Tuesday, 8 October 2019

सण आणि 'त्या' गोळ्या

काल गंमतीत श्रावण पाळण्याबद्दल पोस्ट लिहिली, पण पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेण्याचा विषय निघाला आणि अंतर्मुख व्हायला झालं.
श्रावण सुरू झाला की एकापाठोपाठ सण, व्रत वैकल्ये सुरू होतात. गणपती बसतात, गौरी येतात, मग घट, नवरात्र ...
आणि आमच्याकडे 'त्या' गोळ्या मागण्यासाठी गर्दी सुरू होते. बऱ्याच जणी थेट मेडिकल स्टोअर्स मधून घेतात. पण काही फार्मासिस्ट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय टॅब्लेटस द्यायला नकार देतात, आणि काहीजणी हेल्थ कॉन्शस असतात; डॉक्टर सांगतील त्याच गोळ्या घ्यायच्या असतात त्यांना. मग या फॅमिली डॉक्टर किंवा लेडी डॉक्टरकडे येतात.
हा विषय 'मूर्खपणा आहे हा', ' विटाळ पाळणारे बायका/पुरुष मठ्ठ आहेत',  इतका सरळ सोपा नाही. आणि सरसकट बायकांवर दोषारोप करण्यातही काही अर्थ नाही.
या विषयाचे दोन पैलू आहेत;
स्त्रीच्या प्रजननक्षम काळात दर महिन्यात घडणाऱ्या नैसर्गिक घटनेला अपवित्र मानणे, आणि
या समजुतीमुळे विशिष्ट प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या हॉर्मोन्सच्या गोळ्या व त्यांचे दुष्परिणाम.
पाळी म्हणजे धार्मिक कार्यासाठी अपवित्र, वर्ज्य हे सर्वांच्या आणि खुद्द स्त्रियांच्या मनातही खूप खोल रुजलेले आहे. ते सहजासहजी जाणार नाही.

प्रत्येक कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेले काही ना काही धार्मिक विधी, कर्मकांड असतात. कालौघात काही बदल घडले असतील, पण  देवाधर्माशी निगडित कुठलाच विधी, पूजा नाही अशी कुटुंबं अगदी अपवादात्मक.
बहुतेक कुटुंबांत हे सणवार पारंपरिक पद्धतीने साजरे होतात; बऱ्याचदा एरवी स्वतंत्र राहणारी भावंडं एकत्र येऊन हे विधी, कुळाचार करतात.
त्यामुळे हा विषय, निर्णय त्या स्त्रीचा, किंवा त्या जोडप्याचाही राहत नाही.
 त्यात मागच्या पिढीचे विचार या बाबतीत अजून कर्मठ असतात. अशा सगळ्या परिस्थितीत गोळ्या घेऊन विषय संपवणे हा उपाय मग सगळ्यांना सोपा वाटतो. घरात पै-पाहुणे जमलेले असताना वेगळे बसणे, ते एक्सप्लेन करत राहणेही एम्बॅरेसिंग होते. एकत्र कुटुंबात खरच या अडचणी  असतात.
जिथे छोटे कुटुंब आहे तिथे तर सगळा भार एकट्या स्त्रीवर असतो, आणि त्यासाठी ती सणाच्या काळात 'मोकळी' असावी लागते.
त्यामुळे तिला हा उपाय अपरिहार्य वाटतो.

पण त्याचवेळी, अशा हॉर्मोन्सच्या गोळ्या घेणे, विशेषतः सारखे सारखे, किंवा जास्त काळासाठी घेणे हे स्त्रीच्या आरोग्यावर वाईट परिणाम करणारे, कधीकधी गंभीर दुष्परिणाम करणारे आहे हेही अगदी खरे आहे.
  या गोळ्यांमध्ये असलेल्या प्रोजेस्टेरॉन मुळे नंतर येणाऱ्या पाळीत पोट जास्त दुखते. काहीजणींमध्ये मासिक चक्राची रिदम बिघडते आणि पाळी अनियमित होते. गोळ्या सुरू असतानाही थाडे ब्लीडिंग होणे, तर कधी जास्त दिवस रक्तस्त्राव सुरू राहणे, असे प्रकारही होतात. काहीवेळा बायकांना मळमळ होते, चक्कर येते, ऍसिडिटी वाढते, आणि जास्त दिवस या गोळ्या घेत राहिल्यास चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येणे, मूड स्विंग्स असे त्रासही होतात. शरीरात संप्रेरकांनी तोलून धरलेला जो समतोल असतो, तो सगळा या अशा गोळ्या घेण्याने बिघडतो.
काही केसेसमध्ये रक्ताची घनता वाढल्यामुके पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या ( Deep vein thrombosis) झाल्याचीही उदाहरणे आहेत.

ही समस्या हाताळताना आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला रागावून, धुडकावून लावून उपयोग होत नाही; ते दुसरीकडून सोय करून घेतात.
त्यांच्या घरातल्या ज्येष्ठांवर, पुरुषांवर आगपाखड करूनही उपयोग नसतो.
 सर्वच एका संस्कृतीचे बळी आहेत, हे इरावती बाईंचे वाक्य मला या संदर्भातही समर्पक वाटते.
यात न चिडता अडचणी ऐकाव्या लागतात,  समजून घ्याव्या लागतात, समानुभूती दाखवावी लागते, आणि प्रॅक्टिकल उपाय शोधावे लागतात. मग ते आपली बाजू ऐकतात, त्यानुसार स्वतःमध्ये थोडा तरी बदल करतात.
मी स्वतः ग्रामीण एकत्र कुटुंबाचा भाग आहे, आणि यातून गेले आहे. तीन वर्षांपूर्वी एका जावेला पोटदुखीचा खूप त्रास झाला, आणि मग बायका वेगळं बसतील पण गोळ्या घेणार नाही हे ठरलं. तोपर्यंत स्वतःच्या कुटुंबातल्या बायकांनीसुद्धा माझं ऐकलं नव्हतं.
बाकी कुटुंबीय नंतर; मुळात बायकांनाच कंव्हिन्स करणं कठीण आहे. एकवेळ सार्वजनिक जीवनातल्या वाईट रूढी संपवणे सोपे, कारण त्यामागे एक मोठे जनमत, तर कधी आंदोलन असते, अनेकांची सोबत असते. पण कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर बदल घडवणं जास्त कठीण जातं. त्यातून हा विषय संकोचामुळे चर्चिला सुद्धा जात नाही. घेतल्या चार दिवस एखादवेळी, तर काय आभाळ कोसळते, उगीच देवाच्या कार्यात वावगं वागून गालबोट लावायला नको, हा विचार प्रबळ असतो( गंमत म्हणजे यात देवांपेक्षा देवींचे सोवळे सहसा जास्त कडक असते).
प्रश्न चार दोन दिवसांचा नसून, ही सवय कायम ठेवल्यामुळे या पक्षपाती पद्धतीला खतपाणी मिळते, हा आहे. अल्प काळासाठी तरी आरोग्याशी का खेळायचे, हा आहे. एका अशास्त्रीय, चुकीच्या शुचितेच्या कल्पनेसाठी स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याशी अकारण अनावश्यक तडजोड का करायची, हा आहे.

सध्या तरी मी माझ्यापुरती एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे.
अशा स्त्रियांना जास्त वेळ देणं, शक्य झालं तर गोळ्या घेऊच नका यासाठी कन्व्हीन्स करणं, हा पहिला उपाय.
यात एक तर्क असा की स्त्रीच्या शरीरात प्रजनन यंत्रणेची जी रचना आहे त्यानुसार मासिक चक्र चालते आणि पाळी त्याचाच एक बायप्रॉडक्ट आहे; त्यात देव धर्म, शुद्ध अशुद्ध असे काही नाही. रोजच स्त्री त्या चक्राच्या कुठल्यातरी टप्प्यावर असते; मग त्या लॉजिकने ती रोजच अशुद्ध असायला हवी, पण आपण तसे मानत नाही, मग पाळीत तरी का मानायचे.
दुसरं, जर देवानेच आपल्याला बनवले आहे असे म्हटले, तर त्याच्याकडूनच स्त्रीला मातृत्वाची अजोड देणगी मिळाली आहे. त्या मातृत्वाशी निगडित असणारी घटना मग अपवित्र कशी असेल?
समजा हे पटले नाही, किंवा पटले तरी प्रत्यक्ष आचरणात आणणे शक्य नसेल, तर किमान गोळ्या घेणं टाळा असं सांगायचं...
 त्यासाठी मग एक दोन दिवस ओव्हरलॅप होत असतील तर त्या काळात नवरा, मुलं, यांना पूजा करायला लावा असं सांगणं( "तुम्ही तशीच करा पूजा, काही होत नाही" हे एका झटक्यात सगळ्यांना पचत नाही, गैरसोय वाढली की बायका स्वतःच थोडं थोडं लवचिक होत जातात हे माझे निरीक्षण आहे), हा एक उपाय.
अगदीच ऐकत नसतील तर गोळ्या घेण्याचा काळ कमीत कमी कसा असेल हे बघायचे.
मग स्थापनेच्या दिवसांपुरते घ्या, इतर दिवसांचा प्रसाद आधीच करून ठेवा किंवा बाहेरून मागवा, कुटुंबातल्या इतर सदस्यांवर जबाबदारी सोपवा, असे उपाय करायला लागतात.
 हे  सगळं इतकं विस्ताराने सांगतेय ते कदाचित खूप क्षुल्लक आणि अनावश्यक वाटेल; मलाही कधीकधी वाटतं की हे नियोजन करत बसणं हा माझ्या कामाचा भाग नाही, पण सगळीकडे बंडाचे झेंडे फडकवून काही साध्य होत नाही हा माझा अनुभव आहे.
कुप्रथा म्हणत फार आक्रमक विरोध केला की धार्मिक भावना मध्ये येतात, दोन गट पडतात आणि मग समोरचे दुरावतात, आपला मुद्दा ऐकून घेत नाहीत. 

अर्थात नवीन पिढीच्या मुली याबाबतीत ठाम आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण धार्मिक कारणांसाठी हा उपाय चूक समजणाऱ्या काहीजण ट्रिप्स, सार्वजनिक समारंभ अशा गोष्टींसाठी या गोळ्या सहज घेतात. हे लक्षात घ्यायला हवं की कारणं वेगळी असली तरी टॅब्लेटस त्याच आहेत, आणि दुष्परिणामही !

या सगळ्यामध्ये पुरुषांची भूमिका आजकाल निष्क्रिय उदासीनता किंवा मूकसंमतीची असते. आधीसारखे कट्टर कुटुंबप्रमुख आता शक्यतो नसतात, पण "ते लेडीजचे लेडीज लोकांनाच माहीत" असा कातडीबचावू पवित्रा असतो. बऱ्याचदा या गोळ्यांच्या दुष्परिणामांबद्दल अनभिज्ञताही असते. खरे तर पुरुषांनी जर यात लक्ष घातले आणि घरातल्या बायकांना परावृत्त केले, प्रसंगी सणांमधली काही जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली, तर बऱ्याच ठिकाणी हे गोळ्या घेणे टाळता येईल. थोडी गैरसोय होईल, किंवा जुन्या समजुतींना तिलांजली द्यावी लागेल, पण घरातल्या स्त्रीच्या आरोग्यापुढे हे गौण आहे.
आणि स्त्रिया... ज्यांना हे सगळं कळतं, पटतं, त्यांनी त्यांच्या भोवताली प्रबोधन करत राहायला हवे. कुणावर वैयक्तिक टीका न करता, आरोप न करता, या टॅब्लेट्सचा वापर नुसता अनावश्यक नव्हे तर हानीकारकही आहे, हे शक्य तितके बिंबवत राहायला हवे.
पाळीचा बाऊ होण्याऐवजी या गोळ्या घेण्याचा बाऊ करत राहायला हवा, म्हणजे त्यातला कॅज्युअलनेस कमी होईल आणि सर्रास सहज अशा गोळ्या घेतल्या जाणार नाहीत. हळूहळू सोय वरचढ ठरून वेगळं बसण्याची पद्धतही कमी कमी होत जाईल.
बदल झटक्यात होत नाहीत;  हळूहळू जागृती वाढवत, गैरसमजुती आणि अपायकारक कल्पना दूर सारत ते घडवून आणावे लागतात.
आजच्या संदर्भात हाच खरा चातुर्मास असणार आहे!









No comments:

Post a Comment