Friday, 29 November 2019

ऋणानुबंधाच्या....

कोलाहल फार वाढला की तडक शेताकडे निघावं माणसानं! वाट तीही सुकर नाहीच, चिखल आहे काटेही आहेत, पण शेवटी शेतच ते, गार्डन थोडीच आहे!
एकदा पोहोचलं, की मग मात्र जीव गार होतो अगदी. ही माती सोडली तर बाकी सगळं मातीमोल वाटू लागतं...
तर शेतात गेले अन सोबत आणलेली आंब्याची आणि नारळाची रोपं ओळीत बांधावर लावली... आता असंच हळूहळू वावराच्या शेवटापर्यंत ओळीनं झाडं लावणार आहे. दुसरं कशाचं नाही, पण यापैकी एक झाडाच्या कुशीत आपल्या चिरविश्रांतीची तजवीज करण्याबद्दलचं विल करून ठेवणारंय. कमाल सुकून असणारंय इथं...
या रोपांचीही गंमत आहे. पुण्यातलं एक जोडपं  हापूस आमरस चापतं आणि त्यातली गृहिणी  कोया कुंडीत टाकून त्यांना जोपासते काय, तिची माझी फेसबुक मैत्री होते काय आणि ती मला ही रोपं देऊ करते काय..; आणि दुसरी ग्रीन फिंगर्ड मैत्रीण कोंब आलेले नारळ मागितल्याबरोबर माझ्यासाठी राखून ठेवते काय! याची फलश्रुती अशी, की पश्चिम पुण्यातली ही बाळं ऐंशी किलोमीटर दूर असलेल्या आमच्या शेतात आता रुजतील😊.
माणसांचे बंध तरी काय वेगळे असतात...
काल एका फेसबुकमित्राची पोस्ट होती, फेसबुक लिस्ट मधल्या सगळ्यांना फ्रेंड म्हणणं फारसं संयुक्तिक नाही, ओळख असली म्हणजे मित्र असतो असं नाही. मलाही पटलं, ओळख सुद्धा कधीकधी पूर्ण नसते असंही म्हणाले मी.
आज मात्र तिथं शांत बसताना जाणवलं, हे तर प्रत्यक्षातही घडतं. फक्त ओळख असते मैत्री नाही, फारशी ओळखही नसते मैत्री दूरच, कधी मैत्री होते पण पूर्ण ओळख पटलेलीच नसते. हे सगळे कॉम्बिनेशन्स दोन्ही जगांमध्ये असतात. 'कभी तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकाल आये जनमों के नाते', असं दोन्हीकडे होतं.
हे जगच एक मायाजाल म्हणतात, त्यातलीच ही मयसभा !
  शक्यतांचा सिद्धांत ग्राह्य धरला तर मयसभेतही चुकत धडपडत अधूनमधून तरी बरोबर पाऊल पडतच असणार😊...
एरवीही गावी आलं की सहसा शेताची फेरी चुकत नाही; पण यापुढे या खास जिवलग मैतरांना भेटण्याच्या ओढीनं फेऱ्या वाढतील ..!



No comments:

Post a Comment