Sunday, 8 March 2020

बीज अंकुरे अंकुरे

शाळेत प्रोजेक्ट म्हणून सीडबॉल मिळाला आणि मग तो कुंडीत पेरून निगुतीने देखभाल करणं, सोबत आलेलं खत टाकणं, अगदी मिलिमिटरमध्ये मोजून पाणी देणं सुरू होतं. आज सकाळी अगदी इवलेशे अंकुर दिसले तर आनंदी आनंद झाला. विशेष म्हणजे शेजारच्या कुंडीतली हिरवळ जोमाने उगवलेली; ती मात्र अशीच विनामशागत, अनाहूत. विनासायास आपोआप कुणी कामना न करताच आलेली, मग नाव तरी काय असणार, तण नावाच्या सर्वनामात सामावली.
मातीची कूस मिळाली की अंकुरणे हा बीजाचा स्वधर्म; मातीला हवे की नको, इतर कुणाला कौतुक आहे की नाही, हा त्याचा विषय नाही. लेकीला नवल वाटलं. Nature's ways are stronger than us, म्हणाल्यावर तिने सांगितलं हे नको काढू, राहू दे हेसुद्धा.
माणसाचा जीव तरी काय वेगळा असतो?
कधी अथक उपाय केले जातात, वैज्ञानिक उपायांसोबत देवाला साकडे, ग्रहांची मनधरणी, उपास, व्रत वैकल्ये... पण बीज तरी रुसलेले किंवा माती तरी कोरडी; आणि तेव्हा कशालाच यश येत नाही. आपला वारसा पुढे चालवणाऱ्यात आपलाच अंश असावा... बीजही आपले आणि मातीही आपलीच, ही साधारण प्रत्येकाची अट; ते शक्यच होत नाही म्हटल्यावर कधी बाहेर रुजवून मग थेट रोपच पेरले जाते , कधी बीज दुसरे आणि कूस आपली, कधी बीज आपले पण कूस परकी, अशी आंशिक तडजोडही नाईलाजाने केली जाते. पण हे सगळे प्रयत्नही कधीकधी फोल ठरतात.
त्याचवेळी दुसरीकडे मात्र नको असताना, तयारी नसताना रुजवात होते आणि त्याचं प्राक्तन मग तणासारखं राहतं. एखादा कुणी असू दे आता राहिलंच आहे तर म्हणत स्वीकारतो; तर बऱ्याचदा कुणी नाईलाज म्हणून दुःखाने, कुणी निर्विकारपणे तर कुणी बेदरकारपणे ते तण उपटून टाकतं.
निसर्ग बलाढ्य खरा, पण अशा छोट्या लढाया मनुष्य जिंकतो हे खरं...

No comments:

Post a Comment