#अर्ज_किया_है!
'लग्न पहावे करून' आणि 'घर पहावे बांधून', यात आजकाल 'कर्ज पहावे घेऊन', या नवीन कामगिरीची भर टाकायला हवी .
... तर सुरुवात अगदी सहज होते; इमानेइतबारे चालणारी आपली चारचाकी गाडी अचानक एके दिवशी बिघडते.
मग सर्व्हिस सेन्टरवाले अनपेक्षित अशी मोठी रक्कम सांगतात. मग आपली गाडी बरीच जुनी झालीय याचा साक्षात्कार मालक कम चालक यांना होतो. त्याचवेळी या सीनमध्ये गाडी विक्रेते यांचा जादुई प्रवेश होतो. त्यांच्या दिव्य दृष्टीला हा भावी ग्राहक दिसतो आणि जळी स्थळी, पेपरमध्ये, फोनवर, आपल्याला गाड्यांची मॉडले अव्याहत दिसू लागतात. कॉल्स सुरू होतात. मालक कम चालकाचा विश्वामित्र होतो एकदाचा, आणि मग गाड्यांचा 'टेस्ट ड्राईव्ह' नामक कांदे-पोहे कार्यक्रम सुरू होतो. हा कार्यक्रम घरात न होता आवारात होत असल्यामुळे सोसायटीलाही गोड बातमीची चाहूल लागते.
" '------' घेणार आहात? मज्जाय बाबा," अशी किंचित अविश्वासदर्शक सुरुवात करून मग आपल्यावर माहितीचे अभिषेक सुरू होतात. गाडी या वस्तूत इतके फीचर्स आणि इतके प्रॉब्लम्स असतात हे ऐकून थक्क व्हायला होतं.
बाहेर ही तऱ्हा, तर घरात दुसरीच लढाई.
प्रत्येकाची ड्रीम कार जुबाँ पर येऊ लागते, बजेट वाढत जातं, आणि कॅल्क्युलेटर घेऊन बसलेली अनंत काळाची माता भविष्यात उद्भवू शकणारे सगळे खर्च मांडत प्रत्येक स्वप्न महाग आहे हे गंभीर आवाजात सांगत राहते. पण तोवर मालक कम चालकही पूर्णपणे संमोहित झालेले असतात, आणि मुलांनाही संसर्ग देण्यात यशस्वी होतात.
आता भारत हा भावनाप्रधान देश असल्याने आणि देशात लोकशाही असल्याने आणि ती सोयीनुसार घरातही अवतरत असल्याने बहुमताने हिशोबी मातेचा पराभव होतो. त्याचवेळी तिच्या व्यवहारिक ज्ञानाचं चीज व्हावं म्हणून एकसदस्यीय कार लोन समितीवर एकमताने तिची निवडही होते.
मग आयुष्यात सुरू होते कार लोन नावाची रोलर कोस्टर राईड.
लोन प्रतिनिधीची पहिली भेट फार उत्साहवर्धक असते. फेअर अँड लव्हली वाले गोरेपणाची आणि संतुरवाले तारुण्याची जितकी खात्रीने हमी देतात तितक्याच आत्मविश्वासाने हे लोक आपल्याला आपल्या श्रीमंतीबद्दल आश्वस्त करतात. गाडीच काय, लगे हाथ एखादा व्हिला वगैरे पण आरामात घेऊ असं वाटायला लागतं.
त्यानंतर सुरू होते घी देखा मगर... ची फेज. सिबिल स्कोअर पाहून एक्जॅक्ट काय ते कळेल अशी बहुमूल्य माहिती सिनियर लोन एक्झेक्युटिव्ह आपल्याला फोनवर देतात.
आपण अर्थनिरक्षर आहोत हे त्यांना कळू नये म्हणून आपण फार प्रश्न न विचारता पुढची मीटिंग फिक्स करतो. मग आपल्या जाणकार मित्राकडून जुजबी माहिती घेतो.
पुढच्या मीटिंगमध्ये अजून नवीन अगम्य टर्म्स वाट्याला येतात. पण बिजी मित्राला सारख्या शंका विचारत राहणं म्हणजे सर्दीसाठी सुपरकन्सल्टंटला पिडल्यासारखं, त्यामुळं मग आपण गुगल करून माहिती मिळवत राहतो. त्याचवेळी वेगवेगळ्या
कागदपत्रांची मागणी मारुतीच्या शेपटीसारखी वाढत असते. आपण गेल्या काही वर्षांत किती पसारा मांडून ठेवलाय याचं स्वतःलाच नवल वाटतं. आधीचे गृहकर्ज बिल्डरशी टाय-अप असलेल्या बँकेकडून केल्यामुळे फार जमवाजमव करावी लागलेली नसते. यावेळी स्वबळावर राईड पूर्ण करायची असते.
सगळं जमवता जमवता वैताग येतो; कशाला नवी गाडी, आहे ती रिपेअर करू असं वाटायला लागतं; पण आता शेजारी, मित्रपरिवार, पाहुणे, सगळीकडे बातमी आग की तरह फैललेली असते. परतीचे दोर कापलेले असतात.
नवीन दिवस नवीन सुरुवात म्हणत आपण नव्याने पेपर्सच्या जंगलात शिरतो. इकडे अहोंची कधी मित्रासोबत तर कधी मुलांसोबत शोरूमला चक्कर आणि मग गाडीतून चक्कर सुरूच असते; एलिजिबिलिटी, नेट सेविंग्स, अदर लायाबिलिटीज, अशा विवंचनांपासून ते अगदी मुक्त असतात.
आणि एकदाचा 'सगळं ऑनलाईन मिळतं आता', हा खुल जा सिमसिम मंत्र आपल्याला प्राप्त होतो. डिजिटल जगात घरबसल्या बरेच डॉक्युमेंट्स मिळतात, धावपळ करायची गरज नसते याचा साक्षात्कार होतो. मग या निमित्ताने स्वतःचे सगळे व्यवहार अपग्रेड केले जातात, सगळीकडचा ऑनलाइन ऍक्सेस मिळवला जातो. या एक दोन आठवड्यात आपली अर्थसाक्षरता बरीच सुधारली हे जाणवून स्वतःवरच खुश व्हायला होतं. फक्त एक छोटी अडचण असते; बरेच युजरनेम आणि पासवर्ड तयार होतात. अनेक वर्षांपूर्वीच्या गप्पा आठवतील पण हे अक्षर-आकड्यांचं कॉम्बो हमखास विसरायला होतं. मग जरा युक्ती वापरून ते लक्षात राहतील असे सेट केले जातात. शेवटचे एक दोन डॉक्युमेंट्स जरा त्रास देतात पण शेवटी सगळी फाईल एकदाची तयार होते आणि बँकसावकाराच्या चरणी अर्पण केली जाते.
शेवटचा पेपर देऊन आल्यावर येणारी सुटकेची भावना अनुभवत आता अनंत काळाची माता निवांत झाली आहे.
अजून काही घ्यायचं असेल तर घ्या, तुम्ही फक्त emi भरण्याचे बघा, बाकी मी लोनचे सगळे बघते, असा प्रस्ताव मांडण्याचा धाडसी विचार तिच्या मनात येऊ लागला आहे!

No comments:
Post a Comment