स्वतःचे आणि जवळच्या व्यक्तीचे आजारपण, याला बहुरूपी मनुष्यप्राणी इतक्या विविध प्रकारे रिऍक्ट होतो की घटा- घटांचे रूप आगळे याची वारंवार प्रचिती येते !
आमच्या एक जवळच्या नातेवाईक ताई जिवाला फार घाबरतात. अशात त्यांना हाय बीपी डिटेक्ट झाला आणि त्यांनी फारच टेन्शन घेतलं. सतत आता याचे काय काय दुष्परिणाम होतील, हार्ट अटॅक येईल का, मेंदूत रक्तरस्त्राव होईल का.. अनेक कुशंका आणि टेन्शन, त्यामुळे घाबरून जायच्या आणि बीपी अजून वाढायचा. काल त्यांची धाकटी सून म्हणाली एकूण अवघड दिसतंय तुमचं, तर विल करता का, किंवा तुमच्याकडे इतके दागिने, साड्या आहेत... अमच्यासारख्यांना देऊन टाका थोडंबहुत तरी....
ताई आता चिडल्यात; पण चिडण्याच्या नादात घाबरणं जरा बाजूला पडलंय आणि ब्लडप्रेशर थोडं कमी झालंय !
अजून एक आस्थमाचे पेशंट आहेत; तपासण्या सांगितल्या की खूप संशय घेतात. काही दिवसांपूर्वी आले तेव्हा कोविड टेस्ट करावी लागली. सुदैवाने रिपोर्ट निगेटिव्ह आला; पण काका बोलले, उगीच फुकट खर्च झाला, वाया गेले माझे पैसे!
पेशंट्स सोबतचे नातेवाईकही वेगवेगळ्या प्रकारे परिस्थितीला सामोरं जातात. एक वहिनी आहेत; कुटुंबातले कुणीही आजारी झाले की याच गलितगात्र होतात. मग स्वैपाकाचं डिपार्टमेंट बंद पडतं, आणि घरातल्यांना मूळ पेशंट आणि हा वाढीव पेशंट, अशा दोघांची काळजी घ्यावी लागते!
मध्ये एकजण भेटायला आले ते वडिलांचे पासबुक घेऊनच; म्हणाले माझी आर्थिक परिस्थिती बेतास बात आहे, वडिलांची इतर काळजी घेऊ शकतो पण खर्च नाही करू शकणार, तेव्हा त्यांच्या इतक्या पैशांत जितकं बसवता येईल तितकं बसवा ...
अजून एक स्वघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत.. परिसरातले किंवा नात्यातले कुणी आजारी पडले की उत्साहाने हॉस्पिटलला घेऊन येतात; पहिल्या दिवशी, " बिलाची काळजी करू नका, मी आहे" असं म्हणतात, शेवटच्या दिवशी बिलावरून वाद घालतात, आणि मग स्वतःच, "काहीतरी मांडवली करू, तुमचा पण जास्त नुकसान नको," म्हणत कमी केलेलं बिल पेशंटला भरायला सांगतात. सिरीयस पेशंट असला की त्यांना निकालाची भारी उत्सुकता असते; "म्याडम विकेट पडणार की राहणार पटदिशी सांगा, उगा नळ्या अन ते चुक चुक( मॉनिटर) लावून बिल वाढवू नका..." हे ठरलेलं वाक्य.
पेशंट जास्तच क्रिटिकल असेल तर यांची पुढची घाई.. "ते डेथ चं सर्टिफिकेट लवकर लिहायला पायजे, ते लागतं तिकडं स्मशानात ..."
अहो साहेब, डेथ होईपर्यंत तरी दम धरा, मगच देता येईल ना, असं म्हणून त्यांचा वारू रोखावा लागतो !
कोविड काळात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंट्सच्या नातेवाईकांनाही खूप तणावपूर्ण परिस्थितीतून जावं लागलं, काहीजणांना कठीण निर्णय घ्यावे लागले; त्यातही लोकांची cope करण्याची पद्धत निरनिराळी होती... ते परत कधीतरी !
No comments:
Post a Comment