Tuesday, 15 October 2019

ओंडक्यांची भेट

काल गुलजार यांच्या वाढदिवसामुळे रात्री  आँधीमधल्या गाण्यांची उजळणी झाली, आणि आज मेमरीत मी शेअर केलेली सुधीर मोघे यांची ही कविता दिसली( कवितेच्या या शैलीला त्यांनी 'स्वगत-संवाद' हे सार्थ नाव दिलंय).
"इस मोड से जाते हैं," आणि
"तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं",  या दोन्हींच्या मधला टप्पा म्हणजे ही कविता आहे !
             ************
एक सांगशील,
आपले रस्ते अवचित कुठे; कसे जुळले?
आपल्याच नादात चालताना
हे देखणे वळण कसे भेटले?

क्षणाभोवती
ही कसली रंगत खुलते आहे?
जगणं व्हावं गाणं
अशी स्वरांची संगत जुळते आहे
पण खरं सांगू?
या वाटांचं हे असं भेटणं बरं नव्हे
जीवघेणं उत्कट असेल
तरीही ते खरं नव्हे

तुझी दिशा पूर्वीच निश्चित
ती बदळणं हिताचं नाही
माझ्यापुरतं बोलायचं
तर मला माझी दिशाच नाही

तुझ्या संगतीत
आनंद आहे. आश्वासन आहे, दिलासा आहे.
माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात
भंगण्याचाच वसा आहे

म्हणून म्हणतो,
अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
जीव जडवून, चटका लावून,
निदान दूर होणं तरी असू नये

पण अशा वेळी कळून येतं
आपण आपले मालक नसतो
रस्ते आपली दिशा आखतात
आपण फक्त चालत असतो.
- सुधीर मोघे
      *****************
आपापल्या मार्गाने सुखनैव जाणाऱ्यांच्या वाटा अवचित एकमेकांना छेद देतात; आणि सगळे व्यवहारिक शहाणपण बाजूला ठेवत कुठल्या प्रेरणेने एक व्हायला बघतात... 
पण शेवटी प्रवास असतो तो, थांबवता येत नसतो... आणि वाटांना उचलून हवे त्या दिशेला वळवता येत नाही. फार तर काही काळ एकत्र धावतात त्या; तशा आखलेल्या असतील तर...
 तेही चांगलं की वाईट? कारण न भेटणं आणि भेटून हरवणं यातलं काय जास्त त्रासदायक, कोण जाणे...

प्रवासाची आणि वाटा न जुळण्याची अपरिहार्यता मान्य करून मग कुणी फैज
"यूँ न था, मैनें फ़कत चाहा था यूँ हो जाये," म्हणतो;
किंवा एखादा राजेंद्र कृष्ण
"न तुम बेवफा हो, ना हम बेवफा हैं
मगर क्या करें अपनी राहें जुदा है"
असा निवाडा करतो.
" इन रेशमी राहों में, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहूँचती है", म्हणणारा गुलजारही नंतर " तुम गर साथ हो, मंजिलों की कमी तो नहीं" म्हणताना साथ हवी असेल तर  मंजिल बदलावी लागेल हे मान्य करतो ....




श्रीकृष्ण

श्रीकृष्णाशी निगडित कुठलाही उत्सव आला की राधाकृष्ण रूप फार लोकप्रिय आहे हे जाणवते. साधारण आठव्या-नवव्या शतकात राधेचा कृष्णाचारित्रात प्रवेश झाला, आणि मधुराभक्तीने तिला अजरामर केले. पण खरंच ती संकल्पना आपल्याला कळली आहे, की आपापल्या सोयीसाठी आपण तिचे विकृतीकरण करतोय, अशी कधी कधी शंका येते.
अशा वेळी शांतपणे कुरुंदकरांचे 'व्यासांचे शिल्प' हाती घ्यायचे आणि त्यातल्या श्रीकृष्णावरच्या दोन प्रकारणांचे पारायण करायचे!
खरे तर ही दोन्ही प्रकरणे मुळातून वाचायला हवीत; पण त्यातले काही उतारे देण्याचा मोह आवरत नाहीय.

 राधेच्या पलीकडचा एक कृष्ण आहे ज्याबद्दल कुरुंदकर म्हणतात,
" ऐतिहासिक कृष्ण धूर्त राजकारणी आहे, कर्तृत्ववान आहे. गणांचा नेता आहे, पराक्रमाने आपले राज्य बिनधोक करणारा आहे, शेजारी राष्ट्रांना मित्र करून शत्रूंचा नाश करणारा आहे. या कृष्णाची पूजा भारताने कधी केलीच नाही."

कृष्णाचे भारताच्या सांस्कृतिक इतिहासातले महत्व त्यांनी फार सुंदरपणे उलगडून दाखवले आहे.
"श्रीकृष्णचरित्राविषयी बेजबाबदारपणे बोलायचे ठरले, तर पुष्कळ आहे, पण जबाबदारीने बोलायचे ठरवले तर काय बोलायचे, याच्याविषयी चिंता करण्यासारखे पुष्कळ पुष्कळ आहे. असे हे श्रीकृष्णाचे लोकविलक्षण चरित्र आपल्या डोळ्यांसमोर आहे.
 श्रीकृष्णाचे चरित्र भारतातल्या सर्व सांस्कृतिक जीवनाला जीवनाला आधारभूत म्हणून आहे. याचा अर्थ असा की, आमच्या नाटकांना, नृत्यांना, नानाविध चालीरीतींना आणि आपण ज्याला उत्तर भारतीय संगीत म्हणतो त्यातील अर्ध्या धृपदांना, ख्यालांना,ठुमरींना, कजरींना या जवळपास सर्व शास्त्रीय संगीताच्या संगीताच्या प्रकारांना श्रीकृष्णचरित्राचा आधार आहेत; तसेच भारतीय चित्रकलेचे मध्ययुगातले जे प्रमुख संप्रदाय आहेत, त्या प्रमुख संप्रदायांत तुम्ही पहाडी, कांगा, रजपूत व मुगल या इ. स. च्या चौदाव्या ते अठराव्या शतकापर्यंतच्या संप्रदायाची भारतीय चित्रकला शैली पाहिली, तर त्यातील मोगल शैली सोडून पहाडी, रजपुत, कांगा या तीन  चित्रशैलीतील जवळजवळ दोन-तृतीयांश चित्रे कृष्णाचे चरित्राची जोडली गेली आहेत. तेव्हा संगीताला, चित्राला, काव्याला, नाटकाला, नृत्याला अशा सगळ्या भारताच्या सांस्कृतिक जीवनाला श्रीकृष्णचरित्र आधारभूत राहिलेले आहे. या श्रीकृष्णचरित्राचे वैशिष्ट्य असे की जीवन जेवढे गुंतागुंतीचे आहे तेवढे हे चरित्र गुंतागुंतीचे आहे आणि जीवन जेवढे विविध आहे, तेवढे ते चरित्र वैविध्याने नटलेले आहे. जीवनातले जे सगळे चांगले आहे, ते श्रीकृष्णचरित्रात समाविष्ट झालेले आहे. म्हणून जीवनातल्या सामग्र्याचा प्रतिनिधी म्हणून पूर्ण परमात्मा या नात्याने श्रीकृष्ण आपल्या संस्कृतीमध्ये आहे, म्हणून ही जी श्रीकृष्ण नावाची 'पूर्ण परमात्म्याची' साथ आहे, ती आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, परंपरेचा आधार बनलेली आहे. त्यात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या सगळ्याच इतिहासामध्ये घडलेल्या आहेत असे समजण्याचे कारण नाही."

इतिहासातील असामान्य पुरुष हे सर्व कलांना, संस्कृतीला, तत्वज्ञानाला आधार कसे होतात हे पहायचे असेल तर कृष्णचरित्र अभ्यासायला हवे !

आणि राधा-कृष्णाचे प्रेम...त्यावरसुद्धा इतके सुंदर भाष्य त्यांनी केलंय!
" ज्या क्षणी राधा हे म्हणते की, "हे माझ्या प्रियकरा, तू माझ्याशी विवाह करावास, ही अपेक्षा नाही; नित्य सहवास लाभावा, हीही अपेक्षा नाही," त्या क्षणी हे प्रेम वासनेच्या पलीकडे निघून जाते! कारण सहवासाची, संरक्षणाची, प्रतिष्ठेची अपेक्षा नाही; त्या प्रीतीत वासना वर्ज्यही नाही आणि वासना त्या प्रीतीचा आधारही नाही! ती वासनेच्या पलीकडे निघून गेलेली आहे. ही जी निरपेक्ष प्रीतीची कल्पना राधेच्या रूपाने आमच्या संस्कृतीने उभी केली आहे, ती जगातल्या वाङ्मयातल्या 'प्रेम' या कल्पनेचे सर्वात मधुर व उदात्त असे स्वरूप आहे."


बुद्धिजीवी आणि बहुजन


गांधी कळायला फार वेळ लागतो, आणि डोळे सताड उघडे; तरी पूर्ण कळतीलच असे नाही...
नेमकं कुठल्या पुस्तकात ते आठवत नाहीय, पण गांधींचे एक वाक्य वाचले होते... "सुधारणा(reforms) व्हावी याची ओढ सुरुवातीला सुधारकांना असते, समाजाला नाही; त्यामुळे सुधारकांनी  लोकांकडून अज्ञापालनाची अपेक्षा करू नये, उलट प्रतिकूल प्रतिसादासाठी तयार असावं."
गांधीविचार प्रामाणिकपणे मानणाऱ्यातले सुद्धा किती जण या बाबतीत संयम ठेवतील?

गांधी हे केवळ आदर्शवादामुळे नव्हे, तर समाजमनाचे आकलन उत्तम असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला वश करू शकले. काही तात्कालिक अभिजनांना त्यांची जीवनशैली हास्यास्पद, त्यांच्या योजना बाळबोध वाटतही असतील; पण गांधींना सामान्य माणसाची भाषा कळत होती, आणि लोक त्यांच्याशी कनेक्ट करू शकत होते. त्यामुळे बहुसंख्य समाज गांधी बाबाच्या मागे उभा राहिला.

बहुसंख्य लोकांच्या प्रज्ञेवर अविश्वास दाखवून, त्यांच्या निर्णयक्षमतेला कमी लेखून, त्यांच्या निवडीची हेटाळणी करून  राजकीय बदल घडवण्याची अपेक्षा व्यर्थ आहे.
अभिजन जेव्हा बहुजनांबद्दल असा तुच्छतावाद दाखवतात, तेव्हा नेहमी विरोधकांचा फायदा होतो. हे अतिहुशार विचारवंत तुम्हाला सतत तुच्छ लेखतात, त्यांना तुमच्याबद्दल कसलीही आत्मीयता नाही; अशी लोक काय तुमचं भलं करणार, हा युक्तिवाद पटायला लागतो. आणि आपल्याला हसणारी लोक ज्या बाजूने आहेत, ती बाजू आपल्यासाठी वाईटच असणार, तेव्हा आपण त्याच्या उलट बाजूला जायचं, इतकं साधं गणित लोकांच्या मनात तयार होतं.

मग याचे परिणाम दिसले तरी  विचारांधतेमुळे, आपले आकलन इतर समान्यजनांपेक्षा खूप जास्त आहे या अहंकारामुळे, आपण कुठे कमी पडलो हे डोळसपणे न बघता परत एकदा लोकांना दोष देणे सुरूच राहते. आणि परत एक असेच वर्तुळ सुरू होते.


आदिम ओळख

अंघोळ करून नीट कोरडं न होताच घाईघाईत न्हाणीघराच्या बाहेर आल्यासारखा दिसतोय भोवताल. पावसाने काल चांगल्याच थापडा दिल्यात. काही झुडपं आडवी झालीयत, कुठे कुठे पाण्याची कागदी होडीही चालणार नाही इतकी छोटी छोटी डबकी तयार झालीयत. मुलांच्या काही सायकली आडव्या पडल्यात. बसण्यासाठीची बाकडी थोडी ओली थोडी कोरडी, निवडक आमंत्रण देत असल्यासारखी. कुठेतरी अर्धवट पाचोळा जळतोय...
फुलं मात्र आहेत; कुठे ओघळलेली कुठे उमललेली, पण रंगांची उधळण करत आणि सुगंध मिरवत अस्तित्व जाणवून देतायत. हे एक छानच असतं फुलांचं; प्रपात होत असतात... हे जगणं फुलणं गंधाळणं सोडत नाहीत.
अजून एक गंध येतो आहे; खूप दुरून की आपल्या आतूनच येतोय कळेना ... धूर आहे त्यात, आणि ओल्या झाडांचा करकरीत वास, थोडा तुरट, की कडवट ? जंगल आठवतंय, आणि काहीतरी खूप खूप जुनं, ... या जन्मातलंही नसेल इतकं जुनं. धूसर आकृत्या येतात डोळ्यासमोर.. जंगल, गुहा, धूर, शेकोटी...
किती जन्म हा गंध रुतला असेल जनुकांमध्ये.
बाकी काही कितीही बदलू दे, हा वेड लावणारा गंध माणसापुरता तरी अक्षय आहे...

आठवणीतली नागपंचमी


सकाळी सकाळी थोरल्या चुलतीचा फोन आला; भावाच्या हाती पाठवलेली शिदोरी, साडी-बांगड्या व्यवस्थित पोहोचल्या का,  विचारत होती. सगळे काय करतायत विचारलं तर म्हणाली ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा फस्त करतायत....
  श्रावण सुरू झाला की पहिला सण असायचा नागपंचमीचा. बायकांच्या खास जिव्हाळ्याचा सण. आमच्याकडे सासुरवाशिणी माहेरी यायच्या. साडी खरेदी, जिथं ते शक्य नाही तिथं किमान चांगलं ब्लाउजपीस घेतलं जायचं.
मेंदीचे कोन नव्हते, पण ठिपक्यांची मेंदी लावायच्या सगळ्या, काहीजणी पूर्ण तळवा रंगवायच्या.
बांगड्या भरणे मात्र सगळ्यांसाठी अनिवार्य सोहळा होता.
पंचमीच्या आदल्या दिवशी कासार यायचा आणि आमच्या खालच्या ओसरीत बसायचा. गावातल्या बायका तिथे गोळा व्हायच्या. काही तालेवार घरं होती, तिकडे बोलवायला जावं लागायचं. त्यांच्याकडे निरोप देत देत आम्ही बाकी लोकांसाठीही
"गौडुर मनिगे बळगार बंदेना, येल्लारू बर्ररी..." ( पाटलांच्या घरी कासार आलाय, सगळे या ) अशी हाळी देत रस्त्याने जायचो.
कासार कासारीण जोडीने यायचे; पण बांगड्या भरण्याचे काम चच्चाचे, बीबी फक्त बांगड्या काढून द्यायची आणि आलेल्या पोरी बाळींशी गप्पा मारायची. सगळे पैसे द्यायचे असे नाही. आमच्याकडून धान्य दिले जायचे, काही जणांच्या घरी घाणे होते, तिकडून तेल दिले जायचे. नंतर नंतर मात्र सगळा व्यवहार पैशात व्हायला लागला. तीन चार रंगाच्या चमकीचे ठसे असणाऱ्या काचेच्या बांगड्या असायच्या.. जास्तीत जास्त लहान साईझ चढवा ही मागणी असायची, कारण बांगड्या सैल असल्या की घरकाम करताना वाढायच्या. लहान मुलींसाठी प्लास्टिकच्या बांगड्या असायच्या. काचेची बांगडी येण्याइतका हात मोठा झाला की बीबी ओरडायची, "इसका इस साल देखो पाटलीन, छोकरी बडी हुई देखो".  छोकरी कुणाचीही असली तरी जबाबदारी पाटलीनीकडेच दिली जायची. मग माझी थोरली चुलती लगेच चौकशी सुरू करायची; सगळ्यांच्या माहितीतल्या स्थळांची उजळणी व्हायची. छोकरी उगीच गोरीमोरी व्हायची .
पंचमीच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असायचा, पण पोळ्या करण्याऐवजी पुरणाचे कानवले/ दिंडे केले जायचे.
आमच्याकडे वारुळाला जायची पद्धत नव्हती.
आजोबा भट्टीला ज्वारी न्यायचे आणि त्याच्या लाह्या करून आणायचे.
घरातल्या देव्हाऱ्यात शंकराची पिंड होती आणि त्याच्या डोक्यावर मोठा पितळी नागोबा.. पंचमीच्या दिवशी यांना फार महत्व यायचं. पूजा करून त्यांच्यावर दूध लाह्या वाहिल्या जायच्या. मग समस्त बहिणींचा उपवास सुटायचा (पंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठीचा उपवास असायचा; भाऊ असणाऱ्या सगळ्या हा उपवास करायच्या).
मोठे वाडे असणाऱ्यांच्या अंगणात झोके बांधले जायचे, आणि दुपारी सगळ्या मुली, बायका नवीन साड्या नेसून तिथे गोळा व्हायच्या.
लहान मुलींना परकर पोलके असायचे, काही शहरात राहणाऱ्यांचे फ्रॉक असायचे.
सगळ्या फेर धरून भुलई खेळायच्या, त्यात काही मराठी तर काही कन्नड गाणी असायची. माहेरची आठवण, आई वडिलांचं आणि भाऊ वहिनीचं कौतुक, सासरी असलेले कष्टाचे जीवन, अशी साधारण गाण्यांची गोष्ट असायची. माझी आजी एक गाणं म्हणायची ; मूळ गाणं आठवत नाही पण साटंलोटं झालेली(एका घरातल्या बहीण भावाचं लग्न दुसऱ्या घरातल्या भाऊ बहिणीशी करतात) एक माहेरी आलेली मुलगी आपल्या भावजय कम नणंदेला विनवते की तिने हिच्या आईवडिलांची नीट काळजी घ्यावी, बदल्यात ही आपल्या सासूचे रोज पाय चेपेल.
झोक्यासाठी गर्दी व्हायची, किरकोळ भांडाभांडी सुद्धा, पण मग एखादी ताई पुढे यायची आणि शिस्तीत सगळ्यांचे नंबर लावून द्यायची.
अंधार पडला की मग सगळ्या पांगायच्या.
पंचमीच्या दुसऱ्या दिवशीची आम्हा मुलांना फार उत्सुकता असायची. ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा हा नाश्ता त्यादिवशी सकाळी मिळायचा. पॉपकॉर्न हा पदार्थ माहीत नसलेला तो काळ होता; त्या चिवड्याचं प्रचंड अप्रूप होतं. आणि तेव्हा असे पदार्थ अगदी त्या सणापुरतेच मर्यादित असायचे. मुलांना आवडतात तर ठेऊ घरात वर्षभर, ही कन्सेप्टच नव्हती. त्या लिमिटेड एडिशन देशी पोपकॉर्नवर अक्षरशः तुटून पडायचो आम्ही सगळे.
मग आळसावत चुलीवरचा निरश्या दुधात केलेला चहा पीत कुणाची मेंदी फिक्कट झाली, कुणाचे नेलपॉलिश निघाले ते बघत ओसरीवर बसायचो. झोपाळा बाजूला रिकामा असायचा, कालच्यासारखे नंबर लागलेले नसायचे; पण आज कुणाला झोके घ्याचा फारसा उत्साह नसायचा ...

Wednesday, 9 October 2019

गुंफण गाण्यांची...


काल एका मैत्रिणीने एका गाण्यातून दुसरे गाणे आठवत जाण्याबद्दल लिहिलेले वाचले आणि मला बऱ्याच काळापासून एकत्र आठवणारी दोन गाणी आठवली.
मेहदी हसन यांनी गायलेली फ़राजची ' अब के हम बिछडे' ही गझल आणि लता मंगेशकर यांनी गायलेली सुरेश भट यांची  'मालवून टाक दीप' ही मराठी गझल.
दोन्ही गाण्यातले भाव अगदी वेगळे आहेत पण मला नेहमी एक ऐकलं की दुसरं आठवायचं. काल नेटवर शोध घेतल्यावर दोन्ही गाणी राग भुपेश्वरी (भूपश्री भूपकली) या रागात बांधलेली आहेत हे समजलं.
'मालवून टाक दीप' हे इरोटीक म्हणता येईल असं गाणं आहे. यात प्रदीर्घ विरहानंतर भेटलेला प्रियकर आहे, एकांत आहे आणि मिलनाची थेट मागणी करणारी धीट प्रणयिनी आहे.
यातलं प्रेम ताज्या नुकत्याच उमललेल्या फुलासारखं रसरशीत आहे. यात आवाहन आहे, आळवणी आहे आणि लाभलेले क्षणांत त्याच्याशी पूर्णपणे समरस होण्याची लालसा आहे.
"हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?"  हे विचारत ती एकमेकांत विलीन होण्याची, प्रेमात पूर्णपणे एकरूप होण्याची अपेक्षा करते आहे.
या गाण्याचे बोल शृंगारिक असले तरी चाल अशी आहे की गाणं गंभीर आहे असं  वाटत राहतं 😊.
(होस्टेलला असताना मी लावलेलं हे गाणं ऐकून एक उत्तर भारतीय मैत्रीण म्हणाली होती शीतल ऐसे रोने धोनेवाले क्लासिकल गाने क्यों सुनती रहती है हमेशा... मग तिला शिस्तीत एक एक कडव्याचा नीट अर्थ सांगितला; तेव्हा डोळे विस्फारून "कैसे भयानक गाने सुनते हो रे बेशर्म लोग" म्हणून हसायला लागली.)
याच्या अगदी उलट 'अब के हम बिछडे' हे  विरहगीत आहे.
मिलनाचा काळ संपून आता विरहाची चाहूल लागली आहे, आणि आता होणारी ताटातूट कायमची असणार याची जाणीवही आहे.
परत कधी भविष्यात भेट झालीच तर ती स्वप्नातल्यासारखी आभासी असणार आहे आणि तोवर प्रेमाचे फूल सुकून गेलेले असणार आहे.
पण यात विरहाच्या दुःखाकडे बघण्याचा एक तात्विक दृष्टिकोनही आहे . यातल्या प्रत्येक कडव्यात माणसाच्या बदलत जाणाऱ्या भावनांबद्दल एक इनसाईट आहे.

शेवटच्या "अब न वो मैं हूँ न तू है न वो माज़ी है "फ़राज़, जैसे दो शख़्स तमन्ना के सराबों में मिलें"
या ओळींमध्ये तर फराज नात्यांचे अशाश्वत असणे अधोरेखित करतो. तो म्हणतो,
"आता मी आधीसारखा नाही, तूही आधीची नाहीस, आणि आता तो काळही राहिला नाही; आपलं एकत्र येणं म्हणजे दोन व्यक्तींच्या आकांक्षांचे मृगजळ होते."
याचा एक वेगळा अर्थही लागतो... बिछडणे म्हणजे प्रत्यक्षात दूर जाणे असेही दरवेळी नसते; एकमेकांसोबत राहूनही माणसं बदलत जातात आणि मनाने एकमेकांपासून दूर जातात. मनांमध्ये हा कायमचा दुरावा आला तर मग एकत्र येणे हे निष्प्राण झालेल्या सुकलेल्या फुलांच्या निर्माल्यासारखे होऊन जाते.
या अँगलने वाचल्यावर सगळ्या गझलची नव्याने संगती लागते.
भुपेश्वरी हा नवीन राग आहे आणि यातली गाणी फार कमी आहेत; या रागात अजून एक गाजलेलं गाणं आहे..."चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा" ही कव्वाली.
शारीरिक उत्कट अधीर प्रेमाच्या  प्रकटनापासून ते प्रेम क्षणभंगुर असण्याबद्दलच्या प्रतिपादनापर्यंतचा प्रवास घडवणाऱ्या वरच्या दोन गाण्यांना या कव्वालीतला उत्पत्ती, स्थिती आणि लय हा
सिद्धांत लावून पाहिला, तर हा नियम जगाप्रमाणेच नात्यांनाही लागू आहे असे म्हणता येते...


पियानो की धुन पर

मघाशी एक कथा वाचत होते, त्यात नायक पियानो दुरुस्त करायचा असा उल्लेख आहे.
त्यावरून एकदम आपल्या हिंदी सिनेमांमधला पियानो आणि त्यावर गायलेली  गाणी आठवली.
जुन्या चित्रपटांमध्ये  पियानोवर एक तरी गाणं असायचंच. प्रसंगही बऱ्यापैकी ठरलेले होते.
 श्रीमंत नायिकापित्याचे आलिशान घर, जनम-दिन की दावत, नायिकेच्या प्रेमळ आग्रहाखातर आलेला गरीब घरचा नायक ... क्वचित एखादं व्हेरिएशन सोडलं तर सहसा हाच प्रसंग असायचा.
मग पियानो वाजवत नायक/ नायिका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्यार का इजहार करायचे. बाकी सगळी मंडळी(मुलीचे वडीलसहित) हातातली रंगीत द्रव्य सांभाळत अज्ञानात आनंद साजरा करायची. गरीब घरातल्या नायक हे पियानो वाजवायचे कसब बहुतेक कॉलेजातच शिकत असावा; रादर तो जे फर्स्ट क्लास फर्स्ट यायचा, त्यातला एक फर्स्ट तरी या पियानोवादन प्राविण्याचाच असावा..
दुसरा प्रसंग मात्र शिरेस असायचा, जुदाईचा. यात थोडी व्हरायटी असायची...  गैरसमज/ जालिम दुनिया/ हिरॉईनने मजबुरीत नकार देणं आणि हिरोला ती बेवफा वाटणं... मग त्यानुसार पत्थर के सनम असे दोषारोप, किंवा चलो एक बार फिर से अजनबी बन जाये, असं लायसन्स टू लीव्ह प्रपोजल असायचं.
काही गाण्यात हिरो एखाद्या हॉटेलमध्ये गात असायचा आणि हिरोईन रकीब के साथ यायची, मग हिरो त्वेषाने पियानोच्या कीज बडवत नायिकेच्या भावनांना जोरदार आवाहन करायचा, रकीब परत अज्ञानात आनंद मोडमध्ये गाणं एन्जॉय करायचा.

अजून एक प्रकार असायचा... मुग्ध नायिका अपनी ही लगन में मगन स्थितीत एखादं लडिवाळ स्वगत गात असायची आणि कव्हरेज क्षेत्रात असलेले किंवा आगमन झालेले कधी नायक तर कधी व्हिलन मनात मांडे खायला लागायचे...

काही गाणी मात्र सिनेमाचं थीम सॉंग असायची आणि चित्रपट भर अधून मधून वाजत राहायची. मेरी जंग सिनेमात तर नुसतं गाणच नव्हे, तर महाभारतातल्या रथाचे चित्र असलेल्या पियानोला सुद्धा विशेष महत्व होतं.
पियानोचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा की सगळे शिस्तीत एका जागी बसून, उभे राहून, फार तर एखादी फेरी मारत गाणं पूर्ण करायचे; आतासारखी आचरट स्टेप्स करत नाचायची सक्ती नव्हती...

आताशा बहुतेक इतकी सवड नसते कुणाला; दिलवाले मध्ये अजय देवगणने 'एक ऐसी लडकी थी' म्हटल्यानंतर आणि धडकन मध्ये सुनील शेट्टीने 'तुम दिल की धडकन हो' चा उद्घोष केल्यानंतर फार कुठे पियानो दिसला नाही .

अजून एक हटके गाणं आहे ज्यात पियानो आहे; बहुदा ही एकमेव अंगाई असेल जी आईने न गाता दोन नायकांनी गायली आहे.
'दुनिया दिलवालों की' नावाचा एक डब सिनेमा आला होता, त्यातलं "जा री जा, ऐ हवा, शोर तू न मचा..".. हे एक फार म्हणजे फार गोड गाणं आहे...






राम... मला गवसलेला..

राम आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या रुपात भेटत आला आहे.
रामाची पहिली आठवण गावातल्या रामनवमीची आणि तिथल्या महाप्रसादाची आहे. नंतर दूरदर्शनवर रामायण सुरू झाल्यावर रामाची पूर्ण गोष्ट माहीत झाली, आणि राम म्हणजे सगळ्यात आदर्श देव असे वाटू लागले.
काही वर्षांनी ध्वजदंड नावाची एक कादंबरी वाचली, आणि मग काही दिवस रामापेक्षा लक्ष्मण जास्त अपील होत राहिला.
 मग गीतरामायण आयुष्यात आलं आणि दैवजात दुःखे भरता म्हणणारा राम जास्त रिलेट झाला, जास्त मानवी वाटू लागला.
नंतर एका टप्प्यावर सीतेचा विचार मनात घोळायला लागला आणि रामाचे नायकत्व झाकोळल्यासारखे झाले.
  त्यानंतर महाभारत जास्त वास्तवदर्शक वाटायला लागले आणि रामायणाची मोहिनी कमी होत गेली.

मग कबीर वाचायला लागले आणि त्यांचा राम म्हणजे दशरथपुत्र अयोध्येचा राजा नसून निर्गुण निराकार तत्वालाच त्यांनी राम म्हटलंय हे हळू हळू कळायला लागलं..
कुमार गंधर्व ऐकता ऐकता निरंजन राम आणि रामय्या की दुलहन यातली रूपकं थोडी थोडी उलगडायला लागली..

आता आयुष्याच्या मध्यावर स्वप्नील आदर्शांचे बरेच इमले कोसळत गेलेले असताना, भ्रमनिरासाचे गाठोडे बरेच मोठे झालेले असताना, आपण स्वतःही वाटतो तितके सुष्ट नाही हे वास्तव नाकारणे वरचेवर कठीण होत जात असताना, हेही प्रकर्षाने जाणवते आहे की आयुष्य कितीही वास्तवदर्शी असलं तरी जगणं उमेदीने पुढे नेण्यासाठी आदर्शांची, स्वप्नांची, श्रद्धेची जोड लागतेच माणसाला... ते मरुस्थळ निघेल की मृगजळ हे माहीत नसले तरी हा अनुभवांचा जुगार परत परत नव्या उत्साहाने खेळणे हेच आपले प्राक्तन आहे.

आणि म्हणून आता राम नव्याने खुणावतो, सुखावतो, दिलासा देतो...

आता पत्नीत्याग केला म्हणून रामाचा, गौतमाचा राग येत नाही.. त्यांच्या निष्ठा, त्यांची जबाबदारीची जाणीव, त्यांची समानुभूतीची व्याप्ती कौटुंबिक परिघापेक्षा जास्त होती हे कळत, पटत जातं...
आता राम म्हटलं की व्यक्तिगत सुखापेक्षा कर्तव्य जास्त महत्वाचे मानणारा, दिलेला शब्द, घेतलेले व्रत निष्ठेने पाळणारा एक राजा डोळ्यासमोर येतो, ज्याचे राज्य इतके आदर्श होते की लोक आजही रामराज्य हे विशेषण सुशासनासाठी वापरतात. त्याचवेळी समाजमनात  चांगुलपणा, पावित्र्य, निष्ठा, श्रद्धा या मूल्यांवर असलेल्या अढळ श्रद्धेचे प्रतीक म्हणून राम समोर येतो.
पौराणिक कथांनी जपलेले पिढ्यांपिढ्यांचे सांस्कृतिक संचित म्हणून राम समोर येतो...
आणि संतांनी वर्णिलेल्या निर्गुण निराकार जगन्निर्मात्याचे नाव म्हणूनही आता रामच दिसतो...

मनाचिये गुंती

दिलं एक मंदिर सिनेमातले  'रुक जा रात, ठहर जा रे चंदा', हे गाणं पहिल्यांदा ऐकले तेव्हाच खूप आवडले होते; त्यात एक उदास आर्त अंडरटोन होता जो मनाला खूप भिडणारा होता, ऐकता ऐकता डोळे पाणावले होते हे पक्के आठवते. पण प्रणयगीत असून इतके उदास का, याचे उत्तर नंतर काही काळाने चित्रपट पाहिला तेव्हा मिळाले.
नायकाचे दुसऱ्या दिवशी एक मोठे ऑपरेशन आहे, अगदी जीवन मरणाचा निर्णय त्यात होणार आहे. आजची रात्र कदाचित शेवटची ठरेल या भीतीचे सावट दोघांच्याही मनावर आहे.अशा मनस्थितीत नायक आपल्या पत्नीला म्हणतोय की लग्नाच्या पहिल्या रात्री तू मला जशी भेटली होतीस त्या नवविवाहितेच्या रुपात मला तुला परत एकदा बघायचे आहे. साजशृंगार करून अश्रू आवरत ती उभी आहे आणि त्यांच्या पहिल्या मिलनाची आठवण जागवणारे हे गाणं म्हणतीय... आणि आपल्या सर्वस्वावर  बेतलेले  जीवघेणे संकट  तिच्या कातर स्वरातून आपल्यापर्यंत पोहोचत राहतं.
****
 आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना आपण बऱ्याचदा गृहीत धरलेले असते. आपले आई वडील, बहीण, भाऊ, हे सगळे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात, मात्र त्यांच्या भूमिकेचे महत्व आपल्याला तितके तीव्रतेने जाणवत नसते. पण त्यांचे जाणे, किंवा जाण्याची शक्यतासुद्धा आपल्याला समूळ हादरवून सोडते. It changes you in such a way you are never the same again ..
एक अवखळ, थोडा बेजबाबदार, थोडा खोडकर नवतरुण, आयुष्याला फार कॅज्युअली घेणारा; आपल्या मोठ्या भावाच्या समजूतदारपणाचा क्वचित गैरफायदाही घेणारा... एक वेळ अशी येते की मोठ्या भावाला गंभीर दुखापत होते आणि अपण नेमके काय गमावण्याचा उंबरठ्यावर उभे आहोत याची या तरुणाला प्रकर्षाने जाणीव होते. या प्रसंगात तो अमूलाग्र बदलतो.  'रुठके हमसे कभी, जब चले जाओगे तुम', हे गाणं म्हणजे त्याचा पश्चाताप, त्याची व्याकुळता, याचे मूर्त रूप. भाऊ बहीण या नात्यावर बरीच गाणी आहेत, त्या मानाने दोन भावांमधले भावनिक बंध इतके हळुवारपणे मांडणारे हे गाणे म्हणजे तसा दुर्मिळ प्रकार...
****

आपले नातेवाईक कोण असतील यावर आपला ताबा नसतो; मैत्री मात्र आपण स्वेच्छेने जोडलेले ऋणानुबंध... परस्परांचे गुण म्हणा अवगुण म्हणा, जुळले की मैत्री नावाची प्रचंड सुंदर गोष्ट आयुष्यात येते. त्यातही कॉलेज जीवनातली मैत्री अजून खास, कारण हवेतून जमिनीवर येण्याचा, स्वप्नातून सत्यात येण्याचा प्रवास आपण एकत्र करत असतो. उरात स्वप्नं आणि मनात आदर्शवाद घेऊन भराऱ्या मारणाऱ्या मित्रांचा बेसावध असताना चटका बसावा तसा दाहक वास्तवाशी, नकारात्मक कटुतेशी सामना होतो आणि तो ताण सहन न होऊन एक सवंगडी कोलमडतो, जीव द्यायचा प्रयत्न करतो. सगळं भावविश्व उध्वस्त झालेल्या त्याच्या मित्रांचा आकांत आणि त्याचबरोबर त्याला बरं करण्याचा निग्रह यांचं मिश्रण म्हणजे 'जाने नहीं देंगे तुझे..' हे थ्री इडियट्स मधलं गाणं... नुसतं ऐकतानाही हेलावून जायला होतं
****
माणूस एकटा येतो आणि एकटा जातो असे असले तरी जगत असताना तो नात्यांनी  वेढलेला असतो.
काही नाती जन्माने बहाल केलेली तर काही स्वतः जोडलेली. यातली काही मोजकी नाती ही आपल्या जगण्याचा आधार असतात; प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी, कधी मनात हतबलता दाटून आली तर आश्वस्त करणारी, नव्याने उमेद जागवणारी...
 पण नात्यांनाही मर्त्य असण्याचा शाप असतोच; त्यात मृत्यू हा चिरविरह घडवून आणणारा सगळ्यात मोठा खलनायक.
असा एखाद्या जीवलगाचा मृत्यू समोर उभा ठाकला; ज्याची सोबत सदैव गृहीत धरली तो हात कायमचा सुटण्याची शक्यता निर्माण झाली, की मन प्रचंड विकल होते.
आयुष्याचा जोडीदार, भाऊ, मित्र, या नात्यांचे बाह्यरुप वेगळे असले तरी त्या ऋणानुबंधांची आणि त्यामुळे त्या गाठी सुटण्याच्या भीतीने होणाऱ्या दुःखाची, त्या आर्त आकांताची जातकुळी मात्र एकच..






नैराश्य समज-गैरसमज

काल एका तरुणाने आपण जीव देणार आहोत अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकल्याचं वाचलं, त्यावर उलट सुलट प्रतिक्रियाही वाचायला मिळाल्या आणि परत एकदा जाणवलं की या विषयाबद्दल किती ठाम आणि चुकीच्या समजुती आहेत.
डिप्रेशनचा सामना करणाऱ्या व्यक्तींची सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे या परिस्थितीला आजार म्हणून न स्वीकारले जाणे.
शारीरिक आजारांची लक्षणे लोकांना माहीत आणि मान्य आहेत; ताप आला, दुखतंय, गाठ आली, जखम झाली ... काहीही शारीरिक त्रास जाणवला की लोक वैद्यकीय मदत घेतात. त्यांच्या जवळचे लोक त्यांना मदत करतात, काळजी घेतात.
मानसिक आजारांच्या बाबतीत मात्र बहुसंख्य वेळा ती व्यक्ती उगीच नाटक करतीय असा निष्कर्ष काढला जातो, किंवा पेशंट/नातेवाईक डिनायल मोडमध्ये असतात.
समजा एखादी सुदृढ व्यक्ती आहे, ती पाच दहा किलोमीटर चालू शकते, वीस पंचवीस किलोच्या बॅगा उचलते; पण काहीजण असे करू शकत नाहीत. पण कुणी त्यांच्यावर नाटक केल्याचा आरोप करत नाही. शारीरिक दुर्बलता आपण सहसा समजून घेतो, पण मानसिक कमकुवतपणा मात्र अजूनही स्वीकारहार्य नाही. परिस्थितीचा सामना करण्याची, अपयश पचवण्याची प्रत्येकाची मानसिक क्षमता, भावनिक कोशंट, वेगवेगळा असते. हे समजून घ्यायला हवं, accept करायला हवं.

ताण तणावाला सामोरे जात असताना आपण सगळेच कमी अधिक प्रमाणात अस्वस्थ असतो, कधी चिडचिडे होतो, कधी हताश होतो, कधी भावनेच्या भरात अतर्किक, अयोग्य बोलतो वागतो. पण ही तात्पुरती अवस्था असते. आपण त्यातून बाहेर येऊन परत मार्गी लागतो. काहीजणांच्या बाबतीत हा काळ लांबतो, किंवा या काळातल्या प्रतिक्रिया जास्त तीव्र असतात. काही केसेसमध्ये सायकोसिस, व्यसन, यासारखे वाढीव घटक असतात, किंवा मूलभूत मानसिक ताकदच कमी असते.
एखादी व्यक्ती attention seeking करत आहे, नसलेल्या किंवा क्षुल्लक असलेल्या समस्येचे भांडवल करत आहे असे वाटू शकते, आणि काही केसेसमध्ये ते खरेही असेल, पण हे तर शारीरिक आजारांच्या बाबतीतही कधीकधी केले जाते. पण तरी आपण वैद्यकीय दृष्टिकोनातून शहानिशा करतोच.
मानसिक आजारांच्या बाबतीत मात्र त्या व्यक्तीला दोष देणे किंवा थेट मनोरुग्णाचे लेबल लावणे अशा टोकाच्या भूमिका घेतल्या जातात.
प्रत्येक वेळी मानसिक समस्या आत्महत्येच्या टोकापर्यंत पोहोचण्याइतक्या गंभीर नसतात. पण नैराश्य हा गंभीर आणि झपाट्याने वाढत असलेला आजार आहे हे विसरायला नको.
 शारीरिक आजारांच्या बाबतीत वैद्यकीय मदत घेणे जितके सहज सुलभ असते, तितक्याच सहजपणे मानसिक अस्वास्थ्यासाठी मदत घेता येणे फार गरजेचे आहे.
Psychiatry विषयातली मी तज्ञ नाही.पण या विषयाबाबत जागरूकता, शास्त्रीय माहिती कमी आहे आणि मानसिक आजारांचे प्रमाण मात्र दिवसोंदिवस वाढत आहे हे सतत जाणवत राहतं, आणि म्हणून वाईट वाटत राहतं.











Tuesday, 8 October 2019

सण आणि 'त्या' गोळ्या

काल गंमतीत श्रावण पाळण्याबद्दल पोस्ट लिहिली, पण पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेण्याचा विषय निघाला आणि अंतर्मुख व्हायला झालं.
श्रावण सुरू झाला की एकापाठोपाठ सण, व्रत वैकल्ये सुरू होतात. गणपती बसतात, गौरी येतात, मग घट, नवरात्र ...
आणि आमच्याकडे 'त्या' गोळ्या मागण्यासाठी गर्दी सुरू होते. बऱ्याच जणी थेट मेडिकल स्टोअर्स मधून घेतात. पण काही फार्मासिस्ट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय टॅब्लेटस द्यायला नकार देतात, आणि काहीजणी हेल्थ कॉन्शस असतात; डॉक्टर सांगतील त्याच गोळ्या घ्यायच्या असतात त्यांना. मग या फॅमिली डॉक्टर किंवा लेडी डॉक्टरकडे येतात.
हा विषय 'मूर्खपणा आहे हा', ' विटाळ पाळणारे बायका/पुरुष मठ्ठ आहेत',  इतका सरळ सोपा नाही. आणि सरसकट बायकांवर दोषारोप करण्यातही काही अर्थ नाही.
या विषयाचे दोन पैलू आहेत;
स्त्रीच्या प्रजननक्षम काळात दर महिन्यात घडणाऱ्या नैसर्गिक घटनेला अपवित्र मानणे, आणि
या समजुतीमुळे विशिष्ट प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या हॉर्मोन्सच्या गोळ्या व त्यांचे दुष्परिणाम.
पाळी म्हणजे धार्मिक कार्यासाठी अपवित्र, वर्ज्य हे सर्वांच्या आणि खुद्द स्त्रियांच्या मनातही खूप खोल रुजलेले आहे. ते सहजासहजी जाणार नाही.

प्रत्येक कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेले काही ना काही धार्मिक विधी, कर्मकांड असतात. कालौघात काही बदल घडले असतील, पण  देवाधर्माशी निगडित कुठलाच विधी, पूजा नाही अशी कुटुंबं अगदी अपवादात्मक.
बहुतेक कुटुंबांत हे सणवार पारंपरिक पद्धतीने साजरे होतात; बऱ्याचदा एरवी स्वतंत्र राहणारी भावंडं एकत्र येऊन हे विधी, कुळाचार करतात.
त्यामुळे हा विषय, निर्णय त्या स्त्रीचा, किंवा त्या जोडप्याचाही राहत नाही.
 त्यात मागच्या पिढीचे विचार या बाबतीत अजून कर्मठ असतात. अशा सगळ्या परिस्थितीत गोळ्या घेऊन विषय संपवणे हा उपाय मग सगळ्यांना सोपा वाटतो. घरात पै-पाहुणे जमलेले असताना वेगळे बसणे, ते एक्सप्लेन करत राहणेही एम्बॅरेसिंग होते. एकत्र कुटुंबात खरच या अडचणी  असतात.
जिथे छोटे कुटुंब आहे तिथे तर सगळा भार एकट्या स्त्रीवर असतो, आणि त्यासाठी ती सणाच्या काळात 'मोकळी' असावी लागते.
त्यामुळे तिला हा उपाय अपरिहार्य वाटतो.

पण त्याचवेळी, अशा हॉर्मोन्सच्या गोळ्या घेणे, विशेषतः सारखे सारखे, किंवा जास्त काळासाठी घेणे हे स्त्रीच्या आरोग्यावर वाईट परिणाम करणारे, कधीकधी गंभीर दुष्परिणाम करणारे आहे हेही अगदी खरे आहे.
  या गोळ्यांमध्ये असलेल्या प्रोजेस्टेरॉन मुळे नंतर येणाऱ्या पाळीत पोट जास्त दुखते. काहीजणींमध्ये मासिक चक्राची रिदम बिघडते आणि पाळी अनियमित होते. गोळ्या सुरू असतानाही थाडे ब्लीडिंग होणे, तर कधी जास्त दिवस रक्तस्त्राव सुरू राहणे, असे प्रकारही होतात. काहीवेळा बायकांना मळमळ होते, चक्कर येते, ऍसिडिटी वाढते, आणि जास्त दिवस या गोळ्या घेत राहिल्यास चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येणे, मूड स्विंग्स असे त्रासही होतात. शरीरात संप्रेरकांनी तोलून धरलेला जो समतोल असतो, तो सगळा या अशा गोळ्या घेण्याने बिघडतो.
काही केसेसमध्ये रक्ताची घनता वाढल्यामुके पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या ( Deep vein thrombosis) झाल्याचीही उदाहरणे आहेत.

ही समस्या हाताळताना आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला रागावून, धुडकावून लावून उपयोग होत नाही; ते दुसरीकडून सोय करून घेतात.
त्यांच्या घरातल्या ज्येष्ठांवर, पुरुषांवर आगपाखड करूनही उपयोग नसतो.
 सर्वच एका संस्कृतीचे बळी आहेत, हे इरावती बाईंचे वाक्य मला या संदर्भातही समर्पक वाटते.
यात न चिडता अडचणी ऐकाव्या लागतात,  समजून घ्याव्या लागतात, समानुभूती दाखवावी लागते, आणि प्रॅक्टिकल उपाय शोधावे लागतात. मग ते आपली बाजू ऐकतात, त्यानुसार स्वतःमध्ये थोडा तरी बदल करतात.
मी स्वतः ग्रामीण एकत्र कुटुंबाचा भाग आहे, आणि यातून गेले आहे. तीन वर्षांपूर्वी एका जावेला पोटदुखीचा खूप त्रास झाला, आणि मग बायका वेगळं बसतील पण गोळ्या घेणार नाही हे ठरलं. तोपर्यंत स्वतःच्या कुटुंबातल्या बायकांनीसुद्धा माझं ऐकलं नव्हतं.
बाकी कुटुंबीय नंतर; मुळात बायकांनाच कंव्हिन्स करणं कठीण आहे. एकवेळ सार्वजनिक जीवनातल्या वाईट रूढी संपवणे सोपे, कारण त्यामागे एक मोठे जनमत, तर कधी आंदोलन असते, अनेकांची सोबत असते. पण कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर बदल घडवणं जास्त कठीण जातं. त्यातून हा विषय संकोचामुळे चर्चिला सुद्धा जात नाही. घेतल्या चार दिवस एखादवेळी, तर काय आभाळ कोसळते, उगीच देवाच्या कार्यात वावगं वागून गालबोट लावायला नको, हा विचार प्रबळ असतो( गंमत म्हणजे यात देवांपेक्षा देवींचे सोवळे सहसा जास्त कडक असते).
प्रश्न चार दोन दिवसांचा नसून, ही सवय कायम ठेवल्यामुळे या पक्षपाती पद्धतीला खतपाणी मिळते, हा आहे. अल्प काळासाठी तरी आरोग्याशी का खेळायचे, हा आहे. एका अशास्त्रीय, चुकीच्या शुचितेच्या कल्पनेसाठी स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याशी अकारण अनावश्यक तडजोड का करायची, हा आहे.

सध्या तरी मी माझ्यापुरती एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे.
अशा स्त्रियांना जास्त वेळ देणं, शक्य झालं तर गोळ्या घेऊच नका यासाठी कन्व्हीन्स करणं, हा पहिला उपाय.
यात एक तर्क असा की स्त्रीच्या शरीरात प्रजनन यंत्रणेची जी रचना आहे त्यानुसार मासिक चक्र चालते आणि पाळी त्याचाच एक बायप्रॉडक्ट आहे; त्यात देव धर्म, शुद्ध अशुद्ध असे काही नाही. रोजच स्त्री त्या चक्राच्या कुठल्यातरी टप्प्यावर असते; मग त्या लॉजिकने ती रोजच अशुद्ध असायला हवी, पण आपण तसे मानत नाही, मग पाळीत तरी का मानायचे.
दुसरं, जर देवानेच आपल्याला बनवले आहे असे म्हटले, तर त्याच्याकडूनच स्त्रीला मातृत्वाची अजोड देणगी मिळाली आहे. त्या मातृत्वाशी निगडित असणारी घटना मग अपवित्र कशी असेल?
समजा हे पटले नाही, किंवा पटले तरी प्रत्यक्ष आचरणात आणणे शक्य नसेल, तर किमान गोळ्या घेणं टाळा असं सांगायचं...
 त्यासाठी मग एक दोन दिवस ओव्हरलॅप होत असतील तर त्या काळात नवरा, मुलं, यांना पूजा करायला लावा असं सांगणं( "तुम्ही तशीच करा पूजा, काही होत नाही" हे एका झटक्यात सगळ्यांना पचत नाही, गैरसोय वाढली की बायका स्वतःच थोडं थोडं लवचिक होत जातात हे माझे निरीक्षण आहे), हा एक उपाय.
अगदीच ऐकत नसतील तर गोळ्या घेण्याचा काळ कमीत कमी कसा असेल हे बघायचे.
मग स्थापनेच्या दिवसांपुरते घ्या, इतर दिवसांचा प्रसाद आधीच करून ठेवा किंवा बाहेरून मागवा, कुटुंबातल्या इतर सदस्यांवर जबाबदारी सोपवा, असे उपाय करायला लागतात.
 हे  सगळं इतकं विस्ताराने सांगतेय ते कदाचित खूप क्षुल्लक आणि अनावश्यक वाटेल; मलाही कधीकधी वाटतं की हे नियोजन करत बसणं हा माझ्या कामाचा भाग नाही, पण सगळीकडे बंडाचे झेंडे फडकवून काही साध्य होत नाही हा माझा अनुभव आहे.
कुप्रथा म्हणत फार आक्रमक विरोध केला की धार्मिक भावना मध्ये येतात, दोन गट पडतात आणि मग समोरचे दुरावतात, आपला मुद्दा ऐकून घेत नाहीत. 

अर्थात नवीन पिढीच्या मुली याबाबतीत ठाम आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण धार्मिक कारणांसाठी हा उपाय चूक समजणाऱ्या काहीजण ट्रिप्स, सार्वजनिक समारंभ अशा गोष्टींसाठी या गोळ्या सहज घेतात. हे लक्षात घ्यायला हवं की कारणं वेगळी असली तरी टॅब्लेटस त्याच आहेत, आणि दुष्परिणामही !

या सगळ्यामध्ये पुरुषांची भूमिका आजकाल निष्क्रिय उदासीनता किंवा मूकसंमतीची असते. आधीसारखे कट्टर कुटुंबप्रमुख आता शक्यतो नसतात, पण "ते लेडीजचे लेडीज लोकांनाच माहीत" असा कातडीबचावू पवित्रा असतो. बऱ्याचदा या गोळ्यांच्या दुष्परिणामांबद्दल अनभिज्ञताही असते. खरे तर पुरुषांनी जर यात लक्ष घातले आणि घरातल्या बायकांना परावृत्त केले, प्रसंगी सणांमधली काही जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली, तर बऱ्याच ठिकाणी हे गोळ्या घेणे टाळता येईल. थोडी गैरसोय होईल, किंवा जुन्या समजुतींना तिलांजली द्यावी लागेल, पण घरातल्या स्त्रीच्या आरोग्यापुढे हे गौण आहे.
आणि स्त्रिया... ज्यांना हे सगळं कळतं, पटतं, त्यांनी त्यांच्या भोवताली प्रबोधन करत राहायला हवे. कुणावर वैयक्तिक टीका न करता, आरोप न करता, या टॅब्लेट्सचा वापर नुसता अनावश्यक नव्हे तर हानीकारकही आहे, हे शक्य तितके बिंबवत राहायला हवे.
पाळीचा बाऊ होण्याऐवजी या गोळ्या घेण्याचा बाऊ करत राहायला हवा, म्हणजे त्यातला कॅज्युअलनेस कमी होईल आणि सर्रास सहज अशा गोळ्या घेतल्या जाणार नाहीत. हळूहळू सोय वरचढ ठरून वेगळं बसण्याची पद्धतही कमी कमी होत जाईल.
बदल झटक्यात होत नाहीत;  हळूहळू जागृती वाढवत, गैरसमजुती आणि अपायकारक कल्पना दूर सारत ते घडवून आणावे लागतात.
आजच्या संदर्भात हाच खरा चातुर्मास असणार आहे!