अंत म्हणजे काय असतो नेमका?
माणूस संपतो म्हणजे त्याच्याशी संवाद कायमचा संपतो, भविष्यातल्या सगळ्या शक्यतांसकट. ती वाट कायमची बंद होते.
जगत असताना आपण आपल्या भोवतालच्या लोकांसोबत संपर्काच्या वाटा आणि त्यांच्या टोकाला एक विसावा तयार करत असतो. एक माणूस संपला की एक वाट बंद होते, एक जग संपते कायमचे; त्या व्यक्तीची सोबत गृहीत धरून भविष्यकाळात रंगवलेले जगही कायमचे नाहीसे होते. आपण वसवलेल्या वस्त्या असं एक एक करत ओसाड होत गेल्या की मृत आठवणींशीवाय काय राहतं मागे?
आणि परत काही रस्ते तर मधेच गोठून जातात, अभेद्य भिंती उभ्या राहतात तिथे... माणसं जिवंत असतात पण नाते संपलेले असते कायमचे, त्यांच्यासोबतचे ते जग संपलेले असते. ही अशी कलेवरे मनाचं स्मशान करतात.
आयुष्यभर केलेली ही गुंतवणूक अशी संपून जाते, सगळं तोट्यात जायला लागतं.... तेव्हा हे दुःख, हे नुकसान, फसवणूक झाल्याची भावना, हातात घट्ट पकडून ठेवलेलं असं निसटून जातं तेव्हा वाटणारी हतबलता, हे सगळे सोसणे असह्य जीवघेणे होते....
आपण पौर्वात्यांनी यातून पळवाट म्हणून, मनाला आधार म्हणून मग सगळ्या गोष्टींत तत्व शोधली असावीत. सगळ्या आधिभौतिक जगाला तात्विक अधिष्ठान द्यायला सुरुवात केली, अलौकिकतेचे इमले बांधायला घेतले ...
जे जड अस्तित्व आहे त्याच्या पलीकडे काहीतरी असेल, ज्या निव्वळ शारीरिक गरजा आहेत त्याला काही भावनिक कारणे असतील, जो जन्म आहे त्याला प्रयोजन असेल, जो मृत्यू आहे त्याच्यापल्याड काही असेल, असं म्हणत सगळ्याला कार्यकारणभाव लावायला लागलो. जे आहे त्याहून जास्त काहीतरी आहे अशी कल्पना करु लागलो...जे संपलं आहे ते कुठल्यातरी रुपात अजून शिल्लक आहे, अशी श्रद्धा विकसित करायला लागलो..
जे आहे ते नश्वर आहे याचा स्वीकार करणं कठीण, मग पुनर्जन्मात परत भेटण्याची आशा आली, आत्मा अमर असल्याचा दिलासा आला, नियती आली, अकाली संपलेल्या नात्यांच्या कलेवरांमध्ये जन्मजन्मांतरीच्या पवित्र बंधनांचे छद्मप्राण आले, वास्तवातले जग माया, आणि कल्पनेतले जग सत्य व्हायला लागले; अलौकिक असे एक कल्पनेतले जग निर्माण केले आणि प्रसंगी त्याला खऱ्या जगापेक्षा जास्त महत्वाचे मानले.
शतकानुशतके पिढ्या दर पिढ्या हे असे वळसे घेत घेत परलौकिक विश्वाचे स्तोत्म वाढत गेले आणि तिकडे नेणारे वाटाडे महत्वाचे झाले. वास्तवाला टाळण्याची सवय लागली, कटू सत्याचे हलाहल पचवण्याची ताकद गेली, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची कुवत गेली.
कदाचित यामुळेच अप्प दीपो भव च्या कठीण मार्गापेक्षा बऱ्याचदा जगत मिथ्या ही पळवाट वापरली जाते .
पाश्चात्य जगाने मात्र मध्ययुगानंतर परलोकाकडे लागलेले डोळे परत इहलोककडे वळवले. समाजात बरीच उलथापालथ झाली, आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनातही ...
त्यांनी हे आयुष्याचे सांत असणे खंबीरपणे, डोळसपणे स्वीकारले, जगताना सुखासोबत येणाऱ्या दुःखाचीही जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली, शारीर जगण्याला भौतिक अधिष्ठान दिले; त्यांना पळवाटांची गरज उरली नाही...ताब्यात नसलेल्या गोष्टींना काबूत आणायचा प्रयत्न करत ते जीवनाचे साफल्य ऐहिक गोष्टीत मिळवत राहिले.
No comments:
Post a Comment