Saturday, 30 November 2019

गॉन विथ द विंड



स्कार्लेट आणि ऱ्हेट..
अशा ज्वालाग्राही माणसांचं प्राक्तन अटळ असावं.. मिळमिळीत चाकोरीत रमणे यांना शक्य नसते आणि वादळी आयुष्य जगताना गर्तेत जाणं अटळ.
स्कार्लेट.. स्वतःच्या सौन्दर्याची पुरेपूर जाणीव असणारी, हट्टी, चौकटी न मानणारी बंडखोर अशी मुलगी.
स्कारलेट उत्कट प्रेम या संकल्पनेच्याच प्रेमात पडते आणि एक काल्पनिक प्रतिमा बनवून त्यात ऍशलेला बळेच एकतर्फी बसवते; त्याच्यात जे नाही तेही त्याच्यात बघते. तिचा आत्मविश्वास म्हणा, की अडमुठेपणा म्हणा, वास्तवात ऍशलेचे आपल्यावर प्रेम नाही हे न स्वीकारता ती तो आपल्याला कधी ना कधी मिळवू हा दुर्दम्य आशावाद बाळगत राहते, इतकेच नाही तर ते तिचे ऑब्सेशन बनते. तिला आपल्या दुराग्रहाचा पुनर्विचारही करावासा वाटत नाही.
मनोव्यापार फार गमतीचा असतो. एकदा खेळ मांडला, अगदी स्वतःच्या मनात जरी ; की जीव त्यात गुंतत जातो. वास्तवाचे भान सुटत जाते आणि खेळ मोडला आहे,संपला आहे, खेळातली आपली भूमिका संपली आहे, किंवा आपली भूमिकाच नाहीय याचा  स्वीकार मन करत नाही.
या मृगजळाच्या मागे धावण्याच्या नादात तिला जे खरोखर हवंय, अनुरूप आहे, ते प्रेम तिला दिसतच नाही. खऱ्या जिवलगाची ओळख पटते तोवर उशीर झालेला असतो.

आणि ऱ्हेट.. तो सद्गृहस्थ नाही, हळवा रोमँटिक नायक तर मुळीच नाही; एक धूर्त, स्वार्थी आणि खूप व्यवहारी इसम. पण तो पाखंडी किंवा ढोंगी नाही. खरंच सद्गुणी असणारी ऍशलेची पत्नी मेलिसा, तिच्याबद्दल त्याला ममत्व आणि आदर आहे.
स्कार्लेटचे बेदरकार वागणे, हवे ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणे, सामाजिक संकेतांबद्दल बेफिकीर असणे, या सगळ्यांशी तो relate करू शकतो. तिचा भ्रमही त्याला दिसतो, समजतो. स्कार्लेट आणि तो खूप सारखे आणि एकमेकांना अनुरूप आहेत हे त्याला समजलेले असते. तिला वास्तवाची जाणीव होईपर्यंत वाट पाहण्याचीही त्याची तयारी असते. पण एका दुर्घटनेनंतर त्याचा पेशन्स संपतो, आणि तो निघून जातो.

Inspite of everything, स्कार्लेट स्वतःच्या धारणांशी इतकी प्रामाणिक असते, आणि त्याची प्रचंड किंमत पदोपदी मोजते की  तिचा चाकोरीबाह्य असण्याची आपल्यालाही भुरळ पडते ... ती शेवटी tomorrow is another day म्हणते तेव्हा आपल्या मनात शुभेच्छा उमटतात आणि खात्री वाटायला लागते की ती यातूनही मार्ग काढेल आणि ऱ्हेटला परत आणेल... 

No comments:

Post a Comment