काही चित्रपट पाहताना मनोरंजक वाटतात, तो तेवढा वेळ छान जातो आणि मग आपण त्यांना विसरून जातो. काही मात्र नंतरही आठवणीत राहतात.
काही सिनेमे मात्र सुरुवातीला अगम्य भासतात; आपण त्यांच्याशी रिलेट करू शकत नाही असे वाटते. पण यांची वेळ आयुष्यात येतेच 😊, मग ते मनावर गारुड करतात आणि आपल्याला विचार करायलाही भाग पाडतात..
Matrix trilogy अशीच पाहण्यात आली; स्पेशल इफेक्ट्सने सजलेला एक साय-फाय चित्रपट इतकीच प्रतिमा डोक्यात असताना एकदा हे प्रकरण सलग बघण्याचा योग आला आणि एखादे कोडे सुटले नाही की जसे अस्वस्थ वाटत राहते तसे होत राहिले. मग या भुलभुलैय्याबद्दल बघत, वाचत समजून घ्यायचा प्रयत्न केला. हा शोधप्रवास भन्नाट होता.
ऍनिमेटेड किंवा साय फाय सिनेमात तात्विक धागा गुंफलेला असला की त्याला समजून घ्यायला मजा येते..या चित्रपटत्रयी मध्ये तर असे अनेक धागे गुंफलेले आहेत.
चित्रपटाचा विषय बराच क्लिष्ट आहे, पण मला जे जाणवलं ते मांडण्यापूर्वी या कथेची पार्श्वभूमी थोडी तरी परिचित असणं आवश्यक आहे, म्हणून ज्यांना हा चित्रपट माहीत नाही त्यांच्यासाठी या भागात थोडक्यात कथाविषय मांडते.
मॅट्रिक्सची कथा भविष्यकाळात (बाविसाव्या शतकात) घडते. थोडक्यात कथा अशी आहे:
निओ नावाच्या एका कम्प्युटर प्रोग्रामरच्या लक्षात येते की तो राहतोय ते जग आभासी आहे; मॅट्रिक्स नावाच्या एका विशाल कॉम्प्युटर प्रोग्रामचा भाग आहे जो रोबोटिक मशिन्सनी(AI) डिझाइन केलेला आहे. जगावर मशिन्सची सत्ता आहे आणि ते ऊर्जेचे स्रोत म्हणून मानवांचा वापर करत आहेत.
मॉर्फियस, ट्रिनिटीसारखी काही मोजकी मंडळी आहेत ज्यांना सत्य माहीत आहे आणि ते झिऑन नावाच्या एका गुप्त आश्रयस्थानातून मशिन्सविरुद्ध लढा देत आहेत व मॅट्रिक्स आणि मशीन जगत नष्ट करून मानवांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात ओरॅकल नावाची एक भविष्यवेत्ती आहे जिने "The one" ची भविष्यवाणी(prophecy) वर्तवली आहे, जो या लढ्यात माणसांना विजय मिळवून देईल. निओच तो the one आहे यावर झिऑनच्या रहिवाशांचा विश्वास आहे .
या मशिन्सविरुद्धच्या लढ्यात निओ सामील होतो आणि स्वतःकडे असलेल्या superpowers जाणवल्यावर त्याचाही या भविष्यवाणीवर विश्वास बसायला लागतो.
यात Agents नावाचे कॉम्प्युटर प्रोग्राम्सही आहेत, जे मॅट्रिक्सचे संरक्षक आहेत. ते या लढणाऱ्यांच्या विरोधात लढत असतात आणि मॅट्रिक्स सुरक्षित ठेवत असतात. यांचा प्रमुख एजंट स्मिथ असतो, ज्याला या कथेचा मुख्य खलनायक म्हणता येईल.
Matrix, Matrix Reloaded, आणि Matrix revolutions या तीन भागांमध्ये विस्तारलेल्या या चित्रपट कथेत नंतर निओला मॅट्रिक्सचा निर्माता (Architect) याच्याकडून समजते की झिऑनचे अस्तित्व आणि 'The One' ची prophecy सुद्धा मॅट्रिक्सच्या निर्मात्याचीच खेळी असते , जी विद्रोही मनुष्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी, सीमित विद्रोह करण्याची मुभा देण्यासाठी आणि मॅट्रिक्सला स्थिर ठेवण्यासाठी रचलेली असते. असे मॅट्रिक्स आणि झिऑन याआधीही निर्माण होऊन नष्ट झाले असतात आणि तात्कालिक The one च्या मदतीने परत झिऑनचे पुनर्निर्माण झालेले असते.
या वेळी निओ मात्र आधीच्या the one नी निवडलेला पर्याय न निवडता वेगळा मार्ग निवडतो आणि त्यामुळे पुढचा घटनाक्रम बदलतो.(आधीच्या the one पेक्षा वेगळा मार्ग निओ चोखळतो, त्याला कारण असतं त्याचं ट्रिनिटीवर असलेलं प्रेम, आणि आता काही प्रोग्राम्सदेखील मनुष्यांसारखे प्रेम आणि कर्तव्य या भावना आचरणात आणू लागल्या आहेत याचे त्याला झालेले ज्ञान. )
त्याचवेळी स्मिथ या अनियंत्रित झालेल्या एजंटमुळे मनुष्य, मशीन्स आणि मॅट्रिक्स या सगळ्यांनाच कायमचे नष्ट होण्याची शक्यता निर्माण होते. या धोक्याची जाणीव निओ मशिन्सना करून देतो आणि झिऑनमधल्या माणसांना जीवदान मिळण्याच्या बदल्यात तो स्मिथला नष्ट करण्याची तयारी दर्शवतो. सहजीवनाच्या त्याच्या या प्रस्तावाला मशीन्स मान्यता देतात आणि स्मिथविरुद्धच्या लढ्यात त्याला मदत करतात. पण हे करताना त्याला स्वतःच्या जीवाची आहुती द्यायला लागते.
शेवटी मॅट्रिक्सच्या निर्माता(Architect) ओरॅकलला सांगतो की आता शांतता प्रस्थापित झालेली आहे, आणि मॅट्रिक्समधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या मनुष्यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य असेल. आणि सती नावाच्या दोन प्रोग्राम्सच्या प्रेमातून निर्माण झालेल्या मुलीने साकारलेल्या सूर्योदयावर चित्रपट संपतो .
मॅट्रिक्स ट्रियोलॉजी मध्ये बऱ्याच संकल्पना, बरेच सिद्धांत आहेत.
Matrix is actually a matrix of lot of themes and subtexts😊.
पण मला जाणवलेली सगळ्यात प्रमुख संकल्पना म्हणजे
"There is no absolute victory."(निर्विवाद विजय असे काही नसते)
दोन प्रवृत्तींचा/समूहांचा/ संस्कृतींचा संघर्ष आणि जेत्याने पराभूतावर निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा किंवा त्याचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न, पण शेवटी ते अशक्य असल्याचे लक्षात आल्यामुळे दोन्ही बाजूंनी सहजीवनाची तयारी; आणि हे करत असताना काहीजणांना for the greater good करावा लागणारा त्याग, हा घटनाक्रम काळाच्या पटावर कितीतरी वेळा परत परत घडला असेल.
यातल्या भ्रमात जगणाऱ्या मानवांची तुलना गुलामीला चांगलं मानून समाधानी राहणाऱ्या सामान्यजनांशी करता येईल. ठराविक power holders निवडस्वातंत्र्य असल्याचा भास तयार करतात , आणि बहुतांश लोक त्यांना(शासकांना) अपेक्षित असलेली निवड करून निष्क्रियपणे स्वतःचे प्राक्तन स्वीकारून त्यात सार्थकता शोधत आयुष्य घालवतात.
मात्र काही जागरूक स्वतंत्र वृत्तीची माणसं बंडखोरी करतात. पण यंत्रणा इतकी धूर्त असते की त्यांनाही एका परिघातच बंड करू देते आणि कालांतराने ते बंड गिळंकृत करते . ही सायकल रिपीट होत राहते.
पण या चकव्यावर मात करणारा एखादा खरा 'the one' असणारा प्रवर्तक अवतरतो, जो सगळे पूर्वानुमान मोडीत काढत अगदी नवी वाट चोखळतो. इथे सिस्टम हतबुद्ध झाल्याचे भासते. पण संघर्षाच्या एका टप्प्यावर त्यालाही जाणीव होते की पक्षपाती, अन्यायकारक भासली तरी तीही थोडीफार त्याच्यासारख्याच घटकांनी बनलेली यंत्रणा आहे, जी नामशेष करणं शक्य नाही. पारडे ताकदीच्या प्रमाणात इकडे किंवा तिकडे सरकले तरी दोन्हीत समतोल साधणे हाच त्यातल्या त्यात कमी संहारक पर्याय आहे.
त्याचवेळी यंत्रणेच्या चालकांनाही जाणीव होतेच, की असा सगळा समूह टाचेखाली ठेवणे अशक्य आहे; शिवाय त्यात पूर्ण सिस्टमच्या विनाशाचा धोका आहे. त्यात कालौघात यंत्रणेतले काही भाग बंडखोरांबाबत सहानुभूती बाळगायला लागतात, त्यांचे काही गुण अंगीकारायला लागतात.
त्यामुळे शांतता कायम ठेवण्यासाठी, अराजक टाळण्यासाठी, यंत्रणा चिरेबंदी न ठेवता शिथिल करावी लागणे आवश्यक होऊन जाते. आणि मग दोन्हीकडून शांततापूर्ण सहजीवनासाठी सहमती होते .
ही थेअरी बऱ्याच ठिकाणी लागू होईल:
हुकूमशाही किंवा राजेशाही वि. लोकशाही,
विदेशी आक्रमण वि. स्वातंत्र्यलढा,
अगदी पुरुषतत्व वि. स्त्रीतत्व संघर्ष सुद्धा 😊, (यातले आर्किटेक्ट आणि ओरॅकल मला या दोन तत्वांचे रूपक वाटतात)
दुसरी थीम मानवाच्या मूलभूत design बद्दल आहे.
"Man needs freedom of choice."
आपले आयुष्य आपण घडवतो, कशा प्रकारचे आयुष्य जगायचे याची निवड करणे आपल्या हातात आहे, आणि आपल्या जगण्याला काहीतरी प्रयोजन आहे ज्याची पूर्तता करण्यात जीवनाचे सार्थक आहे, या समजुतींमुळेच माणूस कृतिशील, उद्यमी बनतो आणि मनुष्यजातीची प्रगती होते.
सगळ्या प्रकारचे अनुभव घेणे हे मानवी आयुष्याचे प्रयोजन आहे. म्हणून एकसुरी perfection सुद्धा त्याला मानवत नाही. Utopia शी तो तादात्म्य पावू शकत नाही.
(माणसात असलेली ही anamoly लक्षात न घेतल्यामुळे मॅट्रिक्सची आधीची versions अयशस्वी ठरतात.)
तिसरी संकल्पना उत्पत्ती स्थिती आणि लय याबद्दल आहे
"Everything that has a beginning has an end."
खूप प्रयत्न करून,आपल्या बुद्धीने, कष्टाने माणूस प्रगतीची अत्युच्च पातळी गाठतो, संस्कृती उत्कर्षबिंदूला पोहोचते, पण तिथून पुढे ती तशी कायम राहत नाही.
कारण नंतर सगळेच सहज उपलब्ध होते. त्यामुळे लोक आळशी, बेजबाबदार, बेदरकार आणि ध्येयहीन होतात. आणि काही काळाने तिचा ऱ्हास सुरू होतो.
थोडक्यात मनुष्यजातीची वाटचाल एकरेशीय पद्धतीने न होता ती पुनरावर्तनीय असते. प्रत्येक यंत्रणा उत्पत्ती स्थिती लय या चक्रातून जाते; प्रत्येक जन्मात अंताची बिजे लपलेली असतात, आणि प्रत्येक अंतात एका नवीन सुरुवातीची ...
-------------------------------------------------------
या ट्रायलॉजीच्या शेवटच्या भागात निओचे जे evolution आहे तेही खूप रोचक आहे.
तो आणि स्मिथ सामर्थ्याच्या दृष्टीने शेवटी शेवटी एकमेकांसारखेच होतात; पण दोघांत एक मूलभूत फरक आहे .
स्मिथने स्वतःचा विजय असलेला शेवट पाहिलेला आहे आणि तो त्यामुळे निर्धास्त आहे, पण त्याला निओचे प्रतिकार करणे कळत नाही. तो एक प्रोग्राम केलेली मशीन आहे; पराजय दिसत असतानाही श्रद्धेने लढत राहण्याची निवड करणारा माणूस, एखाद्या मूल्यावर विश्वास ठेवून त्या मूल्यासाठी, ध्येयासाठी स्वतःची आहुती देण्याची निवड स्वेच्छेने करणारा माणूस त्याला कळत नाही. निवड ही संकल्पनाच त्याला कळत नाही .
आणि म्हणूनच त्याला न समजलेल्या निवडीच्या पल्याडचा खरा शेवट स्मिथ पाहू शकत नाही.
दुसरीकडे निओची मात्र समज वाढली आहे, घटनांमागचा कार्यकारणभाव समजण्याइतकी जागृती त्याच्यात आली आहे.
निओने प्रेम अनुभवले आहे. माणसासारखेच मशीन्सही प्रेम करण्याइतक्या उत्क्रांत झाल्या आहेत हे कळल्यावर त्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. मशीन्स आणि मॅट्रिक्स नष्ट करण्याऐवजी सहजीवन आणि शांती हे त्याचे ध्येय झाले आहे.
यासाठी स्मिथला नष्ट करणे गरजेचे आहे हे त्याला कळले आहे. एका क्षणी हा हेतू साध्य करण्यासाठी स्वतःची आहुती देणे आवश्यक आहे हेही त्याला समजले आहे, आणि त्याने त्या उपायाची सजग निवड केली आहे.
तो उगमापर्यंत जाऊन आला आहे; जगातला कुठलाही एक घटक संपवण्यापेक्षा आहे त्या जगावर समग्र प्रेम करण्याची सम्यक दृष्टी त्याला लाभली आहे. हा त्याच्या वैयक्तिक उत्क्रांतीचा सर्वोच्चबिंदु आहे.
अजून एक गंमत म्हणजे इतक्या क्लिष्टतेनंतर, इतक्या तांत्रिक प्रगतीनंतर उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर येऊन मशीन्समध्ये त्यांच्या निर्मात्यांसारखी (माणसांसारखी) प्रेम ही भावना निर्माण झाली आहे. आणि it has made all the difference.
निओ ट्रिनीटीचे प्रेम; ओरॅकलच्या मनात मानवजातीविषयी प्रेम आणि सद्भावना निर्माण झाल्यामुळे तिने अप्रत्यक्षपणे निओला मार्गदर्शन करणे; राम आणि कमला या प्रोग्राम्सना एकमेकांविषयी वाटणारी प्रेमभावना आणि त्यातून त्यांनी केलेली सती या मुलीची निर्मिती, हे या कथेतील खरे game changers आहेत.
या सगळ्या अंतःप्रवाहांमुळे मॅट्रिक्स एक सरधोपट ऍक्शन मुव्ही न राहता त्यापलीकडे जाऊन गुंतवते आणि गुंगवते; आणि संघर्ष करणारे समूह बदलत जातील, पण अस्तित्व टिकवायचे असेल तर शेवटी प्रेम, समावेशकता, सहजीवन या कालातीत मूल्यांनाच शरण जावे लागेल, या निष्कर्षापर्यंत येऊन ठेपते.