बुद्धीचा विकास होत गेला तसा माणसाच्या कुतूहलाच्या कक्षा रुंदावत गेल्या. भोवतालच्या वेगवेगळ्या घटनांबद्दल प्रश्न पडत गेले आणि हळूहळू स्वतःबद्दलही.
उत्तरे शोधण्याच्या ध्यासातून कितीतरी शोध लागले, ज्ञान वाढले, प्रगती झाली. नंतर माणसाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळवण्याचे ओब्सेशनच झाले; प्रत्येक का आणि कसे चे उत्तर मिळायलाच हवे, नाहीतर तो प्रचंड अस्वस्थ होऊ लागला.
दुसरीकडे इतर प्राण्यांना शक्य नसलेल्या मोठ्या टोळ्या आणि नंतर समाज बनवला मनुष्यप्राण्याने. त्याच सोबत या व्यवस्थेचे नियम आले; मुक्त जगण्याला शिस्तीचा बांध घालून आखीव रेखीव चौकटीत बसवणे आले. यासोबत मग सगळ्याच नात्यांना परिभाषा आली आणि परिणीती ही. स्थैर्य हवे तर गोष्टी अनिर्णित अस्पष्ट ठेवता येत नाहीत; त्यामुळे निश्चित निर्णय आले, closure आले आणि बऱ्याचदा हे आजन्म किंवा दीर्घकाळ निभावण्याचे बंधन आले.
या दोन्हीचा परिपाक म्हणजे माणूस उत्तर केंद्रित झाला. ठोस स्पष्ट उत्तरे आणि अचल ठाम निर्णय, या आवश्यक बाबी बनल्या.
सतत बदलणारा माणूस आणि भोवताल, या अस्थिर घटकांना घेऊन एक स्थिर व्यवस्था कायम ठेवायची, अशी ही विरोधाभासी परिस्थिती असते. प्रवाह अडवला की दाब वाढतो, या न्यायाने मग काही उत्तरे मिळूनही माणसांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली.
माणसाच्या आंतरिक उर्मी आणि बाह्य नीतिनियम, यातल्या विसंगतीतून जे द्वंद्व उभे राहते, ते समजून घेण्यासाठी तत्वज्ञान, अध्यात्म यांची सुरुवात झाली असावी.
अध्यात्म हा विषय गहनही आहे, विस्तृतही; माझा इतका अभ्यासही नाही. पण माझ्यापुरते अध्यात्म म्हणजे बाह्य चौकटी, सामाजिक कंडिशनिंगमुळे रुजलेली गृहीतके, या पल्याड जाऊन आयुष्य प्रत्यक्षात कसे आहे याची जाणीव होणे.
जसे की आपण कधीच न बदलणारी नाती किंवा प्रेम म्हणतो, पण खरे पाहिले तर माणसाच्या भावना कालौघात बदलत असतात आणि जीवन आहे तोवर त्या बदलत राहतात; आयुष्य म्हणजे प्रवाही नदी असते असे मानले तर you cannot step in the same river twice. फक्त मृत्यूच्या क्षणी हे फ्रीज होईल, तोवर सगळं परिवर्तनशील असणार. ही जाणीव म्हणजे अध्यात्म.
किंवा कधीकधी नाते कायमचे संपले असेही म्हणतो, पण कायमचे असे काही संपत नाही; आयुष्य आहे तोवर अनेक शक्यता जिवंत असतात.
" शेवट नसलेली गोष्ट स्वीकारायला शिकणं म्हणजे अध्यात्म " असे मी म्हणाले तेव्हा अनिश्चितता मान्य करून सद्य परिस्थितीत जे काही असेल त्याचा समरसून अनुभव घेणे, असा काहीसा अर्थ अभिप्रेत आहे... लिव्ह इन द मोमेंट म्हणतात तसं ...😊
No comments:
Post a Comment