Monday, 1 March 2021

अशी माणसे येती ... २

 मघाशी माझ्या पोस्टमध्ये मी पेशंट्स आणि नातेवाईक यांचे काही अनुभव शेअर केले; तसा हेतू नसतानाही पोस्ट थोडी नकारात्मक झाली, my bad... जीवन आणि मृत्यूशी थेट संबंध असणारे फिल्ड असल्यामुळे वातावरण तणावाचे असते आणि त्यामुळं कधीकधी लोक नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने रिऍक्ट होतात. पण जाणीवपूर्वक, मुद्दाम त्रास देणाऱ्यांची संख्या तशी कमी असते. अनेक चांगले अनुभवही गाठीशी आहेत. बरेचजण व्यवस्थित सहकार्य करतात, सूचना पाळतात, आणि विश्वास ठेवतात. काही नातेवाईक इतर पेशंट्सनाही मदत करतात. पूर्ण बिल भरू न शकणारे काहीजण नंतर आठवणीने उरलेले बिल भरायला येतात. व्यावसायिक नात्याच्या पल्याड जाऊन कृतज्ञता मानणारी, प्रेमादराने वागवणारी खूप लोकं आहेत.

एका कमेंटमध्ये धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरं जाणाऱ्या लोकांचा विषय निघाला आणि मग विचार केल्यावर लक्षात आले की आपल्या स्वतःच्या आयुष्यातही जर मोठं आजारपण आलं, मृत्यूची चाहूल लागली,  तर काय करावं याचा वस्तुपाठ देणारीही काही उदाहरणं आहेत.

 

आम्ही प्रॅक्टीसमध्ये तसे नवीन होतो तेव्हा एक साठीचे गृहस्थ आपल्या बायकोला ऍडमिट करायला घेऊन आले. ती सिरीयस होती; तपासल्यावर आम्ही गंभीर्याची कल्पना दिली आणि त्यांची इच्छा असल्यास दुसरीकडे शिफ्ट करू शकता असंही सांगितलं. त्यावर ते म्हणाले, तुम्ही मनापासून प्रयत्न करताय हे दिसतंय; यश परमेश्वराच्या हातात आहे, द्यायचं तर तो तुमच्या हातूनही देईल. त्यांनी विश्वास दाखवला आणि मग आमचाही आत्मविश्वास वाढला. पेशन्ट ठणठणीत होऊन घरी गेली.

दुसरी एक पन्नाशीची स्त्री दाखवायला आली तेव्हा कर्करोगाच्या शेवटच्या स्टेजला होती. आम्हाला म्हणाली थोडं सलाईन वगैरे लावा आणि एक दिवसापुरता थकवा येणार नाही अशी सोय करा, एक कार्यक्रम ठेवलाय घरी. मी तर चिडले आणि म्हणाले इतक्या आजारी असताना कार्यक्रम कसले करताय? त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आहे आणि जे लोक आयुष्याचा वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना भेटले, ज्या लोकांमुळे जगणं आनंददायी झालं, त्या सगळ्यांना शेवटचं भेटायचं आहे आणि तेही आनंदाने, दुःखाचे सावट पडण्यापूर्वी... 

अजून एक परिचित असेच टर्मिनली आजारी पडले तेव्हा त्यांनी सगळ्या व्यावहारिक बाबी क्लियर केल्या. बायको आणि मुलांना सगळ्या आर्थिक बाबींची माहिती दिली, नॉमिनेशन वगैरे ठीक आहेत हे बघितलं. 

एका जोडप्याला त्यांची मुलगी गमवावी लागली; बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी प्रयत्न करूनही त्यांना डोनर मिळाला नव्हता. त्यांनी नंतर स्वतःचे ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशनचे फॉर्म्स भरले. एका आरोग्य निगडित स्वयंसेवी संस्थेत जमेल तितका वेळ काम करायलाही सुरुवात केली.


आजारपण, मृत्यू या गोष्टी माणसाला obviously भयंकर वाटतात आणि साहजिकच माणसं अतिभावनिक होतात, कधीकधी विचित्रही वागतात. पण तरीही They're only as good as the world allows them to be,  हे म्हणणं खोटं ठरवणारी माणसं अधूनमधून भेटत राहतात आणि आयुष्यावरचा विश्वास दृढ होतो; आणि आपण जे काम करतो ते worthy वाटतं !

अशी माणसे येती ... १



स्वतःचे आणि जवळच्या व्यक्तीचे आजारपण,  याला बहुरूपी मनुष्यप्राणी इतक्या विविध प्रकारे रिऍक्ट होतो की घटा- घटांचे रूप आगळे याची वारंवार प्रचिती येते ! 

आमच्या एक जवळच्या नातेवाईक ताई जिवाला फार घाबरतात. अशात त्यांना हाय बीपी डिटेक्ट झाला आणि त्यांनी फारच टेन्शन घेतलं. सतत आता याचे काय काय दुष्परिणाम होतील, हार्ट अटॅक येईल का, मेंदूत रक्तरस्त्राव होईल का.. अनेक कुशंका आणि टेन्शन, त्यामुळे घाबरून जायच्या आणि  बीपी अजून वाढायचा. काल त्यांची धाकटी सून म्हणाली  एकूण अवघड दिसतंय तुमचं, तर विल करता का, किंवा तुमच्याकडे इतके दागिने, साड्या आहेत... अमच्यासारख्यांना देऊन टाका थोडंबहुत तरी.... 

ताई आता चिडल्यात; पण चिडण्याच्या नादात घाबरणं जरा बाजूला पडलंय आणि ब्लडप्रेशर थोडं कमी झालंय !


अजून एक आस्थमाचे पेशंट आहेत;  तपासण्या सांगितल्या की खूप संशय घेतात. काही दिवसांपूर्वी आले तेव्हा कोविड टेस्ट करावी लागली. सुदैवाने रिपोर्ट निगेटिव्ह आला; पण काका बोलले, उगीच फुकट खर्च झाला, वाया गेले माझे पैसे! 

पेशंट्स सोबतचे नातेवाईकही वेगवेगळ्या प्रकारे परिस्थितीला सामोरं जातात. एक वहिनी आहेत; कुटुंबातले कुणीही आजारी झाले की याच गलितगात्र होतात. मग स्वैपाकाचं डिपार्टमेंट बंद पडतं, आणि घरातल्यांना मूळ पेशंट आणि हा वाढीव पेशंट, अशा दोघांची काळजी घ्यावी लागते!

मध्ये एकजण भेटायला आले ते वडिलांचे पासबुक घेऊनच; म्हणाले माझी आर्थिक परिस्थिती बेतास बात आहे, वडिलांची इतर काळजी घेऊ शकतो पण खर्च नाही करू शकणार, तेव्हा त्यांच्या इतक्या पैशांत जितकं बसवता येईल तितकं बसवा ...

अजून एक स्वघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत.. परिसरातले किंवा नात्यातले कुणी आजारी पडले की उत्साहाने हॉस्पिटलला घेऊन येतात; पहिल्या दिवशी, " बिलाची काळजी करू नका, मी आहे" असं म्हणतात, शेवटच्या दिवशी बिलावरून वाद घालतात, आणि मग स्वतःच,   "काहीतरी मांडवली करू, तुमचा पण जास्त नुकसान नको,"  म्हणत कमी केलेलं बिल पेशंटला भरायला सांगतात. सिरीयस पेशंट असला की त्यांना निकालाची भारी उत्सुकता असते; "म्याडम विकेट पडणार की राहणार पटदिशी सांगा, उगा नळ्या अन ते चुक चुक( मॉनिटर) लावून बिल वाढवू नका..." हे ठरलेलं वाक्य.

पेशंट जास्तच क्रिटिकल असेल तर यांची पुढची घाई.. "ते डेथ चं सर्टिफिकेट लवकर लिहायला पायजे, ते लागतं तिकडं स्मशानात ..."

अहो साहेब, डेथ होईपर्यंत तरी दम धरा, मगच देता येईल ना, असं म्हणून त्यांचा वारू रोखावा लागतो !

कोविड काळात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंट्सच्या नातेवाईकांनाही खूप तणावपूर्ण परिस्थितीतून जावं लागलं, काहीजणांना कठीण निर्णय घ्यावे लागले; त्यातही लोकांची cope करण्याची पद्धत निरनिराळी होती... ते परत कधीतरी !

तिन्हीसांजा ...

 #ये_शाम


चहाचा कप हातात घेऊन बसण्याची ठरलेली खुर्ची असते. दिवेलागणीची वेळ; हॉलच्या बाल्कनीला लावलेल्या मोठ्या काचेतून समोरच्या इमारतीचे उजळ होत जाणारे चौकोन दिसायला लागतात. काही चौकोन पर्दानशीन असतात. बसल्या जागेवरून एका खाली एक असे दोन बेनकाब चौकोन आणि त्यांच्या डावीकडे  एक अंधारा उभा पट्टा सोडून दोन जिने दिसतात. 

वरच्या चौकोनात दिसणारी भिंत गडद विटकरी रंगाची आहे, त्यावर एक वॉल माउंटेड टीव्ही आहे. त्यातली चित्रं सारखी हलत असतात; आवाजही मोठा असावा, पण तो माझ्यापर्यंत पोहोचत नाही.

खालच्या चौकोनातली भिंत फिक्या रंगाची आहे; क्रीम किंवा हलका पिस्ता असावा. त्यावरही एक टीव्ही आहे. त्यातली चित्रं त्या मानाने स्थिर असतात; कधीकधी ब्लॅक अँड व्हाइट असतात. जुनी गाणी असावीत असं इथून पाहताना वाटतं... नूतन देवानंद आठवतात; भारत भूषण मधुबाला सुद्धा...

चहा संपवून परत समोर नजर टाकेपर्यंत खालच्या चौकोनातला टीव्ही बंद झालेला असतो. दोन तीन मिनिटांत वरच्या चौकोनातली भिंतही शांत स्थिर होते. 

वरच्या जिन्यात दोन आकृत्या दिसतात; एक मोठी, आणि तिच्या हाताला थोडं ओढत, उड्या मारत जिना उतरणारी एक छोटी.

खालच्या जिन्यातही दोन आकृत्या दिसतात; एक वाकलेली, आणि तिचा हात हातात धरून सावकाश जिना उतरणारी एक जरा कमी वाकलेली... 

तिन्हीसांजेचा उंबरठा ओलांडून रात्रीने अंधाराच्या प्रदेशात पाऊल ठेवलेलं असतं...

जीवनगाणे !

 वैद्यकीय पार्श्वभूमी असलेली 'House MD'' नावाची सिरीज आहे, त्यात प्रत्येक एपिसोडमध्ये कथेनुरूप एखादं गाणं येतं ... फार मस्त अर्थपूर्ण गाणी आहेत.

एक गाणं फार आवडलं आणि फार लक्षात राहिलं..अतिशय आजारी पण आशावादी असणाऱ्या मुलीवर एक एपिसोड होता, त्यात हे गाणं होतं.


सगळं सुरळीतपणे सुरू असताना अचानक आयुष्यात व्याधी येते.... किरकोळ, गंभीर, जीवघेणी, अशा कितीतरी रूपांत. आजारानुसार शारीरिक, मानसिक त्रास, वेदना, खर्च, अशी बरीच संकटं एकाचवेळी अंगावर चालून येतात.

जोडीला असते भय; "ऑपरेशनच्या टाक्यांचे व्रण राहतील का?", इथपासून ते "परत उभं राहू शकेन, कामावर रुजू होऊ शकेन का?", इथपर्यंत. 

सगळ्यात मूलभूत भय मृत्यूचे... ज्या जगातून तात्पुरते बाजूला फेकले गेलोय त्या जगात परत जाऊ शकू का, हा प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न; आजाराच्या गांभिर्यानुसार कधी क्षणिक तर कधी भरपूर रेंगाळणारा. 

दुसरा एक प्रश्न,  सगळ्या नव्हे पण काही मनांमध्ये तरी नक्की उमटणारा... परत गेलेले आपण तेच असू की वेगळे? मृत्यूला हुलकावणी देता आली तरी त्याचे वार कधीकधी मागे राहतात; कधी अपंगत्व, कधी एखादा अवयव काढावा लागल्यामुळे आलेली कुरुपता, कधी मानसिक आघात, कधी उरलेले आयुष्य गोळ्या औषधांच्या आधाराशिवाय काढता येणार नाही अशी परिस्थिती... रुग्णालय नावाच्या वास्तूत आलेली व्यक्ती आणि तिथून बाहेर पडणारी व्यक्ती तंतोतंत तीच नसते खूपदा; कधी किरकोळ कधी प्रचंड बदललेली असते.


इतरांचा आधार फसवा असतो. स्वतःचे नवे रूप स्वीकारून परत सुरुवात करणे; वारामुळे झालेल्या जखमा टोकरत बसायचं, की हळूहळू भरतील यावर विश्वास ठेवून खपली धरू द्यायची, यापैकी एका निर्णयाची निवड करणे; हे स्वतःचं स्वतःलाच करावं लागतं.

'We're the song inside the tune

Full of beautiful mistakes'  हे ब्रीदवाक्य मनात ठेवून, आयुष्य सुंदर आहे आणि म्हणून ते अनुभवणारे आपणही अंतरबाह्य सुंदर असणार,  यावर विश्वास ठेवता यायला हवा बस्स...!


' Every day is so wonderful

Then suddenly it's hard to breathe

Now and then I get insecure from all the pain

I'm so ashamed


I am beautiful no matter what they say

Words can't bring me down

I am beautiful in every single way

Yes, words can't bring me down

So don't you bring me down today


No matter what we do

No matter what we say

We're the song inside the tune

Full of beautiful mistakes


And everywhere we go

The sun will always shine

Tomorrow we might wake up on the other side

All the other time

We are beautiful in every single way..'

मध्यम सूर

 दुपारी 'मिडल-क्लास मेलडीज', हे नाव वाचून  एक तेलुगू चित्रपट बघायला सुरुवात केली; मेलडीज म्हणजे संगीताशी संबंधित काही असेल असं वाटलं होतं. तसं काही नव्हतं, पण  चित्रपट छान होता, आणि ते शीर्षकही अनुरूप आहे हे पटलं. आयुष्याचा सूर पूर्णतः हरवून सगळं कर्कश्य होण्याइतका विसंवाद/ उद्रेक न होता एकमेकांना सांभाळत, सावरत, समजून घेत आकारास येणारं साधं पण सुरेल मध्यमवर्गीय आयुष्य...

 मध्यम आकाराच्या गावातल्या, मध्यमवर्गीय घरातल्या साध्या पात्रांभोवती फिरणारी ही कथा. बेसिक संघर्ष; कधी घरट्यात रोखून धरणारे तर कधी पंखांना बळ देणारे पालक,  कधी मागच्या पिढीवर वैतागलेली तर कधी त्यांची हतबलता समजून घेणारी मुलं;  या सगळ्यांत नायकाचे एक स्वप्न आणि ते साकार करण्यासाठीची धडपड.

आज सावित्रीबाईंवरच्या वाचलेल्या पोस्ट्स मनात रेंगाळत असताना हा सिनेमा बघत होते आणि बघता बघता यातल्या स्त्री पात्रांनी लक्ष वेधून घेतलं. सर्वसामान्य परिस्थितीतल्या, सर्वसामान्य पेहरावातल्या साध्या मुली आणि बायका.... पण ज्यांना खरोखर विमेन ऑफ सब्स्टन्स म्हणता येईल अशा. संहारक, वाचाळ न होता, आपले मूळ मार्दव शाबूत ठेवून, समोरच्या व्यक्तींच्या मानसिकतेत, आचरणात बदल घडवणाऱ्या... 

 प्रेमळ पण व्यवहारी, कणखर असणारी आई असो, सतत गृहीत धरलं जाणं नामंजूर असणारी प्रयेसी, स्वाभिमान जपणारी लग्नाळू मुलगी, नवऱ्याला लोभाचा अतिरेक होतोय याची आठवण करून देणारी पत्नी असो; ही सगळी पात्र वास्तववादी आहेत, कालसुसंगत आहेत, आणि काळानुरूप बदलत असलेल्या स्त्रियांच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. पारंपारिक चौकटीतल्या भूमिका निभावत असलेल्या पण आत्मभान जागृत असलेल्या या स्त्रिया आहेत.

आपल्या अवतीभोवती अशा अनेकजणी असतात; त्यांचा फार आवाज नसतो, अभिनिवेश नसतो, गर्जना नसतात; पण कृतीशीलता खूप असते, विधायक विद्रोह असतो,  आणि व्हिजिबल रिजल्ट्स असतात, झालेले दीर्घकालीन बदल असतात. या स्त्रिया खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी म्हणवून घ्यायला पात्र वाटतात. 


[ सशक्त, वास्तववादी, अंतर्बाह्य सुंदर अशी स्त्री पात्रं, अशात बघितलेल्या बऱ्याच दक्षिण भारतीय, विशेषतः मल्याळम चित्रपटांमध्ये बऱ्याच संख्येने दिसली . तिकडचे बॉक्स ऑफिस हिट्स कसे असतात माहीत नाही, पण OTT प्लॅटफॉर्म्सवर पाहिलेल्या बहुतांश सिनेमांमधल्या स्त्री व्यक्तिरेखा फार अस्सल, रिलेटेबल वाटतात, आणि त्यांच्या माध्यमातून subtly व्यक्त होणारा स्त्रीवादही फार मनोरम आहे .]


भाषेचं सुंबरान

 'सुंबरान' हा सिनेमा बघताना या शब्दाचा नेमका अर्थ शोधत होते. तेव्हा एक लेख वाचला ज्यात

धनगरी ओव्यांना सुंबरान म्हणतात हे समजलं.

( सुंबरानचा शब्दशः अर्थ स्मरण; प्रमाण भाषेतले स्मरण लोकभाषेत सुंबरान झाले. हिंदी मुलुखात त्याचेच सुमीरन झाले असणार..)


धनगरी ओवीचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे "गाणे' असते आणि दुसरा भाग म्हणजे "कथा'! हा दुसरा भाग गोष्टीरूपाने सांगितला जातो. गाणारे वेगळे असतात. कथा सांगणारे वेगळे असतात. या कथेच्या भागाला "सपादनी' म्हणतात. गाण्यातील माहितीच कथारूपाने पुन्हा पुन्हा सांगितली जाते. ओवीची "गायलेली' प्रत्येक ओळ किमान दोन वेळा, तर कधी कधी चार वेळा सलग म्हटली जाते. ( याबद्दल सविस्तर माहिती असलेल्या लेखाची लिंक कमेंटमध्ये दिली आहे.)


यातला 'सपादनी' हा शब्द आम्ही गावाकडे वापरायचो; वाढवणे या अर्थाने, किंवा कधीकधी अघळपघळ बोलून चुकीवर पांघरूण घालायचा प्रयत्न करणे या अर्थाने.

उदा: ' गर्दी जास्त आनी स्वैपाक कमी असं दिसलं की आचारीलोक वरण/ रस्सा भाजीत पाणी अन तिखट टाकून सपादनी करतात.'

' ह्ये सकाळी एकदम जोरात ओरडले, आता उगी गोड बोलून सपादनी करायलेत' .


😊 शब्द कुठून कुठे असे वाहत, झिरपत जात असतात... आणि त्यामुळेच तर भाषा जिवंत खळाळती राहू शकते !

BORGEN- राजनीती_राजकारण_सत्ताकारण

 #राजनीती_राजकारण_सत्ताकारण



आजोबा दूरदर्शनवर बातम्या बघत दोरवाती वळायचे. माणसाला एखाद्या विषयातलं काही कळत असलं, की त्याला ते सांगावं वाटतं, आणि आप्पांना राजकारणातले बारकावे कळायचे. मग त्यांची हक्काची श्रोता म्हणजे मी असायचे. त्यांच्या विश्लेषणाला ते 'बातमीमागची खरी बातमी' म्हणायचे. त्यामुळं मलाही राजकारण हा विषय इंटरेस्टिंग वाटू लागला. त्या दोरवातींचे उदाहरण देऊन ते म्हणायचे, "हा कापूस इतका ताणता यायला हवा की त्याची पातळ दोरी होईल, पण तुटण्याइतका मात्र ताणू द्यायचा नाही... नेत्यांना समाजात नवीन काही घडवून आणायचं असेल तर असा अप्रोच हवा". 

नेटफलिक्सवर ' बोर्गेन (Borgen)' नावाची डॅनिश सिरीज पाहताना मला अचानक हे सगळं आठवलं.

राजकारणावर बेतलेल्या कलाकृती बऱ्याचदा सनसनाटी असतात आणि हिरो/व्हिलन या साच्यात फिट केलेल्या. बोर्गेन मात्र सुखद अपवाद... डॅनिश पार्श्वभूमीवर असलेली ही  मालिका राजकारण आणि governence यातले बरेच बारकावे उलगडते. त्याचवेळी बदल घडवताना, नवीन कायदे आणताना होणारे फ्रिक्शन दाखवते. 

डेन्मार्क हा विकसित आणि सधन देश आहे, लोकसंख्या कमी; त्यामुळं आपल्याकडच्या परिस्थितीशी तुलना केली तर बरेच फरक आहेत. त्यात त्यांची लोकशाही दीडशे वर्षांहून जास्त जुनी आहे.

पण काही एपिसोड्स बघताना आपल्या देशातील, राज्यातील तशाच प्रकारचे प्रश्न आणि विषय हटकून आठवतात आणि काही गोष्टी युनिव्हर्सल असतात हे जाणवतं; उदा. स्थलांतरितांचा प्रश्न, निर्विवाद बहुमत नसल्यावर होणाऱ्या युती आणि तडजोडी, पत्रकारितेचे मीडिया ट्रायलसारखे धोकादायक पैलू, आणि राजकीय विचारधारेत असणारे मूलभूत मतभेद बाजूला ठेवून होणारे गठबंधन.

 सारांश सांगायचा तर एका राजकारणी स्त्रीची ही गोष्ट. पहिल्या दोन सिझन्समध्ये coalition  सरकार बनवण्याच्या वाटाघाटींमध्ये अनपेक्षितपणे लाभलेले प्रधानमंत्रीपद, ते पार पाडताना येणारी आव्हानं, ती पेलताना राजकारणात मुरब्बी होत जाणं; आणि त्याचसोबत व्यस्ततेमुळे वैयक्तिक, कौटुंबिक आघाडीवर होणारे परिणाम, हा प्रवास आहे. 

तिसऱ्या सिजनमध्ये पायउतार झाल्यानंतरची परिस्थिती, मग वेगळ्या पद्धतीने पुनरागमन आणि त्याची परिणिती, हा भाग आहे. 

या व्यतिरिक्त एका न्यूज चॅनेलमध्ये होणाऱ्या घडामोडी आणि स्पिन डॉक्टर नावाने ओळखले जाणारे राजकीय मदतनीस, हे ट्रॅक्स बरंच भाष्य करत राहतात. 

कथा रोचक आहेच पण त्या पलीकडे जाऊन काही मूलभूत मुद्दे जाणवतात आणि मनात काही प्रश्न येतात; म्हणून ही सिरीज जास्त आवडली.   

- सत्ता राबवताना, एखादी संकल्पना प्रत्यक्षात आणताना, करावी लागणारी तडजोड किती मर्यादेपर्यंत रास्त मानावी? धंदेवाईक दृष्टिकोनातून राजकारण करणारे सोडून देऊ; पण काही तत्व मानून, काही धोरणं आखून राजकारणी व्यक्ती सत्तेत येतात, तेव्हा इम्प्लेमेन्टेशन करताना काय अप्रोच असायला हवा? बहुमत म्हणजे एकमत नव्हे; मग अल्पमत दुर्लक्षित करावं की सर्वसहमती साधावी? ती साधताना आपल्या मूळ धोरणांना किती मुरड घालावी? ती मर्यादा ठरवताना कुठले क्रायटेरिया वापरावेत? 

Ends justify the means हे कितपत समर्थनीय असते? क्रांती म्हणजे नेमकं काय? 

"Politics is war without bloodshed. War is politics with bloodshed.  युद्ध जिंकलं तर करणारा नेता म्हणवतो, हरलं तर दहशतवादी,"  असे आपल्या राजकीय हिंसेचे समर्थन एक आंदोलक करतो जो एक प्रसिद्ध कवीही असतो( तो स्वतःला आंदोलक म्हणवत असतो पण त्याच्या सरकारच्या मते तो दहशतवादी असतो).  राजकीय हिंसा यशस्वी झाली तर क्रांती आणि अयशस्वी झाली तर दहशतवाद असे म्हणता येईल का? लोकशाहीत आपल्याहून वेगळे असणाऱ्या समूहांना सामावून घेण्याची सामर्थ्य आहे असे म्हणणारी व्यक्ती आपल्या समूहाच्या उद्दिष्टांसाठी हिंसा करते तेव्हा ते कसे समर्थनीय असते? 


- चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या पत्रकारितेची निष्ठा कुणाशी असावी? सत्य जर देशाच्या कुटनीतीच्या दृष्टीने हानिकारक ठरत असेल, तर कशाला प्राधान्य द्यावे?

- सार्वजनिक क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात किती डोकावायचे याचे काही बंधन पत्रकारांवर असावे का? दुसऱ्या बाजूने जर सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असणारी मंडळी  समाजाच्या धार्मिक-सांस्कृतिक समजुतींना conform करणाऱ्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आचरणाचे भांडवल करत असतील, तर त्याविरुद्ध झालेल्या त्यांच्या वागण्यावर चिखलफेक झाल्यावर तक्रार करण्याला ग्राउंड राहतो का? 

- विकसित देशांमध्ये सुद्धा दाम्पत्यांतले जबाबदारीवाटप जुनेच आहे का? पुरुष पूर्णवेळ सार्वजनिक क्षेत्रात काम करतात तेव्हा त्यांनी कौटुंबिक सुखाची आहुती दिली, असे कौतुक होते; स्त्रियांच्या बाबतीत मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना कसरत झाली, किंवा त्या आघाडीवर तडजोड करावी लागली, असा नरेटिव्ह असतो... घर म्हणजे पुरुषासाठी सुखाचे स्थान आणि बाईसाठी कर्मभूमी असते का? 

- स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा हक्क बजावताना सोबत त्यांच्या जबाबदारीचे जे ओझे एकट्यावर येते त्याचे समायोजन कसे करावे? 

- लग्नासारखे निर्णय आमरण निभावण्याचे बंधन नसल्यामुळे हा निर्णय बदलण्याचे मिळालेले स्वातंत्र्य, पण त्याच्या जोडीने येणारे कधीकधी असह्य भासणारे एकटेपण, आणि मुलांची होणारी ससेहोलपट ; किंवा तडजोड करत, कधी माघार घेत, वैयक्तिक इच्छा-आकांक्षांना मुरड घालत कुटुंब ही संस्था टिकवून धरणं.....  या दोन्हीतलं कमी वाईट काय? 


सगळ्यात शेवटी चर्चिलचे एक वाक्य जे एका एपिसोडच्या सुरुवातीला आहे ( प्रत्येक एपिसोडला एक समर्पक ओपनिंग कोट दिलेला आहे ):

"Democracy is the worst form of government, except all others that have been tried." - Winston Churchill


( Democracy Index नावाची एक मानांकन पद्धत आहे. त्यात १६७ देशांच्या यादीत भारत ५१ व्या क्रमांकावर आहे. हा इंडेक्स रोचक आहे , जमल्यास नक्की वाचा 😊.)