Saturday, 30 November 2019

लग्नाला जातो...

#The_big_fat_Indian_Wedding

या सीजनमध्ये अटेंड केलेल्या लग्न समारंभांमध्ये काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या :
● लग्न-सोहळा पूर्ण होईपर्यंत आपल्याला वधू (क्वचित वधुमाता)आणि वर यांच्या पेहरावाचे बजट, त्याची थीम, तसेच आपण जेवणार असलेल्या/ जेवत असलेल्या ताटाचा दर, या  गोष्टींची अचूक माहिती हमखास मिळते.
● सगळ्या नवतरुणी लेटेस्ट ट्रेण्डनुसार सजलेल्या असतात आणि खूप क्युट आणि एकसारख्या दिसत असतात .
● सगळ्या चिरतरुण महिलांनी यथोचित आवरलेलं असतं, तरी मोबाईल कॅमेराचा सेल्फी मोड ऑन करून खातरजमा करणं सुरू असतं.
(गम्मत म्हणजे शक्यतो कुणी कुणाला छान म्हणत नाही; कुणी कॉम्प्लिमेंट दिली तरी तिच्याकडे संशयाने पाहिलं जातं.)
● नेहमीच्या पोशाखात असलेली थोडी कमी, तर ट्रेडिशनल वेअर घालावे लागलेली थोडी जास्त, अशा अवघडलेपणाच्या विविध स्थितींत असलेली पुरुष मंडळी इस्ततः विखुरलेली असतात.
त्यात लग्न ताजे असलेले काही बिचारे जोडीने सेल्फी घेण्याच्या किंवा बेटर हाफचे निरनिराळ्या पोझमधले फोटो काढण्याच्या ड्युटीवर तैनात असतात.
● दोन्हीकडच्या जवळच्या नातेवाईकांनी कपडे आणि ऍक्सेसरीजवर बराच खर्च केलेला असतो, आणि तो वसूल व्हावा या उद्देशाने त्यांनी स्टेजवर गर्दी केलेली असते; यामुळे सामान्य जनतेला स्टेजवरचे विधी, समारंभ अजिबात दिसत नाहीत.
● हे सगळं किरकोळ आहे, असे वाटायला लावणारा लाखो रुपये खर्चून बनवलेला प्री-वेडिंग व्हिडीओ साईड स्क्रीनवर सुरू असतो, दुर्दैवाने काही लग्नाळू मेम्बर सोडले तर त्याकडेही फारसे कुणाचे लक्ष नसते.
● जेवणाचे खूप सारे काउंटर्स असतात आणि खूप मोठी रांगही; आणि कितीही डोळ्यात तेल घालून पदार्थ घेतले तरी  शेजारच्या प्लेटमध्ये वेगळे काहीतरी दिसते आणि उगीच चुटपुट लागून राहते.
● आहेर नको असे पत्रिकेत लिहिलेले असले तरी बऱ्याच जणांनी पुष्पगुच्छ आणलेले असतात, त्यांचा एक छोटासा केविलवाणा ढिगारा स्टेजच्या एका कोपऱ्यात तयार झालेला असतो.(त्यात निशिगंध असेल, आणि संध्याकाळचे लग्न असेल तर मात्र मस्त सुगंधी वातावरण तयार होते)

एकूणात 'conspicuous consumption', ही संकल्पना वेगळ्या अर्थाने, पण सोदाहरण स्पष्ट होते 😊.







No comments:

Post a Comment