवा खाऊ त्याच्याकडे सारखा सापडत असेल, त्याच्या/ तिच्या कपड्यांवर संशयास्पद डाग दिसले असतील,  तर सावध होऊन थोडी विचारपूस करणं गरजेचं असतं.

सेक्शुअल अब्युज होत असल्यास योग्य ती कायदेशीर प्रक्रिया फॉलो करणे आवश्यक. यात गुन्हेगाराला कडक शिक्षा करणे हे न्यायसंस्थेचे काम; पण अशा प्रक्रियेत आपण सामील असल्यास बालकाच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. असा प्रसंग शरीर-मनावर खोल आघात करणारा असतो हे अगदी मान्य; पण ही कधीच न भरू शकणारी भळभळणारी जखम आहे असा दृष्टिकोन न ठेवता 'काळ हेच औषध' यावर विश्वास ठेवून, जसं एखाद्या मोठ्या अपघात किंवा आजारातून आपण प्रयत्नपूर्वक बाहेर येतो, तसे या दुर्घटनेतूनही नक्की येऊ शकतो, हा मोठ्यांचा अप्रोच हवा. मुलं सेन्सिटिव्ह असतात, तशीच ती resilient ही असतात. त्यांनी लवकरात लवकर normalcy कडे यावं यासाठी प्रयत्न करणे सगळ्यात महत्वाचे आहे.


पुढच्या भागांमध्ये महिलांशी निगडित गुन्हे डिस्कस करण्याचा प्रयत्न करेन

बालके आणि लैंगिक गुन्हे १

 या विषयावर लिहावं की नाही या बाबतीत बरेच दिवस द्विधा मनस्थिती होती, कारण विषयाची संवेदनशीलता, आणि याविषयी वाचन करताना येणारी अस्वस्थता. अशा घटना पाहताना एक तिऱ्हाईत व्यक्ती असून सुद्धा त्रास होतो. एका रेप व्हीक्टिमची पहिल्यांदा तपासणी पाहिली रेसिडेन्सीत, तेव्हा कितीतरी रात्री झोपू शकले नव्हते, सारखी भीती वाटायची. पण ओव्हर द टाईम हेही लक्षात आलं की याबद्दल कुणाला फारशी तांत्रिक माहिती नसते;  चुकून दुर्वर्तनच्या कक्षेत बसेल अशी काही दुर्घटना घडली, तर काय करायचं, पुढची प्रक्रिया कशी असते, याबद्दल काही माहीत नसतं.

या सगळ्या प्रक्रियेची अजिबात ओळख नसेल तर कुठल्याही न्यायिक प्रक्रियेत भाग घ्यावा लागला, तर तांत्रिक चुका होतात. त्याचे दुष्परिणाम केसवर होतात. त्यामुळं Information is the best weapon against fear of the unknown,  या तत्वाला अनुसरून स्त्रियांवर होणारे लैंगिक गुन्हे या संबंधी वैद्यकीय अनुषंगाने लिहत आहे. कायदेशीर कलमांबद्दल मला मर्यादित स्वरूपाची माहिती आहे, पण त्याविषयीही शक्य तितकी अचूक माहिती देण्याचा प्रयत्न असेल. 

ही माहिती खरोखर गरजेची आहे का, अशी वेळ आपल्यावर थोडीच येणार आहे, असं वाटू शकतं... मला आमच्या भागात १९९३ साली अकल्पितपणे झालेला भूकंप आठवतो. नंतर अशी चर्चा झाली की भूकंप येतो तेव्हा काय करायचं, हे माहीत असतं तर जीवितहानी कमी झाली असती. 

अशा घटना कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत; पण दुर्दैवाने आपल्या आसपास असे काही घडले तर informed असण्याने मदत होईल. 


सुरुवातीला लहान मुलांबद्दल बद्दल चर्चा करू.

२०१२ साली आलेल्या POCSO( Protection of children from sexual offences) कायद्यानुसार  बालकाशी करण्यात आलेला कोणत्याही प्रकारचा लैंगिक व्यवहार हा गुन्हा आहे( इथे बालक म्हणजे मुलगा मुलगी दोन्ही, आणि वय अठरा वर्षांहून कमी), आणि असा गुन्हा करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. यात बलात्काराच्या विस्तृत परिभाषेचा समावेश आहे .  विनयभंग, लैंगिक छळ करण्याच्या हेतूने स्पर्श करणे, पाठलाग करणे, लैंगिक गुन्ह्यात मदत करणे, अशा गुन्ह्याची माहिती लपवणे, या गोष्टींसाठीही शिक्षेची तरतूद आहे. तसेच बालकांचा समावेश असलेली पोर्नोग्राफी तयार करणे, पाहणे, असे साहित्य जवळ बाळगणे हाही गुन्हा आहे. 

ह्या कायद्यान्वये तक्रार नोंद करतेवेळी पीडित बालकाची तक्रार शक्यतो महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फत नोंदविली जाते. पीडित बालकाचे नाव गुप्त ठेवले जाते. बालकाला रात्री पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवले जात नाही. बालकाची वैद्यकीय तपासणी त्याच्या आणि  पालकांच्या संमतीने केली जाते. पीडित बालकाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून त्यास विश्वासाहर्ता वाटेल, अशा वातावरणात खटले चालविले जातात. तसेच पुनर्वसन आणि नुकसान भरपाई या संबंधीची तरतूदही आहे


एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला असल्याची तक्रार असल्यास पोलिसांनी त्याची/ तिची तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यायची असते( जास्तीत जास्त २४ तासांच्या आत). त्यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरकडे नेले जाते. शासकीय रुग्णालय नसल्यास खाजगी रुग्णालयातले डॉक्टरही तपासणी करू शकतात. अशी केस आल्यास निःशुल्क तपासणी आणि प्राथमिक उपचार करणे सर्व डॉक्टरांवर बंधनकारक आहे.

बालक मुलगी असल्यास महिला डॉक्टरांनी तपासणी करणे अनिवार्य आहे. तपासणीसाठी बालकाची आणि पालकांची पूर्वसंमती घेतली जाते. 

वैद्यकीय तपासणी बद्दल पुढच्या भागात सविस्तर माहिती देते.

Monday 1 March 2021

जेथे जातो तेथे ...

 काही गाणी बऱ्याचदा कानावर पडत असतात, आपण ऐकत असतो, पण कधीतरी अवचित ती उलगडतात, किंवा किमान समजून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.

' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती', ने सध्या ताबा घेतलाय. तुकारामांचा हा अभंग देवाला उद्देशून असला तरी आपल्याला  कधी स्थूलरूपात तर कधी  सूक्ष्मरूपात सोबत करणारं कुणी ना कुणी आठवतं ! 

शेवटच्या ओळींमध्ये  जेव्हा तुकोबा म्हणतात, 

" तुका म्हणे आता खेळतो कौतुके

जाले तुझे सुख अंतर्बाही "

... तेव्हा चालणे, बोलणे शिकवून त्या मायबापाने या संसाराच्या खेळासाठी आता तयार केलंय, आणि त्याचं सुख आता कायमसाठी अंतर्बाह्य झिरपलं आहे, असं वाटतं ! 

तरी या अभंगात काहीतरी आहे जे कळत नाहीय असं वाटत राहतं ; श्रीनिवास खळ्यांच्या गूढरम्य चालीचा परिणाम आहे की काय कोण जाणे!

या अभंगाचे निरूपण मिळेल आणि समज थोडी तरी वाढेल या आशेने नेटवर शोधलं पण काही विशेष सापडले नाही.  पण एक वेगळी रोचक माहिती मिळाली. १९३० मध्ये येरवडा तुरुंगात असताना गांधीजींनी तुकारामाच्या काही अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता म्हणे. त्यात हा अभंगही आहे !


Jethe jato tethe tu maajha saangaati


Wherever I go, Thou art my companion. 

Having taken me by the hand Thou movest me.

 I go alone depending solely on Thee. 

Thou bearest too my burdens.

 If I am likely to say anything foolish, Thou makest it right. 

Thou hast removed my bashfulness and madest me self-confident, O Lord. 

All the people have become my guards, relatives and bosom friends. Tuka says: I now conduct myself without any care. I have attained divine peace within and without.

22-10-1930

अशी माणसे येती ... २

 मघाशी माझ्या पोस्टमध्ये मी पेशंट्स आणि नातेवाईक यांचे काही अनुभव शेअर केले; तसा हेतू नसतानाही पोस्ट थोडी नकारात्मक झाली, my bad... जीवन आणि मृत्यूशी थेट संबंध असणारे फिल्ड असल्यामुळे वातावरण तणावाचे असते आणि त्यामुळं कधीकधी लोक नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने रिऍक्ट होतात. पण जाणीवपूर्वक, मुद्दाम त्रास देणाऱ्यांची संख्या तशी कमी असते. अनेक चांगले अनुभवही गाठीशी आहेत. बरेचजण व्यवस्थित सहकार्य करतात, सूचना पाळतात, आणि विश्वास ठेवतात. काही नातेवाईक इतर पेशंट्सनाही मदत करतात. पूर्ण बिल भरू न शकणारे काहीजण नंतर आठवणीने उरलेले बिल भरायला येतात. व्यावसायिक नात्याच्या पल्याड जाऊन कृतज्ञता मानणारी, प्रेमादराने वागवणारी खूप लोकं आहेत.

एका कमेंटमध्ये धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरं जाणाऱ्या लोकांचा विषय निघाला आणि मग विचार केल्यावर लक्षात आले की आपल्या स्वतःच्या आयुष्यातही जर मोठं आजारपण आलं, मृत्यूची चाहूल लागली,  तर काय करावं याचा वस्तुपाठ देणारीही काही उदाहरणं आहेत.

 

आम्ही प्रॅक्टीसमध्ये तसे नवीन होतो तेव्हा एक साठीचे गृहस्थ आपल्या बायकोला ऍडमिट करायला घेऊन आले. ती सिरीयस होती; तपासल्यावर आम्ही गंभीर्याची कल्पना दिली आणि त्यांची इच्छा असल्यास दुसरीकडे शिफ्ट करू शकता असंही सांगितलं. त्यावर ते म्हणाले, तुम्ही मनापासून प्रयत्न करताय हे दिसतंय; यश परमेश्वराच्या हातात आहे, द्यायचं तर तो तुमच्या हातूनही देईल. त्यांनी विश्वास दाखवला आणि मग आमचाही आत्मविश्वास वाढला. पेशन्ट ठणठणीत होऊन घरी गेली.

दुसरी एक पन्नाशीची स्त्री दाखवायला आली तेव्हा कर्करोगाच्या शेवटच्या स्टेजला होती. आम्हाला म्हणाली थोडं सलाईन वगैरे लावा आणि एक दिवसापुरता थकवा येणार नाही अशी सोय करा, एक कार्यक्रम ठेवलाय घरी. मी तर चिडले आणि म्हणाले इतक्या आजारी असताना कार्यक्रम कसले करताय? त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आहे आणि जे लोक आयुष्याचा वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना भेटले, ज्या लोकांमुळे जगणं आनंददायी झालं, त्या सगळ्यांना शेवटचं भेटायचं आहे आणि तेही आनंदाने, दुःखाचे सावट पडण्यापूर्वी... 

अजून एक परिचित असेच टर्मिनली आजारी पडले तेव्हा त्यांनी सगळ्या व्यावहारिक बाबी क्लियर केल्या. बायको आणि मुलांना सगळ्या आर्थिक बाबींची माहिती दिली, नॉमिनेशन वगैरे ठीक आहेत हे बघितलं. 

एका जोडप्याला त्यांची मुलगी गमवावी लागली; बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी प्रयत्न करूनही त्यांना डोनर मिळाला नव्हता. त्यांनी नंतर स्वतःचे ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशनचे फॉर्म्स भरले. एका आरोग्य निगडित स्वयंसेवी संस्थेत जमेल तितका वेळ काम करायलाही सुरुवात केली.


आजारपण, मृत्यू या गोष्टी माणसाला obviously भयंकर वाटतात आणि साहजिकच माणसं अतिभावनिक होतात, कधीकधी विचित्रही वागतात. पण तरीही They're only as good as the world allows them to be,  हे म्हणणं खोटं ठरवणारी माणसं अधूनमधून भेटत राहतात आणि आयुष्यावरचा विश्वास दृढ होतो; आणि आपण जे काम करतो ते worthy वाटतं !

अशी माणसे येती ... १



स्वतःचे आणि जवळच्या व्यक्तीचे आजारपण,  याला बहुरूपी मनुष्यप्राणी इतक्या विविध प्रकारे रिऍक्ट होतो की घटा- घटांचे रूप आगळे याची वारंवार प्रचिती येते ! 

आमच्या एक जवळच्या नातेवाईक ताई जिवाला फार घाबरतात. अशात त्यांना हाय बीपी डिटेक्ट झाला आणि त्यांनी फारच टेन्शन घेतलं. सतत आता याचे काय काय दुष्परिणाम होतील, हार्ट अटॅक येईल का, मेंदूत रक्तरस्त्राव होईल का.. अनेक कुशंका आणि टेन्शन, त्यामुळे घाबरून जायच्या आणि  बीपी अजून वाढायचा. काल त्यांची धाकटी सून म्हणाली  एकूण अवघड दिसतंय तुमचं, तर विल करता का, किंवा तुमच्याकडे इतके दागिने, साड्या आहेत... अमच्यासारख्यांना देऊन टाका थोडंबहुत तरी.... 

ताई आता चिडल्यात; पण चिडण्याच्या नादात घाबरणं जरा बाजूला पडलंय आणि ब्लडप्रेशर थोडं कमी झालंय !


अजून एक आस्थमाचे पेशंट आहेत;  तपासण्या सांगितल्या की खूप संशय घेतात. काही दिवसांपूर्वी आले तेव्हा कोविड टेस्ट करावी लागली. सुदैवाने रिपोर्ट निगेटिव्ह आला; पण काका बोलले, उगीच फुकट खर्च झाला, वाया गेले माझे पैसे! 

पेशंट्स सोबतचे नातेवाईकही वेगवेगळ्या प्रकारे परिस्थितीला सामोरं जातात. एक वहिनी आहेत; कुटुंबातले कुणीही आजारी झाले की याच गलितगात्र होतात. मग स्वैपाकाचं डिपार्टमेंट बंद पडतं, आणि घरातल्यांना मूळ पेशंट आणि हा वाढीव पेशंट, अशा दोघांची काळजी घ्यावी लागते!

मध्ये एकजण भेटायला आले ते वडिलांचे पासबुक घेऊनच; म्हणाले माझी आर्थिक परिस्थिती बेतास बात आहे, वडिलांची इतर काळजी घेऊ शकतो पण खर्च नाही करू शकणार, तेव्हा त्यांच्या इतक्या पैशांत जितकं बसवता येईल तितकं बसवा ...

अजून एक स्वघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत.. परिसरातले किंवा नात्यातले कुणी आजारी पडले की उत्साहाने हॉस्पिटलला घेऊन येतात; पहिल्या दिवशी, " बिलाची काळजी करू नका, मी आहे" असं म्हणतात, शेवटच्या दिवशी बिलावरून वाद घालतात, आणि मग स्वतःच,   "काहीतरी मांडवली करू, तुमचा पण जास्त नुकसान नको,"  म्हणत कमी केलेलं बिल पेशंटला भरायला सांगतात. सिरीयस पेशंट असला की त्यांना निकालाची भारी उत्सुकता असते; "म्याडम विकेट पडणार की राहणार पटदिशी सांगा, उगा नळ्या अन ते चुक चुक( मॉनिटर) लावून बिल वाढवू नका..." हे ठरलेलं वाक्य.

पेशंट जास्तच क्रिटिकल असेल तर यांची पुढची घाई.. "ते डेथ चं सर्टिफिकेट लवकर लिहायला पायजे, ते लागतं तिकडं स्मशानात ..."

अहो साहेब, डेथ होईपर्यंत तरी दम धरा, मगच देता येईल ना, असं म्हणून त्यांचा वारू रोखावा लागतो !

कोविड काळात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंट्सच्या नातेवाईकांनाही खूप तणावपूर्ण परिस्थितीतून जावं लागलं, काहीजणांना कठीण निर्णय घ्यावे लागले; त्यातही लोकांची cope करण्याची पद्धत निरनिराळी होती... ते परत कधीतरी !

तिन्हीसांजा ...

 #ये_शाम


चहाचा कप हातात घेऊन बसण्याची ठरलेली खुर्ची असते. दिवेलागणीची वेळ; हॉलच्या बाल्कनीला लावलेल्या मोठ्या काचेतून समोरच्या इमारतीचे उजळ होत जाणारे चौकोन दिसायला लागतात. काही चौकोन पर्दानशीन असतात. बसल्या जागेवरून एका खाली एक असे दोन बेनकाब चौकोन आणि त्यांच्या डावीकडे  एक अंधारा उभा पट्टा सोडून दोन जिने दिसतात. 

वरच्या चौकोनात दिसणारी भिंत गडद विटकरी रंगाची आहे, त्यावर एक वॉल माउंटेड टीव्ही आहे. त्यातली चित्रं सारखी हलत असतात; आवाजही मोठा असावा, पण तो माझ्यापर्यंत पोहोचत नाही.

खालच्या चौकोनातली भिंत फिक्या रंगाची आहे; क्रीम किंवा हलका पिस्ता असावा. त्यावरही एक टीव्ही आहे. त्यातली चित्रं त्या मानाने स्थिर असतात; कधीकधी ब्लॅक अँड व्हाइट असतात. जुनी गाणी असावीत असं इथून पाहताना वाटतं... नूतन देवानंद आठवतात; भारत भूषण मधुबाला सुद्धा...

चहा संपवून परत समोर नजर टाकेपर्यंत खालच्या चौकोनातला टीव्ही बंद झालेला असतो. दोन तीन मिनिटांत वरच्या चौकोनातली भिंतही शांत स्थिर होते. 

वरच्या जिन्यात दोन आकृत्या दिसतात; एक मोठी, आणि तिच्या हाताला थोडं ओढत, उड्या मारत जिना उतरणारी एक छोटी.

खालच्या जिन्यातही दोन आकृत्या दिसतात; एक वाकलेली, आणि तिचा हात हातात धरून सावकाश जिना उतरणारी एक जरा कमी वाकलेली... 

तिन्हीसांजेचा उंबरठा ओलांडून रात्रीने अंधाराच्या प्रदेशात पाऊल ठेवलेलं असतं...

जीवनगाणे !

 वैद्यकीय पार्श्वभूमी असलेली 'House MD'' नावाची सिरीज आहे, त्यात प्रत्येक एपिसोडमध्ये कथेनुरूप एखादं गाणं येतं ... फार मस्त अर्थपूर्ण गाणी आहेत.

एक गाणं फार आवडलं आणि फार लक्षात राहिलं..अतिशय आजारी पण आशावादी असणाऱ्या मुलीवर एक एपिसोड होता, त्यात हे गाणं होतं.


सगळं सुरळीतपणे सुरू असताना अचानक आयुष्यात व्याधी येते.... किरकोळ, गंभीर, जीवघेणी, अशा कितीतरी रूपांत. आजारानुसार शारीरिक, मानसिक त्रास, वेदना, खर्च, अशी बरीच संकटं एकाचवेळी अंगावर चालून येतात.

जोडीला असते भय; "ऑपरेशनच्या टाक्यांचे व्रण राहतील का?", इथपासून ते "परत उभं राहू शकेन, कामावर रुजू होऊ शकेन का?", इथपर्यंत. 

सगळ्यात मूलभूत भय मृत्यूचे... ज्या जगातून तात्पुरते बाजूला फेकले गेलोय त्या जगात परत जाऊ शकू का, हा प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न; आजाराच्या गांभिर्यानुसार कधी क्षणिक तर कधी भरपूर रेंगाळणारा. 

दुसरा एक प्रश्न,  सगळ्या नव्हे पण काही मनांमध्ये तरी नक्की उमटणारा... परत गेलेले आपण तेच असू की वेगळे? मृत्यूला हुलकावणी देता आली तरी त्याचे वार कधीकधी मागे राहतात; कधी अपंगत्व, कधी एखादा अवयव काढावा लागल्यामुळे आलेली कुरुपता, कधी मानसिक आघात, कधी उरलेले आयुष्य गोळ्या औषधांच्या आधाराशिवाय काढता येणार नाही अशी परिस्थिती... रुग्णालय नावाच्या वास्तूत आलेली व्यक्ती आणि तिथून बाहेर पडणारी व्यक्ती तंतोतंत तीच नसते खूपदा; कधी किरकोळ कधी प्रचंड बदललेली असते.


इतरांचा आधार फसवा असतो. स्वतःचे नवे रूप स्वीकारून परत सुरुवात करणे; वारामुळे झालेल्या जखमा टोकरत बसायचं, की हळूहळू भरतील यावर विश्वास ठेवून खपली धरू द्यायची, यापैकी एका निर्णयाची निवड करणे; हे स्वतःचं स्वतःलाच करावं लागतं.

'We're the song inside the tune

Full of beautiful mistakes'  हे ब्रीदवाक्य मनात ठेवून, आयुष्य सुंदर आहे आणि म्हणून ते अनुभवणारे आपणही अंतरबाह्य सुंदर असणार,  यावर विश्वास ठेवता यायला हवा बस्स...!


' Every day is so wonderful

Then suddenly it's hard to breathe

Now and then I get insecure from all the pain

I'm so ashamed


I am beautiful no matter what they say

Words can't bring me down

I am beautiful in every single way

Yes, words can't bring me down

So don't you bring me down today


No matter what we do

No matter what we say

We're the song inside the tune

Full of beautiful mistakes


And everywhere we go

The sun will always shine

Tomorrow we might wake up on the other side

All the other time

We are beautiful in every single way..'