वाचायला सुरुवात केली तेव्हा लायब्ररीतल्या ग्रंथपाल मॅडम पुस्तकं सुचवायच्या.
एकदा त्यांनी अनुवादित पुस्तकांचा विभाग दाखवला आणि मग बरेच महिने मी मूळ मराठी पुस्तकं वाचलीच नाहीत, अनुवादित विभागातच रमले .
परवा एकजण फिरत्या वाचनालयासाठी विचारायला आले तेव्हा आधी त्यांना अनुवादित साहित्य ठेवता का याचीच विचारणा केली.
उमा कुलकर्णी नसत्या तर भैरप्पा, अनंतमूर्ती, यांचे शब्दवैभव मला अनोळखीच राहिले असते.
रविंद्र गुर्जर नसते तर मारिओ पुझो, रॉबिन कुक हे लेखक माहीत झाले नसते. नंतर मूळ पुस्तके वाचली तरी सुरुवात अनुवाद वाचण्यापासूनच झाली होती.
डायरी ऑफ ऍन फ्रॅंक, दि अलकेमिस्ट, सिद्धार्थ, इतकंच काय गालिब, फैज, फराज यांची शायरी... अनुवाद नसते तर यातलं काही वाचता आलं नसतं.
आपल्याला माहीत असलेल्या दोन तीन लिपींच्या जोरावर इतर राज्यांतले, इतर देशांतले साहित्य आपण वाचू शकतो; आता प्रचलित नसलेल्या भाषांमध्ये शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झालेली साहित्यसंपदा जाणून घेऊ शकतो; ते केवळ या माहीत असलेल्या नसलेल्या अनुवादकांच्या जिवावर.
बऱ्याचदा तर अनुवादकांचे नावही आपण विसरून जातो, किंवा बऱ्याच ठिकाणी उल्लेखही नसतो.
आज अंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस आहे ; यानिमित्त भाषेचा अडसर ओलांडून आपलं साहित्यविश्व समृद्ध करणाऱ्या, अनुवाद या लेखनप्रकारात काम करणाऱ्या सर्व लेखकांना मनापासून अभिवादन.
No comments:
Post a Comment