#Modernlove_Amazonprime
प्रेम ही सगळ्यात जास्त चर्चिलेली भावना असावी; असंख्य कलाकृती या प्रेमावर बेतलेल्या असतात. ताजमहालासारखे शिल्प असेल, रोमिओ ज्युलियट सारखी कलाकृती असेल, अगणित कवने असतील... सगळ्यांच्या केंद्रस्थानी प्रेम ही संकल्पना आहे.
पण प्रेम म्हटलं की सहसा नायक-नायिका, जालीम दुनियावाले, प्रेमाची यशस्वी परिणिती म्हणजे लग्न, अशा ठराविक साच्याचे विचार मनात येतात.
दोन व्यक्तींचे सूर जुळणे याला खरे तर बरेच पदर असतात, पण विरुद्ध जेंडरच्या व्यक्तींमधले हे नाते बऱ्याचदा प्रेमाच्या पारंपारिक चौकटीत बसवले जाते. स्नेहाचा परीघ ओलांडून आकर्षणाच्या प्रदेशात नाते जाते तेव्हा एकत्र येण्याची, एकत्र राहण्याची ओढ लागते. आणि एकत्र राहणे, या टप्प्यावर प्रेमाच्या पल्याड जाऊन अनुरूपतेचे, ऍडजस्टमेंटचे विषय येऊ लागतात. यात कधीकधी प्रेम नावाचे स्वप्न विरायला लागते...
त्याचवेळी 'व्यक्ती' केंद्रस्थानी असलेल्या आधुनिक जगण्यात भावबंध नवनव्या रूपांत समोर येत आहेत आणि त्यातून प्रेम या संकल्पनेचा परीघ विस्तारतो आहे.
अशा अनवट अनुबंधाच्या लोभस कथा म्हणजे " मॉडर्न लव्ह" ही सिरीज.
न्यूयॉर्क टाइम्स मध्ये याच नावाचे सदर प्रकाशित व्हायचे, त्याचा नंतर पॉडकास्टही आला. त्यावर ही आठ भागांची सिरीज आधारित आहे.
यांत वापरलेले संगीत आणि गाणीही फार सुंदर आहेत.

No comments:
Post a Comment