" कसलं भयानक झालं गं ते हैदराबादमध्ये"
"हो"
" आपल्या पोरींसाठी भीतीच वाटते असं काही ऐकलं की"
"हम्म😢"
" आणि तू तुझ्या पोरीला एकटी नको पाठवत जाऊ इकडे तिकडे. सायकलवर बऱ्याचदा जाते ना सामान आणायला"
" हो, शाळेसाठी स्टेशनरी लागली तर, कधी एखादी भाजी, काही ग्रोसरी लागली तरी आणते, तिला जमतं व्यवस्थित आणि आवडतं ही"
" हो गं, पण सेफ्टीचं काय, कशाला रिस्क घ्यायची... एका एजपर्यंत तरी जपायला हवं ना आपणच"
" किती असतं?"
" काय?"
" नाही, तू म्हणते ते एज नेमकं किती असतं... नेमकं किती वय झालं की म्हणायचं आता ती सेफ आहे, आता तिच्या फिमेल होण्याचा काहीच त्रास नसणार तिला. किती वय झालं की तिला विसरता येईल की तिने जपून राहायचंय?"
अवखळ झऱ्यासारखं बालपण निर्मळपणे वाहत असतं... कुठल्याश्या एका किळसवाण्या स्पर्शाने, शब्दाने, गढूळ होतं आणि पहिल्यांदा कळतं आपण बाई आहोत.
स्वप्नांच्या दुनियेत वगैरे रमण्याचे दिवस येतात मग; आणि स्वप्नांपेक्षा दुस्वप्नं जास्त दिसू लागतात. शरीराच्या कौतुकसोहळ्याएवजी अडथळा व्हायला लागतो त्याचा येता जाता; शाळेत कॉलेजात, रस्त्यावर, दुकानात, मंडईत, बसमध्ये... कुणी अचकट विचकट बोलतं, कुणी धक्का मारतं, कुणी सायकलला कट मारतं... ओढणी नीट घ्यायची, पोक काढून चालायचं, पुस्तकं समोर धरायची, मान खाली तोंडावर बोट... अशा लोकांशी हुज्जत घालायची नाही, विरोध केला आणि चेकाळून अजून काही भयंकर केलं म्हणजे? आपल्याला फक्त शिकून पुढे जायचंय.. दुर्लक्ष करायचं...
मग कॉलेज असतं, हुशार लोकांचं...पण इथे तर क्लासरूमच्या भिंती असतात, कॅन्टीनच्या भिंती असतात, लायब्ररीच्या भिंतीही असतात... जपून राहायचं, नाहीतर यापैकी कुठेही जाहीर उद्धार होतो, मग तुम्हाला बघायला गर्दी होते कोरिडॉर्समध्ये. ज्यांनी लिहिलंय त्यांच्याकडे तिरस्काराने कुणी बघणार नाही, हिम्मतच होणार नाही, राजे असतात ते इथले... तुझ्याकडे बघतील लोक, कुतूहलाने... "काय नेमकं पोटेन्शियल आहे, काय मोजमापं आहेत बघू तरी...हिनेच काहीतरी सिग्नल दिला असणार... " . बकऱ्यांकडे बघायला आवडतंच आपल्याला, लांडग्यांकडे बघायची रिस्क घ्यायची नाही फक्त.
परीक्षा येतात; त्यात कुणी विचित्र प्रश्न विचारतात; शरीराशीच जोडलेला सगळं अभ्यासक्रम, काहीही विचारता येतं, सगळंच असतं सिलॅबसमध्ये. सिनियर मुली सांगतात; या तोंडी परीक्षेला नीट ओढणी घेऊन जा, तोंडाला तेल लावा हवं तर, नजर खाली ठेवा, आवाज कमी... ऐकायचं मग... त्याही काळजीनेच बोलत असतात.
सोबतची मुलं म्हणतात पोरींचं बरं असतंय, जरा टाईट ड्रेस घातले की पास; रात्रभर अभ्यास करून लाल झालेले डोळे चुरचुरायला लागतात; ही परत म्हणतात रडणं हा तर रामबाण नुस्खा तुम्हा पोरींचा, लगेच पास करतात तुम्हाला...
सगळंच कडू कडू झालेलं असताना वडील म्हणतात कधीही पूर्ण समूहाबद्दल राग धरू नये, हे individual असतं. ज्यांच्याबद्दल द्वेष वाटतोय त्यांच्यातल्या चांगल्या लोकांची यादी कर; बघ तुझी भावना बदलेल.
बरीच मोठी होते यादी... आहेत की चांगले पुरुष जगात म्हणत ती यादी मनात नीट जपून ठेवायची. अप्रिय प्रसंगी तीच आठवून स्वतःची समजूत घालत राहायचं.
पुढचा टप्पा येतो उच्चशिक्षणाचा; आणि त्यासोबत पुढच्या पातळीवरचे खाचखळगे..
नवरा आपल्याच संस्थेत नोकरी पत्करून सोबत राहायला आला की मग मात्र झटक्यात सगळं सुकर होतं. नुसती रेसिडेंट नसतो आता; लेक्चररची बायको असतो, योग्य तो रिस्पेक्ट राखलाच पाहिजे ना सरांच्या मिसेसचा.
पुढे सोबतीने व्यवसायात जम बसवताना त्याच्या पंखाखाली आपण सुरक्षित... एकट्या स्ट्रगल करणाऱ्या बायकांच्या वाट्याला येणारा त्रास आपल्याला भोगावा लागत नसला तरी दिसत असतो. अशावेळी हुश्श म्हणावं की गिल्टी वाटून घ्यावं, हे कधी कळत नाही. पण या परिघाबाहेर गेलं की चटके फटके हजर असतात. कुणा हाय रिस्क प्रेग्नन्सीला इमर्जन्सी साठी फोन नंबर दिलेला असतो, तिचा नवरा त्यावरून घाण फोटो व्हीडिओ पाठवतो आणि आपण अवाक होतो. कुणी एकटीचा फोटो का ठेवता मॅडम फेसबुकला म्हणत जाब विचारतं. एखादा तथाकथित कौटुंबिक मित्र तर चेष्टेत "वहिनी फार ऍक्टिव्ह असतात बरं फेसबुकवर, मित्रही बरेच आहेत यांचे तिथं, सागर जपून रहा बे," असं सरळ म्हणतो आपल्यासमोर... आपण हतबुद्ध होऊन बघत राहतो नुसते....
चाळीशी ओलांडली की वाटतं आता झालं वय, आता थोडं पल्याड जाता येईल; पण असं काही फिक्स एजच नसतं म्हणे.
चांगल्या गोष्टी, चांगली माणसं आठवत, वाईट ते विसरत रुटीन सुरक्षित आयुष्य जगत असतो. किरकोळ वाईट प्रसंग घडत राहतात पण निबर झालेलो असतो आता... कधी दुर्लक्ष करून, कधी शिव्या देऊन, कधी धमक्या देऊन निस्तरतो विषय... फार चिडचिड झाली तर मनातल्या यादीची उजळणी करतो.
... मग एखादं नृशंस प्रकरण उजेडात येतं, मग अशा प्रसंगांची यादीच डोळ्यासमोर येते; मग ती मनातली चांगल्या पुरुषांची यादी काही केल्या आठवतच नाही.
इतक्या अमानुषपणे जीव का घ्यावा कळत नाही. इतकी विकृती कशी फोफावते कळत नाही. नवऱ्यावरच आगपाखड होते तुम्ही पुरुष इतके नीच कसे बनता म्हणत.
आपला संताप, घृणा सगळं खालमानेने स्वीकारतो तो; आणि काहीतरी सांगत राहतो कसे उपाशी असतात, चेकाळतात काहीतरी पाहून... शरीराच्या उर्मी रेग्युलेट करायला नैतिक, सामाजिक, धार्मिक, कायदेशीर, असा कुठलातरी लगाम असायला लागतो... या लोकांमध्ये यापैकी कुठलाच वर्किंग नसतो आणि मग त्यांच्यातला पशु बेफाम होतो...
माझ्यापर्यंत काही पोहोचत नाहीय पण; खरंच नको जाऊ द्यायला मुलीला इकडे तिकडे? तिचं शॉर्ट्स घालणं बंद करावं आतापासूनच... काय काय बंद करता येईल बरं.... आणि हे सगळं किती वयापर्यंत... हा ही एक प्रश्नच आहे तसा
No comments:
Post a Comment