Friday, 24 July 2020

लेक वयात येताना २


लेक वयात येताना भाग 2 रा
मागील भागात आपण पौगंडावस्थेत होणारे शारीरिक बदल आणि त्या वयात लावायच्या सवयींबद्दल माहिती घेतली.
या भागात आपण मुलींमध्ये होणारे भावनिक/ मानसिक बदल आणि त्याला कसे सामोरे जायचे  याबद्दल माहिती  घेऊ या .
वयाच्या या टप्प्यांवर मुलींमध्ये खूप शारीरिक आणि मानसिक स्थित्यांतर होत असतात , आणि या काळात बऱ्याच वर्तणूक समस्या उद्भवतात.
   * गोंधळलेपणा, आत्मविश्वास कमी होणे* :
पौगंडावस्थेत मुलींमध्ये अनेक शारीरिक व हॉर्मोनल बदल वेगाने  होत असतात . त्यामुळे त्या गोंधळतात, selfconcious होतात. त्याचवेळी अनेक प्रकारचे विचार डोक्यात घोळत असतात. त्यामुळे एकाग्रता कमी होते; परिणामी शालेय प्रगती वर ही परिणाम होऊ शकतो .या सगळ्यामुळे मुली संभ्रमित होऊ शकतात, काही जणांमध्ये आत्मविश्वास ही खालावतो. तसेच स्वतः मधल्या शारीरिक बदलांची तुलना (उंची, वजन,  इ.)इतर मुलींसोबत केल्याने, अथवा कुणी चिडवल्यामुळे  काही मुलींमध्ये न्यूनगंड ही निर्माण होतो
अशावेळी मुलींमधले बदल त्यांना समजावून सांगणे,हे बदल नैसर्गिक आहेत याबद्दल त्यांना आश्वस्त करणे आणि धीर देणेे खूप गरजेचे आहे. शाळेतील कामगिरी खालावली तरी त्यांना धारेवर धरू नका, किंवा सर्वांसमोर टीका अथवा इतरांशी तुलना अजिबात करू नका; त्याने त्यांचा स्वतःवरचा विश्वास अजून खालावेल .
* हळवेपणा/ अती भावनाशीलता*:
छोट्या छोट्या गोष्टींवरून मुली रडवेल्या होतात, अतिभावनिक होऊन काहीतरी बोलतात. पालकांना समजत नाही की क्षुल्लक गोष्टींवर आपली  मुलगी अत्यंतिक प्रतिक्रिया का देत आहे .
मुलीच्या शरीरात दरमहा हॉर्मोन्स ची तीव्र आंदोलनं सुरू असतात ; शरीर, मन, पूर्णपणे सरावलेले नसते, त्यामुळे असे होते. तिची थट्टा करू नका, त्याचवेळी तिने  थोडं खंबीर राहायला पाहिजे हे न दुखावता प्रेमाने, पण ठामपणे सुचवा.
* चिडचिडेपणा/रागावर ताबा न राहणे / आक्रमकता* :
असे कुठलेच आई वडील नसतील, ज्यांना teenage tantrums ची झळ बसली नसेल. वस्तू, दार आपटणं, चिडचिड करणं, सांगितलेलं न ऐकणं, उलट उत्तरं देणं, असे बरेच प्रकार या वयातली मुलं, मुली करतात.
आपण चिडलो की ते अजून आक्रमकपणे react होतात.
प्रत्यक्षात होतं काय,  की या काळात मुलांना स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव होत असते आणि त्यांना स्वतःची ओळख हवी असते. ती ते नेहमीच्या चाकोरी विरुद्ध वागून ठसवायचा प्रयत्न करत असतात. त्याचवेळी त्यांचा सामाजिक जाणिवा ही मूळ धरत असतात. पुस्तकात, शाळेत, शिकवलेले आदर्श, आणि प्रत्यक्ष जगातला मोठ्यांच्या वागण्यातला व्यावहारिक दृष्टिकोन , यातील विसंगती त्यांच्या लक्षात यायला लागते. आणि त्यांचा भाबडा विश्वास कमी होतो व बंडखोरी वाढते .
या परिस्थितीत पालकांनी संयम ढळू न देणे हे सगळ्यात जास्त आवश्यक असते. शांत आणि ठाम रहा. प्रत्येक बाबतीत त्यांना dictate करू नका; त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या.. त्याने त्यांचा आत्मविश्वास ही वाढेल आणि विद्रोह ही कमी  होईल.
काही बाबींना मात्र ठामपणे नकार द्या ; जसे की लायसन्स नसताना वाहन चालवणे, न विचारता घरातून पैसे घेणे, न कळवता  कुठल्याही पार्टी ला जाणे, कायदा मोडणे , इ .
घरात एखादी मिटिंग घेऊन मर्यादा स्पष्ट कराव्यात आणि त्या ठामपणे पाळाव्यात .
* नैराश्य*:
शरीर-मनातील बदल आणि त्याबद्दल अर्धवट किंवा चुकीची माहिती, लैंगिक शिक्षणाचा अभाव, मनात येणारे लैंगिक विचार आणि त्यामुळे येणारा अपराधबोध, तसेच शैक्षणिक आघाडीवर असलेली आव्हाने, अपेक्षांचा होणारा भडिमार,  या सगळ्यामुळे मुलांमध्ये नैराश्य येऊ शकते. नेहमीचे भावनिक चढउतार आणि हे नैराश्य यातील फरक समजणे फार गरजेचे आहे.
नैराश्याची लक्षणे ओळखणे आणि वेळीच उपचार करणे गरजेचे आहे ... खूप जास्त किंवा कमी झोपणे, खाणे कमी होणे,सतत एकटं राहणे, कायम निरुत्साही असणे,सातत्याने शाळेतली कामगिरी ढासळणे,  मरणाविषयी बोलणे किंवा तसे कार्यक्रम बघणे, पुस्तके वाचणे... ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.
मुलांमध्ये नैराश्य टाळण्यासाठी त्यांच्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नका, त्यांना सांघिक खेळांसाठी प्रोत्साहित करा, त्यांना एखादा छंद जोपासू द्या , त्यांच्याशी संवाद कायम ठेवा . आपण चुकलो, हरलो, तरी आपल्या आई वडीलांचे आपल्यावर नेहमी प्रेम असेल हा विश्वास त्यांना वाटू द्या .
आणि तरीही परिस्थिती गंभीर वाटली तर मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकाचा सल्ला घ्यायला अजिबात संकोच करू नका .
*सोशल मीडिया*:
इंटरनेट चा अतिवापर हे अवघड दुखणे होऊन बसले आहे. बरेच पालक स्वतःच आहारी गेलेले असल्यामुळे मुलांना काही बोलण्याची सोय नसते. आणि प्रोजेक्ट्स, इतर  महत्वपूर्ण माहिती, यासाठी आंतरजालाची मदत तर घ्यावीच लागते. पण व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टाग्राम,मोबाईल गेम्स सारख्या गोष्टींमुळे वेळ ही खूप वाया जातो. सोशल मीडिया addiction , त्यातून येणारी अस्वस्थता, नैराश्य, याचा धोका ही आहेच. हे सगळे वापरताना तारतम्य बाळगावे, आहारी जाऊ नये यासाठी प्रयत्न करा.काही आक्षेपार्ह साईट्स ब्लॉक करून टाका.  मुळात स्वतःही या गोष्टी पाळा.दिवसभरात ठराविक  No media time ठरवा आणि तो पाळा.निसर्ग ट्रेक, मैदानी खेळ,  यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन द्या.
* व्यसनाधीनता* :
मोठे झाल्याची भावना, काहीतरी थरारक करण्याची इच्छा, सवंगड्यांचा दबाव (peer pressure),कुटुंबातील व्यक्तींना व्यसन करताना पाहणे,  अशा अनेक गोष्टींमुळे किशोरावस्थेतील मुले मुली व्यसनाकडे वळतात. यात मुलांचे प्रमाण जास्त असले तरी मुलींमध्ये ही हे लक्षणीयरित्या वाढत आहे .घरात सहज उपलब्ध असेल तर उत्सुकतेपोटी  ही व्यसनांना सुरुवात होते.
फक्त एक झुरका, फक्त एक घोट, फक्त एक शॉट, असा "एकदाच करून बघू" म्हणून झालेली सुरुवात कधी कधी सवय आणि नंतर व्यसन बनून जाते .
ही अतिशय नाजूक आणि क्लिष्ट समस्या आहे. मुलांना त्यांच्यावर पाळत ठेवलेली अजिबात आवडत नाही; तेव्हा त्यांच्या नकळत त्यांच्यावर थोडं लक्ष ठेवले पाहिजे. आपल्या मुलीचे मित्र मैत्रिणी घरी येतील तेव्हा त्यांच्याशी संवाद साधा, त्यावरून ती कोणत्या गटात वावरत आहे हे लक्षात येईल. एक इमर्जन्सी डायरी करा, आणि त्यात जवळचे पाहुणे , मित्र, मुलीच्या ही मित्र,मैत्रिणी यांचे नाव, पत्ते,  फोन नंबर लिहून ठेवा.आपल्या मुलीच्या मित्र मैत्रिणींच्या पालकांशी ही संपर्क ठेवा; जमल्यास एखादा ग्रुप बनवा, म्हणजे काही वेगळे, संशयास्पद वाटल्यास सगळे मिळून लक्ष घालता येईल.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रसंगी थोडी मवाळ, नमती भूमिका घेऊन संवाद कायम ठेवा, म्हणजे काही विपरीत घडल्यास ती तुम्हाला ते न बिचकता सांगू शकेल .आपण जी चौकशी करतो, ती काळजी आणि भीतीपोटी करतो आणि ती आजच्या काळात रास्त आहे , हे तिच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे.
एकूण पाल्याचे teenage हाताळणे ही खरच पालकांसाठी तारेवरची कसरत आहे. हे थोडेसे दुचाकी चालवायला शिकवण्यासारखे आहे; हँडल त्यांच्या ताब्यात दिलेच पाहिजे, त्याशिवाय ते शिकू शकणार नाहीत, पण त्याच वेळी तोल गेला, धडपडले, तर सावरायला आई वडील सदैव सोबत, पाठीशी आहेत हा विश्वास त्यांना वाटला पाहिजे.कुंभार होऊन घडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा माळी होऊन जोपासना करा.
ही माहिती सर्वसाधारण किशोरावस्थेतील सामान्य स्थित्यंतराबद्दल आहे . काही विशिष्ट  समस्या असतील( तीव्र नैराश्य, हिंसक वर्तणूक, व्यसनाधीनता, लैंगिक अत्याचार, इ) तर तज्ज्ञांची मदत घ्या.
सगळ्यात महत्वाचे... क्वालिटी टाइम ही संकल्पना किती ही गोंडस असली तरी मुलं ही व्हाट्सअप्प फेसबुक सारखी नसतात, की आपल्याला मोकळा वेळ मिळाला म्हणून ते लगेच ऍक्टिव्हेट होतील आणि संवाद साधतील. भरपूर वेळ एकत्र घालवल्यावर थोडा संवाद साधला जातो. मुलांसोबतचा प्रत्येक क्षण इव्हेंटफुल आणि दिवसातला सगळं वेळ happening नसतो. त्यांना काहीही न करता शांत बसण्यासाठी वेळ मिळू द्या ..... त्यातून त्यांचा संवाद वाढेल, तुमच्याशी, आणि स्वतःशी ही...
Sitting quietly, doing nothing, Spring comes, and the grass grows, by itself.
--- Basho Matsuo






लेक वयात येताना १


लेक वयात येताना भाग १
आज बहुतांशी घरात मुलगी जन्माला येणं हा हर्ष सोहळा, आणि तिचे संगोपन हा आनंदाचा ठेवा आहे...
मुलगा मुलगी समान असली, तरी सारखी नसतात; मुलींच्या काही आरोग्यविषयक गरजा, समस्या वेगळ्या असतात, आणि साधारणपणे preadolescent (९ते१२)वयापासून याबद्दल  सजग असावे लागते.
स्त्रीत्वाच्या दृष्टीने मोठे शारीरिक, भावनिक बदल होण्यापूर्वीचा हा तयारीचा काळ असतो.
या काळात काही सर्वसाधारण गोष्टींची, आणि काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
आहार:  साधारण नवव्या दहाव्या वर्षांपासून मुलींमध्ये वयात येण्याची चाहूल लागते व तशी बाह्यलक्षणे हळूहळू दिसू लागतात . या वयात सकस आणि चौफेर आहाराची नितांत गरज असते, आणि याच वयात दुर्दैवाने मुलांमध्ये बाहेरचे खाणे, जंक फूड, याविषयी आकर्षण वाढू लागते .
या वयात लागलेल्या खाण्याच्या सवयी आयष्यभर साथ देतात, म्हणून घरगुती संपूर्ण आहार द्या; स्वतःही त्याचं पालन करा.

स्वच्छता: आता मुली स्वतःचं सगळं आवरायला लागलेल्या असतात. सकाळी शाळेच्या घाईत नीट ब्रश करण्याचे टाळतात; त्यांना योग्य पद्धतीने ब्रश करायला शिकवा, दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावा.(भारतात दात किडण्याचे प्रमाण प्रचंड आहे, आणि ते वाढतच आहे).
नीट घासून अंग, केस, धुवायला शिकवा. तसेच कानातला मळ नियमितपणे काढत जा. जननेंद्रियांची स्वच्छता ठेवायला सांगा.
ह्या गोष्टी वाचायला क्षुल्लक वाटत असतील, पण मूलभूत स्वच्छतेकडे खरच खूप दुर्लक्ष केले जाते, आणि नंतर वय वाढल्यावर नवीन सवयी लावणे फार जड जाते. तसेच वाईट सवयींमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते
व्यायाम : मुलींमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करा ; व्यायाम त्यांना आयुष्यभर साथ देणारी अतिउत्तम सवय आहे, ती या वयातच त्यांच्यात रुजू द्या. त्यांना सोबत घेऊन आऊटडोअर ऍक्टिव्हिटीज प्लॅन करा; त्यानिमित्ताने तुम्हालाही चांगली सवय लागेल .सकाळी करण्यासाठी15- 20 मिनिटांचे सोपे व्यायाम प्रकार शिकवा (योगासने, सूर्यनमस्कार).
( सद्य परिस्थितीत शक्य तिथे सोसायटीच्या आत चालणे/ जॉगिंग किंवा घरातल्या घरात व्यायाम हे पर्याय आहेत. व्यायामामुळे शारीरीकच नव्हे मानसिक फिटनेसही टिकायला मदत होईल)
झोप: तज्ञांच्या मतानुसार पौगंडावस्थेतील मुलांना साधारण नऊ तासांची झोप गरजेची आहे, पण प्रत्यक्षात  खूप कमी मुले इतकी विश्रांती घेतात. वाढलेला शाळेचा, अभ्यासाचा वेळ,इतर उपक्रम या सगळ्या मध्ये झोपेची वेळ कमी होते; पण शरीराला त्याची खूप गरज असते.
टीव्ही बघणे, एखादा क्लास, यात जाणारा वेळ कमी करून आपल्या  मुलीला पुरेशी विश्रांती घेऊ द्या .
*शारीरिक बादल* :
या वयात मुलींच्या शरीरात बदल व्हायला सुरुवात होते .अचानक ऊंची खूप वाढू शकते (growth spurt). प्रत्यक्ष पाळी सुरू होण्यापूर्वी साधारण दीड दोन वर्षे आधी स्तनांची वाढ, तसेच पायावर, काखेत,  योनीवर केस येणे, हे बदल सुरू होतात.
हे बदल नैसर्गिक आहेत, या बद्दल मुलींना आश्वस्त करणे आवश्यक आहे . तसेच योग्य मापाची ब्रा(सुरुवातीला स्पोर्ट्स ब्रा) घालायला देणे, पोक काढून चालू नये म्हणून सांगणे, या गोष्टी कराव्या लागतील.
काही मुली पिंपल्स च्या त्रासाने खूप बेजार होतात, त्यांना बेसिक सूचना(पिंपल्स फोडू नये, चेहरा स्वच्छ ठेवावा,  इ)आणि आवश्यक वाटल्यास उपचार द्यावे  लागतात .
*सांवेगिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता (EQ आणि SQ)* :
या वयात मुलींना स्वतःच्या स्त्री असण्याची नकळत जाणीव होऊ लागते . शाळांमध्ये मासिक पाळी बद्दल ही माहिती दिली जाते. कधी कधी मुली या गोष्टींनी थोड्या बिचकतात, त्यांचं सामाजिक वर्तन ही थोडे बदलू शकते; अशा वेळी त्यांच्याशी संवाद असणे खूप महत्वाचे आहे. मुलींनी पाळी विषयी, मुलं होण्याविषयी, त्यासंबंधित एखाद्या टीव्ही जाहिरातीविषयी प्रश्न विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देऊ नका; त्यांना जमेल तसं समजावून सांगा, वाटल्यास वेळ मागून घ्या, थोड्या वेळाने विचार करून उत्तरे द्या, पण टाळू नका. हा संवादाचा पूल फार आवश्यक आहे; विशेषतः  त्या पौगंडावस्थेत पोहोचल्यावर हे फार फायदेशीर होईल...
गुड टच, बॅड टच, बद्दल vdeos आहेत, ते मुलींना दाखवू शकता; पण त्याचवेळी मुली घाबरून जाणार नाहीत, त्यांचं निरागस बालपण गढूळणार नाही याचीही काळजी घ्या; जगात अत्यल्प प्रमाणात वाईट लोक असतात आणि त्यांच्यापासून सावध राहायला हवे, पण त्याचवेळी खूप सारी चांगली लोक ही असतात, हे आवर्जून सांगा.
*Adolescence(वयात येणे )* :
*पाळी*  : साधारण 12- 13 व्या वर्षी मुलींना पाळी येते , त्यांचे मासिक चक्र सुरू होते ; एखादा वर्ष पुढे मागे होऊ शकते.
सुरुवातीला पाळी अनियमित असणे, जास्त स्त्राव होणे,जास्त दिवस स्त्राव होणे, अशा समस्या उद्भवू शकतात, पण हळूहळू नियमित पाळी सुरू होते. रक्तस्त्राव खूप जास्त होत असल्यास, किंवा दैनंदिन काम न करू शकण्याइतका त्रास होत असल्यास, एकदा डॉक्टरांना दाखवून घ्यावे .काही मुलींमध्ये रक्तक्षय (रक्तात हिमोग्लोबीन कमी होणे)होतो, तो गोळ्या देऊन बरा करता येतो.
मुलगी आता पौगंडावस्थेत येते; तिच्या शरीरात आणि मनोवस्थेत अनेक बदल होत असतात; त्याच वेळी शैक्षणिक आघाडीवर ही वर्ष महत्वाची असतात. हा सगळा काळ अस्वस्थतेचा असतो, आणि पालकांच्या मानसिक आधाराची तिला गरज असते. टीनेज मुळे ती ते दाखवत नाही, खूप स्वावलंबी, कणखर असल्याचे दाखवते; अशावेळी तिचा स्वाभिमान न दुखावता तिच्याशी मैत्री टिकवणं, आपण पाठीशी आहोत हा विश्वास तिच्यात रुजवणे गरजेचे आहे.आजकाल शाळांमध्ये मुलींना पाळीविषयी  सांगितले जात असते, पण लैंगिक शिक्षण दिले जात नाही; पालक, विशेषतः आई, काही गोष्टी तिला सांगू शकते ; सुसंवाद असेल तर हे इतके कठीण होत नाही.
आपल्या मुलीतून एक उत्साही, सकारात्मक व्यक्तिमत्व घडवण्याची ही वेळ असते, आणि आताची जडण घडण पुढे आयुष्यभर कायम राहते .
ही सर्वसाधारण ढोबळ माहिती आहे; विशिष्ट, किंवा गंभीर आरोग्य समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पौगंडावस्थेत आणि तरुण वयात स्त्रियांना भेडसावणाऱ्या काही आरोग्याशी निगडीत आणि भावनिक समस्यांबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ...


Sunday, 8 March 2020

Searching... हरवलेल्या नात्यांचा शोध

'Searching' नावाचा एक सिनेमा आहे. त्यात आपल्या हरवलेल्या मुलीचा शोध घेणाऱ्या आणि त्यासाठी इंटरनेटवरून, सोशल मीडिया अकाउंटवरून धागेदोरे शोधणाऱ्या वडिलांची गोष्ट आहे. त्याचवेळी ही गोष्ट स्वतःच्या मुलीशी रोज चॅटिंगद्वारे संपर्कात असूनही तिच्या भावविश्वाची जाण नसलेल्या वडिलांचीही आहे.
आधी बहुधा माणसाचे इतके पर्सोना नसायचे. फार तर घरात एक, बाहेर समाजात वावरताना  एक, अशी दोन व्यक्तित्व असतील.
आता प्रत्येकजण मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे की काय असं वाटण्याइतपत वेगवेगळ्या रुपात असतो. घरात आपल्याशी बोलणारी मुलं वेगळी; तीच मुलं इंस्टावर, इतर साईट्सवर असतात तेव्हा प्रचंड वेगळी असतात. त्यांचे कूल असण्याचे, थ्रिलचे कन्सेप्ट आपल्या आखीवरेखीव चौकटीला धक्का देणारे असतात. कधी फॉलोवर्स आणि फॉलोविंगच्या जंजाळात ती खूप एकटी, तर कधी खूप स्ट्रेस्ड असतात. एखादा मिशॅप झाला की मगच पालकांना आणि त्यानंतर आम्हा डॉक्टरांना माहिती होतं.
फक्त मुलंच असं नव्हे, जोडप्यांमधले विसंवादाचे, रादर असंवादाचे परिणाम अकल्पित स्वरूपात समोर येत आहेत.
निखळ शारीरिक व्याधींपेक्षा stress related disorders वाढले आहेत. हतबुद्ध व्हावे अशा समस्या घेऊन लोक येतायत.
एकदा टीव्ही पॅनलला वाळवी लागलेली पाहिली होती. सगळं नेटकं होतं फक्त एका ठिकाणी थोडं फुगल्यासारखं दिसलं; हात लावून पाहायला गेले तर भसकन बोट प्लायमध्ये गेलं आणि वाळवी बाहेर पडायला लागली.सगळा प्लाय पोखरून गेला होता, अक्षरशः भुसा झाला होता, पण बाहेरून अंदाजच आला नव्हता इतके दिवस.
माणसं सुद्धा कडेलोटाच्या टोकावर उभी असल्यासारखी झालीयत; वरून सगळं आलबेल दिसत असतं पण एका छोट्याश्या ट्रीगरने सगळी आवरणं गळून पडतात, आणि कोलमडून गेलेला विकल जीव डोळ्यासमोर असतो. आणि इतके दिवस आपल्याला यातलं काहीच कसं कळलं नाही?... ही जवळच्यांची प्रतिक्रिया आणि उद्वेग असतो.
 अनेक संपर्कमाध्यमे हाताशी असण्याचा अभूतपूर्व  काळ आहे हा. पण सगळेच संपर्क विसविशीत...जणू आधी घट्ट वीण असणारे धागे पसरवून विरळ केले आहेत. संख्यात्मक वाढ भरपूर आहे, पण हक्काने कुणी हाक मारावी, किंवा कुणाला हाक द्यावी, इतकाही अवकाश नसलेले प्रत्येकाचे स्वतंत्र सुटे खाजगी आयुष्य.
एरवी दृष्ट लागण्यासारखा दिसणारा वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवरचा वावर असणारे अचानक असे काहीतरी दुखणे घेऊन येतात की स्वतःला निर्ढावलेलं समजत असणारं मन नव्याने चकित होतं. कुठे एखादा तरुण जीव स्वतःचा जीव घेतो, कुणी अन्व्हॉन्टेड प्रेग्नन्सी घेऊन येते, कधी अनेक वर्षे संसार केलेली जोडपी हिंसेची, वेगळं होणार असल्याची कहाणी घेऊन समोर बसलेली असतात.
आपण ज्यांना ओळखतो असं वाटतं, ती माणसंही किती अनोळखी असू शकतात हे लक्षात येतं.
संपर्कांचा परीघ मोठा होत जातोय तसे अंतरही वाढत चाललंय...

मराठी असे आमुची मायबोली

मराठी ही मातृभाषा असली तरी आमची घर-परिसरातली बोलीभाषा आणि शाळेत अभ्यासक्रमाला असलेली प्रमाण मराठी, यात फार तफावत होती. ज्यांच्या घरी प्रमाण भाषा बोलली जाते त्यांना मराठी विषय कठीण जात नाही. पण आम्ही घरी जसे बोलायचो तसे लिहिले की गुण मिळायचे नाहीत, कारण व्याकरणदृष्ट्या चुका असायच्या त्यात.
अवांतर वाचन वाढवून मग ती उणीव हळूहळू भरून काढली. तरी इंग्लिश, हिंदी, मराठी सगळं वाचत असल्यामुळं थोडी भेसळ व्हायची, अजूनही होते.
आधी शुद्ध मराठी येत नाही याचा थोडा न्यूनगंड होता; पण हळूहळू जाणवलं, की भाषा जर विचार प्रकट करण्याचे साधन असेल तर ते काम ती अचूकपणे करते की नाही हे महत्वाचे. बाकी नियम पाळण्याचा प्रयत्न करावा, पण त्याचा फार अट्टाहास नको; गाभा महत्वाचा. माझ्यापुरता प्रयत्न असा असतो की जे म्हणायचे आहे ते शक्य तितके नेमकेपणाने पोचावे; मग त्यासाठी भाषेच्या बांधणीवर जास्त लक्ष द्यावे लागले तरी चालेल; अर्थ नेमकेपणाने मांडणारे शब्द
शोधावे लागले तरी चालेल.
पण समोरच्याला काय म्हणायचंय हे जर आपल्याला बऱ्यापैकी समजत असेल, तर तांत्रिकदृष्ट्या ते किती अचूक आहे याचा खल नको. यात कधीकधी गफलत झाली; अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन कुणाच्या उच्चारांवर चुकून हसणेही झाले, पण सुदैवाने कान धरणारे मैत्र असले की आरसा दाखवला जातो, आणि अशा चुका होऊ नयेत यासाठी मग आपण सजग राहतो.
लिखित भाषेबद्दल मात्र माझा संभ्रम कायम आहे. कुठल्याही संपर्कव्यवस्थेत काही मूलभूत सार्वत्रिक नियम असतात, ज्यामुळे गोंधळ न होता संपर्क सुलभ होतो. जर कुठलेच नियम मानायचे नाही असे म्हटले तर साधन म्हणून भाषेची(लिपीची) परिणामकारकता कमी होणार नाही का? लिपी असलेल्या प्रत्येक भाषेचे वाक्यरचनेचे, व्याकरणाचे काही नियम असतात. त्या नियमांना अनुसरून ती भाषा शिकली शिकवली जाते. जर हे नियम पाळले गेले नाहीत तर आकलनात बाधा येणार नाही का?
कुठलेही सार्वजनिक माध्यम वापरून जेव्हा कुणी व्यक्त होतो, तेव्हा वाचक हवे असतात हे निर्विवाद. अनुनय किंवा वाचकशरणता म्हणून नव्हे, पण जे स्वतःला वाटतंय ते कुणापर्यंत तरी पोहोचवणे ही निकड असते म्हणून जर लिहितो, तर ते लिखाण वाचणाऱ्यांपैकी बहुतांश जणांपर्यंत तरी नीट पोहोचावे म्हणून काही एक चौकट आखावी लागेल ना?
ग्रामीण भाषा, विभागीय भाषा वापरताना कधीकधी तिला कसलेच नियम लागू होत नाहीत अशा प्रकारे लिहिले जाते, पण त्या भाषांमध्येही एक सुसूत्रता, एक आकृतिबंध असतो; तो सांभाळला गेला पाहिजे की नको?
अजून एक मुद्दा येतो तो परभाषेतील शब्दांचा. कालौघात काही मराठी शब्द लुप्त झाले असणार, काही परकीय भाषेतील शब्दांची भर पडली असणार. यातही सीमाभागात शेजारच्या राज्याच्या भाषेतील शब्द रुजण्याचे प्रमाण जास्त असते. किंवा जिथे मुस्लिम राज्यकर्त्यांचे शासन होते, तिथे उर्दू फारसी शब्द जास्त आले. आता इंग्रजी शब्दांची आयात जास्त आहे. हे सगळे शब्द परके मानायचे की मिसळू द्यायचे?

मुळात भाषाच काय, कुठलीही गोष्ट  उपयुक्त आणि प्रासंगिक असेल तर ती काळाच्या कसोटीवर टिकून राहते...
मराठीवर प्रेम असेल तर ती ज्ञानभाषा आणि संवादाचे प्रमुख माध्यम होईल आणि राहील, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.
हे करताना तिचा धाक कमी आणि प्रेम अधिक वाटले, तर तिच्या बहरण्याची शक्यता जास्त आहे...

#मराठी_भाषा_दिन

चित्रांची भाषा

घराचे इंटेरियर होत होते तेव्हाची गोष्ट; सगळं उरकत आलं होतं आणि हॉलच्या भिंतीवर लावण्यासाठी चित्र निवडायची होती.
आमच्या डिझायनर मॅडमने एक चित्र सुचवलं; त्यात एकाच चित्राचे तीन भाग असतात आणि ते सलग न लावता थोडे अंतर ठेवून एका शेजारी एक लावायचे असतात म्हणे.
मला मात्र ती अर्धवट वाटणारी चित्र पाहून काही बरं वाटेना. म्हटलं बाई मला कळो न कळो पण रोज उठून पहावी तर मलाच लागणार! त्या दरम्यान माझ्याकडे एक कॅलेंडर आलं होतं आणि त्यातली पेंटिंग्स मला फार आवडली होती; मी तीच फ्रेम करून लावू असं सांगितलं. तिला मात्र काहीतरी कंटेम्पररी  लावायचं होतं, मग आपण अजून एक वैकल्पिक सेट करू असं ठरलं. तर त्यात मी चार राजा रवीवर्मांची पोर्ट्रेटस निवडली... मग तिने शेवटी हात टेकले आणि तो विषय संपला!
मॉडर्न आर्टमधली माझी गती अगदीच शून्य आहे. आधुनिक चित्रकला बघण्याची, समजण्याची जी दृष्टी लागते ती माझ्याकडे नाही. रूढार्थाने सुंदर वाटणारी व्यक्तिचित्र, निसर्गचित्र पाहायला आवडतात.
परवा अहोंचे एक मित्र बऱ्याच वर्षांनी घरी  आले. हॉलमधल्या चित्रांचं कौतुक केलं आणि ती मी निवडली म्हणून माझंही. कौतुक सुखावणारे होते, तरी त्यांना इमानदारीत सांगितलं की आवडली म्हणून लावली, त्यांबद्दल  माहिती मात्र नाहीय. त्यांनी मग सांगितलं की ही प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार William-Adolphe Bouguereau यांची चित्र आहेत (अर्थात कॉपीज). चित्रकलेतल्या अकॅडेमिक शैलीचे ते प्रमुख चित्रकार होते; विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांची लोकप्रियता ओसरली होती, पण आता परत नव्याने त्यांच्या चित्रांमध्ये लोकांची रुची वाढली आहे.  त्यांनी हेही सांगितलं की राजा रविवर्मा देखील ही स्टाईल वापरत होते आणि त्यांच्या चित्रांवर या Bouguereau च्या अकॅडेमिक शैलीचा प्रभाव होता, असे संदर्भ उपलब्ध आहेत. हे ऐकून गंमत वाटली.
मला गाण्यांचे राग ओळखता येत नाहीत, पण आवडलेलं गाणं बहुतेक वेळा  यमन रागातलं निघतं. तसं चित्रांच्या बाबतीत या अकॅडेमिक शैलीचे झाले होते बहुतेक!
यात लहानपणी पाहिलेल्या चित्रांचाही प्रभाव असेल. तेव्हा चित्र म्हणजे शक्यतो
देवांच्या तसबिरी असायच्या, ज्या सहसा राजा रविवर्माच्या चित्रांच्या कॉपी असायच्या, किंवा त्या शैलीशी मिळत्या जुळत्या असायच्या. आणि बहुतेक वेळा कॅलेंडर मधून चित्र कापून फ्रेम केलेले असायचे. ती चित्र बघायला फार आवडायची... लक्ष्मीच्या फोटोत मागे दूरवर धबधबा दिसायचा, तलाव आणि बदकं दिसायची, सोबत हत्तीही असायचे... अशा ठिकाणी जायला मिळायला हवे असे फार वाटायचे. महादेवाचे एक चित्र तर फार लक्षात आहे; फिकट रंगातला जटाओं में गंगा विराजित, मस्तक में चंद्र प्रकाशित रुपातला गळ्यात नाग आणि रुद्राक्षांच्या माळा ल्यालेला निळसर कांतीचा, कैलास मानसरोवरच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला शिवशंकर म्हणजे अद्भुताचा अविष्कार वाटायचा. तेव्हापासून मानसरोवर यात्रा करण्याचं स्वप्न मनात जाम खोल बसलंय.
अजून एक ठळक आठवण म्हणजे लकी नावाच्या एका हॉटेलच्या भिंतीवर रंगवलेली मोठीच्या मोठी चित्र. शाळेत जाताना मी त्या हॉटेलसमोर थबकून बाहेरून दिसेल तितकी चित्र वाकून वाकून बघत असे. नेहमी दिसणाऱ्या चित्रांपेक्षा फार वेगळी, रंगांची उधळण असलेली चित्र होती; त्यातली माणसंही वेगळी दिसणारी होती. वडिलांना सांगून त्यांच्यासोबत आत जावं आणि नीट सगळी चित्र पाहावीत, हे मात्र कसं कोण जाणे कधी सुचलं नाही. नुकतीच माहेरी गेले तेव्हा ठरवलं होतं आता नक्की बघू, पण तिकडे गेल्यावर कळलं आता ते हॉटेल राहिलं नाही आणि त्या भिंतीही...
गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मी, सरस्वती सापडल्या, महादेव मात्र भेटला नाही. ती हॉटेलातली चित्रही नव्हतीच, पण त्याबद्दलचा उल्लेख असणारा चित्रकार रविमुकुल यांचा एक फार सुंदर लेख वाचायला मिळाला.( लिंक पहिल्या कमेंटमध्ये) त्यांनाही या चित्रांची मोहिनी पडायची हे वाचून मौज वाटली.
किती गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्यात रुजत असतात; आणि किती प्रकाराने आपल्या निवडींमध्ये रिफ्लेक्ट होतात! आणि ही सगळी लिंक शोधावी म्हटलं तर दरवेळी अखंड सापडेलच असेही नाही, पण ते एक्सप्लोर करण्यातही आनंद असतो; काही ना काही तर मिळूनच जातं...
 
न पहुंचा मंजिल तक तो क्या हुआ,
 सफर अपने आप में कम हसीन नहीं होता...



गालिब ...

दुःख झालं तरच माणूस सहसा रडतो, कधी आनंदातिरेकानेही रडू कोसळतं...
 मात्र कालौघात वैयक्तिक सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन अजून काही गोष्टींनी डोळे भरून यायला लागले. अलौकिकाची अनुभूती झाली की ती डोळ्यातून ओसंडायला लागली...
 कुठे निसर्गाच्या अमर्याद अद्भुत रूपाचे दर्शन झाले; कुठे मनुष्याच्या अचाट कर्तृत्वाची निशाणी असणारे एखादे भव्य शिल्प पाहिले, की अंगावर काटा यायचा आणि डोळ्यात पाणी उभे राहायचे.
कधी कुठले दैवी सूर ऐकून हेलावून जावे; कधी कुठला विलक्षण भावाविष्कार पाहून गलबलून यावे, असेही कितीतरी वेळा होते.
काहीतरी विलक्षण वाचले की भारावून जाण्याचे क्षण तर कितीवेळा येतात. किमान शब्दांत प्रचंड अर्थपूर्ण काही मंडणाऱ्यांचे तर विलक्षण कौतुक वाटत आलेलं आहे. कोट्स आणि छोट्या कविता, शेर आवडण्यामागेही बहुधा हेच कारण आहे.
आज मिर्झा गालिब यांची पुण्यतिथी. शब्दांचा सम्राट... काही शेर तर असे की कॅलेडिस्कोप सारखे दरवेळी अर्थांच्या नवीन छटा दिसतील. गालिब वाचताना आपल्याच जगण्यात लपलेलं काय काय आठवतं...
"कोई मेरे दिल से पूछे तिरे तीर-ए-नीम-कश को
ये ख़लिश कहाँ से होती जो जिगर के पार होता "
असे काही विव्हळ करणारे असेल, किंवा
"ये रश्क है कि वो होता है हम-सुख़न तुम से
वर्ना ख़ौफ़-ए-बद-आमोज़ी-ए-अदू क्या है"
अशी इर्षेची वेगळी छटा असेल, 
गालिब चकित करतो ...
माझ्या सगळ्यात आवडत्या ओळी मात्र या आहेत...
बेखुदी बेसबब नहीं गालिब,
कुछ तो है जिसकी पर्दादारी है...

मोहोब्बत है क्या चीज....

हॉस्टेलवर भिंतीचे पोपडे निघाले की तिथे एखादे पोस्टर चिकटवण्याचा जुगाड असतो. आमच्या रूममध्ये आधीच्या रहिवासिनीने 'Love and God' नावाच्या सिनेमाचे पोस्टर चिकटवले होते. तो सिनेमा तेव्हाही माहीत नव्हता आताही माहीत नाही; पण संजीवकुमार, प्राण या विभूतींना कुणी का म्हणून डोळ्यासमोर मांडून ठेवलं असेल याचा अचंबा वाटायचा. कदाचित पोस्टर फुकट मिळालं असेल असा निष्कर्ष आम्ही सद्य रहिवाश्यांनी काढला.
तर तेव्हा सतत डोळ्यासमोर असणाऱ्या 'Love and God' कडून प्रेरणा घेऊन आमचं एक तत्वज्ञान तयार झालं होतं; प्रेम आणि देव या दोन्ही माणसाची करमणूक करणाऱ्या काल्पनिक गोष्टी आहेत.
यातले देवाबद्दलचे मत नव्याने स्वतंत्र राहणे, नवीन वाचन यामुळे घेतलेला बंडखोर पवित्रा होता. प्रेमाबद्दल जो थोडा नकारात्मक भाव होता त्यामागची कारणं गुंतागुंतीची होती. भोवताली जे वातावरण होते त्यात जात बघून प्रेम करणाऱ्यांचा सुळसुळाट होता. मग जातच बघायची तर थोडं उशिरा पीजी वगैरे फिक्स झाल्यावर बघावी; आतापासून कुठे हा दांभिक प्रकार करा, हा युक्तिवाद आम्हाला पटला. दुसरं म्हणजे आमच्यातल्या एका चुलत मैत्रिणीचे  अफेयर सुरू झाले होते; तिची ओढाताण आणि तिच्या बॉयफ्रेंडने घातलेले नियम अटी पाहून तर आमची खात्री पटली की प्रेम ही ओव्हररेटेड आणि फिक्शनल गोष्ट असून लग्नाचा व्यवहार नेहमी डोळे उघडून करावा!
त्यामुळे प्रेम या विषयावर हिंदी सिनेमे, आमिर, शारुख, आणि व पु, गौरी देशपांडे यांच्या कृपेने थेरॉटिकल चर्चा प्रचंड केल्या तरी त्या वाटेला जाण्याची संधी कधी घेतली नाही.
यथावकाश  कांदे पोहे कार्यक्रम झाला. मुलगा खात्रीलायक बॅकग्राऊंडचा, निर्व्यसनी, एमडी, असे सगळे निकष बघून लग्न ठरले. जोडीदाराबद्दलची काय संकल्पना मनात आहे, काय अपेक्षा आहेत, या अशा गोष्टी आम्ही डिस्कस न करता थेट लग्नच झाले आमचे...
मग अपेक्षांची अतिशय वेगवेगळी गाठोडी घेऊन दोन अनोळखी लोकांचे सहजीवन सुरू झाले.
एकीकडे प्रेमासाठी भावविव्हल होऊन डोळ्यात पाणी आणणाऱ्या शारुखची इमेज मनात होती, दुसरीकडे तुम्ही मेरी मंदिर म्हणणाऱ्या भारतीय नारीची... बऱ्याच खडखडाटानंतर दोन्ही फ्रेम्स अवास्तव आहेत याची दोघांना जाणीव झाली.
लग्नाचा आधार म्हणजे प्रेम आणि ते प्रेम जोडीदाराकडून आपल्याला विनाशर्त मिळायला हवे, असे काहीतरी गृहीतक डोक्यात असते. जणू लग्न म्हणजे रेडिमेड प्रेमाने भरलेली बारमाही विहीर असते. प्रत्यक्षात लग्न म्हणजे रिकामे भांडे असते, ज्याला परिश्रमपूर्वक भरावे लागते.
अपेक्षांच्या जंजाळातून मार्ग काढत असताना जे जुन्या प्रवाशांचे पथदर्शक दगड असतात ते आपला प्रवास सुकर करतीलच असे नाही. प्रत्येकाच्या फ्रेम्स वेगळ्या, प्राधान्यक्रम वेगळे. हे सगळे अनुभवत असताना कधीतरी मैत्रिणीशी गप्पा मारताना परत लव्ह अँड गॉड आठवला आणि जाणवलं प्रेमाचंही देवासारखे आहे. देव एक म्हटला तरी त्यांच्यापर्यंत नेणारे धर्म निरनिराळे, तसे संसारधर्मही वेगवेगळे असतात. एकच एक हमखास फॉर्म्युला नाही याचा… आणि भक्तीतही नुसतं मागत राहिलो तर देवही सारखा सारखा पावत नाही; आधी समर्पणभावाने भक्तीही करावी लागते.
 दोघे देणं हळूहळू शिकत गेलो, अजूनही शिकतोय. आई झाल्यावर मात्र देण्यातला आनंद, निखळ प्रेम या गोष्टी बऱ्यापैकी उमजू लागल्या. समोरची व्यक्ती आपल्या मनातल्या प्रतिमेच्या चौकटीत कोंबता येत नाही. ती प्रत्यक्षात जशी आहे तशी आधी स्वीकारावी लागते. आपल्याला अयोग्य वाटणाऱ्या बाबी काही मर्यादेपर्यंत सुधारायला लावता येतात, आवडणाऱ्या गोष्टी थोड्या वाढवता येतात; पण अगदी संत्रीचा आंबा करता येत नाही. आपला अंश असणाऱ्या मुलांची ही गत तर एक पक्के मडके झालेली व्यक्ती किती बदलणार. आपण स्वतःतरी समोरच्यासाठी किती बदलू शकतो स्वतःला?
आपण प्रेम म्हणतो तेव्हा बऱ्याचदा We want to receive love and attention rather than giving it. दोघेही घेणेकरी झाले तर द्यायचे कुठून?
दोन वर्तुळं कधी पूर्णपणे एकमेकांत विलीन होत नाहीत; ती केवळ अपूर्ण किंवा अमूर्त प्रेमातली कविकल्पना असते. दोन वर्तुळांचा काही भाग सामायिक असतो तर काही स्वतंत्र राहतो. सामायिक भाग विस्तारायचे प्रयत्न करत असताना स्वतंत्र भागही ऍक्सेप्ट करायला लागतो. आणि जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रेमाची बेगमी करण्याची जबाबदारी या एकमेव नात्यावर टाकली तर त्याचं ओझं होतं.

जगण्यातले कडू गोड अनुभव घेताना जाणवलं देव आहे की नाही याचा खल करण्यात अर्थ नाही.. बळ मिळत असेल, शांत वाटत असेल, तर काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यालाही काही हरकत नसते. नाहीतरी लौकिक जगातल्या आपण ज्यांना मौल्यवान समजतो अशा कितीतरी गोष्टी या केवळ संकल्पनाच तर आहेत.
तसंच  प्रेम नावाच्या चकव्याचा वेध घेतानाही  कळत गेलं की प्रेम ही भावना  फुलात असलेल्या सुगंधासारखी असते; तो फक्त अनुभवावा... त्याचं पृथक्करण करायला गेलं तर मात्र फुलाची नासधूस होते.
कुठल्याही नात्यात दोन माणसांना जोडणारा अदृश्य धागा प्रेमाचा असतो, नात्याचे नाव काही असो.
आणि नास्तिक व्हायची इच्छा असेल तर त्या धाग्याचं अस्तित्व नाकारताही येतं... मैत्री, आपुलकी, काळजी, आवड, आकर्षण अशी वैकल्पिक नावं देता येतातच !
कर्मकांड करणाऱ्या भाविकांसारखा आजचा दिवस दणक्यात सेलिब्रेट करा; 'मला पटत नाही पण घरच्यांसाठी करतो' म्हणणाऱ्या सेमिनास्तिकासारखं जोडीदाराच्या हट्टाखातर तळ्यातमळ्यात करत साजरा करा; किंवा हे सगळं थोतांड आहे म्हणत नाकारा; प्रेम असणारच आहे. देव न मानणारे दुसरं काही ना काही मानतात, तसं प्रेम मानलं नाही तर ते दुसऱ्या कुठल्या नावाने सोबत करेलच. फक्त फार ओझं नका टाकू, म्हणजे न गुदमरता  त्याची सुगंधी साथ कायम सोबत राहील...

गोव्याचे देव

गोवा ट्रिप म्हणजे फक्त समुद्र मासे आणि फेणी हा सर्वसाधारण समज. पण गोवा भेटीत फक्त समुद्रच नव्हे तर काही मंदिरांनाही भेट दिली. रेकमंडेशन चुकणार नाही याची खात्री होती. आणि एखाद्या पर्यटनस्थळाला गेलो की नेहमीचे गाजलेले स्पॉट्स सोडून थोडं तरी अंतरंग बघावं असं मला नेहमी वाटतं.
गोवा म्हणजे फक्त समुद्र हा समज दूर झाला.
 शांतादुर्गा आणि महालसा नारायणी  देवस्थान खूप चांगली राखलेली आणि मनःशांती देणारी आहेत. महालसा मंदिरातील दीपमाळ अतिशय सुंदर आहे. आणि तिथले जेवणही अस्सल कोकणी पद्धतीचे होते बहुतेक, चविष्ट होते अगदी.
अजून एक फारसं प्रसिद्ध नसलेलं ठिकाण म्हणजे तांबडी सुरला इथले महादेव मंदिर.
हे मंदिर गोव्यामधील सर्वात प्राचीन मंदिर आहे असे सांगितले जाते. वनराईत लपलेले हे देवालय अतिशय मनोरम आहे.
 १३ व्या शतकात कदंब राजवटीच्या काळात याचे निर्माण झाले. बरेच आडबाजूला असल्यामुळे परकीय आक्रमकांच्या हल्ल्यांमधून सुरक्षित राहिलेले आहे. मंदिर बघताना ऐहोळे इथल्या मंदिरांची आठवण येते. गर्भगृहात शिवलिंग असून पूजा सुरू आहे; समोर नंदी आहे. मंदिराभोवती सुबक बाग आहे. हे स्थळ भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येते. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर एक ओढाही आहे.
एकूण परिसर फार serene आहे. गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या अनमोड घाटाच्या पायथ्याशी हे मंदिर वसलेले आहे. तिथे जाणारा रस्ताही फार देखणा आणि बराचसा निर्मनुष्य आहे. घाटातून जाताना बऱ्याच ठिकाणी झाडांनी कमान केलेली आहे. त्या बऱ्यापैकी आडवळणी रस्त्यावरून जात सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या त्या मंदिर परिसरात विसावणे हा निव्वळ ट्रान्समध्ये नेणारा अनुभव आहे....




बीज अंकुरे अंकुरे

शाळेत प्रोजेक्ट म्हणून सीडबॉल मिळाला आणि मग तो कुंडीत पेरून निगुतीने देखभाल करणं, सोबत आलेलं खत टाकणं, अगदी मिलिमिटरमध्ये मोजून पाणी देणं सुरू होतं. आज सकाळी अगदी इवलेशे अंकुर दिसले तर आनंदी आनंद झाला. विशेष म्हणजे शेजारच्या कुंडीतली हिरवळ जोमाने उगवलेली; ती मात्र अशीच विनामशागत, अनाहूत. विनासायास आपोआप कुणी कामना न करताच आलेली, मग नाव तरी काय असणार, तण नावाच्या सर्वनामात सामावली.
मातीची कूस मिळाली की अंकुरणे हा बीजाचा स्वधर्म; मातीला हवे की नको, इतर कुणाला कौतुक आहे की नाही, हा त्याचा विषय नाही. लेकीला नवल वाटलं. Nature's ways are stronger than us, म्हणाल्यावर तिने सांगितलं हे नको काढू, राहू दे हेसुद्धा.
माणसाचा जीव तरी काय वेगळा असतो?
कधी अथक उपाय केले जातात, वैज्ञानिक उपायांसोबत देवाला साकडे, ग्रहांची मनधरणी, उपास, व्रत वैकल्ये... पण बीज तरी रुसलेले किंवा माती तरी कोरडी; आणि तेव्हा कशालाच यश येत नाही. आपला वारसा पुढे चालवणाऱ्यात आपलाच अंश असावा... बीजही आपले आणि मातीही आपलीच, ही साधारण प्रत्येकाची अट; ते शक्यच होत नाही म्हटल्यावर कधी बाहेर रुजवून मग थेट रोपच पेरले जाते , कधी बीज दुसरे आणि कूस आपली, कधी बीज आपले पण कूस परकी, अशी आंशिक तडजोडही नाईलाजाने केली जाते. पण हे सगळे प्रयत्नही कधीकधी फोल ठरतात.
त्याचवेळी दुसरीकडे मात्र नको असताना, तयारी नसताना रुजवात होते आणि त्याचं प्राक्तन मग तणासारखं राहतं. एखादा कुणी असू दे आता राहिलंच आहे तर म्हणत स्वीकारतो; तर बऱ्याचदा कुणी नाईलाज म्हणून दुःखाने, कुणी निर्विकारपणे तर कुणी बेदरकारपणे ते तण उपटून टाकतं.
निसर्ग बलाढ्य खरा, पण अशा छोट्या लढाया मनुष्य जिंकतो हे खरं...

(कर्ज के लिए) अर्ज किया है

#अर्ज_किया_है!

'लग्न पहावे करून' आणि 'घर पहावे बांधून', यात आजकाल 'कर्ज पहावे घेऊन', या नवीन कामगिरीची भर टाकायला हवी .
... तर सुरुवात अगदी सहज होते; इमानेइतबारे चालणारी आपली चारचाकी गाडी अचानक एके दिवशी बिघडते.
मग सर्व्हिस सेन्टरवाले अनपेक्षित अशी मोठी रक्कम सांगतात. मग आपली गाडी बरीच जुनी झालीय याचा साक्षात्कार मालक कम चालक यांना होतो. त्याचवेळी या सीनमध्ये गाडी विक्रेते यांचा जादुई प्रवेश होतो. त्यांच्या दिव्य दृष्टीला हा भावी ग्राहक दिसतो आणि जळी स्थळी, पेपरमध्ये, फोनवर, आपल्याला गाड्यांची मॉडले अव्याहत दिसू लागतात. कॉल्स सुरू होतात. मालक कम चालकाचा विश्वामित्र होतो एकदाचा, आणि मग गाड्यांचा 'टेस्ट ड्राईव्ह' नामक कांदे-पोहे कार्यक्रम सुरू होतो. हा कार्यक्रम घरात न होता आवारात होत असल्यामुळे सोसायटीलाही गोड बातमीची चाहूल लागते.
" '------' घेणार आहात?  मज्जाय बाबा," अशी किंचित अविश्वासदर्शक सुरुवात करून मग आपल्यावर माहितीचे अभिषेक सुरू होतात. गाडी या वस्तूत इतके फीचर्स आणि इतके प्रॉब्लम्स असतात हे ऐकून थक्क व्हायला होतं.
बाहेर ही तऱ्हा, तर घरात दुसरीच लढाई.
प्रत्येकाची ड्रीम कार जुबाँ पर येऊ लागते, बजेट वाढत जातं, आणि कॅल्क्युलेटर घेऊन बसलेली अनंत काळाची माता भविष्यात उद्भवू शकणारे सगळे खर्च मांडत प्रत्येक स्वप्न महाग आहे हे गंभीर आवाजात सांगत राहते. पण तोवर मालक कम चालकही पूर्णपणे संमोहित झालेले असतात, आणि मुलांनाही संसर्ग देण्यात यशस्वी होतात.
आता भारत हा भावनाप्रधान देश असल्याने आणि देशात लोकशाही असल्याने आणि ती सोयीनुसार घरातही अवतरत असल्याने बहुमताने हिशोबी मातेचा पराभव होतो.  त्याचवेळी तिच्या व्यवहारिक ज्ञानाचं चीज व्हावं म्हणून एकसदस्यीय कार लोन समितीवर एकमताने तिची निवडही होते.
मग आयुष्यात सुरू होते कार लोन नावाची रोलर कोस्टर राईड.
लोन प्रतिनिधीची पहिली भेट फार उत्साहवर्धक असते. फेअर अँड लव्हली वाले गोरेपणाची आणि संतुरवाले तारुण्याची जितकी खात्रीने हमी देतात तितक्याच आत्मविश्वासाने हे लोक आपल्याला आपल्या श्रीमंतीबद्दल आश्वस्त करतात. गाडीच काय, लगे हाथ एखादा व्हिला वगैरे पण आरामात घेऊ असं वाटायला लागतं.
त्यानंतर सुरू होते घी देखा मगर... ची फेज. सिबिल स्कोअर पाहून एक्जॅक्ट काय ते कळेल अशी बहुमूल्य माहिती सिनियर लोन एक्झेक्युटिव्ह आपल्याला फोनवर देतात.
 आपण अर्थनिरक्षर आहोत हे त्यांना कळू नये म्हणून आपण फार प्रश्न न विचारता पुढची मीटिंग फिक्स करतो. मग आपल्या जाणकार मित्राकडून जुजबी माहिती घेतो.
पुढच्या मीटिंगमध्ये अजून नवीन अगम्य टर्म्स वाट्याला येतात. पण बिजी मित्राला सारख्या शंका विचारत राहणं म्हणजे सर्दीसाठी सुपरकन्सल्टंटला पिडल्यासारखं, त्यामुळं मग आपण गुगल करून माहिती मिळवत राहतो. त्याचवेळी वेगवेगळ्या
कागदपत्रांची मागणी मारुतीच्या शेपटीसारखी वाढत असते. आपण गेल्या काही वर्षांत किती पसारा मांडून ठेवलाय याचं स्वतःलाच नवल वाटतं. आधीचे गृहकर्ज बिल्डरशी टाय-अप असलेल्या बँकेकडून केल्यामुळे फार जमवाजमव करावी लागलेली नसते. यावेळी स्वबळावर राईड पूर्ण करायची असते.
सगळं जमवता जमवता वैताग येतो; कशाला नवी गाडी, आहे ती रिपेअर करू असं वाटायला लागतं; पण आता शेजारी, मित्रपरिवार, पाहुणे, सगळीकडे बातमी आग की तरह फैललेली असते. परतीचे दोर कापलेले असतात.
नवीन दिवस नवीन सुरुवात म्हणत आपण नव्याने पेपर्सच्या जंगलात शिरतो. इकडे अहोंची कधी मित्रासोबत तर कधी मुलांसोबत शोरूमला चक्कर आणि मग गाडीतून चक्कर सुरूच असते; एलिजिबिलिटी, नेट सेविंग्स, अदर लायाबिलिटीज, अशा विवंचनांपासून ते अगदी मुक्त असतात.
आणि एकदाचा 'सगळं ऑनलाईन मिळतं आता', हा खुल जा सिमसिम मंत्र आपल्याला प्राप्त होतो. डिजिटल जगात घरबसल्या बरेच डॉक्युमेंट्स मिळतात, धावपळ करायची गरज नसते याचा साक्षात्कार होतो.  मग या निमित्ताने स्वतःचे सगळे व्यवहार अपग्रेड केले जातात, सगळीकडचा ऑनलाइन ऍक्सेस मिळवला जातो. या एक दोन आठवड्यात आपली अर्थसाक्षरता बरीच सुधारली हे जाणवून स्वतःवरच खुश व्हायला होतं. फक्त एक छोटी अडचण असते; बरेच युजरनेम आणि पासवर्ड तयार होतात.  अनेक वर्षांपूर्वीच्या गप्पा आठवतील पण हे अक्षर-आकड्यांचं कॉम्बो हमखास विसरायला होतं. मग जरा युक्ती वापरून ते लक्षात राहतील असे सेट केले जातात.  शेवटचे एक दोन डॉक्युमेंट्स जरा त्रास देतात पण शेवटी सगळी फाईल एकदाची तयार होते आणि बँकसावकाराच्या चरणी अर्पण केली जाते.

शेवटचा पेपर देऊन आल्यावर येणारी सुटकेची भावना अनुभवत आता अनंत काळाची माता निवांत झाली आहे.
अजून काही घ्यायचं असेल तर घ्या, तुम्ही फक्त emi  भरण्याचे बघा, बाकी मी लोनचे सगळे बघते, असा प्रस्ताव मांडण्याचा धाडसी विचार तिच्या मनात येऊ लागला आहे!

Eternal sunshine.... स्मृती विस्मृतीचा लपंडाव.

आठवणी हा प्रकार मती गुंग करणारा आहे. एखाद्या व्यक्तीशी निगडीत सुखद अनुभवांच्या स्मृती जागवून पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्याची कला माणसाला अवगत आहे. पण वर्तमानकाळात जर त्या व्यक्तीशी असलेले नाते बिनसलेले असेल, तर  मात्र त्या आठवणी आनंददायी न राहता वेदनेचे कारण बनतात.
एका उत्कट नात्याचा दुःखद समारोप आणि म्हणून त्याच्याशी निगडित सर्व आठवणी पुसण्याचा प्रयत्न एका वैज्ञानिक प्रयोगामार्फत करणे, या थीमभोवती 'Eternal sunshine of the spotless mind' या चित्रपटाची कथा फिरते.
हा चित्रपट प्रेमकथा, विज्ञानकथा, थ्रिलर अशा बऱ्याच वर्गांत मोडतो. नॅरेटिव्ह नॉन लिनियर पद्धतीने उलगडते त्यामुळे लक्ष देऊन पाहायला लागते. पण सिनेमा गुंगवून टाकणारा आहे.
नात्याचा अंत झाला म्हणून त्यातल्या सुखद क्षणांचे मोल नष्ट होते का? पूर्वाश्रमीच्या नात्याची आठवण शिल्लक नसतानाही ती व्यक्ती नव्याने भेटल्यावर परत तशीच ओढ का लागते? दुसरी संधी मिळाली, तर पुन्हा त्याच वाटेने जायला नको असे वाटणे योग्य, की त्या चुका टाळून, समोरच्याला स्वीकारून परत एकदा त्या ओढीला शरण जाणं योग्य? अशा प्रश्नांचा वेध हा चित्रपट घेतो.
चित्रपटाचे शीर्षक म्हणून अलेक्झांडर पोप या कवीच्या Eloisa to Abelard या पत्राच्या स्वरूपात असलेल्या कवितेतल्या ओळी वापरल्या आहेत...
“How happy is the blameless vestal's lot!
The world forgetting, by the world forgot.
Eternal sunshine of the spotless mind!
Each prayer accepted, and each wish resigned.”
ही कविता बाराव्या शतकातील एका विवादास्पद प्रेमकथेवर आणि त्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित आहे. यातली नायिका आता ननचे आयुष्य कंठते आहे, आणि भूतकाळातील सर्व आठवणींचे डाग पुसून आता निर्विकार शांततेच्या निरंतर प्रकाशात आनंदी असल्याचे सांगत आहे.
लौकिक जगात मनात उमटणारे विकार, स्मृती या सगळ्यांना अव्हेरून निष्कलंक अशा परलौकीक आनंदात रममाण होणे, हे एक प्रकारे 'विस्मृती हेच वरदान'  चे अध्यात्मिक स्वरूप आहे.
गंमत म्हणजे चित्रपट याच्या उलट सुचवू पाहतो. प्रयत्न करूनही नायक नायिका एकमेकांना आपल्या मनातून पूर्णपणे पुसून टाकू शकत नाहीत आणि एका अगम्य ओढीने दोघेही परत एक विशिष्ट ठिकाणी येतात, परत भेटतात आणि आपल्या नात्याला अजून एक संधी देण्याचे ठरवतात.
एखाद्या नात्यात गोष्टी मनाविरुद्ध घडल्यामुळे होणारा त्रास नको म्हणून आयुष्यातल्या अनुभवांना, स्मृतींना दूर सारणे; किंवा मग नात्यांतले कडूगोड दोन्ही स्वीकारत त्या डागांसकट आयुष्य अनुभवत राहणे, यातले द्वंद्व दाखवून चित्रपट दुसऱ्या पर्यायाचा बाजूने कौल देतो.
मुळात सगळ्या प्रेरणा बुद्धीच्या कक्षेत पूर्णपणे आणणे; हव्या तशा, हव्या तेव्हा इनिशिएट करणे किंवा संपवणे मानवी प्रज्ञेला शक्य आहे का? हा प्रश्नही सिनेमा पाहताना उपस्थित होतो. आणि आपलं असणं, याचा बराच भाग आपल्या अनुभूतींनी व्यापलेला असेल, तर त्यांपासून दूर जाऊन काय हाशील; त्यापेक्षा सगळ्या बॅगेज सकट स्वतःला आणि समोरच्याला स्वीकारणं जास्त संयुक्तिक नाही का?

(नेहमी धबधब्यासारख्या फसफसणाऱ्या जिम कॅरीला संयत रुपात बघणं आणि केट विन्सलेटला बेफाम भूमिकेत पाहणं, हा एक अविस्मरणीय अनुभव आहे... थोडक्यात सांगायचं तर हे एकाच वेळी विश्वसनीय आणि सर्रियल असा काहीतरी अनुभव देतात.)