Saturday, 30 November 2019

व्यासांचे शिल्प

#मला_भावलेलेलं_पुस्तक

माझ्यासाठी महाभारत हा लहानपणापासून कुतूहलाचा विषय...त्याचा विशाल पट आणि मानवी मनोव्यापराचे असंख्य प्रकार मनाला सदैव भुरळ घालत आलेले ...
महाभारतावरची वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचणे आणि वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेणे अजूनही सुरू आहे. त्यात विशेष प्रभाव टाकणारी पुस्तके म्हणजे पर्व,युगांत, व्यासांचा वारसा; पण सगळ्यात आवडलेले या विषयावरचे पुस्तक म्हणजे नरहर कुरुंदकर यांचे 'व्यासांचे_शिल्प'.
त्यांनी वेळोवेळी महाभारतविषयक केलेल्या लिखाणाचा संग्रह म्हणजे हे पुस्तक .
हे पुस्तक वाचताना त्यांचा व्यासंग, त्यांच्या विचारांतील स्पष्टता आणि सुयोग्य दिशा पदोपदी जाणवते, तसेच अतिशय चपखल समिक्षा करण्याची त्यांची हतोटी ही लक्षात येते .
महाभारताचा विचार एका वेगळ्या चिकित्सक दृष्टीने आपण करू लागतो.

महाभारताच्या किंवा एकूण धार्मिक वाङ्मयाचा कसा विचार करावा याबद्दल ते लिहितात,
"भारतीय युद्धासाठी अठरा अक्षौहिणी सैन्य जमले होते, रामचंद्र विमानातून लंकेवरून अयोध्येला गेले, इ. माहितीचे स्वरूप थोडेसे काव्य, थोडी श्रद्धा, खूपशी अतिशयोक्ती, थोडेसे ऐतिहासिक सत्य, असे असते. सगळे धर्मवाङ्मय समजून घेताना आपण हे तारतम्य बाळगले पाहिजे".

पुस्तकातील महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीबद्दल माहिती आणि ती तयार करण्यामागचे कष्ट वाचून आपण स्तिमित होतो.

कुरूंदकरांचे ययाती बद्दलचे विवेचन आपल्या पारंपारिक समजुतींना धक्का देते.

 तसेच भीष्माबद्दल लिहिताना मांडलेली 'पापाच्या बाजूने उभे असलेले पुण्य आणि पुण्याच्या बाजूने उभे असलेले पाप,'  ही संकल्पना ही विचारप्रवर्तक आहे.
"जगाच्या व्यवहारात आपण सज्जन असणे पुरेसे होत नाही; सज्जनाची बाजू घेऊन दुर्जनाविरुद्ध लढावेही लागते. हे ज्याला जमत नाही, त्याच्या सज्जनपणाचे मोल काय," असा परखड प्रश्नही ते उपस्थित करतात.याच अनुषंगाने ते आजही सार्वजनिक जीवनात बऱ्याचदा दिसणाऱ्या 'चांगल्या बाजूला वाईट माणसं आणि वाईट बाजूला चांगली माणसं,' या भेडसावणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष वेधतात.

मला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे त्यांनी केलेले श्रीकृष्णाचे वर्णन ... देवत्वाची सगळी पुटे बाजूला सारल्यानंतर ही एक अफाट कर्तृत्व असणारा लोकनेता, निष्णात योद्धा, मुत्सद्दी राजकारणी, असामान्य बुद्धिमत्ता असणारा किंगमेकर, एक आदर्श युगपुरुष म्हणून कृष्ण आपल्यासमोर येतो.
अतिशय मोठा लढवय्या असूनही तो हत्यार सोडून प्रसंगी रथाचे घोडे हाकणारा सारथी आहे, शस्त्रधारी असून शस्त्रत्याग करणारा ही आहे ; स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर साम्राज्ये उलथी-पालथी करणारा असूनही तो कोणत्याच साम्राज्याचा मोह न धरणारा आहे. तो जसा भोगविलासाचा प्रतिनिधी आहे, तसा सर्व अनासक्ती, वैराग्य आणि संयम यांचाही प्रतिनिधी आहे...
सामान्य गोपालकांच्या समूहाचे एका बलाढ्य साम्राज्यात रूपांतर करणाऱ्या असामान्य ताकदीच्या कृष्णाने साम्राज्य बिनधोक केले. पण राज्य बिनधोक झाले, संपत्ती आणि भोगाची साधने खूप झाली आणि कुणाचीच भीती राहिली नाही, की लोक बेजबाबदार होतात, आणि आपापसांतच मारामाऱ्या सुरू होतात; हा अटळ ऱ्हास तो श्रीकृष्ण ही टाळू शकला नाही, हे ही सांगायला कुरुंदकर विसरत नाहीत...
तसेच सत्यभामा, रुक्मिणी आणि राधा या व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून श्रीकृष्णचारित्राने प्रेम या कल्पनेची जी विविध रूपे मांडली आहेत, ती त्यांनी अतिशय सुंदरपणे उलगडून दाखवली आहेत.
त्यांचे इरावती कर्वे आणि प्रो. दामोदर कोसंबी यांच्यावर लिहिलेले लेख ही खूप माहितीपूर्ण आहेत.
पुस्तकात महाभारतावरचा वस्तुनिष्ठ, अभ्यासपूर्वक विचार तर आपल्याला दिसतोच, पण एकूणच धार्मिक वाङ्मयाचे वाचन करताना विचारांची बैठक कशी असावी याचे ही मार्गदर्शन नकळत आपल्याला मिळत राहते..

श्रीकृष्ण म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा कोलाज वाटतो...
हसरा, खोडकर, लडिवाळ बालक; वेडावणारा, भूल पाडणारा, लोभस नवतरुण; दुष्ट कंसाचा नायनाट करणारा  धाडसी युवक; पांडवांना मदत करणारा, सल्ला देणारा सुजाण मार्गदर्शक; वाटाघाटी करणारा धोरणी मुत्सद्दी; गीतेसारखं अजरामर ज्ञान देणारा तत्त्ववेत्ता...
असंख्य रूपे असणारा असा हा पूर्णपुरुष कृष्ण...
पण त्याचं सगळ्यात भावणारं रूप म्हणजे मित्राचं...
स्वतःच्या मोठेपणाचे ओझे नं होऊ देता तो मित्रत्वाचे, बरोबरीचे नातं निर्माण करतो. त्याच्यासमोर दडपण न येता सगळं मनातलं सांगता येतं, त्याच्यावर चिडता येतं, चिडवून घेता येतं ...
प्रत्येकाला हा फक्त आपलाच जिवलग आहे असा विश्वास देणारा जिवाभावाचा मित्र.
 ...राधेचा, गोपिकांचा, सुदाम्याचा, पांडवांचा, आणि कृष्णेचाही  ... #सखा ...

1 comment:

  1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद! हे पुस्तक विकत घ्यायचे होते... तुमच्या लेखाने शिक्कामोर्तब झाले

    ReplyDelete