Monday, 1 March 2021

मध्यम सूर

 दुपारी 'मिडल-क्लास मेलडीज', हे नाव वाचून  एक तेलुगू चित्रपट बघायला सुरुवात केली; मेलडीज म्हणजे संगीताशी संबंधित काही असेल असं वाटलं होतं. तसं काही नव्हतं, पण  चित्रपट छान होता, आणि ते शीर्षकही अनुरूप आहे हे पटलं. आयुष्याचा सूर पूर्णतः हरवून सगळं कर्कश्य होण्याइतका विसंवाद/ उद्रेक न होता एकमेकांना सांभाळत, सावरत, समजून घेत आकारास येणारं साधं पण सुरेल मध्यमवर्गीय आयुष्य...

 मध्यम आकाराच्या गावातल्या, मध्यमवर्गीय घरातल्या साध्या पात्रांभोवती फिरणारी ही कथा. बेसिक संघर्ष; कधी घरट्यात रोखून धरणारे तर कधी पंखांना बळ देणारे पालक,  कधी मागच्या पिढीवर वैतागलेली तर कधी त्यांची हतबलता समजून घेणारी मुलं;  या सगळ्यांत नायकाचे एक स्वप्न आणि ते साकार करण्यासाठीची धडपड.

आज सावित्रीबाईंवरच्या वाचलेल्या पोस्ट्स मनात रेंगाळत असताना हा सिनेमा बघत होते आणि बघता बघता यातल्या स्त्री पात्रांनी लक्ष वेधून घेतलं. सर्वसामान्य परिस्थितीतल्या, सर्वसामान्य पेहरावातल्या साध्या मुली आणि बायका.... पण ज्यांना खरोखर विमेन ऑफ सब्स्टन्स म्हणता येईल अशा. संहारक, वाचाळ न होता, आपले मूळ मार्दव शाबूत ठेवून, समोरच्या व्यक्तींच्या मानसिकतेत, आचरणात बदल घडवणाऱ्या... 

 प्रेमळ पण व्यवहारी, कणखर असणारी आई असो, सतत गृहीत धरलं जाणं नामंजूर असणारी प्रयेसी, स्वाभिमान जपणारी लग्नाळू मुलगी, नवऱ्याला लोभाचा अतिरेक होतोय याची आठवण करून देणारी पत्नी असो; ही सगळी पात्र वास्तववादी आहेत, कालसुसंगत आहेत, आणि काळानुरूप बदलत असलेल्या स्त्रियांच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. पारंपारिक चौकटीतल्या भूमिका निभावत असलेल्या पण आत्मभान जागृत असलेल्या या स्त्रिया आहेत.

आपल्या अवतीभोवती अशा अनेकजणी असतात; त्यांचा फार आवाज नसतो, अभिनिवेश नसतो, गर्जना नसतात; पण कृतीशीलता खूप असते, विधायक विद्रोह असतो,  आणि व्हिजिबल रिजल्ट्स असतात, झालेले दीर्घकालीन बदल असतात. या स्त्रिया खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी म्हणवून घ्यायला पात्र वाटतात. 


[ सशक्त, वास्तववादी, अंतर्बाह्य सुंदर अशी स्त्री पात्रं, अशात बघितलेल्या बऱ्याच दक्षिण भारतीय, विशेषतः मल्याळम चित्रपटांमध्ये बऱ्याच संख्येने दिसली . तिकडचे बॉक्स ऑफिस हिट्स कसे असतात माहीत नाही, पण OTT प्लॅटफॉर्म्सवर पाहिलेल्या बहुतांश सिनेमांमधल्या स्त्री व्यक्तिरेखा फार अस्सल, रिलेटेबल वाटतात, आणि त्यांच्या माध्यमातून subtly व्यक्त होणारा स्त्रीवादही फार मनोरम आहे .]


भाषेचं सुंबरान

 'सुंबरान' हा सिनेमा बघताना या शब्दाचा नेमका अर्थ शोधत होते. तेव्हा एक लेख वाचला ज्यात

धनगरी ओव्यांना सुंबरान म्हणतात हे समजलं.

( सुंबरानचा शब्दशः अर्थ स्मरण; प्रमाण भाषेतले स्मरण लोकभाषेत सुंबरान झाले. हिंदी मुलुखात त्याचेच सुमीरन झाले असणार..)


धनगरी ओवीचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे "गाणे' असते आणि दुसरा भाग म्हणजे "कथा'! हा दुसरा भाग गोष्टीरूपाने सांगितला जातो. गाणारे वेगळे असतात. कथा सांगणारे वेगळे असतात. या कथेच्या भागाला "सपादनी' म्हणतात. गाण्यातील माहितीच कथारूपाने पुन्हा पुन्हा सांगितली जाते. ओवीची "गायलेली' प्रत्येक ओळ किमान दोन वेळा, तर कधी कधी चार वेळा सलग म्हटली जाते. ( याबद्दल सविस्तर माहिती असलेल्या लेखाची लिंक कमेंटमध्ये दिली आहे.)


यातला 'सपादनी' हा शब्द आम्ही गावाकडे वापरायचो; वाढवणे या अर्थाने, किंवा कधीकधी अघळपघळ बोलून चुकीवर पांघरूण घालायचा प्रयत्न करणे या अर्थाने.

उदा: ' गर्दी जास्त आनी स्वैपाक कमी असं दिसलं की आचारीलोक वरण/ रस्सा भाजीत पाणी अन तिखट टाकून सपादनी करतात.'

' ह्ये सकाळी एकदम जोरात ओरडले, आता उगी गोड बोलून सपादनी करायलेत' .


😊 शब्द कुठून कुठे असे वाहत, झिरपत जात असतात... आणि त्यामुळेच तर भाषा जिवंत खळाळती राहू शकते !

BORGEN- राजनीती_राजकारण_सत्ताकारण

 #राजनीती_राजकारण_सत्ताकारण



आजोबा दूरदर्शनवर बातम्या बघत दोरवाती वळायचे. माणसाला एखाद्या विषयातलं काही कळत असलं, की त्याला ते सांगावं वाटतं, आणि आप्पांना राजकारणातले बारकावे कळायचे. मग त्यांची हक्काची श्रोता म्हणजे मी असायचे. त्यांच्या विश्लेषणाला ते 'बातमीमागची खरी बातमी' म्हणायचे. त्यामुळं मलाही राजकारण हा विषय इंटरेस्टिंग वाटू लागला. त्या दोरवातींचे उदाहरण देऊन ते म्हणायचे, "हा कापूस इतका ताणता यायला हवा की त्याची पातळ दोरी होईल, पण तुटण्याइतका मात्र ताणू द्यायचा नाही... नेत्यांना समाजात नवीन काही घडवून आणायचं असेल तर असा अप्रोच हवा". 

नेटफलिक्सवर ' बोर्गेन (Borgen)' नावाची डॅनिश सिरीज पाहताना मला अचानक हे सगळं आठवलं.

राजकारणावर बेतलेल्या कलाकृती बऱ्याचदा सनसनाटी असतात आणि हिरो/व्हिलन या साच्यात फिट केलेल्या. बोर्गेन मात्र सुखद अपवाद... डॅनिश पार्श्वभूमीवर असलेली ही  मालिका राजकारण आणि governence यातले बरेच बारकावे उलगडते. त्याचवेळी बदल घडवताना, नवीन कायदे आणताना होणारे फ्रिक्शन दाखवते. 

डेन्मार्क हा विकसित आणि सधन देश आहे, लोकसंख्या कमी; त्यामुळं आपल्याकडच्या परिस्थितीशी तुलना केली तर बरेच फरक आहेत. त्यात त्यांची लोकशाही दीडशे वर्षांहून जास्त जुनी आहे.

पण काही एपिसोड्स बघताना आपल्या देशातील, राज्यातील तशाच प्रकारचे प्रश्न आणि विषय हटकून आठवतात आणि काही गोष्टी युनिव्हर्सल असतात हे जाणवतं; उदा. स्थलांतरितांचा प्रश्न, निर्विवाद बहुमत नसल्यावर होणाऱ्या युती आणि तडजोडी, पत्रकारितेचे मीडिया ट्रायलसारखे धोकादायक पैलू, आणि राजकीय विचारधारेत असणारे मूलभूत मतभेद बाजूला ठेवून होणारे गठबंधन.

 सारांश सांगायचा तर एका राजकारणी स्त्रीची ही गोष्ट. पहिल्या दोन सिझन्समध्ये coalition  सरकार बनवण्याच्या वाटाघाटींमध्ये अनपेक्षितपणे लाभलेले प्रधानमंत्रीपद, ते पार पाडताना येणारी आव्हानं, ती पेलताना राजकारणात मुरब्बी होत जाणं; आणि त्याचसोबत व्यस्ततेमुळे वैयक्तिक, कौटुंबिक आघाडीवर होणारे परिणाम, हा प्रवास आहे. 

तिसऱ्या सिजनमध्ये पायउतार झाल्यानंतरची परिस्थिती, मग वेगळ्या पद्धतीने पुनरागमन आणि त्याची परिणिती, हा भाग आहे. 

या व्यतिरिक्त एका न्यूज चॅनेलमध्ये होणाऱ्या घडामोडी आणि स्पिन डॉक्टर नावाने ओळखले जाणारे राजकीय मदतनीस, हे ट्रॅक्स बरंच भाष्य करत राहतात. 

कथा रोचक आहेच पण त्या पलीकडे जाऊन काही मूलभूत मुद्दे जाणवतात आणि मनात काही प्रश्न येतात; म्हणून ही सिरीज जास्त आवडली.   

- सत्ता राबवताना, एखादी संकल्पना प्रत्यक्षात आणताना, करावी लागणारी तडजोड किती मर्यादेपर्यंत रास्त मानावी? धंदेवाईक दृष्टिकोनातून राजकारण करणारे सोडून देऊ; पण काही तत्व मानून, काही धोरणं आखून राजकारणी व्यक्ती सत्तेत येतात, तेव्हा इम्प्लेमेन्टेशन करताना काय अप्रोच असायला हवा? बहुमत म्हणजे एकमत नव्हे; मग अल्पमत दुर्लक्षित करावं की सर्वसहमती साधावी? ती साधताना आपल्या मूळ धोरणांना किती मुरड घालावी? ती मर्यादा ठरवताना कुठले क्रायटेरिया वापरावेत? 

Ends justify the means हे कितपत समर्थनीय असते? क्रांती म्हणजे नेमकं काय? 

"Politics is war without bloodshed. War is politics with bloodshed.  युद्ध जिंकलं तर करणारा नेता म्हणवतो, हरलं तर दहशतवादी,"  असे आपल्या राजकीय हिंसेचे समर्थन एक आंदोलक करतो जो एक प्रसिद्ध कवीही असतो( तो स्वतःला आंदोलक म्हणवत असतो पण त्याच्या सरकारच्या मते तो दहशतवादी असतो).  राजकीय हिंसा यशस्वी झाली तर क्रांती आणि अयशस्वी झाली तर दहशतवाद असे म्हणता येईल का? लोकशाहीत आपल्याहून वेगळे असणाऱ्या समूहांना सामावून घेण्याची सामर्थ्य आहे असे म्हणणारी व्यक्ती आपल्या समूहाच्या उद्दिष्टांसाठी हिंसा करते तेव्हा ते कसे समर्थनीय असते? 


- चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या पत्रकारितेची निष्ठा कुणाशी असावी? सत्य जर देशाच्या कुटनीतीच्या दृष्टीने हानिकारक ठरत असेल, तर कशाला प्राधान्य द्यावे?

- सार्वजनिक क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात किती डोकावायचे याचे काही बंधन पत्रकारांवर असावे का? दुसऱ्या बाजूने जर सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असणारी मंडळी  समाजाच्या धार्मिक-सांस्कृतिक समजुतींना conform करणाऱ्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आचरणाचे भांडवल करत असतील, तर त्याविरुद्ध झालेल्या त्यांच्या वागण्यावर चिखलफेक झाल्यावर तक्रार करण्याला ग्राउंड राहतो का? 

- विकसित देशांमध्ये सुद्धा दाम्पत्यांतले जबाबदारीवाटप जुनेच आहे का? पुरुष पूर्णवेळ सार्वजनिक क्षेत्रात काम करतात तेव्हा त्यांनी कौटुंबिक सुखाची आहुती दिली, असे कौतुक होते; स्त्रियांच्या बाबतीत मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना कसरत झाली, किंवा त्या आघाडीवर तडजोड करावी लागली, असा नरेटिव्ह असतो... घर म्हणजे पुरुषासाठी सुखाचे स्थान आणि बाईसाठी कर्मभूमी असते का? 

- स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा हक्क बजावताना सोबत त्यांच्या जबाबदारीचे जे ओझे एकट्यावर येते त्याचे समायोजन कसे करावे? 

- लग्नासारखे निर्णय आमरण निभावण्याचे बंधन नसल्यामुळे हा निर्णय बदलण्याचे मिळालेले स्वातंत्र्य, पण त्याच्या जोडीने येणारे कधीकधी असह्य भासणारे एकटेपण, आणि मुलांची होणारी ससेहोलपट ; किंवा तडजोड करत, कधी माघार घेत, वैयक्तिक इच्छा-आकांक्षांना मुरड घालत कुटुंब ही संस्था टिकवून धरणं.....  या दोन्हीतलं कमी वाईट काय? 


सगळ्यात शेवटी चर्चिलचे एक वाक्य जे एका एपिसोडच्या सुरुवातीला आहे ( प्रत्येक एपिसोडला एक समर्पक ओपनिंग कोट दिलेला आहे ):

"Democracy is the worst form of government, except all others that have been tried." - Winston Churchill


( Democracy Index नावाची एक मानांकन पद्धत आहे. त्यात १६७ देशांच्या यादीत भारत ५१ व्या क्रमांकावर आहे. हा इंडेक्स रोचक आहे , जमल्यास नक्की वाचा 😊.)

Saturday, 27 February 2021

जगण्यातले अध्यात्म

 बुद्धीचा विकास होत गेला तसा माणसाच्या कुतूहलाच्या कक्षा रुंदावत गेल्या. भोवतालच्या वेगवेगळ्या घटनांबद्दल प्रश्न पडत गेले आणि हळूहळू स्वतःबद्दलही.

उत्तरे शोधण्याच्या ध्यासातून कितीतरी शोध लागले, ज्ञान वाढले, प्रगती झाली. नंतर माणसाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळवण्याचे ओब्सेशनच झाले; प्रत्येक का आणि कसे चे उत्तर मिळायलाच हवे, नाहीतर तो प्रचंड अस्वस्थ होऊ लागला.

 दुसरीकडे इतर प्राण्यांना शक्य नसलेल्या मोठ्या टोळ्या आणि नंतर समाज बनवला मनुष्यप्राण्याने. त्याच सोबत या व्यवस्थेचे नियम आले; मुक्त जगण्याला शिस्तीचा बांध घालून आखीव रेखीव चौकटीत बसवणे आले. यासोबत मग सगळ्याच नात्यांना परिभाषा आली आणि परिणीती ही. स्थैर्य हवे तर गोष्टी अनिर्णित अस्पष्ट ठेवता येत नाहीत; त्यामुळे निश्चित निर्णय आले, closure आले आणि बऱ्याचदा हे आजन्म किंवा दीर्घकाळ निभावण्याचे बंधन आले.

या दोन्हीचा परिपाक म्हणजे माणूस उत्तर केंद्रित झाला. ठोस स्पष्ट उत्तरे आणि अचल ठाम निर्णय, या आवश्यक बाबी बनल्या. 

 सतत बदलणारा माणूस आणि भोवताल, या अस्थिर घटकांना घेऊन एक स्थिर व्यवस्था कायम ठेवायची, अशी ही विरोधाभासी परिस्थिती असते. प्रवाह अडवला की दाब वाढतो, या न्यायाने मग काही उत्तरे मिळूनही   माणसांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली. 

माणसाच्या आंतरिक उर्मी आणि बाह्य नीतिनियम, यातल्या विसंगतीतून जे द्वंद्व उभे राहते, ते समजून घेण्यासाठी तत्वज्ञान, अध्यात्म यांची सुरुवात झाली असावी.

अध्यात्म हा विषय गहनही आहे, विस्तृतही; माझा इतका अभ्यासही नाही. पण माझ्यापुरते अध्यात्म म्हणजे बाह्य चौकटी, सामाजिक कंडिशनिंगमुळे रुजलेली गृहीतके, या पल्याड जाऊन आयुष्य प्रत्यक्षात कसे आहे याची जाणीव होणे.  

जसे की आपण कधीच न बदलणारी नाती किंवा प्रेम म्हणतो, पण खरे पाहिले तर माणसाच्या भावना कालौघात बदलत असतात आणि जीवन आहे तोवर त्या बदलत राहतात; आयुष्य म्हणजे प्रवाही नदी असते असे मानले तर you cannot step in the same river twice. फक्त मृत्यूच्या क्षणी हे फ्रीज होईल, तोवर सगळं परिवर्तनशील असणार. ही जाणीव म्हणजे अध्यात्म.

किंवा कधीकधी नाते कायमचे संपले असेही म्हणतो, पण कायमचे असे काही संपत नाही; आयुष्य आहे तोवर अनेक शक्यता जिवंत असतात. 

" शेवट नसलेली गोष्ट स्वीकारायला शिकणं म्हणजे अध्यात्म " असे मी म्हणाले तेव्हा अनिश्चितता मान्य करून सद्य परिस्थितीत जे काही असेल त्याचा समरसून अनुभव घेणे, असा काहीसा अर्थ अभिप्रेत आहे... लिव्ह इन द मोमेंट म्हणतात तसं ...😊

अभिव्यक्तीचा पिंजरा

 जगणं सुरू होतं आणि जगता जगता विचार करणंही. मग कधीतरी एक माध्यम, एक आऊटलेट मिळतं; श्रोते मिळतात आणि व्यक्त होणं सुरू होतं. हा एक नवीन, फार लिबरेटिंग अनुभव असतो... स्वातंत्र्याचा, मुक्ततेचा .

अमूर्त विचारांना मूर्त शब्दांत बांधणे सुरू होते आणि मग त्यांना जडत्व मिळायला लागते. त्या अभिव्यक्तीचे सहाजिकच पालकत्व आपल्याकडे येते. श्रोते/ वाचक यांच्या सहमती/ कौतुक यांनी आपले तिच्याशी नाते आजून घट्ट होते. व्यक्त होता होता आपल्या भूमिका, मतं तयार होतात, ती घट्ट होत जातात. 

आणि मग एक टप्प्यावर आपल्यावर यांचा अंमल सुरू होतो. घेतलेल्या भूमिकेला, मांडलेल्या मताला सातत्याने डिफेन्ड करणे ही जबाबदारी बनते. इतकंच नाही, एखाद्या किंवा काही विषयावर मतैक्य झालेल्यांच्या प्रत्येक मताशी सहमती दर्शवणे, पाठिंबा देणे हे camaraderie चे परिमाण बनायला लागते. 

आणि या सगळ्यात आपण आपल्याच भूमिकांच्या पिंजऱ्यात आपल्या मुक्त अभिव्यक्तीला स्वतःहून बंदिस्त करून टाकतो !


प्रेमाचे बदलते रंग ❤️

 #Modernlove_Amazonprime

प्रेम ही सगळ्यात जास्त चर्चिलेली भावना असावी; असंख्य कलाकृती या प्रेमावर बेतलेल्या असतात. ताजमहालासारखे शिल्प असेल, रोमिओ ज्युलियट सारखी कलाकृती असेल, अगणित कवने असतील... सगळ्यांच्या केंद्रस्थानी प्रेम ही संकल्पना आहे.

पण प्रेम म्हटलं की सहसा नायक-नायिका, जालीम दुनियावाले, प्रेमाची यशस्वी परिणिती म्हणजे लग्न, अशा ठराविक साच्याचे विचार मनात येतात. 

दोन व्यक्तींचे सूर जुळणे याला खरे तर बरेच पदर असतात, पण विरुद्ध जेंडरच्या व्यक्तींमधले हे नाते बऱ्याचदा प्रेमाच्या पारंपारिक चौकटीत बसवले जाते. स्नेहाचा परीघ ओलांडून आकर्षणाच्या प्रदेशात नाते जाते तेव्हा एकत्र येण्याची, एकत्र राहण्याची ओढ लागते. आणि एकत्र राहणे, या टप्प्यावर प्रेमाच्या पल्याड जाऊन अनुरूपतेचे, ऍडजस्टमेंटचे विषय येऊ लागतात. यात कधीकधी प्रेम नावाचे स्वप्न विरायला लागते...




त्याचवेळी 'व्यक्ती' केंद्रस्थानी असलेल्या आधुनिक जगण्यात   भावबंध नवनव्या रूपांत समोर येत आहेत आणि त्यातून प्रेम या संकल्पनेचा परीघ विस्तारतो आहे.

अशा अनवट अनुबंधाच्या लोभस कथा म्हणजे " मॉडर्न लव्ह" ही सिरीज. 

न्यूयॉर्क टाइम्स मध्ये याच नावाचे सदर प्रकाशित व्हायचे, त्याचा नंतर पॉडकास्टही आला. त्यावर ही आठ भागांची सिरीज आधारित आहे.

यांत वापरलेले संगीत आणि गाणीही फार सुंदर आहेत.

भेटीचे क्षण !

 आवडत्या व्यक्तीची भेट झाली की वेळ फास्ट फॉरवर्ड होऊन पळायला लागतो.

कधी व्यवधाने सांभाळत, कधी चोरून ठरलेली भेट आणि या चोरलेल्या तुटपुंज्या क्षणांत किती मोठी बेगमी करण्याची धडपड...त्यात कधी तिला निघण्याची घाई तर कधी त्याला. या प्रसंगावर खूप सुरेख गाणी आहेत; इतकी हृद्य सिच्युएशन गीतकरांना इंस्पायर न करती तरंच नवल! 

क्षणिक भेटीबद्दल कातर होता होता बऱ्याचदा क्षणभंगुर आयुष्यावर भाष्य करून जातात ही गाणी, आणि हाती असलेले मोजके क्षण भरभरून जगण्याची सादही घालतात... 

अनारकली चित्रपटातील गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या 'ये जिंदगी उसी की है' मधलं हे कडवं.. 

"धड़क रहा है दिल तो क्या, 

दिल की धड़कनें ना सुन 

फिर कहां ये फ़ुर्सतें,

 फिर कहाँ ये रात-दिन 

आ रही है ये सदा, 

मस्तियों में झूम जा..."


'आज जाने की जिद ना करो' या गजलमध्ये शायर फय्याद हाश्मी यांनीही हीच भावना मांडलीय...

"कितना मासूम रंगीन है ये समा 

हुस्न और इश्क़ की आज मैराज है 

कल की किसको खबर जान-ए-जाँ 

रोक लो आज की रात को"


गुलजार साहेब आँधी मधल्या सुप्रसिद्ध गाण्यातही हेच म्हणतात...

" तुम जो कह दो तो 

आजकी रात चांद डूबेगा नहीं, 

रात को रोक लो 

रात कि बात है, और ज़िंदगी बाकी तो नहीं"


ही भावनाच इतकी युनिव्हर्सल आहे की मराठीतही खेबुडकरांनी असंच काहीसं म्हटलंय, 

"चिरंजीव होई कथा मिलनाची

तृषा वाढते तृप्त या लोचनांची

युगांचे मिळावे रूप या क्षणांना

शब्दरूप आले मुक्या भावनांना"

तेच पुन्हा 'पिंजरा'तल्या लावणीत म्हणतात,

" अशीच ऱ्हावी रात साजणा कधी न व्हावी सकाळ..."


गंमत म्हणजे आंग्लभाषेतही बिली जोएलने

हा भाव त्याच्या एका गाण्यात शब्दबद्ध केलाय, 


"I'll tell you to forget yesterday

This night we are together


This night is mine

It's only you and I

Tomorrow is a long time away

This night can last forever..."