Thursday, 7 November 2019

दिवाळसण

गावाकडची दिवाळी म्हटलं की थंडी, धुराचा वास, मिणमिणत्या प्रकाशात लावलेलं तेल उटणं, आणि तळणाचा वास आठवतो.
आता आमच्या घरातली दिवाळी बरीच सुटसुटीत आणि आटोपशीर झालीय, पण अगदी दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही गावी जायचो दिवाळीसाठी.

गावी दिवाळी एकादशीपासून सुरू व्हायची.
कुंभारीण पणत्या घेऊन यायची आणि त्या पुजून घरात घेतल्या जायच्या. पणत्या साध्या पण मोठ्या आकाराच्या असायच्या; रात्री पेटवून पुढच्या मागच्या दारांवरच्या कोनाड्यात ठेवल्या, की पहाटेपर्यंत तेवायच्या.
त्या दिवशीपासून पुढच्या मागच्या अंगणात सडा आणि रांगोळी सुरू व्हायची, ती भाऊबीजेपर्यंत; हौशी लेकी-सुना असणाऱ्या घरात संध्याकाळी परत सडा टाकून वेगळी रांगोळी काढली जायची. आकाशकंदील सहसा चांदणीचाच असायचा, तो पुढच्या ओट्यावर लावला जायचा.
एकादशीला फराळ बनवायला सुरुवात व्हायची. फक्त बुंदी पाडून द्यायला आचारी यायचा; लाडू वळणं, आणि इतर पदार्थ घरीच केले जायचे. लग्नकार्यात वापरतात तशा मोठ्या कढया, पातेली आणि डाव असायचे. सगळा हिशोब शेरांत असायचा.
 लाडू, चिवडा, शेव, करंज्या आणि शंकरपाळे हे मुख्य पदार्थ. चकल्या, अनारसे हे पदार्थ मात्र काहीजणीच करायच्या.
वसू बारशीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि खीर करून गाई वासराला नैवेद्य दाखवला जायचा. घरी गाय नसेल तर शेजारच्या गाईवासराची पूजा व्हायची.
धन त्रयोदशीची पूजा संध्याकाळी असायची.
ती दिवाणखान्यात न करता शक्यतो आतल्या तिजोरीच्या खोलीत केली जायची. पूजेत पैसे, दागिने ठेवलेले असायचे. पूजा करताना  दागिन्यांना आणि दागिन्यांच्या डब्यांना अत्तर लावले जायचे; बरेच दिवस मग दागिने सुगंधी होऊन जायचे! धने-गुळाचा नैवेद्य असायचा.
मग नरकचतुर्दशी उजाडायची. भल्या पहाटे  बंब, चुली पेटायच्या; आणि ज्येष्ठ मंडळी बाकीच्यांना उठवायला सुरुवात करायची. अंगणात किंवा फार थंडी असेल तर माजघरात पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढली जायची आणि साखरझोपेतले एक एक सदस्य उठवून आणले जायचे. बऱ्याचदा लाईट नसायची, मग चिमणी किंवा कंदिलाच्या उजेडात तेलात उटणं कालवून ते अंगाला लावण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग पहाटेच्या थंडीत कढत पाण्याने अभ्यंगस्नान झाले की न्हाणीघरातून बाहेर येताना कणकेचे दिवे मुटके ओवाळून उतरवून टाकले जायचे. हे चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे चार दिवस चालायचे.
 आंघोळीनंतर फराळ व्हायचा. फटाके कुणी फोडायचं नाही .
मग लक्ष्मीपूजन हा मुख्य सण. सकाळी उटणं अंघोळ कार्यक्रम असायचा. मग दुपारी एखादा ताजा फराळाचा पदार्थ नैवेद्यासाठी केला जायचा. संध्याकाळी लक्ष्मीपूजन. ही पूजा गादीवर मांडतात. कदाचित आधी दुकानातली गादी असेल; आता  दुकानं नाहीत सगळ्यांची पण गादीवर पूजा कायम आहे.
पूजा उरकत यायची तेव्हा गोंधळी यायचे आणि संबळ आणि टाळ वाजवून देवीची आरती म्हणायचे. मग पुरुष मंडळींना कुंकू लावून दक्षिणा घेऊन जायचे. पूजेनंतर मुलं लाह्या बत्तासे वाटायला घरोघरी जायची. फटाके फार कमी वाजवले जायचे.
पाडव्यादिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आणि फराळाच्या ताटांची देवाण घेवाण असायची. गडी माणसांना थोडा जास्त फराळ बांधून दिला जायचा. फराळ मागायला बरीच लोकं मागच्या दारी यायची. त्यांना पसाभर चिवडा आणि दोन लाडू वाढले जायचे; क्वचित शेव.
दिवसभर  कुणी कुणी भेटायला, दिवाळीचं पाया पडायला यायचं.  लहान मुलं नवीन कपडे घालून फराळाची ताटं घेऊन यायची.
दुपारनंतर पाडवा संपता संपता दिवाळीचा उत्साहही मावळायला लागायचा.
 पण सासुरवाशीणींच्या चेहऱ्यावर मात्र चोरपावलांनी हसू उमलायला लागायचं. डोळे चमकायला लागायचे, आवाज थोडा चढायचा, पिशव्या सावरणं सुरू व्हायचं.
भाऊबीजेला भाऊ यायचे ना सगळ्यांचे...  भाऊबीजेच्या दिवशी पाहुण्याची ओवाळणी, जेवण व्हायचं, फराळाचे डबे दिले घेतले जायचे. मग भाऊराया पोक्त आवाजात घरच्या कर्त्या पुरुषाची परवानगी मागायचा... ताईला अन पोरांना नेतो चार दिवस, चालंल ना ओ ?
चालंल की, पण लवकर परत आणून सोडा काय, म्हणत परवानगी मिळायची.
विजेच्या वेगाने बॅगा बाहेर पडवीत यायच्या. तिची एक नजर तरी वळेल आपल्याकडे म्हणून लक्ष ठेवून असलेले धनी बऱ्याचदा हिरमुसले व्हायचे... आता 'ति'चे चित्त माहेरी लागलेले असायचे, दुसरं काही दिसणं सुचणं बंद झालेलं असायचं...
मग गाडीत बसता बसता डोक्यावरचा पदर हळूच खांद्यावर नि:श्वास घ्यायचा, पोरं मामाशी गप्पा टाकण्यात गुंग व्हायची, आणि तिचे थकलेले खांदे सैलावायचे, डोळे मिटायला लागायचे, आणि मन अलगद माहेरच्या कुशीत पोहोचलेले असायचे ...
इकडं एकादशीपासून लगबग सुरू असलेलं घर मात्र एकदम शांत शांत होऊन जायचं. डौलात लहरत असलेली आकाशदिव्याची चांदणीही मलूल, निपचित होऊन जायची...


No comments:

Post a Comment