#राजनीती_राजकारण_सत्ताकारण
आजोबा दूरदर्शनवर बातम्या बघत दोरवाती वळायचे. माणसाला एखाद्या विषयातलं काही कळत असलं, की त्याला ते सांगावं वाटतं, आणि आप्पांना राजकारणातले बारकावे कळायचे. मग त्यांची हक्काची श्रोता म्हणजे मी असायचे. त्यांच्या विश्लेषणाला ते 'बातमीमागची खरी बातमी' म्हणायचे. त्यामुळं मलाही राजकारण हा विषय इंटरेस्टिंग वाटू लागला. त्या दोरवातींचे उदाहरण देऊन ते म्हणायचे, "हा कापूस इतका ताणता यायला हवा की त्याची पातळ दोरी होईल, पण तुटण्याइतका मात्र ताणू द्यायचा नाही... नेत्यांना समाजात नवीन काही घडवून आणायचं असेल तर असा अप्रोच हवा".
नेटफलिक्सवर ' बोर्गेन (Borgen)' नावाची डॅनिश सिरीज पाहताना मला अचानक हे सगळं आठवलं.
राजकारणावर बेतलेल्या कलाकृती बऱ्याचदा सनसनाटी असतात आणि हिरो/व्हिलन या साच्यात फिट केलेल्या. बोर्गेन मात्र सुखद अपवाद... डॅनिश पार्श्वभूमीवर असलेली ही मालिका राजकारण आणि governence यातले बरेच बारकावे उलगडते. त्याचवेळी बदल घडवताना, नवीन कायदे आणताना होणारे फ्रिक्शन दाखवते.
डेन्मार्क हा विकसित आणि सधन देश आहे, लोकसंख्या कमी; त्यामुळं आपल्याकडच्या परिस्थितीशी तुलना केली तर बरेच फरक आहेत. त्यात त्यांची लोकशाही दीडशे वर्षांहून जास्त जुनी आहे.
पण काही एपिसोड्स बघताना आपल्या देशातील, राज्यातील तशाच प्रकारचे प्रश्न आणि विषय हटकून आठवतात आणि काही गोष्टी युनिव्हर्सल असतात हे जाणवतं; उदा. स्थलांतरितांचा प्रश्न, निर्विवाद बहुमत नसल्यावर होणाऱ्या युती आणि तडजोडी, पत्रकारितेचे मीडिया ट्रायलसारखे धोकादायक पैलू, आणि राजकीय विचारधारेत असणारे मूलभूत मतभेद बाजूला ठेवून होणारे गठबंधन.
सारांश सांगायचा तर एका राजकारणी स्त्रीची ही गोष्ट. पहिल्या दोन सिझन्समध्ये coalition सरकार बनवण्याच्या वाटाघाटींमध्ये अनपेक्षितपणे लाभलेले प्रधानमंत्रीपद, ते पार पाडताना येणारी आव्हानं, ती पेलताना राजकारणात मुरब्बी होत जाणं; आणि त्याचसोबत व्यस्ततेमुळे वैयक्तिक, कौटुंबिक आघाडीवर होणारे परिणाम, हा प्रवास आहे.
तिसऱ्या सिजनमध्ये पायउतार झाल्यानंतरची परिस्थिती, मग वेगळ्या पद्धतीने पुनरागमन आणि त्याची परिणिती, हा भाग आहे.
या व्यतिरिक्त एका न्यूज चॅनेलमध्ये होणाऱ्या घडामोडी आणि स्पिन डॉक्टर नावाने ओळखले जाणारे राजकीय मदतनीस, हे ट्रॅक्स बरंच भाष्य करत राहतात.
कथा रोचक आहेच पण त्या पलीकडे जाऊन काही मूलभूत मुद्दे जाणवतात आणि मनात काही प्रश्न येतात; म्हणून ही सिरीज जास्त आवडली.
- सत्ता राबवताना, एखादी संकल्पना प्रत्यक्षात आणताना, करावी लागणारी तडजोड किती मर्यादेपर्यंत रास्त मानावी? धंदेवाईक दृष्टिकोनातून राजकारण करणारे सोडून देऊ; पण काही तत्व मानून, काही धोरणं आखून राजकारणी व्यक्ती सत्तेत येतात, तेव्हा इम्प्लेमेन्टेशन करताना काय अप्रोच असायला हवा? बहुमत म्हणजे एकमत नव्हे; मग अल्पमत दुर्लक्षित करावं की सर्वसहमती साधावी? ती साधताना आपल्या मूळ धोरणांना किती मुरड घालावी? ती मर्यादा ठरवताना कुठले क्रायटेरिया वापरावेत?
Ends justify the means हे कितपत समर्थनीय असते? क्रांती म्हणजे नेमकं काय?
"Politics is war without bloodshed. War is politics with bloodshed. युद्ध जिंकलं तर करणारा नेता म्हणवतो, हरलं तर दहशतवादी," असे आपल्या राजकीय हिंसेचे समर्थन एक आंदोलक करतो जो एक प्रसिद्ध कवीही असतो( तो स्वतःला आंदोलक म्हणवत असतो पण त्याच्या सरकारच्या मते तो दहशतवादी असतो). राजकीय हिंसा यशस्वी झाली तर क्रांती आणि अयशस्वी झाली तर दहशतवाद असे म्हणता येईल का? लोकशाहीत आपल्याहून वेगळे असणाऱ्या समूहांना सामावून घेण्याची सामर्थ्य आहे असे म्हणणारी व्यक्ती आपल्या समूहाच्या उद्दिष्टांसाठी हिंसा करते तेव्हा ते कसे समर्थनीय असते?
- चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या पत्रकारितेची निष्ठा कुणाशी असावी? सत्य जर देशाच्या कुटनीतीच्या दृष्टीने हानिकारक ठरत असेल, तर कशाला प्राधान्य द्यावे?
- सार्वजनिक क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात किती डोकावायचे याचे काही बंधन पत्रकारांवर असावे का? दुसऱ्या बाजूने जर सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असणारी मंडळी समाजाच्या धार्मिक-सांस्कृतिक समजुतींना conform करणाऱ्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आचरणाचे भांडवल करत असतील, तर त्याविरुद्ध झालेल्या त्यांच्या वागण्यावर चिखलफेक झाल्यावर तक्रार करण्याला ग्राउंड राहतो का?
- विकसित देशांमध्ये सुद्धा दाम्पत्यांतले जबाबदारीवाटप जुनेच आहे का? पुरुष पूर्णवेळ सार्वजनिक क्षेत्रात काम करतात तेव्हा त्यांनी कौटुंबिक सुखाची आहुती दिली, असे कौतुक होते; स्त्रियांच्या बाबतीत मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना कसरत झाली, किंवा त्या आघाडीवर तडजोड करावी लागली, असा नरेटिव्ह असतो... घर म्हणजे पुरुषासाठी सुखाचे स्थान आणि बाईसाठी कर्मभूमी असते का?
- स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा हक्क बजावताना सोबत त्यांच्या जबाबदारीचे जे ओझे एकट्यावर येते त्याचे समायोजन कसे करावे?
- लग्नासारखे निर्णय आमरण निभावण्याचे बंधन नसल्यामुळे हा निर्णय बदलण्याचे मिळालेले स्वातंत्र्य, पण त्याच्या जोडीने येणारे कधीकधी असह्य भासणारे एकटेपण, आणि मुलांची होणारी ससेहोलपट ; किंवा तडजोड करत, कधी माघार घेत, वैयक्तिक इच्छा-आकांक्षांना मुरड घालत कुटुंब ही संस्था टिकवून धरणं..... या दोन्हीतलं कमी वाईट काय?
सगळ्यात शेवटी चर्चिलचे एक वाक्य जे एका एपिसोडच्या सुरुवातीला आहे ( प्रत्येक एपिसोडला एक समर्पक ओपनिंग कोट दिलेला आहे ):
"Democracy is the worst form of government, except all others that have been tried." - Winston Churchill
( Democracy Index नावाची एक मानांकन पद्धत आहे. त्यात १६७ देशांच्या यादीत भारत ५१ व्या क्रमांकावर आहे. हा इंडेक्स रोचक आहे , जमल्यास नक्की वाचा 😊.)

No comments:
Post a Comment