Saturday, 30 November 2019

वाचनालय नावाचे ओऍसिस

वाचनालय या अलिबाबाच्या गुहेशी माझी ओळख फार लहानपणी झाली. आजोबांचे एक मित्र ग्रंथपाल होते आणि त्यांना भेटायला जाताना ते मला सोबत घेऊन जायचे. त्यांच्या गप्पा होईपर्यंत मी तिथल्या बालविभागात हरवून जायचे.
साधारण आठवीत असताना 'वाचनालय' या अलीबाबाच्या गुहेची चावी मिळाली. शाळेच्या रस्त्यावर असलेल्या वाचनालयाची सदस्य झाले. तिथल्या ग्रंथपाल 'कोरा कागज'मधल्या जया भादुरीसारख्या दिसायच्या, तशीच वेणी आणि चष्मा. त्यांची सेन्सॉरशिप मात्र जबर असायची;  वि. स.  खांडेकर चालायचे, ना. सी. फडके नॉट अलाउड 😊. इंडिया टुडे, ज्युनियर सायन्स रिफ्रेशर सारखी मासिके मिळायची, गृहशोभिका, फिल्मफेअरला मज्जाव होता .
पण चांगली पुस्तकं सजेस्ट करायच्या, आवर्जून वाचायला द्यायच्या. फार भरभर पुस्तकं बदलायला गेले की अभ्यासपण करत जा अशी तंबी मिळायची.
अकरावी बारावीला मात्र PCB चा विळखा पडला,आणि मग त्याने थेट औरंगाबादला रवानगी केली, आणि गावातली लायब्ररी सुटलीच.
औरंगाबादला परत कॉलेजजवळ असलेले एक वाचनालय लावले, तेही आम्ही चार - पाच मैत्रिणींनी मिळून... शॉपिंगला मुली मिळून जातात तसं मिळून लायब्ररीत जायचो. व पु आणि गौरी देशपांडे जास्त वाचायचो तेव्हा, आणि खूप वादविवादही करायचो.
एकीकडे स्त्रीवादी लिखाण वाचत होतो, (त्यातले काही चांगलेच जहाल होते) आणि त्याचा विचारांवर परिणाम होत होता; त्याचवेळी दुसरीकडे पडद्यावरचे (आणि काही स्थानिकदेखील) शाहरुख, आमिर खुणावत होते ...😊
पण शेवटी हृदय आणि बुद्धी यात बुद्धीचा विजय झाला. आणि चेहरे पढण्याची यातायात वाचवून आम्ही सगळ्या सुखाने किताबें पढत राहिलो 😊.
मग लग्न झालं, आणि होस्टेलमध्ये राहून  पोस्टग्रॅज्युएशन आणि संसार एकत्रच सुरू झाला.
खरा संसार मात्र पीजी संपल्यानंतर सुरू झाला. पिठाची गिरणी कुठे, किराणा दुकान कुठे, या चौकशीत वाचनालय कुठे ही चौकशी सामील होती. घराजवळच एक छोटं वाचनालय सापडलं आणि माहेर मिळाल्यासारखं झालं... लगेच मेम्बर झाले. 
तिथे काही पुस्तकं टेबलावर ट्रेज मध्ये मांडून ठेवलेली असायची, त्यातून निवडणं अपेक्षित असायचं. बाजूच्या एका रूममध्ये  रॅक्समध्ये आणि काचेच्या कुलूपबंद कपाटांमधून पुस्तकं ठेवलेली होती.
मला सहज समोर असलेल्या पुस्तकांमधली आवडायची नाहीत, आणि कुलुपं उघडून त्यातून पुस्तकं काढून द्यायचा लायब्रेरियन काकांना कंटाळा यायचा . पण हळूहळू पाषाणाला पाझर फुटला आणि हवी ती पुस्तकं काका देऊ लागले. नंतर तर आमची चांगली गट्टी झाली आणि वाचनालयाच्या वार्षिक खरेदीच्या वेळी ते माझी यादीही घ्यायला लागले. खूप सारी अनुवादित पुस्तकं वाचली त्या काळात .
अजून एक गंमत होती, लायब्ररीत पुस्तक घेतानाची माझी वेगळी सही होती, अगदी पहिल्यापासून.. ती सही मी दुसरीकडे कुठेच करायचे नाही...

मग घर बदललं... दोनेक वर्ष खूप प्रयत्नपूर्वक लायब्ररीसोबतची लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप निभावली, पण नंतर कठीण व्हायला लागलं . महिना महिना पुस्तक बदलायला जाणेच व्हायचे नाही. तरी सदस्यत्व रद्द करवत नव्हतं. पण शेवटी लक्षात आलं, हे कन्टीन्यू करणं शक्य नाही.
शेवटी मेम्बरशिप बंद करायचं ठरवलं...नाही म्हटलं तरी शेवटच्या सह्या करताना डोळ्यासमोर सगळं धूसर धूसर झालं ...एखादी सख्खी मैत्रीण कायमची सोडून जातीय असं काहीतरी वाटायला लागलं .
आता इकडे फार आवडेल अशी दुसरी लायब्ररी नाही, वाचनही मोजकं झालं आहे..
आणि आता हळूहळू ती सहीही कायमची हरवून जाणार, असे वाटू लागले आहे..
  

No comments:

Post a Comment