Saturday, 30 November 2019

समाजमाध्यमांची शमा

समाजमाध्यमे आणि त्यांचे योगदान .

सध्या एखादी गोष्ट लोकप्रिय झाली, की काहीजण आपले वेगळेपण दाखवण्यासाठी लगेच विरोध दर्शवू लागतात. फेसबुक आणि व्हाट्सअप्प विद्यापीठे समाजात जनजागृती आणि सामंजस्य पसरवण्याचे अतिशय थोर कार्य करत असताना असा अस्थायी विरोध करणे खरे तर त्यांच्या ज्ञानद्रोहाचाच पुरावा, पण म्हणतात ना, 'जया अंगी मोठेपण...' असो.
तर आता आपण थोडक्यात फेसबुक आणि व्हाट्सअप्प चे प्रमुख फायदे पाहूया.
१. कुठल्याही रांगेत उभे असतानाचा वेळ खरे तर प्रचंड वैताग येण्याचा, पण फेबु, व्हाऍ मुळे हा प्रतिक्षाकाळ सुसह्य होतो, लोकांचा उद्रेक होत नाही, शांतता राखली जाते.
दुसरे म्हणजे फोन हातात घेतलेला असल्यामुळे आपल्या आणि आपल्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीत पुरेसे अंतर राखले जाऊन सांस्कृतिक गरिमा राखली जाते.
२. स्मार्टफोनमुळे सगळे सगळ्या बाबतींत स्मार्ट बनतात. आधी फक्त सालगड्याचा यंदा काय रेट हाय, किंवा बोनस मिळणार का, या विवंचनेत असणारे आता राफेल च्या किमतींबद्दल सांगू शकतात, किती टेर्रिस्ट उडवले याचीही अचूक माहिती देतात. पोरांना डब्यात काय देऊ, कामवाल्या बायका लै त्रास देतात आजकाल, अशा क्षुल्लक बाबींमध्ये अडकलेल्या भगिनी आता सगळ्या देशी विदेशी रेशीपींबद्दल बोलू शकतात, इतकंच काय कॅलरी ते तैमुर कशावर पण बोलू शकतात.(फक्त " आमच्या यांना काही कळत नाही", या शाश्वत सत्यात काही बदल झालेला नाहीय)
३. समाजमाध्यमांमध्ये लिहून 'शांती में क्रांती'  नावाची अहिंसक, सुलभ, हानीरहित चळवळ बसल्याजागी सुरू करून पूर्णत्वास नेता येते. अशा चळवल्या महात्म्यास कुठलीही तोशीस न लागता क्रांतिवीर झाल्याचे, तर ते वाचणाऱ्याला, टिप्पणी करणाऱ्याला, शेअर तसेच फॉरवर्ड करणाऱ्याला क्रांतीपालखीचे भोई झाले असल्याचे समाधान लाभते .
समाजात खरी क्रांती होण्याइतका उद्रेक साठत नाही हा समाजस्वास्थ्यासाठी वाढीव लाभ आहेच ..
४. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे या उच्च विचाराने प्रेरित होऊन फेबु व्हाऍ वर सर्व प्रकारच्या माहितीची आणि चित्रफितींची अविरत देवाणघेवाण होत असते. याचा दुसरा लाभ असा की जिओ सारख्या कुटीरुद्योगांना जीवदान मिळते.
५. लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य ही विद्यापीठे करतात.
'घर की मुर्गी' समस्येने ग्रस्त व्यक्तींना इथे कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतात. वाचवत नाही इतकं भंगार लिहिलंय, किती फिल्टर लावा कावळ्याचे कबुतर होत नसतंय, अशी क्रूर विधाने न करता वाचणारे पुष्पवृष्टी करतात, अंगठा, हृदय अर्पण करतात, इतकंच नाही तर खूप अभ्यासू लेख, अगदी माझ्या मनातलं, किती सुंदर, कुठल्या कॉलेजात जाता? अशी मधुर स्तुतीसुमनेही उधळतात आणि एकमेकांचा आत्मविश्वास वाढवत असतात.
६. फेबु व्हाऍ म्हणजे अनेकांच्या आयुष्यरूपी मरुस्थळातले आपुलकीचे मृगजळ, आय मीन मरुद्यान असते. प्रत्यक्ष आयुष्यात एखादीची छबी जास्त वेळ न्याहाळणे आणि त्यावर टिप्पणी करणे म्हणजे काय मेला फालतू लोचट माणूस आहे अशी पंचक्रोशीत दुष्कीर्ती करून घेणं;
इथे मात्र बिनधास्तपणे फूल, पत्री सॉरी सॉरी बदाम, हृदय बहाल करणारा हात,  असे काय काय अर्पण करता येते. बदल्यात अंगठा, बदाम मिळतो आणि अगदीच नशीब जोरात असेल तर ईश्श्य लबाड, असे लाडीक रिटर्न गिफ्टही मिळते. सगळीकडे द्वेषाचे वातावरण वरचढ होत असताना, साने गुरुजींचा जगाला प्रेम अर्पावे हा महान संदेश इथे सदैव दिला जात असतो.
७. नातेसंबंध आधीसारखे राहिले नाहीत, लोक स्वार्थी झाली, माणसं माणसांपेक्षा गॅजेट्स मध्ये रमली, गेले ते दिन गेले, ही कैफियत मांडण्यासाठी ही गॅजेट्सच उपयोगी येतात. फेबु व्हॅ ऍ वर वेळ घालवण्यापेक्षा स्त्रियांनी संसाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे, हा लाख मोलाचा संदेशही फेबु व्हा ऍ वर मिळतो, ही किती थोर गोष्ट आहे.

तसे अजून खूप मुद्दे आहेत, पण कसे आहे, माध्यम तारतम्याने वापरावे याबाबत मी फार दक्ष असते, उगीच फालतू वेळ घालवणे तत्वात बसतच नाही आपल्याला, फक्त आठवड्यात चार पाच डीपी आणि रोज दहा बारा फॉरवर्ड्स बास, याहून जास्त वेळ नसतोच, बिजी असते मी बरीच ...

 शेवटी काय हो, आपल्या वापरण्यावर असते सगळे; आता ते प.पू.आनंद बक्षी महाराज सांगून गेलेच आहेत..

"ये शमा तो जली रोशनी के लिए,
इस शमा से कहीं आग लग जाए तो,
 ये शमा क्या करे ?"

No comments:

Post a Comment