Friday, 29 November 2019

बाला ... का रे भुललासी वरलिया रंगा



#No_compromise_on_looks_vs_क्यों_बदलना_है

जगताना कोरी पाटी घेऊन सुरुवात केलेली असते आपण; पण समाज नावाच्या जंगलात शिरतो, तेव्हा मोठं होतानाच्या प्रक्रियेत कितीतरी ओरखडे उमटतात..., त्यांचे मनात गंड तयार होतात आणि मग किती दिवस, महिने, वर्ष, कधी आयुष्यभर ते आपला पिच्छा पुरवतात. चारचौघांपेक्षा थोडं वेगळं दिसणाऱ्या माणसांसाठी तर to fit in, हा एक  महाकठीण संघर्ष असतो.
 या सगळ्यावर 'बाला' हसत भाष्य करतो.
स्वतःच्या लुक्समुळे अतिआत्मविशास निर्माण झालेला बालमुकुंद केस गळायला लागल्यावर सगळा आत्मविश्वास गमावून बसतो. तो परत मिळवण्याची, स्वतःला स्वीकारण्याची, दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं हे समजण्याची ही गोष्ट.
यातली कानपुरी हिंदी ऐकणं ही एक पर्वणी आहे... कदापि, पीडा, असे शब्द ऐकायला मजा येते. आणि नव्वदीतल्या सिनेमांचे टिकटॉक व्हर्जन्सही फर्मास झालेत.
टक्कलावर वेगवेगळे उपाय योजणाऱ्या बालावर हसताना आपल्यासमोरही अलगद एक आरसा येतो... प्रचलित सामाजिक समजुतींच्या प्रभावाखाली आपण कुणाच्या एखाद्या कमतरतेवर( कमतरता म्हणणं ही चूकच, वेगळेपण खरं तर) कधी हसलेले असतो; कधी कुणी आपल्यावर हसलेले असते.
बाजार सौन्दर्याचे निकष ठरवत असतो; आणि आपण त्यानुसार स्वतःला मोल्ड करण्याचा आटापिटा करत राहतो, पुरेसे मोल्ड झालो नाही तर न्यूनत्व येते, कधी इतर लोक न्यूनगंड देतात.
या सगळ्यात झालेल्या स्वतःच्या  ससेहोलपटीचीही आठवण झाली...  किती वेळ खर्ची पडला, किती वेळा हर्ट झालो, किती गोष्टींमधून निव्वळ संकोचापोटी माघार घेतली, सगळे आजकाल असेच राहतात म्हणून आपणही त्यांच्यासारखं राहण्याची धडपड करताना किती  फरफट झाली...काय काय आठवत राहिलं. त्याचवेळी आपल्यासाठी ज्या व्यक्ती महत्वाच्या आहेत, त्यांनी मात्र आपल्याला किती निःसंकोचपणे स्वीकारलंय हे जाणवून कृतज्ञ वॅट राहिलं. 
त्याचवेळी 'दिखना ही सब कुछ है' चीही एक बाजू समजते. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काही विशेष कौशल्य किंवा हुशारी नसेल, तर अशावेळी सेल्फ-इस्टिम राखण्यासाठी दिसण्याचे भांडवल करणे, ही   मानसिकता बनू शकते, हे जाणवतं.
 एक होतं मात्र; स्वतःला स्वीकारत बाला जेव्हा शेवटी 'क्यों बदलना है' म्हणतो, तेव्हा आपणही हा प्रश्न स्वतःला विचारतो आणि स्वतःविषयीचे अनावश्यक गंड बऱ्यापैकी सोडून देतो...!




No comments:

Post a Comment