Saturday, 30 November 2019

नव-कलेवर


साधारण एका वर्षांपूर्वी नवकलेवर या संकल्पनेची ओळख झाली... इरावती कर्वेनी हे रूपक वापरून जो विचार मांडला तो ही खूप प्रभावित करून गेला. दोन तीन दिवसांपूर्वी परत एका कवितेच्या निमित्ताने नवकलेवर आठवले....
हिंदूंच्या चार धामांपैकी एक असलेले पुरीचे जगन्नाथ मंदिर. अनेक आख्यायिका आणि कथांची पार्श्वभूमी असणारे. इथली रथयात्रा प्रसिद्ध आहे.
अजून एका अलौकिक गोष्टीसाठी हे मंदिर ओळखले जाते, ती म्हणजे दर 12 किंवा 19 वर्षांनी होणारा नवकलेवर विधी.
हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्या वर्षी जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या नवीन काष्ठमूर्ती तयार करून त्यांची शास्त्रोक्त विधीवत प्रतिष्ठापना करणे म्हणजेच ‘नव-कलेवर’.
जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात.
या प्रथेचा नेमका उगम ज्ञात नाही, पण  अशी प्रथा पडण्यामागे काही व्यवहारिक आणि काही तात्कालिक कारणं असावीत.
मूर्ती लाकडी आहेत, विशिष्ट काळानंतर खराब होतात, म्हणून त्या बदलणे गरजेचे .
दुसरे म्हणजे मध्ययुगात परकीय आक्रमण काळात मूर्ती लपवल्या गेल्या, प्रसंगी मातीखाली पुरल्या गेल्या, आणि आक्रमण ओसरल्यावर जेव्हा बाहेर काढला गेल्या तेव्हा  बऱ्याच खराब झाल्या होत्या. मग त्या बदलल्या गेल्या. असे काही वेळा झाल्यावर  तो एक नियमित उपक्रमच बनला असावा.
हिंदू धर्मातल्या प्राणप्रतिष्ठा आणि अमर आत्मा या दोन संकल्पना इथे फार महत्वाच्या आहेत. त्यानुसार या सोहळ्यात आधी नवीन मूर्ती घडवल्या जातात; आणि जुन्या मूर्तींतले प्राण किंवा ब्रह्मतत्व काढून नवीन मूर्तींमध्ये टाकण्याचा विधी होतो. ही प्राणप्रतिष्ठा झाली की नवीन मूर्ती पूजण्यायोग्य होतात, आणि जुन्या मूर्ती मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या कोइली वैकुंठ येथे पुरल्या जातात.
पुरीच्या मंदिरात जगन्नाथाची दिनचर्या मनुष्यासारखी आहे. देव दात घासतो, अंघोळ करतो, वेगवेगळे वस्त्र परिधान करतो, जेवण करतो, आणि कधी कधी चक्क आजारीही पडतो. मनुष्यासारखाच त्याचा मृत्यूसुद्धा होतो.
पण आत्मा अमर, अक्षय असतो. जुन्या जीर्ण शरीराचा त्याग करून तो एक नवीन शरीर धारण करतो. 
पुरीतला हा जगन्नाथ जन्म-मरणाचे देवालाही न चुकलेले अटळ वर्तुळ आणि आत्म्याचे अमरत्व सोदाहरण दाखवत युगानुयुगे उभा आहे.
हा सगळा सोहळा फार विस्तृत आहे आणि खूप काटेकोरपणे तपशीलवार पार पाडला जातो. आजच्या विज्ञायुगात हे सगळे अंधश्रद्धा म्हणून झटकून देऊ शकतो , पण त्याचवेळी इतका मोठा धार्मिक कार्यक्रम आणि त्यात गुंतलेल्या असंख्य लोकांच्या अढळ श्रद्धा पाहिल्या की स्तिमित व्हायला होतं.
नवकलेवर विधी असो, कुंभ मेळा असो, आपली वारी असो, की वेगवेगळ्या तीर्थयात्रा असो, असे सामूहिक कार्यक्रम माणसांना श्रद्धेच्या धाग्याने जोडतात आणि त्या एका देव नावाच्या तत्वाशीच नव्हे, तर त्याचे भक्त म्हणून इतर माणसांशीही तादात्म्य पावायला, स्वतःला त्यांच्याशी जोडून घ्यायला मदत करतात.
माणसाचे सामाजिक प्राणी म्हणून असणारी ओळख आणि भान या अशा प्रथांमुळे  सुदृढ होत असावे .
कुठल्याही कारणाने मनुष्यसमूह एकत्र आला की अनेक विधी आणि प्रोटोकॉल निर्माण होतात.
देश, संस्था, पक्ष ही कारणं असली की त्यांना देशभक्ती, आचारसंहिता, पक्षशिस्त अशी नावं मिळतात आणि ती मनाला आणि बुद्धीलाही सहज मान्य होतात.
पण धार्मिक कारणाने होणाऱ्या विधींना मात्र अर्थहीन कर्मकांड मानले जाते आणि आपली पहिली प्रतिक्रिया अविश्वासाची असते.
बुद्धीच्या मर्यादेपल्याड असणारे असे श्रद्धेचे, भावपूर्ण सोहळे पाहिले की मात्र मन  संभ्रमित होतं; इंद्रियगम्य ज्ञानापलीकडे असलेल्या गोष्टींवर भावनिक होऊन डोळे झाकून विश्वास ठेवणं बुद्धीला जड जातं, आणि नुसत्या बुद्धीची कास पकडून राहायचं तर भावनारहित जगण्याचा कोरडेपणा जाणवतो....




No comments:

Post a Comment