हॉस्टेलवर भिंतीचे पोपडे निघाले की तिथे एखादे पोस्टर चिकटवण्याचा जुगाड असतो. आमच्या रूममध्ये आधीच्या रहिवासिनीने 'Love and God' नावाच्या सिनेमाचे पोस्टर चिकटवले होते. तो सिनेमा तेव्हाही माहीत नव्हता आताही माहीत नाही; पण संजीवकुमार, प्राण या विभूतींना कुणी का म्हणून डोळ्यासमोर मांडून ठेवलं असेल याचा अचंबा वाटायचा. कदाचित पोस्टर फुकट मिळालं असेल असा निष्कर्ष आम्ही सद्य रहिवाश्यांनी काढला.
तर तेव्हा सतत डोळ्यासमोर असणाऱ्या 'Love and God' कडून प्रेरणा घेऊन आमचं एक तत्वज्ञान तयार झालं होतं; प्रेम आणि देव या दोन्ही माणसाची करमणूक करणाऱ्या काल्पनिक गोष्टी आहेत.
यातले देवाबद्दलचे मत नव्याने स्वतंत्र राहणे, नवीन वाचन यामुळे घेतलेला बंडखोर पवित्रा होता. प्रेमाबद्दल जो थोडा नकारात्मक भाव होता त्यामागची कारणं गुंतागुंतीची होती. भोवताली जे वातावरण होते त्यात जात बघून प्रेम करणाऱ्यांचा सुळसुळाट होता. मग जातच बघायची तर थोडं उशिरा पीजी वगैरे फिक्स झाल्यावर बघावी; आतापासून कुठे हा दांभिक प्रकार करा, हा युक्तिवाद आम्हाला पटला. दुसरं म्हणजे आमच्यातल्या एका चुलत मैत्रिणीचे अफेयर सुरू झाले होते; तिची ओढाताण आणि तिच्या बॉयफ्रेंडने घातलेले नियम अटी पाहून तर आमची खात्री पटली की प्रेम ही ओव्हररेटेड आणि फिक्शनल गोष्ट असून लग्नाचा व्यवहार नेहमी डोळे उघडून करावा!
त्यामुळे प्रेम या विषयावर हिंदी सिनेमे, आमिर, शारुख, आणि व पु, गौरी देशपांडे यांच्या कृपेने थेरॉटिकल चर्चा प्रचंड केल्या तरी त्या वाटेला जाण्याची संधी कधी घेतली नाही.
यथावकाश कांदे पोहे कार्यक्रम झाला. मुलगा खात्रीलायक बॅकग्राऊंडचा, निर्व्यसनी, एमडी, असे सगळे निकष बघून लग्न ठरले. जोडीदाराबद्दलची काय संकल्पना मनात आहे, काय अपेक्षा आहेत, या अशा गोष्टी आम्ही डिस्कस न करता थेट लग्नच झाले आमचे...
मग अपेक्षांची अतिशय वेगवेगळी गाठोडी घेऊन दोन अनोळखी लोकांचे सहजीवन सुरू झाले.
एकीकडे प्रेमासाठी भावविव्हल होऊन डोळ्यात पाणी आणणाऱ्या शारुखची इमेज मनात होती, दुसरीकडे तुम्ही मेरी मंदिर म्हणणाऱ्या भारतीय नारीची... बऱ्याच खडखडाटानंतर दोन्ही फ्रेम्स अवास्तव आहेत याची दोघांना जाणीव झाली.
लग्नाचा आधार म्हणजे प्रेम आणि ते प्रेम जोडीदाराकडून आपल्याला विनाशर्त मिळायला हवे, असे काहीतरी गृहीतक डोक्यात असते. जणू लग्न म्हणजे रेडिमेड प्रेमाने भरलेली बारमाही विहीर असते. प्रत्यक्षात लग्न म्हणजे रिकामे भांडे असते, ज्याला परिश्रमपूर्वक भरावे लागते.
अपेक्षांच्या जंजाळातून मार्ग काढत असताना जे जुन्या प्रवाशांचे पथदर्शक दगड असतात ते आपला प्रवास सुकर करतीलच असे नाही. प्रत्येकाच्या फ्रेम्स वेगळ्या, प्राधान्यक्रम वेगळे. हे सगळे अनुभवत असताना कधीतरी मैत्रिणीशी गप्पा मारताना परत लव्ह अँड गॉड आठवला आणि जाणवलं प्रेमाचंही देवासारखे आहे. देव एक म्हटला तरी त्यांच्यापर्यंत नेणारे धर्म निरनिराळे, तसे संसारधर्मही वेगवेगळे असतात. एकच एक हमखास फॉर्म्युला नाही याचा… आणि भक्तीतही नुसतं मागत राहिलो तर देवही सारखा सारखा पावत नाही; आधी समर्पणभावाने भक्तीही करावी लागते.
दोघे देणं हळूहळू शिकत गेलो, अजूनही शिकतोय. आई झाल्यावर मात्र देण्यातला आनंद, निखळ प्रेम या गोष्टी बऱ्यापैकी उमजू लागल्या. समोरची व्यक्ती आपल्या मनातल्या प्रतिमेच्या चौकटीत कोंबता येत नाही. ती प्रत्यक्षात जशी आहे तशी आधी स्वीकारावी लागते. आपल्याला अयोग्य वाटणाऱ्या बाबी काही मर्यादेपर्यंत सुधारायला लावता येतात, आवडणाऱ्या गोष्टी थोड्या वाढवता येतात; पण अगदी संत्रीचा आंबा करता येत नाही. आपला अंश असणाऱ्या मुलांची ही गत तर एक पक्के मडके झालेली व्यक्ती किती बदलणार. आपण स्वतःतरी समोरच्यासाठी किती बदलू शकतो स्वतःला?
आपण प्रेम म्हणतो तेव्हा बऱ्याचदा We want to receive love and attention rather than giving it. दोघेही घेणेकरी झाले तर द्यायचे कुठून?
दोन वर्तुळं कधी पूर्णपणे एकमेकांत विलीन होत नाहीत; ती केवळ अपूर्ण किंवा अमूर्त प्रेमातली कविकल्पना असते. दोन वर्तुळांचा काही भाग सामायिक असतो तर काही स्वतंत्र राहतो. सामायिक भाग विस्तारायचे प्रयत्न करत असताना स्वतंत्र भागही ऍक्सेप्ट करायला लागतो. आणि जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रेमाची बेगमी करण्याची जबाबदारी या एकमेव नात्यावर टाकली तर त्याचं ओझं होतं.
जगण्यातले कडू गोड अनुभव घेताना जाणवलं देव आहे की नाही याचा खल करण्यात अर्थ नाही.. बळ मिळत असेल, शांत वाटत असेल, तर काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यालाही काही हरकत नसते. नाहीतरी लौकिक जगातल्या आपण ज्यांना मौल्यवान समजतो अशा कितीतरी गोष्टी या केवळ संकल्पनाच तर आहेत.
तसंच प्रेम नावाच्या चकव्याचा वेध घेतानाही कळत गेलं की प्रेम ही भावना फुलात असलेल्या सुगंधासारखी असते; तो फक्त अनुभवावा... त्याचं पृथक्करण करायला गेलं तर मात्र फुलाची नासधूस होते.
कुठल्याही नात्यात दोन माणसांना जोडणारा अदृश्य धागा प्रेमाचा असतो, नात्याचे नाव काही असो.
आणि नास्तिक व्हायची इच्छा असेल तर त्या धाग्याचं अस्तित्व नाकारताही येतं... मैत्री, आपुलकी, काळजी, आवड, आकर्षण अशी वैकल्पिक नावं देता येतातच !
कर्मकांड करणाऱ्या भाविकांसारखा आजचा दिवस दणक्यात सेलिब्रेट करा; 'मला पटत नाही पण घरच्यांसाठी करतो' म्हणणाऱ्या सेमिनास्तिकासारखं जोडीदाराच्या हट्टाखातर तळ्यातमळ्यात करत साजरा करा; किंवा हे सगळं थोतांड आहे म्हणत नाकारा; प्रेम असणारच आहे. देव न मानणारे दुसरं काही ना काही मानतात, तसं प्रेम मानलं नाही तर ते दुसऱ्या कुठल्या नावाने सोबत करेलच. फक्त फार ओझं नका टाकू, म्हणजे न गुदमरता त्याची सुगंधी साथ कायम सोबत राहील...

No comments:
Post a Comment