Wednesday, 10 March 2021

बालके आणि लैंगिक गुन्हे २

 मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे पॉक्सो कायद्यानुसार पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी गुन्ह्याची माहिती मिळाल्याच्या चोवीस तासांच्या आत करण्याचे बंधन पोलिसांवर असते. 

डॉक्टरांनी तपासणीविषयी सविस्तर माहिती देऊन बालक आणि पालकांची तपासणीसाठी संमती घ्यायची असते. मुलाला कमीत कमी त्रास होईल, प्रायव्हसी जपली जाईल, याची व्यवस्थित काळजी घेऊन तपासणी केली जाते. मुलगी असेल तर महिला डॉक्टर तपासणी करते. बालकाला त्याला कळेल अशा भाषेत तब्येतीच्या तक्रारी विचारल्या जातात. मग शरीरावर कुठे जखमा असतील तर त्यांची सविस्तर नोंद केली जाते. लघवीची जागा काळजीपूर्वक तपासली जाते; इन्फेक्शनची लक्षणे, फॉरेन बॉडी नाही ना, याची खातरजमा करतात. तसेच फॉरेन्सिक तपासणीसाठी सॅम्पल घेतले जातात. कपड्यांवर डाग असल्यास तेही फॉरेन्सिक लॅबला पाठवले जातात. शी ची जागा तपासली जाते. तसेच तोंडही जखमांसाठी तपासले जाते. ही सगळी तपासणी हळुवारपणे, मुलाला जास्त वेदना होणार नाहीत याची काळजी घेत केली जाते. मूल घाबरल्यास, नकार देत असल्यास थोडं थांबून, समजूत घालून थोड्या वेळाने तपासणी पूर्ण करतात. मुलासोबत धीर देण्यासाठी पालक थांबू शकतात.

तपासणी झाल्यावर इजेनुसार उपचार केले जातात. इन्फेक्शनची शक्यता दिसल्यास त्यानुसार औषधं दिली जातात. तसेच मुलगी जननक्षम वयाची असेल तर गर्भ राहण्याची शक्यता लक्षात घेऊन इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. एखादी जखम मोठी असल्यास टाके घातले जातात. 

सिंगल इंसिडन्स, म्हणजे एकदाच गुन्हा घडला असेल आणि लगेच मूल तपासणीसाठी आणलं गेलं असेल तर निदान तुलनेने सोपे असते आणि तपासणीत, सॅम्पलमधून  पुरावेही सापडतात.

पण गुन्हा जुना असेल, वारंवार घडत आलेला असेल तर गुंतागुंत वाढते. ताज्या जखमांएवजी जुने व्रण दिसू शकतात. कधी कधी इन्फेक्शनची लक्षणे असतात, लघवीला जळजळ होते अशी तक्रार असते, तर कधी काहीच सब्स्टँशियल सापडत नाही. मुलगी असेल तर हायमेन टियर वरून कल्पना येऊ शकते. अशा केसेसमध्ये फार काळजीपूर्वक तपासणी करावी लागते.

मूल मानसिक धक्क्यात असेल तर मानसोपचार तज्ज्ञाची सोय केली जाते. 

तपासणीचा अहवाल काटेकोरपणे भरून तपास अधिकाऱ्यांना दिला जातो जे तो पुढे मॅजिस्ट्रेटकडे सादर करतात.


दुर्दैवाने मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार जास्त करून रिपीटेड ऑफेन्स प्रकारातले असतात आणि ओळखीच्या, संपर्कातल्या व्यक्तीकडून केले जातात. अशावेळी पालकांना हे कळल्यानंतर कितीही वेदनादायी परिस्थिती असली तरी त्यांनी मुलांसमोर भीती प्रकट करू नये. मूल आधीच दहशतीखाली वावरत असते; बहुतांश वेळा गुन्हेगार, "तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन", अशी धमकी देतात. अशावेळी आई वडील घाबरलेले दिसले की मुलं काहीच बोलत नाहीत, कोषात जातात. मुलांना आधी सगळे सुरक्षित आहेत, आई वडील स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना कुणी इजा पोहोचवू शकत नाही असा विश्वास  वाटावा लागतो, मग ते ओपन अप होतात. 

दुसरं म्हणजे कधीच भरून न येणारं नुकसान झालं, असा दृष्टिकोन ठेवू नये, आणि मुलांसमोर तर कधीच तसं व्यक्त होऊ नये. मुलं संभ्रमित असतात, दुखावलेली, घाबरलेली असतात, पण त्याचवेळी आपला दृष्टिकोन सकारात्मक, बळ देणारा असेल तर ती लवकर सावरतात सुद्धा. आपल्या बाबतीत काहीतरी भयंकर किळसवाणा प्रकार घडला आहे, आपलं शरीर कायमचं  pollute झालं असं त्यांना वाटलं तर मानसिक समस्या वाढतात.

लहान मुलांच्या बाबतीत कुठलाही लैंगिक व्यवहार घडला की गुन्हा दाखल होतोच; इथे पालक आम्हाला तक्रार करायची नाही अशी भूमिका घेऊ शकत नाहीत. आपल्या कुटुंबात, किंवा नातेवाईक, मित्रपरिवारात  कुणाच्याही बाबतीत असा प्रसंग उद्भवल्यास पॅनिक मोडमध्ये न जाता शांतपणे आणि चौकसपणे सगळी प्रक्रिया नीट फॉलो केली जातेय याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच मुलांसमोर धीरोदात्त राहणे अतिशय गरजेचे आहे. 

एरवीही जर कुठले मूल खेळकरपणा सोडून अचानक अबोल झाले असेल, बाहेर जायला घाबरत असेल, विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट व्यक्तीसोबत जायला काहीतरी कारणं सांगून नकार देत असेल, लघवीला त्रास होत असल्याची वारंवार तक्रार करत असेल, तुम्ही न आणलेली नवीन खेळणी किंवा खाऊ त्याच्याकडे सारखा सापडत असेल, त्याच्या/ तिच्या कपड्यांवर संशयास्पद डाग दिसले असतील,  तर सावध होऊन थोडी विचारपूस करणं गरजेचं असतं.

सेक्शुअल अब्युज होत असल्यास योग्य ती कायदेशीर प्रक्रिया फॉलो करणे आवश्यक. यात गुन्हेगाराला कडक शिक्षा करणे हे न्यायसंस्थेचे काम; पण अशा प्रक्रियेत आपण सामील असल्यास बालकाच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. असा प्रसंग शरीर-मनावर खोल आघात करणारा असतो हे अगदी मान्य; पण ही कधीच न भरू शकणारी भळभळणारी जखम आहे असा दृष्टिकोन न ठेवता 'काळ हेच औषध' यावर विश्वास ठेवून, जसं एखाद्या मोठ्या अपघात किंवा आजारातून आपण प्रयत्नपूर्वक बाहेर येतो, तसे या दुर्घटनेतूनही नक्की येऊ शकतो, हा मोठ्यांचा अप्रोच हवा. मुलं सेन्सिटिव्ह असतात, तशीच ती resilient ही असतात. त्यांनी लवकरात लवकर normalcy कडे यावं यासाठी प्रयत्न करणे सगळ्यात महत्वाचे आहे.


पुढच्या भागांमध्ये महिलांशी निगडित गुन्हे डिस्कस करण्याचा प्रयत्न करेन

बालके आणि लैंगिक गुन्हे १

 या विषयावर लिहावं की नाही या बाबतीत बरेच दिवस द्विधा मनस्थिती होती, कारण विषयाची संवेदनशीलता, आणि याविषयी वाचन करताना येणारी अस्वस्थता. अशा घटना पाहताना एक तिऱ्हाईत व्यक्ती असून सुद्धा त्रास होतो. एका रेप व्हीक्टिमची पहिल्यांदा तपासणी पाहिली रेसिडेन्सीत, तेव्हा कितीतरी रात्री झोपू शकले नव्हते, सारखी भीती वाटायची. पण ओव्हर द टाईम हेही लक्षात आलं की याबद्दल कुणाला फारशी तांत्रिक माहिती नसते;  चुकून दुर्वर्तनच्या कक्षेत बसेल अशी काही दुर्घटना घडली, तर काय करायचं, पुढची प्रक्रिया कशी असते, याबद्दल काही माहीत नसतं.

या सगळ्या प्रक्रियेची अजिबात ओळख नसेल तर कुठल्याही न्यायिक प्रक्रियेत भाग घ्यावा लागला, तर तांत्रिक चुका होतात. त्याचे दुष्परिणाम केसवर होतात. त्यामुळं Information is the best weapon against fear of the unknown,  या तत्वाला अनुसरून स्त्रियांवर होणारे लैंगिक गुन्हे या संबंधी वैद्यकीय अनुषंगाने लिहत आहे. कायदेशीर कलमांबद्दल मला मर्यादित स्वरूपाची माहिती आहे, पण त्याविषयीही शक्य तितकी अचूक माहिती देण्याचा प्रयत्न असेल. 

ही माहिती खरोखर गरजेची आहे का, अशी वेळ आपल्यावर थोडीच येणार आहे, असं वाटू शकतं... मला आमच्या भागात १९९३ साली अकल्पितपणे झालेला भूकंप आठवतो. नंतर अशी चर्चा झाली की भूकंप येतो तेव्हा काय करायचं, हे माहीत असतं तर जीवितहानी कमी झाली असती. 

अशा घटना कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत; पण दुर्दैवाने आपल्या आसपास असे काही घडले तर informed असण्याने मदत होईल. 


सुरुवातीला लहान मुलांबद्दल बद्दल चर्चा करू.

२०१२ साली आलेल्या POCSO( Protection of children from sexual offences) कायद्यानुसार  बालकाशी करण्यात आलेला कोणत्याही प्रकारचा लैंगिक व्यवहार हा गुन्हा आहे( इथे बालक म्हणजे मुलगा मुलगी दोन्ही, आणि वय अठरा वर्षांहून कमी), आणि असा गुन्हा करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. यात बलात्काराच्या विस्तृत परिभाषेचा समावेश आहे .  विनयभंग, लैंगिक छळ करण्याच्या हेतूने स्पर्श करणे, पाठलाग करणे, लैंगिक गुन्ह्यात मदत करणे, अशा गुन्ह्याची माहिती लपवणे, या गोष्टींसाठीही शिक्षेची तरतूद आहे. तसेच बालकांचा समावेश असलेली पोर्नोग्राफी तयार करणे, पाहणे, असे साहित्य जवळ बाळगणे हाही गुन्हा आहे. 

ह्या कायद्यान्वये तक्रार नोंद करतेवेळी पीडित बालकाची तक्रार शक्यतो महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फत नोंदविली जाते. पीडित बालकाचे नाव गुप्त ठेवले जाते. बालकाला रात्री पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवले जात नाही. बालकाची वैद्यकीय तपासणी त्याच्या आणि  पालकांच्या संमतीने केली जाते. पीडित बालकाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून त्यास विश्वासाहर्ता वाटेल, अशा वातावरणात खटले चालविले जातात. तसेच पुनर्वसन आणि नुकसान भरपाई या संबंधीची तरतूदही आहे


एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला असल्याची तक्रार असल्यास पोलिसांनी त्याची/ तिची तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यायची असते( जास्तीत जास्त २४ तासांच्या आत). त्यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरकडे नेले जाते. शासकीय रुग्णालय नसल्यास खाजगी रुग्णालयातले डॉक्टरही तपासणी करू शकतात. अशी केस आल्यास निःशुल्क तपासणी आणि प्राथमिक उपचार करणे सर्व डॉक्टरांवर बंधनकारक आहे.

बालक मुलगी असल्यास महिला डॉक्टरांनी तपासणी करणे अनिवार्य आहे. तपासणीसाठी बालकाची आणि पालकांची पूर्वसंमती घेतली जाते. 

वैद्यकीय तपासणी बद्दल पुढच्या भागात सविस्तर माहिती देते.

Monday, 1 March 2021

जेथे जातो तेथे ...

 काही गाणी बऱ्याचदा कानावर पडत असतात, आपण ऐकत असतो, पण कधीतरी अवचित ती उलगडतात, किंवा किमान समजून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.

' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती', ने सध्या ताबा घेतलाय. तुकारामांचा हा अभंग देवाला उद्देशून असला तरी आपल्याला  कधी स्थूलरूपात तर कधी  सूक्ष्मरूपात सोबत करणारं कुणी ना कुणी आठवतं ! 

शेवटच्या ओळींमध्ये  जेव्हा तुकोबा म्हणतात, 

" तुका म्हणे आता खेळतो कौतुके

जाले तुझे सुख अंतर्बाही "

... तेव्हा चालणे, बोलणे शिकवून त्या मायबापाने या संसाराच्या खेळासाठी आता तयार केलंय, आणि त्याचं सुख आता कायमसाठी अंतर्बाह्य झिरपलं आहे, असं वाटतं ! 

तरी या अभंगात काहीतरी आहे जे कळत नाहीय असं वाटत राहतं ; श्रीनिवास खळ्यांच्या गूढरम्य चालीचा परिणाम आहे की काय कोण जाणे!

या अभंगाचे निरूपण मिळेल आणि समज थोडी तरी वाढेल या आशेने नेटवर शोधलं पण काही विशेष सापडले नाही.  पण एक वेगळी रोचक माहिती मिळाली. १९३० मध्ये येरवडा तुरुंगात असताना गांधीजींनी तुकारामाच्या काही अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता म्हणे. त्यात हा अभंगही आहे !


Jethe jato tethe tu maajha saangaati


Wherever I go, Thou art my companion. 

Having taken me by the hand Thou movest me.

 I go alone depending solely on Thee. 

Thou bearest too my burdens.

 If I am likely to say anything foolish, Thou makest it right. 

Thou hast removed my bashfulness and madest me self-confident, O Lord. 

All the people have become my guards, relatives and bosom friends. Tuka says: I now conduct myself without any care. I have attained divine peace within and without.

22-10-1930

अशी माणसे येती ... २

 मघाशी माझ्या पोस्टमध्ये मी पेशंट्स आणि नातेवाईक यांचे काही अनुभव शेअर केले; तसा हेतू नसतानाही पोस्ट थोडी नकारात्मक झाली, my bad... जीवन आणि मृत्यूशी थेट संबंध असणारे फिल्ड असल्यामुळे वातावरण तणावाचे असते आणि त्यामुळं कधीकधी लोक नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने रिऍक्ट होतात. पण जाणीवपूर्वक, मुद्दाम त्रास देणाऱ्यांची संख्या तशी कमी असते. अनेक चांगले अनुभवही गाठीशी आहेत. बरेचजण व्यवस्थित सहकार्य करतात, सूचना पाळतात, आणि विश्वास ठेवतात. काही नातेवाईक इतर पेशंट्सनाही मदत करतात. पूर्ण बिल भरू न शकणारे काहीजण नंतर आठवणीने उरलेले बिल भरायला येतात. व्यावसायिक नात्याच्या पल्याड जाऊन कृतज्ञता मानणारी, प्रेमादराने वागवणारी खूप लोकं आहेत.

एका कमेंटमध्ये धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरं जाणाऱ्या लोकांचा विषय निघाला आणि मग विचार केल्यावर लक्षात आले की आपल्या स्वतःच्या आयुष्यातही जर मोठं आजारपण आलं, मृत्यूची चाहूल लागली,  तर काय करावं याचा वस्तुपाठ देणारीही काही उदाहरणं आहेत.

 

आम्ही प्रॅक्टीसमध्ये तसे नवीन होतो तेव्हा एक साठीचे गृहस्थ आपल्या बायकोला ऍडमिट करायला घेऊन आले. ती सिरीयस होती; तपासल्यावर आम्ही गंभीर्याची कल्पना दिली आणि त्यांची इच्छा असल्यास दुसरीकडे शिफ्ट करू शकता असंही सांगितलं. त्यावर ते म्हणाले, तुम्ही मनापासून प्रयत्न करताय हे दिसतंय; यश परमेश्वराच्या हातात आहे, द्यायचं तर तो तुमच्या हातूनही देईल. त्यांनी विश्वास दाखवला आणि मग आमचाही आत्मविश्वास वाढला. पेशन्ट ठणठणीत होऊन घरी गेली.

दुसरी एक पन्नाशीची स्त्री दाखवायला आली तेव्हा कर्करोगाच्या शेवटच्या स्टेजला होती. आम्हाला म्हणाली थोडं सलाईन वगैरे लावा आणि एक दिवसापुरता थकवा येणार नाही अशी सोय करा, एक कार्यक्रम ठेवलाय घरी. मी तर चिडले आणि म्हणाले इतक्या आजारी असताना कार्यक्रम कसले करताय? त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आहे आणि जे लोक आयुष्याचा वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना भेटले, ज्या लोकांमुळे जगणं आनंददायी झालं, त्या सगळ्यांना शेवटचं भेटायचं आहे आणि तेही आनंदाने, दुःखाचे सावट पडण्यापूर्वी... 

अजून एक परिचित असेच टर्मिनली आजारी पडले तेव्हा त्यांनी सगळ्या व्यावहारिक बाबी क्लियर केल्या. बायको आणि मुलांना सगळ्या आर्थिक बाबींची माहिती दिली, नॉमिनेशन वगैरे ठीक आहेत हे बघितलं. 

एका जोडप्याला त्यांची मुलगी गमवावी लागली; बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी प्रयत्न करूनही त्यांना डोनर मिळाला नव्हता. त्यांनी नंतर स्वतःचे ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशनचे फॉर्म्स भरले. एका आरोग्य निगडित स्वयंसेवी संस्थेत जमेल तितका वेळ काम करायलाही सुरुवात केली.


आजारपण, मृत्यू या गोष्टी माणसाला obviously भयंकर वाटतात आणि साहजिकच माणसं अतिभावनिक होतात, कधीकधी विचित्रही वागतात. पण तरीही They're only as good as the world allows them to be,  हे म्हणणं खोटं ठरवणारी माणसं अधूनमधून भेटत राहतात आणि आयुष्यावरचा विश्वास दृढ होतो; आणि आपण जे काम करतो ते worthy वाटतं !

अशी माणसे येती ... १



स्वतःचे आणि जवळच्या व्यक्तीचे आजारपण,  याला बहुरूपी मनुष्यप्राणी इतक्या विविध प्रकारे रिऍक्ट होतो की घटा- घटांचे रूप आगळे याची वारंवार प्रचिती येते ! 

आमच्या एक जवळच्या नातेवाईक ताई जिवाला फार घाबरतात. अशात त्यांना हाय बीपी डिटेक्ट झाला आणि त्यांनी फारच टेन्शन घेतलं. सतत आता याचे काय काय दुष्परिणाम होतील, हार्ट अटॅक येईल का, मेंदूत रक्तरस्त्राव होईल का.. अनेक कुशंका आणि टेन्शन, त्यामुळे घाबरून जायच्या आणि  बीपी अजून वाढायचा. काल त्यांची धाकटी सून म्हणाली  एकूण अवघड दिसतंय तुमचं, तर विल करता का, किंवा तुमच्याकडे इतके दागिने, साड्या आहेत... अमच्यासारख्यांना देऊन टाका थोडंबहुत तरी.... 

ताई आता चिडल्यात; पण चिडण्याच्या नादात घाबरणं जरा बाजूला पडलंय आणि ब्लडप्रेशर थोडं कमी झालंय !


अजून एक आस्थमाचे पेशंट आहेत;  तपासण्या सांगितल्या की खूप संशय घेतात. काही दिवसांपूर्वी आले तेव्हा कोविड टेस्ट करावी लागली. सुदैवाने रिपोर्ट निगेटिव्ह आला; पण काका बोलले, उगीच फुकट खर्च झाला, वाया गेले माझे पैसे! 

पेशंट्स सोबतचे नातेवाईकही वेगवेगळ्या प्रकारे परिस्थितीला सामोरं जातात. एक वहिनी आहेत; कुटुंबातले कुणीही आजारी झाले की याच गलितगात्र होतात. मग स्वैपाकाचं डिपार्टमेंट बंद पडतं, आणि घरातल्यांना मूळ पेशंट आणि हा वाढीव पेशंट, अशा दोघांची काळजी घ्यावी लागते!

मध्ये एकजण भेटायला आले ते वडिलांचे पासबुक घेऊनच; म्हणाले माझी आर्थिक परिस्थिती बेतास बात आहे, वडिलांची इतर काळजी घेऊ शकतो पण खर्च नाही करू शकणार, तेव्हा त्यांच्या इतक्या पैशांत जितकं बसवता येईल तितकं बसवा ...

अजून एक स्वघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत.. परिसरातले किंवा नात्यातले कुणी आजारी पडले की उत्साहाने हॉस्पिटलला घेऊन येतात; पहिल्या दिवशी, " बिलाची काळजी करू नका, मी आहे" असं म्हणतात, शेवटच्या दिवशी बिलावरून वाद घालतात, आणि मग स्वतःच,   "काहीतरी मांडवली करू, तुमचा पण जास्त नुकसान नको,"  म्हणत कमी केलेलं बिल पेशंटला भरायला सांगतात. सिरीयस पेशंट असला की त्यांना निकालाची भारी उत्सुकता असते; "म्याडम विकेट पडणार की राहणार पटदिशी सांगा, उगा नळ्या अन ते चुक चुक( मॉनिटर) लावून बिल वाढवू नका..." हे ठरलेलं वाक्य.

पेशंट जास्तच क्रिटिकल असेल तर यांची पुढची घाई.. "ते डेथ चं सर्टिफिकेट लवकर लिहायला पायजे, ते लागतं तिकडं स्मशानात ..."

अहो साहेब, डेथ होईपर्यंत तरी दम धरा, मगच देता येईल ना, असं म्हणून त्यांचा वारू रोखावा लागतो !

कोविड काळात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंट्सच्या नातेवाईकांनाही खूप तणावपूर्ण परिस्थितीतून जावं लागलं, काहीजणांना कठीण निर्णय घ्यावे लागले; त्यातही लोकांची cope करण्याची पद्धत निरनिराळी होती... ते परत कधीतरी !

तिन्हीसांजा ...

 #ये_शाम


चहाचा कप हातात घेऊन बसण्याची ठरलेली खुर्ची असते. दिवेलागणीची वेळ; हॉलच्या बाल्कनीला लावलेल्या मोठ्या काचेतून समोरच्या इमारतीचे उजळ होत जाणारे चौकोन दिसायला लागतात. काही चौकोन पर्दानशीन असतात. बसल्या जागेवरून एका खाली एक असे दोन बेनकाब चौकोन आणि त्यांच्या डावीकडे  एक अंधारा उभा पट्टा सोडून दोन जिने दिसतात. 

वरच्या चौकोनात दिसणारी भिंत गडद विटकरी रंगाची आहे, त्यावर एक वॉल माउंटेड टीव्ही आहे. त्यातली चित्रं सारखी हलत असतात; आवाजही मोठा असावा, पण तो माझ्यापर्यंत पोहोचत नाही.

खालच्या चौकोनातली भिंत फिक्या रंगाची आहे; क्रीम किंवा हलका पिस्ता असावा. त्यावरही एक टीव्ही आहे. त्यातली चित्रं त्या मानाने स्थिर असतात; कधीकधी ब्लॅक अँड व्हाइट असतात. जुनी गाणी असावीत असं इथून पाहताना वाटतं... नूतन देवानंद आठवतात; भारत भूषण मधुबाला सुद्धा...

चहा संपवून परत समोर नजर टाकेपर्यंत खालच्या चौकोनातला टीव्ही बंद झालेला असतो. दोन तीन मिनिटांत वरच्या चौकोनातली भिंतही शांत स्थिर होते. 

वरच्या जिन्यात दोन आकृत्या दिसतात; एक मोठी, आणि तिच्या हाताला थोडं ओढत, उड्या मारत जिना उतरणारी एक छोटी.

खालच्या जिन्यातही दोन आकृत्या दिसतात; एक वाकलेली, आणि तिचा हात हातात धरून सावकाश जिना उतरणारी एक जरा कमी वाकलेली... 

तिन्हीसांजेचा उंबरठा ओलांडून रात्रीने अंधाराच्या प्रदेशात पाऊल ठेवलेलं असतं...

जीवनगाणे !

 वैद्यकीय पार्श्वभूमी असलेली 'House MD'' नावाची सिरीज आहे, त्यात प्रत्येक एपिसोडमध्ये कथेनुरूप एखादं गाणं येतं ... फार मस्त अर्थपूर्ण गाणी आहेत.

एक गाणं फार आवडलं आणि फार लक्षात राहिलं..अतिशय आजारी पण आशावादी असणाऱ्या मुलीवर एक एपिसोड होता, त्यात हे गाणं होतं.


सगळं सुरळीतपणे सुरू असताना अचानक आयुष्यात व्याधी येते.... किरकोळ, गंभीर, जीवघेणी, अशा कितीतरी रूपांत. आजारानुसार शारीरिक, मानसिक त्रास, वेदना, खर्च, अशी बरीच संकटं एकाचवेळी अंगावर चालून येतात.

जोडीला असते भय; "ऑपरेशनच्या टाक्यांचे व्रण राहतील का?", इथपासून ते "परत उभं राहू शकेन, कामावर रुजू होऊ शकेन का?", इथपर्यंत. 

सगळ्यात मूलभूत भय मृत्यूचे... ज्या जगातून तात्पुरते बाजूला फेकले गेलोय त्या जगात परत जाऊ शकू का, हा प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न; आजाराच्या गांभिर्यानुसार कधी क्षणिक तर कधी भरपूर रेंगाळणारा. 

दुसरा एक प्रश्न,  सगळ्या नव्हे पण काही मनांमध्ये तरी नक्की उमटणारा... परत गेलेले आपण तेच असू की वेगळे? मृत्यूला हुलकावणी देता आली तरी त्याचे वार कधीकधी मागे राहतात; कधी अपंगत्व, कधी एखादा अवयव काढावा लागल्यामुळे आलेली कुरुपता, कधी मानसिक आघात, कधी उरलेले आयुष्य गोळ्या औषधांच्या आधाराशिवाय काढता येणार नाही अशी परिस्थिती... रुग्णालय नावाच्या वास्तूत आलेली व्यक्ती आणि तिथून बाहेर पडणारी व्यक्ती तंतोतंत तीच नसते खूपदा; कधी किरकोळ कधी प्रचंड बदललेली असते.


इतरांचा आधार फसवा असतो. स्वतःचे नवे रूप स्वीकारून परत सुरुवात करणे; वारामुळे झालेल्या जखमा टोकरत बसायचं, की हळूहळू भरतील यावर विश्वास ठेवून खपली धरू द्यायची, यापैकी एका निर्णयाची निवड करणे; हे स्वतःचं स्वतःलाच करावं लागतं.

'We're the song inside the tune

Full of beautiful mistakes'  हे ब्रीदवाक्य मनात ठेवून, आयुष्य सुंदर आहे आणि म्हणून ते अनुभवणारे आपणही अंतरबाह्य सुंदर असणार,  यावर विश्वास ठेवता यायला हवा बस्स...!


' Every day is so wonderful

Then suddenly it's hard to breathe

Now and then I get insecure from all the pain

I'm so ashamed


I am beautiful no matter what they say

Words can't bring me down

I am beautiful in every single way

Yes, words can't bring me down

So don't you bring me down today


No matter what we do

No matter what we say

We're the song inside the tune

Full of beautiful mistakes


And everywhere we go

The sun will always shine

Tomorrow we might wake up on the other side

All the other time

We are beautiful in every single way..'

मध्यम सूर

 दुपारी 'मिडल-क्लास मेलडीज', हे नाव वाचून  एक तेलुगू चित्रपट बघायला सुरुवात केली; मेलडीज म्हणजे संगीताशी संबंधित काही असेल असं वाटलं होतं. तसं काही नव्हतं, पण  चित्रपट छान होता, आणि ते शीर्षकही अनुरूप आहे हे पटलं. आयुष्याचा सूर पूर्णतः हरवून सगळं कर्कश्य होण्याइतका विसंवाद/ उद्रेक न होता एकमेकांना सांभाळत, सावरत, समजून घेत आकारास येणारं साधं पण सुरेल मध्यमवर्गीय आयुष्य...

 मध्यम आकाराच्या गावातल्या, मध्यमवर्गीय घरातल्या साध्या पात्रांभोवती फिरणारी ही कथा. बेसिक संघर्ष; कधी घरट्यात रोखून धरणारे तर कधी पंखांना बळ देणारे पालक,  कधी मागच्या पिढीवर वैतागलेली तर कधी त्यांची हतबलता समजून घेणारी मुलं;  या सगळ्यांत नायकाचे एक स्वप्न आणि ते साकार करण्यासाठीची धडपड.

आज सावित्रीबाईंवरच्या वाचलेल्या पोस्ट्स मनात रेंगाळत असताना हा सिनेमा बघत होते आणि बघता बघता यातल्या स्त्री पात्रांनी लक्ष वेधून घेतलं. सर्वसामान्य परिस्थितीतल्या, सर्वसामान्य पेहरावातल्या साध्या मुली आणि बायका.... पण ज्यांना खरोखर विमेन ऑफ सब्स्टन्स म्हणता येईल अशा. संहारक, वाचाळ न होता, आपले मूळ मार्दव शाबूत ठेवून, समोरच्या व्यक्तींच्या मानसिकतेत, आचरणात बदल घडवणाऱ्या... 

 प्रेमळ पण व्यवहारी, कणखर असणारी आई असो, सतत गृहीत धरलं जाणं नामंजूर असणारी प्रयेसी, स्वाभिमान जपणारी लग्नाळू मुलगी, नवऱ्याला लोभाचा अतिरेक होतोय याची आठवण करून देणारी पत्नी असो; ही सगळी पात्र वास्तववादी आहेत, कालसुसंगत आहेत, आणि काळानुरूप बदलत असलेल्या स्त्रियांच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. पारंपारिक चौकटीतल्या भूमिका निभावत असलेल्या पण आत्मभान जागृत असलेल्या या स्त्रिया आहेत.

आपल्या अवतीभोवती अशा अनेकजणी असतात; त्यांचा फार आवाज नसतो, अभिनिवेश नसतो, गर्जना नसतात; पण कृतीशीलता खूप असते, विधायक विद्रोह असतो,  आणि व्हिजिबल रिजल्ट्स असतात, झालेले दीर्घकालीन बदल असतात. या स्त्रिया खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी म्हणवून घ्यायला पात्र वाटतात. 


[ सशक्त, वास्तववादी, अंतर्बाह्य सुंदर अशी स्त्री पात्रं, अशात बघितलेल्या बऱ्याच दक्षिण भारतीय, विशेषतः मल्याळम चित्रपटांमध्ये बऱ्याच संख्येने दिसली . तिकडचे बॉक्स ऑफिस हिट्स कसे असतात माहीत नाही, पण OTT प्लॅटफॉर्म्सवर पाहिलेल्या बहुतांश सिनेमांमधल्या स्त्री व्यक्तिरेखा फार अस्सल, रिलेटेबल वाटतात, आणि त्यांच्या माध्यमातून subtly व्यक्त होणारा स्त्रीवादही फार मनोरम आहे .]


भाषेचं सुंबरान

 'सुंबरान' हा सिनेमा बघताना या शब्दाचा नेमका अर्थ शोधत होते. तेव्हा एक लेख वाचला ज्यात

धनगरी ओव्यांना सुंबरान म्हणतात हे समजलं.

( सुंबरानचा शब्दशः अर्थ स्मरण; प्रमाण भाषेतले स्मरण लोकभाषेत सुंबरान झाले. हिंदी मुलुखात त्याचेच सुमीरन झाले असणार..)


धनगरी ओवीचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे "गाणे' असते आणि दुसरा भाग म्हणजे "कथा'! हा दुसरा भाग गोष्टीरूपाने सांगितला जातो. गाणारे वेगळे असतात. कथा सांगणारे वेगळे असतात. या कथेच्या भागाला "सपादनी' म्हणतात. गाण्यातील माहितीच कथारूपाने पुन्हा पुन्हा सांगितली जाते. ओवीची "गायलेली' प्रत्येक ओळ किमान दोन वेळा, तर कधी कधी चार वेळा सलग म्हटली जाते. ( याबद्दल सविस्तर माहिती असलेल्या लेखाची लिंक कमेंटमध्ये दिली आहे.)


यातला 'सपादनी' हा शब्द आम्ही गावाकडे वापरायचो; वाढवणे या अर्थाने, किंवा कधीकधी अघळपघळ बोलून चुकीवर पांघरूण घालायचा प्रयत्न करणे या अर्थाने.

उदा: ' गर्दी जास्त आनी स्वैपाक कमी असं दिसलं की आचारीलोक वरण/ रस्सा भाजीत पाणी अन तिखट टाकून सपादनी करतात.'

' ह्ये सकाळी एकदम जोरात ओरडले, आता उगी गोड बोलून सपादनी करायलेत' .


😊 शब्द कुठून कुठे असे वाहत, झिरपत जात असतात... आणि त्यामुळेच तर भाषा जिवंत खळाळती राहू शकते !

BORGEN- राजनीती_राजकारण_सत्ताकारण

 #राजनीती_राजकारण_सत्ताकारण



आजोबा दूरदर्शनवर बातम्या बघत दोरवाती वळायचे. माणसाला एखाद्या विषयातलं काही कळत असलं, की त्याला ते सांगावं वाटतं, आणि आप्पांना राजकारणातले बारकावे कळायचे. मग त्यांची हक्काची श्रोता म्हणजे मी असायचे. त्यांच्या विश्लेषणाला ते 'बातमीमागची खरी बातमी' म्हणायचे. त्यामुळं मलाही राजकारण हा विषय इंटरेस्टिंग वाटू लागला. त्या दोरवातींचे उदाहरण देऊन ते म्हणायचे, "हा कापूस इतका ताणता यायला हवा की त्याची पातळ दोरी होईल, पण तुटण्याइतका मात्र ताणू द्यायचा नाही... नेत्यांना समाजात नवीन काही घडवून आणायचं असेल तर असा अप्रोच हवा". 

नेटफलिक्सवर ' बोर्गेन (Borgen)' नावाची डॅनिश सिरीज पाहताना मला अचानक हे सगळं आठवलं.

राजकारणावर बेतलेल्या कलाकृती बऱ्याचदा सनसनाटी असतात आणि हिरो/व्हिलन या साच्यात फिट केलेल्या. बोर्गेन मात्र सुखद अपवाद... डॅनिश पार्श्वभूमीवर असलेली ही  मालिका राजकारण आणि governence यातले बरेच बारकावे उलगडते. त्याचवेळी बदल घडवताना, नवीन कायदे आणताना होणारे फ्रिक्शन दाखवते. 

डेन्मार्क हा विकसित आणि सधन देश आहे, लोकसंख्या कमी; त्यामुळं आपल्याकडच्या परिस्थितीशी तुलना केली तर बरेच फरक आहेत. त्यात त्यांची लोकशाही दीडशे वर्षांहून जास्त जुनी आहे.

पण काही एपिसोड्स बघताना आपल्या देशातील, राज्यातील तशाच प्रकारचे प्रश्न आणि विषय हटकून आठवतात आणि काही गोष्टी युनिव्हर्सल असतात हे जाणवतं; उदा. स्थलांतरितांचा प्रश्न, निर्विवाद बहुमत नसल्यावर होणाऱ्या युती आणि तडजोडी, पत्रकारितेचे मीडिया ट्रायलसारखे धोकादायक पैलू, आणि राजकीय विचारधारेत असणारे मूलभूत मतभेद बाजूला ठेवून होणारे गठबंधन.

 सारांश सांगायचा तर एका राजकारणी स्त्रीची ही गोष्ट. पहिल्या दोन सिझन्समध्ये coalition  सरकार बनवण्याच्या वाटाघाटींमध्ये अनपेक्षितपणे लाभलेले प्रधानमंत्रीपद, ते पार पाडताना येणारी आव्हानं, ती पेलताना राजकारणात मुरब्बी होत जाणं; आणि त्याचसोबत व्यस्ततेमुळे वैयक्तिक, कौटुंबिक आघाडीवर होणारे परिणाम, हा प्रवास आहे. 

तिसऱ्या सिजनमध्ये पायउतार झाल्यानंतरची परिस्थिती, मग वेगळ्या पद्धतीने पुनरागमन आणि त्याची परिणिती, हा भाग आहे. 

या व्यतिरिक्त एका न्यूज चॅनेलमध्ये होणाऱ्या घडामोडी आणि स्पिन डॉक्टर नावाने ओळखले जाणारे राजकीय मदतनीस, हे ट्रॅक्स बरंच भाष्य करत राहतात. 

कथा रोचक आहेच पण त्या पलीकडे जाऊन काही मूलभूत मुद्दे जाणवतात आणि मनात काही प्रश्न येतात; म्हणून ही सिरीज जास्त आवडली.   

- सत्ता राबवताना, एखादी संकल्पना प्रत्यक्षात आणताना, करावी लागणारी तडजोड किती मर्यादेपर्यंत रास्त मानावी? धंदेवाईक दृष्टिकोनातून राजकारण करणारे सोडून देऊ; पण काही तत्व मानून, काही धोरणं आखून राजकारणी व्यक्ती सत्तेत येतात, तेव्हा इम्प्लेमेन्टेशन करताना काय अप्रोच असायला हवा? बहुमत म्हणजे एकमत नव्हे; मग अल्पमत दुर्लक्षित करावं की सर्वसहमती साधावी? ती साधताना आपल्या मूळ धोरणांना किती मुरड घालावी? ती मर्यादा ठरवताना कुठले क्रायटेरिया वापरावेत? 

Ends justify the means हे कितपत समर्थनीय असते? क्रांती म्हणजे नेमकं काय? 

"Politics is war without bloodshed. War is politics with bloodshed.  युद्ध जिंकलं तर करणारा नेता म्हणवतो, हरलं तर दहशतवादी,"  असे आपल्या राजकीय हिंसेचे समर्थन एक आंदोलक करतो जो एक प्रसिद्ध कवीही असतो( तो स्वतःला आंदोलक म्हणवत असतो पण त्याच्या सरकारच्या मते तो दहशतवादी असतो).  राजकीय हिंसा यशस्वी झाली तर क्रांती आणि अयशस्वी झाली तर दहशतवाद असे म्हणता येईल का? लोकशाहीत आपल्याहून वेगळे असणाऱ्या समूहांना सामावून घेण्याची सामर्थ्य आहे असे म्हणणारी व्यक्ती आपल्या समूहाच्या उद्दिष्टांसाठी हिंसा करते तेव्हा ते कसे समर्थनीय असते? 


- चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या पत्रकारितेची निष्ठा कुणाशी असावी? सत्य जर देशाच्या कुटनीतीच्या दृष्टीने हानिकारक ठरत असेल, तर कशाला प्राधान्य द्यावे?

- सार्वजनिक क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात किती डोकावायचे याचे काही बंधन पत्रकारांवर असावे का? दुसऱ्या बाजूने जर सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असणारी मंडळी  समाजाच्या धार्मिक-सांस्कृतिक समजुतींना conform करणाऱ्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आचरणाचे भांडवल करत असतील, तर त्याविरुद्ध झालेल्या त्यांच्या वागण्यावर चिखलफेक झाल्यावर तक्रार करण्याला ग्राउंड राहतो का? 

- विकसित देशांमध्ये सुद्धा दाम्पत्यांतले जबाबदारीवाटप जुनेच आहे का? पुरुष पूर्णवेळ सार्वजनिक क्षेत्रात काम करतात तेव्हा त्यांनी कौटुंबिक सुखाची आहुती दिली, असे कौतुक होते; स्त्रियांच्या बाबतीत मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना कसरत झाली, किंवा त्या आघाडीवर तडजोड करावी लागली, असा नरेटिव्ह असतो... घर म्हणजे पुरुषासाठी सुखाचे स्थान आणि बाईसाठी कर्मभूमी असते का? 

- स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा हक्क बजावताना सोबत त्यांच्या जबाबदारीचे जे ओझे एकट्यावर येते त्याचे समायोजन कसे करावे? 

- लग्नासारखे निर्णय आमरण निभावण्याचे बंधन नसल्यामुळे हा निर्णय बदलण्याचे मिळालेले स्वातंत्र्य, पण त्याच्या जोडीने येणारे कधीकधी असह्य भासणारे एकटेपण, आणि मुलांची होणारी ससेहोलपट ; किंवा तडजोड करत, कधी माघार घेत, वैयक्तिक इच्छा-आकांक्षांना मुरड घालत कुटुंब ही संस्था टिकवून धरणं.....  या दोन्हीतलं कमी वाईट काय? 


सगळ्यात शेवटी चर्चिलचे एक वाक्य जे एका एपिसोडच्या सुरुवातीला आहे ( प्रत्येक एपिसोडला एक समर्पक ओपनिंग कोट दिलेला आहे ):

"Democracy is the worst form of government, except all others that have been tried." - Winston Churchill


( Democracy Index नावाची एक मानांकन पद्धत आहे. त्यात १६७ देशांच्या यादीत भारत ५१ व्या क्रमांकावर आहे. हा इंडेक्स रोचक आहे , जमल्यास नक्की वाचा 😊.)

Saturday, 27 February 2021

जगण्यातले अध्यात्म

 बुद्धीचा विकास होत गेला तसा माणसाच्या कुतूहलाच्या कक्षा रुंदावत गेल्या. भोवतालच्या वेगवेगळ्या घटनांबद्दल प्रश्न पडत गेले आणि हळूहळू स्वतःबद्दलही.

उत्तरे शोधण्याच्या ध्यासातून कितीतरी शोध लागले, ज्ञान वाढले, प्रगती झाली. नंतर माणसाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळवण्याचे ओब्सेशनच झाले; प्रत्येक का आणि कसे चे उत्तर मिळायलाच हवे, नाहीतर तो प्रचंड अस्वस्थ होऊ लागला.

 दुसरीकडे इतर प्राण्यांना शक्य नसलेल्या मोठ्या टोळ्या आणि नंतर समाज बनवला मनुष्यप्राण्याने. त्याच सोबत या व्यवस्थेचे नियम आले; मुक्त जगण्याला शिस्तीचा बांध घालून आखीव रेखीव चौकटीत बसवणे आले. यासोबत मग सगळ्याच नात्यांना परिभाषा आली आणि परिणीती ही. स्थैर्य हवे तर गोष्टी अनिर्णित अस्पष्ट ठेवता येत नाहीत; त्यामुळे निश्चित निर्णय आले, closure आले आणि बऱ्याचदा हे आजन्म किंवा दीर्घकाळ निभावण्याचे बंधन आले.

या दोन्हीचा परिपाक म्हणजे माणूस उत्तर केंद्रित झाला. ठोस स्पष्ट उत्तरे आणि अचल ठाम निर्णय, या आवश्यक बाबी बनल्या. 

 सतत बदलणारा माणूस आणि भोवताल, या अस्थिर घटकांना घेऊन एक स्थिर व्यवस्था कायम ठेवायची, अशी ही विरोधाभासी परिस्थिती असते. प्रवाह अडवला की दाब वाढतो, या न्यायाने मग काही उत्तरे मिळूनही   माणसांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली. 

माणसाच्या आंतरिक उर्मी आणि बाह्य नीतिनियम, यातल्या विसंगतीतून जे द्वंद्व उभे राहते, ते समजून घेण्यासाठी तत्वज्ञान, अध्यात्म यांची सुरुवात झाली असावी.

अध्यात्म हा विषय गहनही आहे, विस्तृतही; माझा इतका अभ्यासही नाही. पण माझ्यापुरते अध्यात्म म्हणजे बाह्य चौकटी, सामाजिक कंडिशनिंगमुळे रुजलेली गृहीतके, या पल्याड जाऊन आयुष्य प्रत्यक्षात कसे आहे याची जाणीव होणे.  

जसे की आपण कधीच न बदलणारी नाती किंवा प्रेम म्हणतो, पण खरे पाहिले तर माणसाच्या भावना कालौघात बदलत असतात आणि जीवन आहे तोवर त्या बदलत राहतात; आयुष्य म्हणजे प्रवाही नदी असते असे मानले तर you cannot step in the same river twice. फक्त मृत्यूच्या क्षणी हे फ्रीज होईल, तोवर सगळं परिवर्तनशील असणार. ही जाणीव म्हणजे अध्यात्म.

किंवा कधीकधी नाते कायमचे संपले असेही म्हणतो, पण कायमचे असे काही संपत नाही; आयुष्य आहे तोवर अनेक शक्यता जिवंत असतात. 

" शेवट नसलेली गोष्ट स्वीकारायला शिकणं म्हणजे अध्यात्म " असे मी म्हणाले तेव्हा अनिश्चितता मान्य करून सद्य परिस्थितीत जे काही असेल त्याचा समरसून अनुभव घेणे, असा काहीसा अर्थ अभिप्रेत आहे... लिव्ह इन द मोमेंट म्हणतात तसं ...😊

अभिव्यक्तीचा पिंजरा

 जगणं सुरू होतं आणि जगता जगता विचार करणंही. मग कधीतरी एक माध्यम, एक आऊटलेट मिळतं; श्रोते मिळतात आणि व्यक्त होणं सुरू होतं. हा एक नवीन, फार लिबरेटिंग अनुभव असतो... स्वातंत्र्याचा, मुक्ततेचा .

अमूर्त विचारांना मूर्त शब्दांत बांधणे सुरू होते आणि मग त्यांना जडत्व मिळायला लागते. त्या अभिव्यक्तीचे सहाजिकच पालकत्व आपल्याकडे येते. श्रोते/ वाचक यांच्या सहमती/ कौतुक यांनी आपले तिच्याशी नाते आजून घट्ट होते. व्यक्त होता होता आपल्या भूमिका, मतं तयार होतात, ती घट्ट होत जातात. 

आणि मग एक टप्प्यावर आपल्यावर यांचा अंमल सुरू होतो. घेतलेल्या भूमिकेला, मांडलेल्या मताला सातत्याने डिफेन्ड करणे ही जबाबदारी बनते. इतकंच नाही, एखाद्या किंवा काही विषयावर मतैक्य झालेल्यांच्या प्रत्येक मताशी सहमती दर्शवणे, पाठिंबा देणे हे camaraderie चे परिमाण बनायला लागते. 

आणि या सगळ्यात आपण आपल्याच भूमिकांच्या पिंजऱ्यात आपल्या मुक्त अभिव्यक्तीला स्वतःहून बंदिस्त करून टाकतो !


प्रेमाचे बदलते रंग ❤️

 #Modernlove_Amazonprime

प्रेम ही सगळ्यात जास्त चर्चिलेली भावना असावी; असंख्य कलाकृती या प्रेमावर बेतलेल्या असतात. ताजमहालासारखे शिल्प असेल, रोमिओ ज्युलियट सारखी कलाकृती असेल, अगणित कवने असतील... सगळ्यांच्या केंद्रस्थानी प्रेम ही संकल्पना आहे.

पण प्रेम म्हटलं की सहसा नायक-नायिका, जालीम दुनियावाले, प्रेमाची यशस्वी परिणिती म्हणजे लग्न, अशा ठराविक साच्याचे विचार मनात येतात. 

दोन व्यक्तींचे सूर जुळणे याला खरे तर बरेच पदर असतात, पण विरुद्ध जेंडरच्या व्यक्तींमधले हे नाते बऱ्याचदा प्रेमाच्या पारंपारिक चौकटीत बसवले जाते. स्नेहाचा परीघ ओलांडून आकर्षणाच्या प्रदेशात नाते जाते तेव्हा एकत्र येण्याची, एकत्र राहण्याची ओढ लागते. आणि एकत्र राहणे, या टप्प्यावर प्रेमाच्या पल्याड जाऊन अनुरूपतेचे, ऍडजस्टमेंटचे विषय येऊ लागतात. यात कधीकधी प्रेम नावाचे स्वप्न विरायला लागते...




त्याचवेळी 'व्यक्ती' केंद्रस्थानी असलेल्या आधुनिक जगण्यात   भावबंध नवनव्या रूपांत समोर येत आहेत आणि त्यातून प्रेम या संकल्पनेचा परीघ विस्तारतो आहे.

अशा अनवट अनुबंधाच्या लोभस कथा म्हणजे " मॉडर्न लव्ह" ही सिरीज. 

न्यूयॉर्क टाइम्स मध्ये याच नावाचे सदर प्रकाशित व्हायचे, त्याचा नंतर पॉडकास्टही आला. त्यावर ही आठ भागांची सिरीज आधारित आहे.

यांत वापरलेले संगीत आणि गाणीही फार सुंदर आहेत.

भेटीचे क्षण !

 आवडत्या व्यक्तीची भेट झाली की वेळ फास्ट फॉरवर्ड होऊन पळायला लागतो.

कधी व्यवधाने सांभाळत, कधी चोरून ठरलेली भेट आणि या चोरलेल्या तुटपुंज्या क्षणांत किती मोठी बेगमी करण्याची धडपड...त्यात कधी तिला निघण्याची घाई तर कधी त्याला. या प्रसंगावर खूप सुरेख गाणी आहेत; इतकी हृद्य सिच्युएशन गीतकरांना इंस्पायर न करती तरंच नवल! 

क्षणिक भेटीबद्दल कातर होता होता बऱ्याचदा क्षणभंगुर आयुष्यावर भाष्य करून जातात ही गाणी, आणि हाती असलेले मोजके क्षण भरभरून जगण्याची सादही घालतात... 

अनारकली चित्रपटातील गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या 'ये जिंदगी उसी की है' मधलं हे कडवं.. 

"धड़क रहा है दिल तो क्या, 

दिल की धड़कनें ना सुन 

फिर कहां ये फ़ुर्सतें,

 फिर कहाँ ये रात-दिन 

आ रही है ये सदा, 

मस्तियों में झूम जा..."


'आज जाने की जिद ना करो' या गजलमध्ये शायर फय्याद हाश्मी यांनीही हीच भावना मांडलीय...

"कितना मासूम रंगीन है ये समा 

हुस्न और इश्क़ की आज मैराज है 

कल की किसको खबर जान-ए-जाँ 

रोक लो आज की रात को"


गुलजार साहेब आँधी मधल्या सुप्रसिद्ध गाण्यातही हेच म्हणतात...

" तुम जो कह दो तो 

आजकी रात चांद डूबेगा नहीं, 

रात को रोक लो 

रात कि बात है, और ज़िंदगी बाकी तो नहीं"


ही भावनाच इतकी युनिव्हर्सल आहे की मराठीतही खेबुडकरांनी असंच काहीसं म्हटलंय, 

"चिरंजीव होई कथा मिलनाची

तृषा वाढते तृप्त या लोचनांची

युगांचे मिळावे रूप या क्षणांना

शब्दरूप आले मुक्या भावनांना"

तेच पुन्हा 'पिंजरा'तल्या लावणीत म्हणतात,

" अशीच ऱ्हावी रात साजणा कधी न व्हावी सकाळ..."


गंमत म्हणजे आंग्लभाषेतही बिली जोएलने

हा भाव त्याच्या एका गाण्यात शब्दबद्ध केलाय, 


"I'll tell you to forget yesterday

This night we are together


This night is mine

It's only you and I

Tomorrow is a long time away

This night can last forever..."

कव्वाली आणि कबीर

 सूफी बाजाच्या कव्वाल्या हा प्रकार आवडायला लागला की माणूस चांगलाच नादावतो.  गाजलेल्या कव्वाल्यांची वेगवेगळी व्हर्जन्स ऐकताना फरीद अयाज आणि अबू मुहम्मद ही जोडगोळी माहीत झाली. त्यांच्या कव्वालीच्या घरगुती मैफिलींचे व्हीडिओ युट्युबवर आहेत. ते पाहताना तो माहौल फार भावला. गायकी तर अस्सल आहेच. तेव्हा सिराज औरंगाबादीची एक चीज ऐकली होती आणि ती ऐकताना कबीर फार आठवला होता.

काल एका फेसबुक पोस्टमध्ये त्या गाण्याची लिंक होती ती ऐकतानाही हाच अनुभव आला. 

 यातले काही शेर ऐकताना कबीराचे काही दोहे अंधुक आठवले. अर्थ तंतोतंत सारखा नसला तरी भावार्थ साधारण तोच. 

सूफी तत्वज्ञान बऱ्याचदा कबिराच्या साहित्यात डोकावते आणि ही कव्वाली सूफी अंगाने जाणारी आहेच, त्यामुळे साम्य जाणवले असावे.  कव्वाली या प्रकारात  शब्दशः अर्थ घेतला तर ती प्रयेसीला उद्देशून असते, पण रूपकात्मक विचार केला तर आध्यात्मिक अर्थ निघतात... त्या अंगाने विचार केला तर ही साम्यस्थळं जाणवतील.

(अर्थात सगळ्यांना तसे वाटेल असे नाही; ओढून ताणून संबंध जोडला असंही वाटू शकतं😊. पण ही सगळी शोधयात्रा माझ्यासाठी फार आनंददायी ठरली. उर्दू, कबिराची खास पंचमेल खिचडी नावाने ओळखली जाणारी भाषा, आणि मराठीत अर्थ मांडण्याचा प्रयत्न करताना झालेली तारांबळ, ही मुशाफिरी करताना जाम मजा आली. म्हणून हे शेअर करत आहे😊)

----------------

"ख़बर-ए-तहय्युर-ए-इश्क़ सुन न जुनूँ रहा न परी रही 

न तो तू रहा न तो मैं रहा जो रही सो बे-ख़बरी रही "

( ~~ एकदा प्रेमाच्या अद्भुत अविष्काराची प्रचिती घेतल्यावर ना सुंदरीचे भान राहिले ना (तिच्यामुळे मला लागलेल्या) वेडाची जाणीव उरली,

न तुझे अस्तित्व उरले न माझे, केवळ बेहोशीची स्थिती उरली~~)


कबीर दोहा : 'जब मैं था तब हरि नहीं अब हरि है मैं नाहीं ।

प्रेम गली अति सांकरी जामें दो न समाई

----------------

"नज़र-ए-तग़ाफ़ुल-ए-यार का गिला किस ज़बाँ सीं बयाँ करूँ 

कि शराब-ए-सद-क़दह आरज़ू ख़ुम-ए-दिल में थी सो भरी रही "

(~~तुझ्या नजरेतल्या दुर्लक्षाची तक्रार मी कुठल्या तोंडाने करू?

(कारण) तुझ्या अभिलाषेच्या शेकडो मद्यप्याल्यांनी माझे हृदय अजूनही भरलेलेच आहे~~)


कबीर दोहा: हम तुम्हरो सुमिरन करै, तुम हम चितबौ नाहि

सुमिरन मन की प्रीति है, सो मन तुम ही माहि।

(~~ मी तुझे नित्यस्मरण करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस,

पण  स्मरण म्हणजे मनाचे प्रेम आहे आणि माझे मन सदैव तुझ्यापाशीच आहे~~)

-----------------------


"वो अजब घड़ी थी मैं जिस घड़ी लिया दर्स नुस्ख़ा-ए-इश्क़ का 


कि किताब अक़्ल की ताक़ पर जूँ धरी थी त्यूँ ही धरी रही "


(~~ तो क्षण विलक्षण होता जेव्हा प्रेमाच्या उपायाची दीक्षा घेतली,

त्या क्षणापासून शहाणपणाचे पुस्तक एका कोनाड्यात कायमचे पडून राहिले~~)


कबीर दोहा: "चतुराई हरि ना मिलय, येह बातों की बात

निसप्रेही निर्धार का, गाहक दीनानाथ।"

--------------------


किया ख़ाक आतिश-ए-इश्क़ ने दिल-ए-बे-नवा-ए-'सिराज' कूँ 

 ख़तर रहा न हज़र रहा मगर एक बे-ख़तरी रही 

(~~ प्रेमाच्या ज्वालेने सिराजच्या या दीन हृदयाला भस्म केले 

आता ना कुठली भीती उरली न शंका, आता फक्त निःशंक निर्भयता मागे राहिली~~)

"सिर राखे सिर जात है, सिर कटाये सिर होये

जैसे बाती दीप की कटि उजियारा होये।"

(डोके वाचवण्याची धडपड केली तर ती असफल होते, पण ते अर्पण करायची तयारी केली की उलट डोके शाबूत राहते,

जसे दिव्याच्या वातीचे टोक कापले की तो अजून प्रकाशमान होतो)

https://youtu.be/QQt791hZ6wQ

कोरोना ७

 सर्दी/ ताप/ थकवा/खोकला ही लक्षणे असताना हा साधा फ्लू सदृश्य आजार आहे अशी स्वतःची समजूत घालून कोव्हीड टेस्ट टाळण्याकडे कल वाढला आहे. काहीजण सांगतात की त्यांच्या डॉक्टरांनी इतर तपासण्या केल्या, सर्दीसाठी गोळ्या औषधे दिली, पण स्वॉब तपासणीची गरज नाही सांगितलं. कधीकधी अगदी सिटीस्कॅन पर्यंत सगळं केलेलं असतं पण कोव्हीड टेस्ट केलेली नसते.

यामुळं होतं काय की काटेकोर आयसोलेशन पाळले जात नाही. त्याने कुटुंबातल्या इतर सदस्यांना, आणि जर रुग्ण बाहेर पडला तर बाहेरच्यांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते.  आजाराच्या सुरुवातीच्या दिवसांत संसर्गजन्यता सगळ्यात जास्त असते, त्यामुळे धोका अजून वाढतो.

 याहून महत्वाचा दुसरी अडचण म्हणजे जेव्हा त्रास वाढतो; म्हणजे दम लागतो किंवा श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, तेव्हा पेशन्ट्स हॉस्पिटलला येतात. ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झालेले असते.

आता अडचण अशी येते की कोव्हीडचा रिपोर्ट हाताशी नसल्यामुळे कोव्हीड सेन्टर मध्ये कुणी दाखल करून घेत नाही. लक्षणांवरून कोरोना आहे हे कळत असतं त्यामुळे बाकीचे हॉस्पिटल्स  ऍडमिट करून घ्यायला अनिच्छुक असतात. कारण तीव्र आजारात जी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लागतात त्यासाठीही कोव्हीड पॉजिटीव्ह रिपोर्ट लागतो आणि ती औषधे मोस्टली  कोव्हीड सेन्टरमध्येच उपलब्ध आहेत, सगळ्यांना सहज मागवता येत नाहीयत. त्यात आता ऑक्सिजन सिलिंडरच्या तुटवड्याचा प्रश्न उभा राहिला आहे.  

या टप्प्यावर पेशंट, नातेवाईक अगतिक होऊन चिडायला लागतात, पण आम्हीही हतबलच असतो. कोविडसदृश्य आजार असतानाही रिपोर्ट येईपर्यंत शक्य तितकी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न असतो, पण त्याला मर्यादा आहेत.

रिपोर्ट येईपर्यंतचा वेळ गंभीर स्थितीतल्या रुग्णांसाठी फार अडचणीचा ठरत आहे.

त्यामुळे सौम्य लक्षणे जाणवली तरी टेस्ट करण्याला प्राधान्य द्या, त्याबद्दल आग्रही रहा. ते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या हिताचे आहे.

मुग्ध चुडे

 गावी अजूनही काही वयस्कर बायका हातभर बांगड्या घालतात, पण आता तरुण पिढीत सहसा कुणी घालत नाही. या बांगड्यांचा आवाज मात्र फार लयदार असायचा. ताक घुसळताना, भाकरी थापताना, केरवारे करताना घरभर किणकिणत असायचा.

आजी एक गाणं म्हणायची पंचमीच्या भुलईत( भुलई म्हणजे फेर), त्यात एक कडवं बांगड्यांबद्दल होतं..

'आला पंचमीचा सण 

कासार भरितो काकण,

हात सैल नको गं चुड्याचा

अवचित वाजतील किणकिण'


कृष्णवरची गाणी ऐकताना 'रिमझिम पाऊस पडे सारखा' ऐकायला मिळालं आणि त्यातलं एक कडवं ऐकून हे सगळं आठवलं.


"हाक धावली कृष्णा म्हणुनी

रोखुनी धरली दाही दिशांनी,

खुणाविता तुज कर उंचावुनी

गुंजत मंजुळ मुग्ध चुडे,

गं बाई गेला मोहन कुणीकडे"



गणपती उत्सवाचा उगम

 श्रीगिरी कुटुंबात प्रवेश झाला तेव्हा गतवैभवाच्या बऱ्याच गोष्टी आमच्या सासऱ्यांकडून ऐकायला मिळाल्या, पण तेव्हा मौज म्हणून ऐकलं आणि सोडून दिलं होतं. 

त्यांना एक घटना विशेष अभिमानास्पद वाटते आणि  दरवर्षी गणपतीच्या दिवसांत आमच्याकडे याची चर्चा होते. त्यांचे आजोबा चंगळप्पा श्रीगिरी यांच्या घरी गौरी गणपतीच्या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक आले होते आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना तिथली गर्दी पाहून सुचली होती. 

 श्रीगिरी यांच्याकडे गणपती आणि गौरीचा उत्सव मोठ्या थाटामाटात व्हायचा; नेत्रदीपक आरास असायची आणि कलावंतांचा गाण्याचा कार्यक्रमही असायचा. लोक आरास आणि गाण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने यायचे. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने झालेली गर्दी पाहून लोकमान्यांना वाटले की याच धर्तीवर सार्वजनिक उत्सव केला तर लोक एकत्र येतील आणि देशकार्यासाठी याचा वापर करून घेता येईल. त्यातून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले.

पुढच्या पिढीतल्या मुलांना हे सगळे कितपत खरे आहे याबद्दल थोडी शंका वाटायची! आमच्या नणंद बाईंनी मात्र याविषयी सकाळ पेपरमध्ये आलेल्या एका जुन्या लेखाचे कात्रण जपून ठेवले होते. आज त्यांच्याकडून  त्या कात्रणाचे फोटो मिळाले. 

नंतर आमच्या सासऱ्यांच्या वडिलांनी सोलापूर सोडले आणि  ते सासरवाडीच्या गावी येऊन स्थायिक झाले; कारण सासूबाई एकुलते अपत्य होत्या.

श्रीगिऱ्यांकडे आता गणेशोत्सव साधा असतो. गावाकडे वेगळा गणपती बसवतात तो अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. इकडे आमचा मात्र दीड दिवसांचाच असतो. यंदा धातूच्याच गणपतीची पूजा केली आहे.

पिढ्यांगणिक बदल होत असतात, तसे उत्सवांचे रूपही बदलत जाते... हर घडी जिंदगी रूप बदलते,  तसे हर पिढी संस्कृती रंग बदलते...



अस्तु ...

 #अस्तु... #so_be_it... 

#आवडलेलं_काही

हे अस्तु या  चित्रपटाचं परीक्षण नाही; आणि लिहिण्याच्या ओघात काही स्पॉइलर्स येऊ शकतात. 

सिनेमाचे तांत्रिक पैलू मला कळत नाहीत. पण चित्रपट हा कलाप्रकार फार आवडतो. विरंगुळा म्हणून, प्रत्यक्षात न आलेले अनुभव व्हर्च्युअली जगता येतात म्हणून, कधी काही उत्तरे मिळतात म्हणून, कधी पर्सनल इज युनिव्हर्सल चा प्रत्यय वेगवेगळ्या भाषेतले सिनेमे देतात म्हणून.

पण एखाद्या चित्रपटटातल्या सगळ्याच बाजू इतक्या रिलेट व्हाव्यात असं क्वचित होतं; तो अनुभव अस्तू ने दिला.

जोडीदार कितीही समजूतदार असला तरी आपला जन्मदाता कणाकणाने निसटून जाताना हतबल होऊन बघावं लागणं, त्या बाबतीतले निर्णय घ्यावं लागणं, हे ओझं एकट्याचं असतं. 

 कुठल्याही नात्यात काही भाग अनोळखीच राहणं, इनसेक्युर वाटणं हेही बऱ्याचदा आपण अनुभवत असतो. 

आणि विशेष रिलेट झालेली अजून एक गोष्ट म्हणजे अमृता सुभाषने गायलेली अंगाई...  लहानपणी गावी आजीकडून ऐकलेल्या अंगाईगीतांसारखीच सेम!

पण सगळ्यात जास्त भिडला तो त्यात केंद्रस्थानी असलेला कोहम हा प्रश्न आणि  आहे हे असे आहे, या स्वीकारापर्यंतचा प्रवास...

थर्ड इयरला असताना मेडिसीनच्या सरांनी वर्गात एक प्रश्न विचारला होता; स्वतःवर वेळ आली तर कुठला रोग तुम्हाला सगळ्यात भीतीदायक वाटेल? माझं उत्तर amnesia होतं.

आपण म्हणजे आपली स्मृती, आणि आपल्या भोवतालाशी आपण कनेक्ट होऊ शकणं, आपला अवेअरनेस... जर या गोष्टी नाहीश्या झाल्या, तर मग जे शरीराचं जगणं असतं त्याला जगणं म्हणायचं? जी माणसं भोवताली आहेत त्यांनी कसं स्वीकारायचं या स्वतःचीही ओळख विसरलेल्या व्यक्तीला?  चन्नम्मा मात्र हे सहज स्वीकारते!

सुरुवातीला शास्त्रींच्या बोलण्यात, केवळ वर्तमान खरा आहे असे मानणाऱ्या, अनित्यतेबद्दल सांगणाऱ्या झेन तत्वज्ञानाचा उल्लेख येतो, आणि निरभ्र आकाशासारखं नीरव शांतता पेलणारं मन असू शकतं असं ते म्हणतात. जगण्याच्या तत्वज्ञानाविषयीचे त्यांचे मत त्यातून कळते.

उत्तरार्धात चन्नम्मा अप्पांची अवस्था पाहून  'याचं मूल झालंय', म्हणते. विचारांच्या गुंत्यात न अडकता निसर्गदत्त वात्सल्याने त्यांची आई होऊन जाते, आणि त्यांना सहज कुटुंबात सामावून घ्यायचं ठरवते. नंतर त्यांची हक्काची माणसं मिळाल्यावर तेही स्वीकारते, मायेने पाठवणी करते, काळजी घ्या इतकंच सांगते. तिला कुठलं तत्वज्ञान माहीत नसेल, पण ती ते जगतीय.

ते पाहताना तिच्या रुपात ते निरभ्र आकाशच दिसत आहे असं वाटत राहतं...


रुखवत आणि कलाकुसर

 डोश्याचे पीठ वापरून प्राजक्ताची फुले बनवलेला फोटो इकडे खूप व्हायरल झाला. मग त्याची मस्करीही वणव्याच्या वेगाने पसरली. अर्थात सध्या फेसबुकवर वणवे कॉमन आहेत. कदाचित मूळ पोस्टकर्तीला हे इतके गाजेल असे वाटलेही नसेल; किंवा शेअर करण्याचा अतिरेक होऊन मग अजीर्ण झाल्यासारखं होऊनही टीका, चेष्टा सुरू झाली असेल.

मला ती फुले बघून निगुतीने हे सगळं करणारीचे कौतुक वाटले. सांगितलं नाही तर पटकन ओळखू येणार नाही इतकी परफेक्ट जमली होती ती फुलं. मला कलाकुसर जमत नाही, त्यामुळंही कदाचित जास्त कौतुक वाटतं अशा गोष्टीचं. वेळखाऊ असेल, पण कुणी कसा वेळ घालवावा आणि अमक्या गोष्टीत  गेलेला वेळ हा तमक्या गोष्टीत गेलेल्या वेळेपेक्षा क्वालिटेटिव्हली इन्फेरियर असतो हे कसं आणि कुणी ठरवायचं? 

एखादं चित्र, रेखाटन, रांगोळी काढायलाही बराच वेळ लागतो, पण ती प्रोसेस नक्की आनंददायी असते.  

यातल्या बऱ्याच गोष्टी स्ट्रेसबस्टरचे काम करतात; क्रिएटिव्ह काही करता येणं इज ए ब्लिस, मग रॉ मटेरियल काही असो.


 काही का असेना, पण ती फुलं पाहून मला मात्र लहानपणी बघितलेला रुखवत प्रकार आठवला आणि आठवणींच्या राज्याची छानशी सैर झाली.

आता कुणी फारसं करत नाही, पण आधी रुखवतात बऱ्याच खाद्यपदार्थांपासून केलेल्या वस्तू असायच्या. शेवयांचा नारळ, शेवयांची वेणी हे दोन आयटम हमखास असायचे. रंगीत पापड, कुरडया, वड्या पण असायच्या( धाकट्या चुलत भाऊजयीचे रुखवतातले पापड आमच्यापर्यंत आले, त्याचा फोटो टाकलाय). सुजीचे पीठ( गहू ओलावून मग दळून आणले जायचे; चाळले की मैद्यासारखे शुभ्र पीठ मिळायचे) वापरून बोटवे केले जायचे, थोडे रंगविरहित आणि थोडे रंगीत. त्याच पिठाची छोटी फुले/ लवंग बनवली जायची. अगदी छोटी टिकलीएवढी लाटी, तिची चौघडी करायची आणि मग त्रिकोणाच्या बेसला ट्विस्ट करायचं, की फुल/लवंग तयार!( लिहिता लिहिता फारच हात शिवशिवले म्हणून कणकेचे करून बघितले. कलाकुसर जमत नाही हे डिस्क्लेमर सुरुवातीला टाकले आहे त्यामुळं फोटोतला पदार्थ पाहून हसू नये; यातल्या एक्सपर्ट मुली बनवतात तेव्हा फार सुंदर दिसतात हे!)

 महादेवाची साखरेची पिंड हा आयटमही हमखास असायचा.

इतर प्रकारात लोकर, बांगड्या, काचेच्या रंगीत नळ्या, असे काहीतरी वापरून केलेले तोरण असायचे.

 नैवेद्य/ पूजेचे ताट झाकण्याचा लोकरी बदकांचा रुमाल असायचा. 

हे सगळं मला करता यायचं नाही, पण थोडी लुडबुड करायला मजा यायची. माझी मोठी मावस बहीण बरंच काय काय करायची, आणि तिची एकाग्रता बघून मस्त वाटायचं.

तिने फार किचकट असणाऱ्या मोती विणून बनवायच्या बांगड्या आणि मोत्याची वेणीही केली होती( मला गुगलवर फुलांची वेणी सापडली, तशी डिझाइन आम्ही प्लास्टिक वायरमध्ये मोती विणून केली होती.)

मी फक्त फुलं, पानं, वाळवून त्याची शुभेच्छापत्र बनवायचे आणि ते करताना फार छान वाटायचं. एक दीड वर्षांपूर्वी तो फील येण्यासाठी मी कुणाला द्यायची नसताना अशी कार्ड्स बनवली होती. 

माझे वडील स्ट्रेसमध्ये असले की पत्त्यांचा बंगला बनवत बसायचे.

आता फूड डेकोरेशन, गार्निशिंग, या गोष्टींना खूप महत्व आले आहे. आधी गावी असला काही प्रकार नव्हता. अगदी दिवाळी, गौरीपूजन सोडलं तर नैवेद्य भरताना आजी भाताची मुदी करण्यातही वेळ घालवायची नाही, इतकी कामं असायची. पण आजोबांनी जर नैवेद्याचं ताट केलं तर ते इतकं देखणं असायचं की आपण देव असायला हवं होतं असं फार वाटायचं!

(फोटो गुगलवरून साभार.)

आँधी आणि 96 ... रात को रोक लो

 बऱ्याच दिवसांपासून 96 या तामिळ चित्रपटाबद्दल वाचण्यात येत होतं. अशात त्याच्या तेलुगू रिमेकबद्दल इथे एक मैत्रिणीची पोस्ट वाचली. मग सलग वेळ काढून बघितलाच. सिनेमा सुंदर आहे, आणि गाणी मधुर. मात्र त्यातली निरागसता, उत्कट प्लेटोनिजम अनुभवायला थोडं टाईम ट्रॅव्हल करून मनाने त्या वयात जावं लागलं. 

यातल्या एका गाण्याच्या लिरिक्सचे सबटाईटल्स वाचताना 'आँधी' मधलं 'तेरे बिना जिंदगी से कोई..' आठवायला लागलं;  'रात को रोक लो' ही इच्छा दोन्हीकडे आहे, कारण रात की बात है, और जिंदगी बाकी तो नहीं, अशी स्थिती आहे.

गंमत म्हणजे 'आँधी' मध्येही दीर्घ काळासाठी ताटातूट झालेल्या दोघांची विरहाचे सावट असलेली भेट चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. पण दोन्हीकडच्या परिस्थितींमध्ये फरक आहे. आणि दोन्हीकडे प्रेम अपयशी ठरले तरी कारणं वेगवेगळी आहेत... आणि बहुतेक या कारणांमध्ये अतिशय बहुचर्चित असूनही अचूक व्याख्या न करता येणाऱ्या प्रेम या इलुजिव्ह संकल्पनेचे काही पैलू दडलेले आहेत. 

 'जानू' मध्ये दोघांची शाळकरी वयातल्या अबोध प्रेमाची अधुरी राहिलेली कहाणी आहे. सहजीवनाची परीक्षा न दिलेली ती झाकली मूठ म्हणजे एक न भरलेली जखम आहे. एकाचे अख्खे मन अजूनही त्या भूतकाळानेच व्यापले आहे; दुसऱ्याने वर्तमानात जगणे स्वीकारले असले तरी मनाच्या तळाशी अजूनही ही जखम भळभळते आहे. 

'आँधी' मध्ये  दोघांनी प्रेमाला लग्नाच्या सोपानापर्यंत नेलेले आहे. त्यानंतर सहजीवनाच्या अग्निपरिक्षेत मात्र दोघेही होरपळले आहेत आणि फक्त प्रेम पुरेसे नसते; दोन स्वतंत्र व्यक्ती प्रेमात स्वतःचे अस्तित्व विरघळून टाकू शकत नाहीत, हे उमजून त्यांनी स्वतःच्या मर्जीने वेगळ्या वाटा चोखळल्या आहेत. 


 जानू मधला नायक एका पेटीत त्या काळातल्या वस्तू जशाच्या तश्या जतन करून ठेवतो... प्रेमाचेही तसेच असावे.. निगुतीने जतन करून ठेवले तर मूळ रुपात सुस्थितीत राहील, पण जगण्याच्या लढाईत उतरवले तर ते आहे तसे अढळ राहून तग धरू शकेल याची खात्री नाही. जसे सोन्याचे असते; शुद्ध स्वरूपातले सोने सगळ्यात मौल्यवान, पण त्याचा दागिना घडत नाही. दागिना म्हणून वापरात आणायचं असेल, तर सोन्यात हीण मिसळायला लागते. मग दागिना तयार होतो, पण सोन्याचा कस आधीसारखा  राहत नाही!

समटाइम्स विंड अँड ...

 सकाळी बटाटे उकडायला टाकले आणि अचानक शाळेत अभ्यासाला असलेली एक कविता आठवली. Children's song नावाची कविता होती. कविता समजावून सांगण्याआधी मॅडम कवितेचं सामूहिक वाचन करायला सांगायच्या. उत्साहात आणि तालात sometimes wind and sometimes rain अशी जोरात सुरुवात केली होती पण पुढे वाचता वाचता सगळ्यांचाच आवाज कमी कमी आणि कावराबावरा होत गेला होता, हे अजून आठवतंय. 

यातल्या बटाट्याचा संदर्भ तेव्हा नीट कळला नव्हता. आमच्याकडे बाजारात जास्तकरून आजूबाजूला पिकणाऱ्या भाज्या मिळायच्या; कधी रानभाज्या, डाळी टाकून भाज्या केल्या जायच्या. बटाटा इतका कॉमन नव्हता. बटाट्याची भाजी कधीतरी सणासुदीला व्हायची, बटाटा म्हणजे भारी पदार्थ असं वाटायचं. त्यामुळं बटाटे खायला मिळत असताना त्यांवर कसंबसं भागवावं लागतं असा सूर कवितेत का आहे, अशी शंका कविता वाचताना आली होती. मग मॅडमनी इंग्लंडमध्ये बटाटा हा कठीण काळातला पोटभरीचा पदार्थ आहे असं स्पष्टीकरण दिलं होतं. 

आज वेगळ्या संदर्भात बटाटा हीच भूमिका वठवत आहे, आणि आता कवितेतला संदर्भ अचूक कळतोय. 

पूर्ण कविता आठवत नव्हती, ती नेटवर शोधली. वास्तवदर्शी आहे, पण Then the sun comes back again या ओळीमुळे आशावादही डोकावतोय.


Children's Song


by Ford Madox Ford


Sometimes wind and sometimes rain,

Then the sun comes back again;

Sometimes rain and sometimes snow,

Goodness, how we'd like to know

Why the weather alters so.


When the weather's really good

We go nutting in the wood;

When it rains we stay at home,

And then sometimes other some

Of the neighbors' children come.


Sometimes we have jam and meat,

All the things we like to eat;

Sometimes we make do with bread

And potatoes boiled instead.

Once when we were put to bed

We had nowt and mother cried,

But that was after father died.


So, sometimes wind and sometimes rain,

Then the sun comes back again;

Sometimes rain and sometimes snow,

Goodness, how we'd like to know

If things will always alter so.

पुराणकथांचे जग

 मागच्या वर्षी लेकीला सोबत करायची म्हणून अव्हेंजर्स एंडगेम बघायला गेले होते. पिक्चर खूप आवडला, पण कसलेच संदर्भ माहीत नव्हते. मग हळूहळू टीव्हीवर जमेल तसे एमसीयू चे सिनेमे बघणं सुरू झालं. लॉकडाऊन कृपेने मात्र जवळजवळ सगळ्या मुव्हीज पाहून झाल्या आणि बघून, सोबत थोडं नेटवर वाचून बऱ्यापैकी संगतीही लागली.  थॉरबद्दल वाचताना नॉर्स मिथकांबद्दल कुतुहूल चाळवलं. तसाही मायथॉलॉजी हा विषय आवडीचा; त्या अद्भुत गोष्टी, त्यातले कधी कळणारे कधी न कळणारे गर्भितार्थ, त्यातली प्रतीकं, काही गोष्टींचा अजूनही शाबूत असलेला रेलेव्हन्स यांची नेहमीच भुरळ पडते...  तर नॉर्स पुराणकथांविषयी वाचायला सुरुवात केली.

    गंमत म्हणजे त्यातून एका दुसऱ्याच संदर्भातली माहिती मिळत गेली.

'लॉर्ड ऑफ द रिंग्स' या महाकादंबरीचे लेखक जे. आर. आर. टॉल्कीन यांनी त्यांच्या पुस्तकांत विश्वामित्रासारखी एक प्रतिसृष्टीच उभी केली आहे. त्यात चार युग आहेत; तिसऱ्या आणि चौथ्या युगातल्या घटनांचे वर्णन 'हॉबिट' आणि 'लॉर्ड ऑफ द रिंग्स' मध्ये आढळते, तर पहिल्या दोन युगांतल्या घटना 'द सीलमॅरिलिऑन' या तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या पुस्तकात आहेत. 'मिडल अर्थ' असे नाव दिलेल्या या जगाच्या उत्पत्तीची रम्य कथाही यात आहे. या सगळ्यांमध्ये नॉर्स मायथॉलॉजी खूप प्रमाणात वापरली आहे हे लक्षात आलं. तेव्हा टॉल्कीन यांनी अगदीच शून्यातून नवनिर्मिती केली नसून काही ठिकाणी पौराणिक पात्र, तर कुठे जुन्या कथाच वेगळ्या वेषात मांडलेल्या पाहून थोडी खट्टू झाले. पण नंतर विचार केल्यावर जाणवलं की पूर्णपणे ओरिजिनल असे काही बहुधा नसते. तेच धागे घेऊन प्रत्येकजण वेगवेगळे वस्त्र विणतो; त्या विणकारीच्या कसबाचे कौतुकच !

अजून एक समजले की बऱ्याच संस्कृतींच्या मिथकांमध्ये साम्य आढळतं; कारण त्यांचा उगम मुळात प्रोटो इंडो युरोपियन भाषा बोलणाऱ्या मूळ समूहापासून झालेला आहे

त्यामुळं "विश्वाची उत्पत्ती होण्याआधी सगळीकडे पाणी होते आणि एक अंडे होते;  एक दैवी तत्वाच्या हस्तक्षेपाने मग त्यातून विश्व निर्माण झाले", ही संकल्पना बऱ्याच ठिकाणी आढळते. या प्रक्रियेत संगीत किंवा स्वराचा सहभागही बऱ्याच ठिकाणी आहे.

ही सगळी शोधाशोध करताना 'यारसानिजम' नावाच्या एका कुर्दीश प्रांतात असलेल्या धर्माची ओळख झाली. यातली रोचक बाब म्हणजे इस्लामी जगताने वेढलेल्या या धर्मसमूहाच्या बऱ्याच संकल्पना हिंदू मान्यतांशी जुळणाऱ्या आहेत. त्यांच्यातही चार युग आहेत; प्रत्येक युगात देव अवतार घेतात ही श्रद्धा आहे, पुनर्जन्म आणि आत्म्याचा जन्म- जन्मांतरीचा प्रवास या संकल्पनाही आहेत. आपण गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार मानलं, तसं यांनी इमाम अली या इस्लाममधल्या चौथ्या खलिफाला त्यांच्या  देवाचा  अवतार मानले आहे. 

या अशा धर्मांचे मूळ, आधी सामायिक असणाऱ्या इंडो इराणीयन समूहात आहे. 

मनुष्य समूहांचे स्थित्यंतर आणि जगभर फैलाव होत गेला तरी त्यांच्या उगमाच्या खुणा धार्मिक-सांस्कृतिक मिथकांच्या, प्राचीन प्रार्थना आणि स्तोत्रांच्या रुपात जतन होऊन राहिल्या असाव्यात. 

आज वेगळ्या, अपरिचित वाटणाऱ्या संस्कृतींशी, त्यांच्या मिथकाधारीत फँटसीप्रकारच्या साहित्याशी, कलाकृतींशी आपण समरस होतो, कनेक्ट होतो त्यामागे या सामायिक वारश्याचाही हातभार असावा. कुठेतरी खोल अजूनही आपल्या जीन्समध्ये ती जन्मांतरीची ओळख शाबूत असावी ...!

ज़िन्दगी ख़ाक न थी ...

 गाणी सुरू असली की स्वयंपाकघरातला वेळ फार छान जातो. मघाशी फरीदा खानुम आर्जवी स्वरात "कल की किसको खबर जानेजा, रोक लो आज की रात को", म्हणत होत्या. आणि एक गमतीशीर विचार मनात चमकला; खरंच उद्या जगाचा अंत होणार असेल तर आजची रात्र शेवटची! 

लगोलग "रात की बात है, और जिंदगी बाकी तो नहीं " असं व्याकुळ होऊन म्हणणारा संजीवकुमार आठवला, " शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो" म्हणणारी साधना आठवली... आणि " वही राज-ए- दिल कहने की रात आयी" म्हणणारे रफीसाबही आठवले.

हाताशी काही तासच आहेत म्हटल्यावर खरोखर काय करायला हवं? तसंही इतक्या कमी वेळात काय करू शकतो, काय बदलू शकतो !

जे जगत आलो त्याबद्दल विचार केला तर कुठले पारडे जड होईल; कृतार्थतेचे की रिग्रेट्सचे? 

काय काय राहून गेलं... साधं बोलणं सांगणं सुद्धा; कधी मन तर कधी मान राखायचा म्हणून, कधी भीड म्हणून, कधी ही वेळ योग्य नाही म्हणून अव्यक्त राहिलेले किती काय असेल. काही छोट्या मोठ्या इच्छा असतील; नंतर बघू म्हणत एक बकेट लिस्ट बनवून त्यात भरून ठेवल्या असतील. काही शिखरं असतील, साद घालणारी पण सर न झालेली... 

दुसरीकडे जन्माचे सार्थक झाले, असे वाटायला लावणाऱ्या काय अचिवमेंट्स असतील; वैयक्तिक उत्कर्षाच्या असतील की कौटुंबिक साफल्याच्या? आपल्याला आयुष्याने किती भरभरून दिलं म्हणून डोळ्यात कृतज्ञता दाटून येईल, की life was too unfair असं वाटून दुःखाच्या अश्रूंनी डोळे वाहतील...?

बहुतेक वेळा आयुष्य कालचा कल आणि उद्याच्या कलमध्येच फार वेळ घालवतं. 


हे डोक्यात आलं आणि काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका उर्दू मालिकेचं टायटल सॉंग आठवलं. 'जिंदगी गुलज़ार है' नावाची सिरीयल; त्यात एपिसोडच्या शेवटी लागणारं, 'जिंदगी खाक न थी, खाक उडाते गुजरी',  हे गाणं अविस्मरणीय आहे. लिरिक्स अतिशय अर्थपूर्ण आहेत आणि संगीत संयोजन आधुनिक धाटणीचे. हादिका कियानी नावाच्या अतिशय प्रसिद्ध पाकिस्तानी गायिकेने हे गीत गायलंय. 

गाण्याचा अचूक अनुवाद  करता येणं मलाही कठीण आहे; पण ढोबळ अनुवाद केला आहे( काही दुरुस्ती असेल तर स्वागत) . उर्दूतले काही शब्द बहुअर्थी आहेत, उदा.गुजरी म्हणजे व्यतित झाली असा अर्थ होतो आणि सोसणे असाही अर्थ होतो(उदा: हम पे क्या गुजरी क्या बताये). त्यामुळंही अनुवाद करताना चुका होऊ शकतात. तसेही पद्य रचनेचे अर्थ फक्त मूळ कवीच अचूक स्पष्ट करू शकतो; आपण फक्त ढगात आकार शोधतो, आणि आपल्या मनातल्या ऋतूनुसार आपले आकलनही बदलत राहते!

 गाभा हा आहे की आयुष्य व्यर्थ नसतं, पण बऱ्याच व्यर्थ गोष्टींमध्ये वाया जातं....


 

ज़िन्दगी ख़ाक न थी, ख़ाक उड़ाते गुज़री

तुझसे क्या कहते, तेरे पास जो आते गुज़री


दिन जो गुज़रा तो, किसी याद की रौ में गुज़रा

शाम आई तो कोई ख़्वाब दिखाते गुज़री


अच्छे वक़्तों की तमन्ना में रही उम्र-ए-रवां

वक़्त ऐसा था के बस नाज़ उठाते गुज़री


ज़िन्दगी जिसके मुक़द्दर में हों ख़ुशियां तेरी

उसको आता है निभाना सो निभाते गुज़री


ज़िन्दगी नाम उधर है किसी सरशारी का

और उधर दूर से एक आस लगाते गुज़री


रात क्या आई के तन्हाई की सरगोशी में

हू का आलम था, मगर सुनते-सुनाते गुज़री


बारहा चौंक सी जाती है मुसाफ़त दिल की

किसकी आवाज़ थी ये, किसको बुलाते गुज़री....

---- नसीर तुराबी 


आयुष्य म्हणजे धूळ नव्हती, पण धूळ उडवण्यात बरंच आयुष्य गेलं,

त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत (ते जवळून कळेपर्यंत) खूप काही सहन करावं लागलं.

चांगला काळ येईल या आशेवर जगताना बरचसं आयुष्य काळाच्या तालावर जुळवून घेण्यातच गेलं.

ज्याच्या नशिबात जीवनाचे आनंद असतात, त्याला ते पेलताही येतात; मग ते उपभोगण्यात त्याचं आयुष्य सुखनैव व्यतीत होत राहतं.

कुठे आयुष्य म्हणजे अखंड धुंदी आहे , तर कुठे एका आकांक्षेच्या पूर्तीच्या प्रतिक्षेत ते संपतंय.

अंतर्मनाचा प्रवास पाहताना परत परत आश्चर्य वाटतं, ही साद नेमकी कुणाची होती आणि ती कुणाला हाक देत होती...

तोच चंद्रमा नभात...

 झोपताना वारं वारं करत लेकाने पडदे बाजूला सारलेले असतात.

मग पहाटे उठून उजेड डोळ्यावर येऊ नये म्हणून पडदे नीट लावायचे ...

या साधनेचे फळ म्हणून की काय आज निसर्गदेवतेने अप्रतिम नजारा दाखवला... पूर्वेला सुर्याएवजी चंद्रोदय झालेला, सोबत शुक्राची चांदनी लखलखत होती. नीरव शांतता, क्वचित एखाद्या पाखराचा आवाज , समोर निळाई आणि चंद्राची कोर... भान हरपायला झालं. 

असाच चंद्र हंपीला दिसला होता; तीन वर्षांपूर्वी... 

अडीच दिवसांत हम्पी दर्शन दाटीवाटीने बसवलं होतं, आणि प्रत्येक ठिकाणी उशीर होत होता. खूप छान विस्तृत माहिती देणारा गाईड, आणि स्तिमित करणारी विलक्षण मॉनुमेंट्स, यामुळं वेळ लागणं अपरिहार्य होतो.

महानवमी डिब्बा नावाच्या चौथाऱ्याजवळ पोहोचलो तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाली होती, कुणी टुरिस्ट दिसत नव्हते.  आम्ही पायऱ्या चढून चौथऱ्यावर गेलो.

क्षितिजावर चंद्र दिसत होता; आम्ही जमिनीच्या काही फूट वर होतो ... काहीतरी विलक्षण शांतता होती त्या क्षणांमध्ये; बडबड करणारी लेकही शांत होत तिच्या दादाला बिलगली होती. समाधी अवस्था काय असते मला माहीत नाही, पण ते क्षण फार वेगळे होते... काळ थांबल्यासारखे, आणि जगात दुसरं काही नाही, फक्त आकाश आणि चंद्र इतकंच काय ते अस्तित्वात आहे असं वाटायला लावणारे.

ती शांतता अनुभवण्यासाठी तरी हंपीला परत जायला हवं असं मला फार वाटायचं.

आजच्या चंद्रोदयात तसंच हरवून जायला झालं.. मग जाणवलं भावनांना विशिष्ट चौकटीचे बंधन नसते...एखादी भावना एका विशिष्ट फ्रेमवर्कमधून आली तरंच खरी असे नाही; लेबल वेगळं असूनही मनात तो भाव जागृत होऊ शकतो...!



वळू आणि पुलं

 वळू चित्रपट आम्हा दोघांना आणि मुलांना बेहद्द आवडला होता. घरात डीव्हीडीवर इतक्यांदा बघितला की तोंडपाठ झाला. अजूनही आम्हा चौघांपैकी कुणीतरी एखादा संवाद म्हणतं आणि मग बराच वेळ आमचा तो थ्रेड सुरू राहतो. गंमत म्हणजे मी खूप जणांना तो पिक्चर रेकमंड केला, पण सगळ्यांनाच काही तो तितका आवडला नाही. मग माझ्या लक्षात आलं की त्यातले बारकावे ग्रामीण भागाशी ओळख असेल तरंच लक्षात येतात, नाहीतर ते विनोद इतके रिलेट होत नाहीत. 

पुलं यांच्याबाबतीत माझं लहानपणी असं झालेलं.  बटाट्याची चाळ वाचायला घेतलं होतं. विनोदी लेखक म्हणून अतिशय फेमस असणाऱ्या या लेखकाकडून अपेक्षाही खूप होत्या. त्यामानाने ते पुस्तक काही तितके भावेना, आणि त्यातले विनोदही तितके विनोदी वाटेनात.. यापेक्षा द.मा मिरासदार आणि शंकर पाटील फार भारी लिहितात असं वाटलं होतं. कारण शहरी जगाची तितकी ओळखच नव्हती; चाळ नेमकी कशी असते हेच माहीत नव्हतं. 

मग एक प्रवासवर्णन वाचलं, आणि बाकी पुलं वाचायचे राहून गेले ते गेलेच. 

  एका मित्राच्या पोस्टमुळे त्यांची पुस्तकं परत वाचायला सुरुवात केली. आता त्यांनी वर्णलेलं जगही बरंच डोळ्याखालून आणि कानांवरून गेलं होतं. या टप्प्यावर मात्र फार आवडले पुलं.

 माझ्या जगण्याचं एक वर्तुळ पूर्ण होत होतं... भाबडेपणा ते प्रॅक्टिकल जगाशी ओळख, मग सगळा स्वप्नाळूपणा संपत जाणं आणि थोडं कडवट होणं; इथपासून ते आयुष्य म्हणजे पूर्ण पॅकेज असतं, सिलेक्टिव्हली घेण्याचा चॉईस नसतो त्यामुळं उगीच वाईटावर फोकस करून कटुता बाळगण्यापेक्षा चांगल्या गोष्टींकडे जास्त पाहावे, थोडा भाबडेपणाही जपावा, थोडा स्वप्नाळूपणाही, अध्येमध्ये दडण्यासाठी थोड्या पळवाटाही असाव्यात, ही समज येऊन हे वर्तुळ पूर्ण होत असताना हा लेखक वाचायला घेतला आणि यावेळी फार रिलेट झाला.

आता आपल्या मर्यादित अवकाशात शक्य तितकं समृद्ध जगण्याची; परीघ ओलांडता येत नसेल हरकत नाही, पण त्याबाहेरच्या वेगळ्या जगाबद्दल समानुभूती ठेवण्याची; जिंदगी गुलझार है यावरची श्रद्धा वृद्धिंगत करण्याची आजन्म शिकवणी सुरू झाली आहे या आजोबांकडे !


लॉकडाऊन आणि वॉशिंग मशीन दुरुस्ती

 तब्बल अडीच महिन्यांनी तिचा अबोला संपला. तिचा आवाज ऐकू आला आणि कान तृप्त झाले; एखादी अप्रतिम सुरावट ऐकतोय असं वाटायला लागलं...

आता एरवी वॉशिंग मशीनचा आवाज हा कर्कश प्रकारात मोडू शकतो.... तो सुरेल वाटण्यासाठी अडीच महिने हाताने कपडे धुण्याची तपस्या झालेली हवी!

आधी लॉकडाऊनमुळे आणि मग काही दिवस आमच्या अडचणींमुळे मेकॅनिक येऊ शकत नव्हते. शेवटी काल तो सुदिन उगवला. दुपारी साबळे भाऊ आले( हे आमचे ऑल राऊंडर इलेक्ट्रिशियन कम मशीन रिपेअरर कम अजून बरंच काही; ते handyman का काय म्हणतात तसे). मशीनच्या ड्रम मध्ये लिकेज होता, तो त्यांनी रिपेअर करायला घेतला. धुवायचे सगळे कपडे बादलीत भरून, "आजपासून काय तुम्हाला हात लावत नसते मी", म्हणत मी निवांत बसले.

 दुपार उलटून गेली, ढल गया दिन हो गयी शाम झाली, तरी ड्राय बाल्कनीतून काही खबर येईना. हिंदी सिनेमात डॉक्टर तोंडावरचा मास्क खाली घेत ऑपरेशन थिएटरमधून  गंभीर चेहरा करून बाहेर येतात, तसे रात्री आठ वाजता साबळे भाऊ बाहेर आले, आणि बॅड न्यूज दिली, 'इथे नाही होणार, ड्रम घरी नेतो.'

मोठ्या टेचात दूर लोटलेल्या बादलीतल्या कपड्यांना परत अटेंड करावं लागलं.

आज सकाळी येऊन त्यांनी दुरुस्त केलेला ड्रम बसवला आणि जीव सिंकमधल्या भांड्यांत पडला. पण ट्रायल घेताना परत लक्षात आलं ड्रम नीट झाला, आता हिटर लीक होतोय!

भाऊंना विचारलं, 'आज कपड्यांचं काय करू, धुवून टाकू की थांबू?' 

त्यांना मशीन दुरुस्तीच्या आव्हानापुढे माझा प्रश्न किरकोळ वाटला असणार.

पण कसं असतं, उपाय नाही म्हटल्यावर माणूस सहन करतं; पण एकदा उपाय दृष्टिपथात आला की पेशन्स ठेवणं कठीण व्हायला लागतं !

सुदैवाने ते लिकेज छोटं होतं. प्रॉब्लम अरलडाईट लावून सुटला. मग त्याला वाळायला वगैरे ठेवलं, आणि शेवटी आज रात्री ठीक आठ वाजता वॉशिंग मशीन व्यवस्थित सुरू झाली...

 कितीतरी दिवसांनी मशीनच्या मंजुळ स्वरांनी घर भरून गेले आहे!

लगीनसराई

 


उन्हाळा म्हणजे लग्नांचा ऑफिशियल मौसम. उन्हाळी सुट्टीची सोय बघून बहुतेक लग्नं उन्हाळ्यात होतात. साधारणपणे मे हा सर्वाधिक पॉप्युलर महिना; इकडे सूर्यनारायण फॉर्मात आणि तिकडे लग्नं जोमात!

आता अशात उन्हाळ्याच्या त्रासाला घाबरून तुळशीचं लग्न झाल्यावर ख्रिसमसच्या सुट्ट्या पाहून हिवाळ्यात लग्न होत आहेत; पण ते म्हणजे आजकाल कुठल्याही महिन्यात कैऱ्या मिळतात तसंय; खरं लोणचं ते उन्हाळ्यातलंच, तसं खरी लग्नाची मजा उन्हाळ्यातच! 

 नवरीचा शालू, नवरदेवाचा सूट, स्टेजवरचा 'वारं कमी, आवाज जास्त',  वाला मोठा स्टँडवाला फ्यान, पिटुकले रुमाल घेऊन नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरचा घाम नजाकतीने पुसणाऱ्या करवल्या, दोन स्ट्रॉ टाकलेली एक थम्सपची बाटली, घाम पुसत जेवणावर  ताव मारणारे वऱ्हाडी, कितीही केला तरी कमीच पडणारा आणि शेवटीशेवटी पाणी टाकून वाढवलेला मठ्ठा... हे खरे लग्न!

अशा या लग्नाचा पहिला पडाव म्हणजे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम... साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये "पोरगी पाहायला जायचंय" हा सगळ्यात महत्वाचा इव्हेंट सुरू होतो; तो मग एप्रिलमध्ये आणि काही अगदीच उशिरा उजाडलेल्यांसाठी मेमध्येही सुरू राहतो.

गावाकडे लग्न ठरवताना पहिला टप्पा म्हणजे मुलगी दाखवणे, त्यात पसंती झाली की मुलीकडचे लोक मुलाचं घर पाहायला येतात. त्यांना घरदार पटलं, की ते मुलाकडच्यांना बैठकीचे आमंत्रण देतात.

मग बैठक नावाचा वर्ल्डफेमस कार्यक्रम होतो. 

पण ते नंतर, आधी मुलगी बघणे हा कार्यक्रम ...😊

काहीजणांना, किंबहुना बऱ्याच जणांना ही पद्धत मुलींसाठी अपमानकारक, अन्याय्य वाटू शकते. समज आल्यावर मलाही वाटायला लागली, पण बरीच वर्षे गावाकडे अवतीभोवती हेच वास्तव होतं, अजूनही काही प्रमाणात आहे. जे बरीच वर्षे बघत आले, ज्या घडामोडींनी हे एक दोन महिने व्यापलेले असतात, ते सहज मजेत मांडलं आहे... कृहघे 😊.


 तर गावात काही ज्येष्ठ, काही मध्यमवयीन मंडळी लग्न जमवणे या कामात निष्णात असतात. कुणाला आपल्या मुलाचं/ मुलीचं/ भाच्याचं /पुतणीचं लग्न करायचं असलं की या मंडळींना आधी सगळा बायोडाटा दिला जातो. त्यांच्या डोक्यात सगळा डेटा फिट असतो. ते दोन चार अनुरूप स्थळं सुचवतात. मुलगी असेल तर तयारी किती? आणि मुलगा असेल तर अपेक्षा किती? हे सगळ्यात कळीचे प्रश्न. याचं उत्तर नीट खरंखुरं द्यायचं असतं. कारण पुढच्या सगळ्या वाटाघाटी त्यानुसार होणार असतात.

मुलीच्या घरच्या कर्त्या पुरुषाला मग हे मध्यस्थ भेटतात; किती भारी स्थळ आलंय हे सांगतात. मग बघण्याचा कार्यक्रम ठरतो.

मुलाकडे मग लगबग सुरू होते. 

मुलगी बघायला कोण जाणार याची यादी ठरते. मानपानानुसार मोठे चुलते-चुलती, मामा-मामी या मेम्बरना प्राधान्य असतं. मुलाची लग्न झालेली बहीण असेल तर ती आणि जावाईबापू यांचाही मान ठेवायला लागतो. यातल्या कुणाचं तरी एक लहान मूलही बाय डिफॉल्ट सोबत असतं. मध्यस्थ तर असतातच. या सगळ्यात मेम्बर जास्त व्हायला लागले तर बऱ्याचदा मुलाच्या आईचाच नंबर कट होतो. 

मुलगी बरी वाटली तर पाहण्याच्या सेकंड राऊंडसाठी काही अनुभवी महिला सदस्य राखीव ठेवले जातात.

या कार्यक्रमाला सार्वजनिक वाहनातून जायचं नसतं; घरात गाडी नसेल तर भाड्याची गाडी ठरवली जाते (आमच्याकडे गाडी बांधणे म्हणतात). मग ही सगळी वरात मुलीकडच्यांकडे निघते.

 बायांनी शक्य तितके दागिने आणि अगदी रेशमी नाही पण बऱ्यापैकी भारी साड्या नेसलेल्या असतात ( यावरून "माझ्याकडं एकही चांगली नवी साडी नाही, कधी म्हणून तुम्ही काही घेऊन देत नाही. कितीवेळा हे एकच लुगडं गुंडाळायचं, नशीबच दरिद्री माझं😢" असा एखादा सुखसंवाद मामा- मामी, काका-काकू यांच्यात घडलेला असतो!).

दिलेल्या वेळेत पोहोचणं फाऊल असतं; साधारण एखादा तास उशिरा मंडळी पोहोचतात. आधी तर पहिल्या राउंडला मुलगा नसायचाच, पण आता मुलीकडचेही थोडे पर्टीक्युलर झालेत, त्यामुळं बऱ्याचदा मुलगा सोबत असतो.

इकडं मुलीच्या घरी सकाळपासून नुसती गडबड सुरू असते. बाहेरगावचे पाहुणे असतील आणि दुपारची वेळ असेल तर सहसा पूर्ण स्वयंपाक केला जातो; भर दुपारी पोहे कोण खाणार हा हिशोब. आणि पोहे केले तर त्यांना इकडे नुसते पोहे म्हणतात, कांदेपोहे कुणी म्हणत नाही. पोह्यांसोबत मग सहसा शिरा असतो. 

घराचा दिवाणखाना मस्तपैकी आवरला जातो. सतरंजी, खुर्च्या लोड-तक्के मांडले जातात. मोठी सतरंजी गल्लीत काहीजणांकडेच असते, ती सकाळीच आणून ठेवली जाते. पाहुणे जास्त संख्येत येणार असतील आणि घरात नसतील तर शेजारी-पाजारी विचारून ज्यादा खुर्च्या, चमचे, प्लेट सगळं जमवलं जातं. अशावेळी सगळं पटापट पुरवलंही जातं.

मुलीचं तयार होणं हा एक स्वतंत्र अध्याय असतो. ती एकाच वेळी घाबरलेली आणि चिडलेली असते आणि तिला आईची कुठलीच साडी आवडत नसते. नुकतंच लग्न होऊन आलेल्या कुठल्यातरी वहिनीची थोडी लेटेस्ट फॅशनची साडी मग आणली जाते.  त्याच वहिनीकडे मग तिचं मेकप डिपार्टमेंट सोपवलं जातं. "होटं रंगवू नका गं, बरं नाय दिसत",  या सूचनेसकट !

दुसरीकडे जो मेनू ठरलाय तो बनवण्यासाठी सदस्य नेमले जातात. धाकटी काकू, मामी, वहिनी, एखादी सुगरण शेजारीण असे कुणीतरी ही जबाबदारी खांद्यावर घेतं.

मुलीची आई सहसा सगळं कोऑरडीनेट करत असते. आणि मुलगी स्वतः कधीही ते पोहे बनवत नसते; बहुतेक वेळा सर्व्हही करत नसते. ती नेमलेल्या खुर्चीवर किंवा पाटावर डोक्यावर/ खांद्यावर पदर घेऊन नुसती येऊन बसते. 

तर अशी सगळी तयारी झाली, की वाट बघणे सुरू होते. मुलीकडची मानाची मंडळीही एव्हाना यायला लागतात. आधी 

"पाहुणे घरून केव्हा निघालेत" याची खातरजमा करायला लँडलाईन फोन वापरले जायचे. आता मोबाईलमुळे क्षणा क्षणाला रिपोर्ट मिळत राहतो. 

एकदाची गाडी दारात येते, आणि मग पाहुण्यांना हातपाय धुवायला पाणी, टॉवेल द्यायची लगबग सुरू होते.

इकडे मुलीला शेवटचे मेकप टच( म्हणजे परत एकदा थोडी पावडर लावणे, पदराची पिन काढून परत लावणे इ,) देणे सुरू होते.

स्वयंपाकघरात सगळी तयारी करून ठेवलेले  पोहे फोडणीला टाकले जातात.

 हाश- हुश्श करत एकदाचे सगळे पाहुणे त्या सजवलेल्या दिवाणखान्यात विराजमान होतात, आणि मग सोहळ्याला सुरुवात होते...  


(क्रमशः😊)

नेबरहूड मधला भला माणूस

 साधारण दोन वर्षांपूर्वी इथेच फेसबुकवर एक छोटा व्हिडीओ पाहिला होता. लहान मुलांसाठी टीव्हीवर कार्यक्रम करणारी एक व्यक्ती अमेरिकन सिनेटसमोर अशा कार्यक्रमांचे फंडिंग कमी करू नये यासाठी बाजू मांडत होती. अतिशय साधे आणि निखळ निवेदन होते, आणि एक कविता वाचली होती त्यांनी. ते सगळं इतकं टचिंग, इतकं प्रामाणिक होतं की डोळ्यात पाणी आलं. 

त्यानंतर गुगलवर शोध घेऊन फ्रेड रॉजर्स यांच्याबद्दल माहिती मिळवली. त्यांच्या कार्यक्रमाचे व्हिडीओज बघितले. रॉजर्स त्यांच्या 'मिस्टर रॉजर्स नेबरहूड'  या टीव्ही शोच्या माध्यमातून लहान मुलांना सहज सोप्या पद्धतीने दैनंदिन प्रसंगांमध्ये भावनिक समायोजन करायला शिकवायचे. मुलांच्या भावविश्वात येणाऱ्या छोट्या आणि मोठ्या वादळांबद्दल आणि ती हाताळण्याबद्दल ते सोप्या, अभिनिवेश विरहित पद्धतीने सांगायचे. जोडीला एखादी कविता, गाणं असायचं.  हा कार्यक्रम तीस वर्ष चालला आणि यात त्यांना सहकार्य मिळाले ते मार्गारेट मॅकफरलँड  या बालमानसशास्त्रज्ञाचे. मार्गारेट प्रत्येक भागाची संहिता वाचायच्या आणि त्यांना उपयुक्त सूचना द्यायच्या. हा कार्यक्रम खूप लोकप्रिय होता, त्यांनी असंख्य मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं अनुभवविश्व समृद्ध केलं.

१९९८ साली एस्क्वायर मॅगझिनने अमेरिकन नायकांवर एक अंक काढायचं ठरवलं आणि फ्रेड रॉजर्सची मुलाखत घेण्याचं काम टॉम जुनोद या पत्रकाराला दिलं. टॉम जुनोद हा उपरोधिक, तिरकस लिखाणाबद्दल (कु)प्रसिद्ध, आणि त्यांच्या काही मुलाखती विवादास्पद ठरल्या होत्या.

 त्यामुळं सिलेब्रिटींचे वाभाडे काढणाऱ्या या पत्रकाराला मुलाखत द्यायला बरेच हॉलिवूडकर अनिच्छुक असायचे. पण फ्रेड रॉजर्स सहर्ष तयार झाले.

टॉम जुनोदना मात्र या टू गुड टु बी ट्रू माणसाची नेमकी कशी स्टोरी बनवावी याबद्दल थोडा संभ्रम, थोडी अनिच्छा होती. 

पण ही मुलाखत झाली. "Can you say... Hero?" या नावाची सुरेख कव्हर स्टोरी झाली, आणि गाजली.  या मुलाखतीदरम्यान दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि ते नंतरही एकमेकांच्या  संपर्कात राहिले.

जुनोदनी असं म्हटलंय की रॉजर्सशी ओळख झाल्यानंतर त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. त्याच्या लक्षात आलं की माणसातल्या चांगुलपणाचा वेध घेणं हे माणसांच्या वाईटपणाबद्दल लिहिण्याइतकंच दिलचस्प आहे. त्याचं असंही मत आहे की त्याचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला होता हे ओळखून रॉजर्सनी त्याला अलगद मदतीचा हात दिला आणि तेही कुठला आव न आणता. 


अशा या स्टोरीवर आधारित सिनेमा आहे,  'A beautiful day in the neighbourhood'.  

हृद्य प्रसंगांनी सजलेला साधा चित्रपट आहे , सिम्प्लिस्टिक वाटू शकतो इतका साधा. हा रॉजर्सचा चरित्रपट नाही. स्वतःला सामोरं जाण्याची, स्वीकारण्याची, त्याबद्दल बोलण्याची, लेट गो करण्याची आणि सहृदयता बाळगण्याची गोष्ट हा सिनेमा सांगतो. 

ही गोष्ट त्यातल्या पात्रांची आहे, त्याहून जास्त ती आपल्यालाही सतत काहीतरी सांगत राहते... सहज, ओघात येणाऱ्या मौल्यवान इनसाईट्स. 

 ज्या लोकांनी आपलं नुकसान केलं, त्रास दिला असं आपल्याला वाटतं, त्यांचासुद्धा आपण जे आहोत त्या असण्यात हातभार असतो. जी लोक सिनिकल, नकारात्मक वाटतात त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या योग्यायोग्यतेच्या ठाम नैतिक बैठकीतून आलेला असू शकतो. 

आणि चांगुलपणा, सहृदयता ही कुठली दैवी देणगी नसून शिस्तबद्ध प्रयत्नांनी, अविरत सरावाने हे गुण आत्मसात करता येतात, वाढवता येतात.


जेव्हा जगात मोठ्या दुर्घटना घडतात, कुठे उद्रेक होतो, अराजक माजते; तेव्हा अजूनही लोक इंटरनेटवर रॉजर्सचे जुने कार्यक्रम, भाषणं पाहतात, त्यातल्या साध्यासोप्या संवादांतून कनवाळूपणा अनुभवतात, सकारात्मकता मिळवतात.


जगात काहीच वाईट, भीतीदायक नसेल असा कालखंड कदाचित कुठलाच नसेल; पण त्याच्या जोडीने चांगुलपणा, सहृदयता असणार आहे, आणि आपल्यासकट कुणीही त्याचा वाहक होऊ शकतो, यावरचा आपला विश्वास दृढ होतो, ही रॉजर्स यांची आपल्याला मिळालेली देणगी...


नैया मोरी ...

 अगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथांचे वैशिष्ट्य म्हणजे कथानकाच्या ओघात माणसांबद्दल, परिस्थितीबद्दल येणारे भाष्य, ज्याने एकदम चमकायला होते.

" It is perhaps the absorption in one's personal life that has lead the human race to survive".

जगात इतकी उलथापालथ होत असताना लोक क्षुल्लक वैयक्तिक गोष्टींमध्ये कसे काय गुंग राहू शकतात असे एक पात्र वैतागून म्हणते तेव्हा हर्क्युल पायरो वरचे वाक्य उच्चारतो. सामान्य लोक आपले सामान्यत्व स्वीकारत अस्थिर परिस्थितीतही आपले दैनंदिन आयुष्य सुरू ठेवतात, आणि त्यातल्या छोट्या सुखा-दुःखांशी समरस होत उत्कटतेने जगत राहतात, त्यामुळं जगरहाटीचे चक्र प्रतिकूल काळातही बऱ्यापैकी सुरळीतपणे सुरू राहते, असा साधारण त्या संवादाचा आशय आहे.

आज फेसबुकवर कुमार गंधर्वांनी गायलेले कबीराचे एक भजन सापडले. आवडती जोडी होतीच, आणि यात राग दुर्गा वापरलेला आहे ही माहितीही मिळाली.

गाणं शिकण्याचा प्रयत्न गाण्याच्या शिशुवर्गातच आटोपता घेतला होता, पण तेव्हा थोडी थोडी शिकलेली एकमेव चीज म्हणजे या दुर्गा रागातले 'सखी मोरी' हे गीत; त्यामुळे या रागाबद्दल विशेष ममत्व...

सगळा योग जुळून आला आणि दिल बाग बाग होण्याची प्रचिती आली; काही तास तरी सगळ्या विवंचना विसरून मन आनंदात न्हाऊन निघालं.

मग हर्क्युल पायरो आठवला आणि त्याचं म्हणणं तंतोतंत पटलं!

https://youtu.be/og16xgV9rF4

माहेरची सय

 सासर आयुष्यात आलं त्याला वीस वर्षे झाली. इतक्या वर्षांत काही झालं तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन माहेरी जाण्याचा शिरस्ता कधी चुकला नाही. साधारण मार्चपासून " पोरांच्या परीक्षा कधी संपतायत?", चे फोन सुरू व्हायचे. मग सगळी जुळवाजुळव करत, घरीदारी एक आठवड्याची तरी रजा अरेंज करायचे. 

फोनवर दरवेळी " यंदा उन्हाळी कामं नको काढायला, असंही आता कुणी फार खात नाही; यंदा निवांत राहू." असं आई आजीला बजावलं जायचं.

तिकडं पोहोचलं की मात्र तिथलं ठरलेलं वेळापत्रक आपोआप सुरू व्हायचं. पहिल्या एक-दोन दिवसांत खाली जुन्या गावात दौरा निघायचा... जिथं वर्षानुवर्षे जातोय ते कापड दुकान, मग फॅमिली डॉक्टर काकांच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्यांना भेटणं, मग मिलन बँगल स्टोअर, सत्कार शू इम्पोरियम आणि मणियार जनरल स्टोअर्स. काही ठिकाणी पुढची पिढी आलीय, काही ठिकाणी माझ्या लहानपणी असणारे अजून गादीवर आहेत; या सगळ्या दुकानांमध्ये मला काहीतरी सामान घ्यायचं असतंच...  हे सगळं न मिळणाऱ्या पुण्याच्या कुठल्या भागात मी नेमकी राहते असा प्रश्न या लोकांना नक्की पडत असेल! 

घरी निघताना मंडईत चक्कर मारून थोड्या भाज्या, बरेच बटाटे, लसूण, लोणच्यासाठी लागणारं सामान आणि काळं तिखट( गरम मसाला) करण्याचे जिन्नस घ्यायचे. मग सगळ्या पिशव्या सावरत घामाने निथळत वरात घरी निघायची. 

मग मात्र पूर्ण घरात राहण्याचा कार्यक्रम... रोज एक काहीतरी करणे, वाळवणे यात दिवस कमी पडायचा. शेवटच्या एकदोन दिवसांत अंगणातल्या कैऱ्या काढून लोणचं करायचा कार्यक्रम व्हायचा. तक्कू मात्र शेजारच्या काकू मलगोबा कैऱ्या द्यायच्या, त्याचाच करायचो. दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकेत आजीच असायची; आई आणि मी सेकंड लीड ...

हा इतका नियमितपणे सुरू असलेला प्रघात इतका गृहीत धरलेला होता, की गावी जाणं कधी अशक्य होऊ शकेल, असा विचारच कधी मनाला शिवला नाही. 

आयुष्य फार अनिश्चित असतं; आपण कल्पनाही करू शकत नाही अशा मार्गाने संकटं येतात. 

ही अनिश्चितता स्वीकारत 'बहारें फिर भी आएंगी',  यावर श्रद्धा ठेवावी लागते... यातही येणारी बहार कदाचित आधीपेक्षा वेगळी असेल, याचीही मनाची तयारी हवी...


Friday, 26 February 2021

आजारपणाचे बजेट

 इथे एका मित्राने वित्तीय संकल्पनांचा इतिहास विशद करणारी एक डॉक्युमेंटरी सुचवली होती. माझा अर्थशास्त्राचा अभ्यास नाही; तरीसुद्धा ही डॉक्युमेंटरी इतकी सुरेख आहे की जवळजवळ सगळ्या संकल्पना आणि त्यांचा इतिहास व्यवस्थित समजतो.

याच्या चौथ्या भागात इन्श्युरन्स आणि कल्याणकारी राज्य या विषयांची माहिती आहे आणि त्यांचा उगम कसा झाला हा इतिहासही.

सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा विषय महत्वाचा आणि जास्त रेलेव्हन्ट वाटला. 

सध्याच्या परिस्थितीत या आजारासाठी हेल्थ इन्शुरन्स कव्हर मिळत आहे अशी बातमी वाचली होती. पण त्यात काही कंपन्या pandemic कव्हर करत नाहीत, अशी उपबातमी होती. दुसरा भाग असा की व्हेंटिलेटरचा कालावधी वाढला तर खर्च बराच वाढू शकतो. खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचे दर बरेच जास्त असणार आहेत, कारण या केसेसमध्ये आयसोलेशन आणि सेफ्टी गियरचा खर्च वाढलेला असेल.

यातली नेमकी सद्य परिस्थिती मला अचूक माहिती नाही. शक्य असेल तर या विषयी प्रत्येकाने आपल्या इन्श्युरन्स एजंटशी बोलून घ्यावे. 

लॉकडाऊन शिथिल झाल्यावर संसर्गाचे प्रमाण वाढू शकते. बऱ्याच केसेसमध्ये लक्षणे सौम्य असतात आणि ऍडमिट होण्याचीही गरज भासत नाही. पण अशी काही परिस्थिती उद्भवल्यास आपण इन्फॉर्म्ड असलेले बरे. त्यानुसार खाजगी हॉस्पिटलला जायचे की शासकीय रुग्णालयात, हा निर्णय घ्यायला मदत होईल.

बरेच जण हेल्थ इन्श्युरन्स असला की दरवेळी कॉर्पोरेट हॉस्पिटल्सला जातात. आपल्या भागातले लोकल डॉक्टर, फॅमिली फिजिशियन, यांची काहीच माहिती नसते. पण आता ती करून घ्यायला हवी. सध्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये साध्या साध्या त्रासासाठी जाणं कठीण आहे, आणि रिस्कीसुद्धा. आपल्या भागात कुठले क्लिनिक्स सुरू आहेत याची माहिती घेऊन ठेवा. नेहमीचे डॉक्टर वर्किंग आहेत का याचीही खातरजमा करून ठेवा. 

याच अनुषंगाने दुसऱ्या एक दोन गोष्टी पाहण्यात आल्या. खर्च आणि बचत यांचा ताळमेळ बसवताना अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी काही तरतूद करण्याचा विचार कमी जणांनी केलाय. यात इन्कम कमी आहे या कारणापेक्षा लिक्विड कॅश नाहीय ही बाब जास्त दिसली. कुठे खर्च, कर्जाचे हप्ते खूप आहेत, तर कुठे पैसे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत अडकलेले आहेत. 

दुसरं म्हणजे थोडी तरी कॅश जवळ असायला हवी. सुरक्षिततेच्या दृष्टीने लोक घरात पैसे ठेवत नाहीत, जास्त करून कार्ड्स वापरतात. पण इकडे अचानक बँक आणि atm बंद झाले. अत्यावश्यक खर्चांसाठी पैसे लागतात, सगळीकडे डिजिटल पेमेंट सुरू असेलच असे नाही. वाच्यता करू नये, पण घरात इमार्जन्सीसाठी पैसे ठेवावेत. 

अजून एक गुंतवणूक असते; ती म्हणजे माणसांमधली. आपल्याला प्रायव्हसी आवडत असली तरी आपल्या अवतीभोवती असणारे शेजारी, गावात राहणारे नातेवाईक, आपले मित्र, ही आवर्जून जपणूक करावी अशी ऍसेट्स आहेत. अडचणीच्या वेळी हाकेला ओ देणारी काही माणसं तरी तयार करावीत. आणि यासाठी प्रीमियम म्हणजे आपणही आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या त्यांच्या अडचणीत उपयोगी येणं😊.

--------------------------//---------------------------

एडिट:

शालेय अभ्यासक्रमात गणित, विज्ञान या प्रमाणेच अर्थशास्त्र, आर्थिक नियोजन हे विषय सुद्धा थोडे तरी शिकवायला हवेत. पैसा, संपत्ती म्हणजे काय, तिचे प्रकार, याची ओळख लवकर झाली, अर्थसाक्षरता वाढली, तर पैशाविषयी अवास्तव आकर्षण किंवा तिटकारा न वाटता त्याचा विनियोग आपण रॅशनली करायला शिकू.

तरीही वसंत फुलतो...

 सगळ्या स्टाफला त्यांच्या घरी सोडून ड्रायव्हर दादा यावेळी गाडीची चावी द्यायला येतात. सोसायटीच्या मेनगेट जवळ जाऊन चावी घेतली आणि आज जरा गार्डन जवळ टेकले. 

माळीबुवा रजेवर आहेत; त्यामुळं खूप खेळून दंगा मस्ती करून घरी आलेल्या पोरांसारखी अस्ताव्यस्त झालीय बाग.  गवत वाढलंय; नेहमी सुबक ट्रिम केलेली शोभेची झाडंही  नवीन मिळालेलं स्वातंत्र्य घेत मनसोक्त वाढलीयत. ब्युटी इन कॅओस का काय म्हणतात तसं हेही साजिरं दिसतंय. 


'या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें..' ची आठवण करून देणारी हवा सुटलीय. नेहमीच्या मानाने सामसूम आहे अगदी. एरवी हसून दोन शब्द बोलणाऱ्या वॉचमनचा मास्कच्या आड लपलेला चेहरा अनोळखी भासतोय. 

बिल्डिंग खाली असलेली रातराणी मात्र बहरलीय. फोन घेऊन जात नाही खाली, त्यामुळं फोटो घेता आला नाही, पण सकाळी मेमरीत दिसली होती तशीच फुललीय तंतोतंत. 

सुधीर मोघेंची ही कविता फार आठवतेय सध्या...

प्रत्येक जन्मणारा क्षण

शेवटास ढळतो

तरीही वसंत फुलतो…


उमलती फुले इथे जी, ती ती अखेर वठती


लावण्य रंग रूप, सारे झडून जाती

तो गंध तो फुलोरा, अंती धुळीस मिळतो


तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…


जी वाटती अतूट, जाती तुटून धागे


आधार जो ठरावा, त्यालाच कीड लागे


ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो


तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…


तरीही फिरुनी बीज, रुजते पुन्हा नव्याने


तरीही फिरुनी श्वास, रचती सुरेल गाणे


तरीही फिरुनी अंत, उगमाकडेच वळतो


तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…


- सुधीर मोघे -


लॉकडाऊन कहाणी २

 कोरोनाविषयी अफवा/ चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असल्याच्या बातम्या आम्ही आवर्जून व्हाट्सअप्प ग्रुप्सवर पोस्ट केल्या, तेही ऍडमीनच्या विशेष उल्लेखासह. त्यामुळे ग्रुप्सवर आता त्याबद्दलचे खरे-खोटे अपडेट्स आणि उपाय येणे बंद झाले आहे. 

पण त्या बदल्यात इतर काही जालीम कार्यक्रम सुरू झाले आहेत. 


एका ग्रुपवर रोज रात्री दहा वाजता होममिनिस्टरच्या धर्तीवर टास्क/ प्रश्न सुरू होतात. त्यामुळे वीस-पंचवीस फोटो आणि पाच-सहाशे मेसेज जमा होतायत. बरं त्यात कुणाच्या घरातील कोपऱ्यातल्या खुर्चीवरचा कपड्यांचा ढीग मोठा, कुणाच्या ओट्यावरचा घासलेल्या भांड्यांचा ढीग जास्त, असे टास्क, किंवा शिळ्या भाताला किती प्रकारे फोडणी देऊन कुठल्या वेगवेगळ्या नावाने खपवता येते, असे इनोव्हेटिव्ह प्रश्न नसल्यामुळे भाग घेत येत नाही ही खंत वाटत राहते!


दुसरं म्हणजे घरकाम करतानाचे बाप्यांचे फोटो येतायत; इतक्या कौतुकाने फोटो टाकतायत मित्रलोक जणू काही इतकी वर्षे आम्हाला ही कामं माहीतच नव्हती.

 "अरे असा मोठा नळ सोडून भांडी घासतं का कुणी, अन तो फेस किती केलाय.. टब बाथ घ्यायचाय का...",  "काय तो नेत्यांसारखा झाडू धरलाय बाई, कोपऱ्यात कचरा तसाच राहिलाय तो बघ आधी...",   या एक्सपर्ट कमेंट्स  मनातल्या मनात देऊन उघड मात्र ग्रेट, वहिनी लकी हां, अशी कौतुकसुमने उधळतोय ☺️! आता वहिनी याच्या असल्या कामवाढवू कर्तृत्वाचे रीतसर पोस्टमॉर्टेम करणार हे आम्हालाही माहीत असतं पण असो...


आणि रेसिपीच्या फोटोंनी तर कहर केलाय... ताई माई काकू काका दादा, इतकंच काय एवढूशी पोरं पण मॅगी नायतर ती कसली ढालगज कॉफी आलीय त्याचे फोटो टाकून राहिले. आता अशा दुष्काळी दिवसांत होममेड पिझ्झा चे फोटो टाकून का जीव जाळावा अमच्यासारख्यांचा? पण जगात दुष्ट लोकांची कमी नाहीय हेच खरं.

आज सकाळी तर एकाने खरबुजाच्या तीन फोडी, दोन स्लाईस भाजलेले ब्रेड, आणि पाऊण कप चहा, यांचा फोटो टाकून "ब्रेकफास्ट लाईक ए किंग",  असा कॅप्शन टाकलाय... आता बोला !


#लॉकडाऊन_टेल्स

कोरोना ६

 तसे इथे सगळेच सुजाण आहेत, पण जित्याची खोड म्हणतात ना, तसं आपल्या क्षेत्रासंबंधी असलेल्या विषयात इतकं काही घडत असताना राहवत नाही म्हणून सारखं लिहिल्या जातंय. 

तर आपल्याकडे  केसेस वाढतच आहेत, विशेषतः मुंबई पुण्यात; आणि मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. 

आपण काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे याच्यावरचे लक्ष ढळू देऊ नका. ही स्टेज 2 आहे की 3, टेस्टिंग किती व्हायला पाहिजे, या थेरॉटिकल चर्चा ठीक; पण स्टेज काही असो आणि टेस्ट ऑर नो टेस्ट, उत्तर आणि उपाय एकच आहे... आयसोलेशन.  

बाहेर पडणे टाळा, अगदीच अत्यावश्यक असेल तर किमान एकाच फेरीत सगळी कामे उरका. बाहेर पडताना आणि घरी परतल्यावर सेफ्टी मेजर्स काटेकोरपणे पाळा. आता सगळ्यांनाच बाहेर पडताना मास्क/ तोंड झाकणारे रुमाल वापरण्याचे निर्देश आहेत. चष्मा/गॉगल, पूर्ण बाह्याचे कपडे आणि शक्य असल्यास हातमोजेही वापरा.  कॅप वापरली तर अजून उत्तम. 


या व्यतिरिक्त दोन गोष्टींबद्दल सांगायचे होते.

एक म्हणजे या काळातले मानसिक अस्वास्थ्य. 

सगळे सतत एकत्र राहण्याची सवय नसते, त्यामुळे कुणाला थोडा वेळ एकटं राहायचं असेल तर राहू द्या. गृहिणीवरच सगळे कामाचे ओझे न टाकता विभागून घ्या, मुलांनाही जमेल तशी मदत करायला लावा.

सतत घरात राहिल्यामुळे काहीजणांना अस्वस्थता जाणवत आहे, त्यात वरून भीतीचे सावट आहे. धडधड वाढणे, झोप न येणे, किंवा काहीच करावेसे न वाटणे, आजारी पडलोय असे वाटणे, ही लक्षणे दिसून येत आहेत. स्वतःचा स्वभाव ओळखा; जर ताण येत असेल तर सतत बातम्या आणि wa फॉरवर्ड्स बघू नका. वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर पुरेशी काळजी घेतली तर काही धोका नाही हे समजून घ्या आणि स्वतःला बजावत रहा. 

हा विषय सोडून दुसरे काहीतरी वाचा, किंवा बघा. एखादा छंद असेल तर त्याला वेळ द्या.


जे कणखर आहेत त्यांचे अभिनंदन. पण सगळे स्ट्रॉंग नसतात, आपल्याच जवळच्या काही व्यक्ती खचलेल्या असू शकतात हे लक्षात घ्या. ज्या माहितीचा उपयोग नाही आणि ज्याने नकारात्मकता पसरते, तिचा सतत उच्चार आणि प्रसार करणे टाळा.


दुसरा मुद्दा जाणवला तो या दरम्यान उद्भवणाऱ्या इतर आजारांचा. 

वेळ अशी आहे की दवाखान्यात जावे लागणे हे सुद्धा सद्यस्थितीत धोकादायक आहे. तिथे आरोग्य कर्मचारी योग्य ती काळजी घेत असतात, तरी संसर्गाची भीती राहतेच. त्यामुळे हॉस्पिटलला जायची वेळ येणार नाही असा प्रयत्न असू द्या. ज्यांना बीपी, शुगर, थायरॉईडसारखे आजार आहेत त्यांनी गोळ्या न विसरता घ्या. नियमित व्हिजिटसाठी दवाखान्यात न जाता फोनवरून कन्सलटेशन करून आहे त्या गोळ्या सुरू ठेवता येतील. गर्भवती महिलांनाही हाच नियम लागू आहे. 

फार नकारात्मक विचार करू नका, कारण त्याने प्रतिकारशक्ती कमी होते. थोडे दिवस

 असा विचार देणाऱ्या व्यक्ती, समूह, समाजमाध्यमे टाळा.

निरोगी असणाऱ्यांनीही खाण्याच्या झोपण्याच्या वेळा सांभाळा. तसेच डोमेस्टिक ऍक्सिडेंट्स होणार नाहीत याची काळजी घ्या.

ज्यांना  काही व्यसन आहे त्यांना  withdrawal ची लक्षणे जाणवत आहेत. आपल्या कुटुंबात असे कुणी असेल आणि अस्वस्थ किंवा हिंसक होत असेल तर त्यांना तातडीने वैद्यकीय मदत लागेल, त्याची तजवीज करा.

आणि हो, आज जागतिक आरोग्य दिवस आहे; आणि यंदाची टॅगलाईन आहे, 'Support Nurses and Midwives'.

आरोग्य क्षेत्रातले यांचे योगदान अमूल्य आहे. कुठल्याही आरोग्य यंत्रणेचे हे पहिल्या फळीचे सैनिक असतात; सद्य आपत्तीत तर हे अजून ठळकपणे अधोरेखित झाले आहे. यांच्याशी नेहमी सहकार्य आणि सन्मानाची भूमिका ठेवा. 


.

लॉकडाऊन कहाणी १

 परिस्थिती बाका असतानाच्या काही महत्वाच्या गृहउपयोगी टिप्स:


- मिळेल ती मदत लाखमोलाची म्हणून स्वीकारावी. 'हे असं नसतं करायचं', हे वाक्य सध्या माळ्यावर ठेवून द्यावे

- मुलांनी केलेल्या कामांत चुका काढू नये, चार दिवसांत कुणी परफेक्ट होत नसतं; आपल्या परफेक्शनच्या अपेक्षांमुळे मिळतेय ती मदतही बंद होऊ शकते.

- नवरा या इसमास आज जेवायला काय करू असे आत्मघातकी प्रश्न विचारू नयेत; ते जागतिक प्रश्नांवर गहन विचार आणि मोबाईलवर तावातावाने चर्चा करत असतात त्यामुळे लॉक डाऊन सारखा किरकोळ तपशील त्यांच्या लक्षात नसतो आणि नेहमीसारख्या फर्माईशी येऊ शकतात.

- फोनवर घरात कोण किती मदत करत आहे(विशेषतः त्यांचे प्रिय दादा) याबद्दल सासरच्या स्त्रीवर्गाशी शक्यतो चर्चा करू नये, उगीच तापमान वाढण्याची भीती असते.

- कौटुंबिक ग्रुपवरच्या चर्चेत भाग घेऊ नये; वाद घालयचाच असेल तर मित्रमैत्रिणींचा ग्रुप वापरावा.

(ग्रुप सोडायचा असेल तर मात्र ही सुवर्णसंधी आहे!)

- रेसिपीच्या, dalgona कॉफीच्या पोस्ट्स लाईक करून विसरून जावे, उगीच उत्साहात येऊन कष्ट वाढवू नयेत. 

- निराश वाटले तरी छताकडे बघणे टाळावे; पंखे पुसायला आलेत हे दिसून अजून नैराश्य वाढते.


आणि


- कुणी सातत्याने 'आमच्या यांनी आज हे केलं' म्हणत वेगवेगळ्या घरकामाचे फोटो टाकत असेल आणि आपल्या सोफ्यावर सदैवस्थानापन्न असलेल्या अहोंकडे बघून चिडचिड होत असेल, तर त्या फोटोवर 'अय्या जीजू कसले हँडसम दिसतायत' अशी कमेन्ट करून टाकावी... अशा प्रकारचे सगळे फोटो बंद होतात.

स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, घरात रहा ☺️☺️


#लॉकडाऊन_टेल्स

कोरोना ५

 #संकटसमयी_आपण २


घरच्या आघाडीवर....


एकवीस दिवस तर ठरलेले आहेत; त्यापुढेही घरात राहणं लांबेल का, हे माहीत नाही. माणूस वाईट बातमीपेक्षाही अनिश्चिततेला फार भितो. त्यामुळे सगळीकडे चलबिचल जाणवत आहे. पण सध्या फार पुढचा विचार न करता डोके शांत ठेवणे गरजेचे आहे. कुणालाही अचूक अंदाज येत नाहीय.

एक दिनक्रम ठरवून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याने स्ट्रेस कमी होतो आणि काहीतरी रुटीन सुरू आहे ही फीलिंग येते. जे वर्क फ्रॉम होम नाहीयेत त्यांनीसुद्धा रुटीन आखून घ्यायला हवं.

काल रात्री मुलांशी बोलले. जशी त्यांना घरकामाची सवय नाही तशी मलाही एकटीने सगळं करण्याची सवय नाही, मावशी होत्या म्हणून निभत होतं, हे समजावून सांगितलं.  

घरातल्या कामांमध्ये त्यांनाही हातभार लावायला सांगणार आहे. बाकी आपल्याकडे कामाला येणाऱ्या मदतनीस किती काम करतात आणि यांच्यामुळं आयुष्य किती जास्त कम्फर्टेबल आहे हे परत जाणवून डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येत आहेत. देव त्यांना सुखरूप ठेवो!

सामान साठवलं नव्हतं, त्यामुळे एखाद-दुसरी वस्तू संपत आहे. पण त्याशिवायही काम सुरू ठेवता येतं हा साक्षात्कार होतोय.

रेसिपी थोडी मॉडिफाय केली तरी चव बिघडत नाहीय. चाललंय तोवर चालू देणार. अगदीच सगळं संपत आलं की मग किराणा दुकानात जाणार आहे. कदाचित ती वेळ येणार नाही, घरपोच सामान मिळण्यासाठी काहीतरी यंत्रणा सुरू होईल असे वाटत आहे. जेवणाचे मेनू साधे ठेवणार आहे, चारी ठाव स्वयंपाकाचा अट्टाहास करणार नाहीय. जिन्नस पुरवून वापरणार आणि स्वतःला खूप जास्त दमवणार नाही. थोडा वेळ तरी वाचन करायला, काही छान बघायला/ऐकायला बाजूला काढणार. 

दुसरे काम म्हणजे फोनवर बोलणे. पेशंट्सचे फोन तर आहेतच, पण नातेवाईक, परिचित यांचेही फोन आहेत. जमेल तितकी माहिती देतोय, सूचना देतोय... पॅनिक न होता काळजी घ्यायला सांगतोय. काही वयस्कर नातेवाईकांना स्वतःहून फोन करतोय आणि माहिती देतोय. घरी जे जिन्नस आहेत त्यात भागवा, सगळं सामान संपल्याशिवाय दुकानांमध्ये गर्दी करू नका सांगतोय.

भीतीपेक्षा समज आणि जबाबदारीची जाणीव वाढली तर यंत्रणांवरही अनावश्यक ताण येणार नाही; त्याहून महत्वाचं म्हणजे जीव वाचेल.

व्यवसाय असा आहे की दोघांपैकी एकाला तरी बाहेर जावे लागते. दोन्ही आघाड्यांवर परीक्षा पाहणारा काळ आहे. अज्ञानात सुख असतं हे पटतंय.... कधीकधी फार टेन्शन येतं. पण मग स्वतःला जाणीवपूर्वक डायव्हर्ट करते. पुस्तकं आहेत, आणि संगीत आहे. फेसबुकही आहेच अर्थात. इकडे आलं की सहप्रवासी भेटल्यासारखं वाटतं. काही पॉजिटीव्ह, काही विनोदी पोस्ट्स वाचून उभारी येते. पण या सगळ्यात इथले स्वघोषित तज्ञ,भविष्यवेत्ते आणि रुदाल्या, राजकीय पोळी भाजून घेणारे, यांची नकारात्मकता मात्र नको वाटतेय.  काही कन्स्ट्रक्टीव्ह सूचना असतील तर चांगलं असतं, पण सतत वाईटच बघणे वाईटच ऐकणे वाईटच बोलणे त्रास देते. आणि कुठलेही सरकार असते तरी हेच मत राहिले असते. 

 त्यामुळे फेसबुकच्या स्नुझ ऑप्शनचा सढळ वापर करणार आहे. अर्थात प्रत्येकाला प्रतिक्रिया व्यक्त करायचा अधिकार आहेच, आणि तो कसा वापरायचा याचाही. फक्त अशा प्रसंगांमध्ये मला या गोष्टी हतोत्साहित करणाऱ्या वाटतात, म्हणून हे स्वसंरक्षण.

  एका महिन्यासाठी हे आयसोलेशनही गरजेचे आहे.

परत एकदा माझं आवडतं वाक्य...

There are many passive denouncers, few whistle blowers, ...and very few working reformers . 

 निद्रादेवीच्या रुष्ट होण्याचा दुर्मिळ अनुभव सध्या घेतेय.  पहाटेही फार लवकर आपोआप जाग येते आहे. फ्रेश मेंदूत परत नव्याने फ्रेश गणितं,आकडेवारी आणि काळजी. अशावेळी युट्युबवर काहीतरी छान बघणे ही थेरपी आहे.

आज "ये सफर बहुत है कठीण मगर" हे आवडतं गाणं ऐकलं... जरा बरं वाटलं....होपफुल...


"नहीं रहनेवाली ये मुश्किलें 

ये हैं अगले मोड़ पे मंज़िलें

 मेरी बात का तू यकीन कर,

 ना उदास हो मेरे हमसफर...."

कोरोना ४

 #संकटसमयी_आपण_१ 


काही कामासाठी एक कपाट लागणार आहे, म्हणून अहोंनी काल दुपारी पुस्तकांचं कपाट रिकामं केलं. पुस्तकांचे गठ्ठे करून टेरेस मध्ये ठेवले. 

आज पहाटे पावसाच्या आवाजाने जाग आली आणि टेरेसमधली पुस्तकं आठवून धडपडत उठले. बरीचशी भिजली होती. मनात पहिली प्रतिक्रिया रागाची उमटली... गच्चीत असं ठेवतात का पुस्तकं? नीट झाकूनही ठेवली नाहीत; रात्री थोडा पाऊस झाला तेव्हा तरी यांनी पुढचा धोका ओळखून आत आणून ठेवायला हवी होती ना. मग थोडं स्वतःचं हसू आलं. मी रोजच्या कामांत अडकल्यामुळं कपाट रिकामं करण्यात सहभागी नव्हते; पण टेरेसमधली पुस्तकं मलाही दिसली होती. ती मीही झाकली नव्हती. रात्रीचा पाऊस मलाही दिसला होता, पण तातडीने पुस्तकं आत ठेवायलाच हवीत हे माझ्याही डोक्यात आलं नाही हे खरं. 

खरं तर एप्रिलमधला पाऊस अनपेक्षित होता...


या पॅन्डेमिकमुळे उद्भवलेली सगळी परिस्थिती सुद्धा शासकीय यंत्रणेपासून सामान्य माणसापर्यंत सगळ्यांसाठी अनपेक्षित आहे. पण खूप सजग राहून कृती केली नाही तर नुकसान अटळ आहे. 

 मोठे निर्णय घेताना इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या विकसनशील देशात रोगामुळे हाहाकार की आर्थिक अनागोंदी, अशी इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती असणार. सुरुवातीचे टेस्टिंग अजून काटेकोर असते तर काय हा प्रश्न राहतो. त्याचवेळी एखादे पॅन्डेमिक जगभरात पसरले असेल तर आपण स्वतःला किती काळ विलग ठेऊ शकलो असतो हाही प्रश्न आहे. 

शासकीय यंत्रणांकडून अथक प्रयत्न सुरू आहेत. पण बरेच प्रश्न, शंका उपस्थित होत आहेत.. त्यांचे निरसनही होत आहे पण थोडा वेळ लागतोय. तोवर थोडा धीर धरावा लागतोय. रोजंदारीवर काम करणारे, असंघटित कामगार यांच्यासाठी काय सोय आहे याबद्दल अजून सुस्पष्टता नाहीय, पण गर्दी न होता वितरण करण्याचे टास्क असल्यामुळे थोडा उशीर होत असावा.

या बाबतीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते/ स्वयंसेवक यांच्या मार्फत काही करता येईल का पाहायला हवे. पण सेफ्टी प्रोटोकॉल पाळले जातील का, ही भीतीही आहे.

डॉक्टर्सच्या बाबतीतही खाजगी व्यवसाय करणाऱ्यांबाबत अजून स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. काही मोठी हॉस्पिटल्स कदाचित खास या आजारासाठी रिअरेंज होतील असा अंदाज आहे. तिथे कदाचित आम्हा खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना स्टाफ सकट, उपकरणांसकट जाऊन सहभागी व्हावे लागेल. उपलब्ध संसाधने एकटवणे आणि मेकिंग द मोस्ट आउट ऑफ इट असा प्लॅन असावा. परिस्थिती अभूतपूर्व आहे, आयता रोडमॅप उपलब्ध नाहीय, नवीन वाटा चोखाळाव्या लागतील. सगळे चित्र स्पष्ट व्हायला, सर्व बाबतीत शासकीय सूचना यायला थोडा वेळ लागणार. पण हळूहळू होईल असे वाटत आहे. 

थोडा पेशन्स ठेवणं, तोवर स्वतःला सुरक्षित ठेवणं, सेफ्टी प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळणं, इतकं करायचं आहे सध्यातरी.

कोरोना ३

 प्रश्नच प्रश्नं आणि उत्तरं भविष्याच्या काळोखात दडलेली... अजिबात दृष्टीक्षेपातही नाहीत. 

आपल्या किंवा आपल्या मागच्या पिढीनेही असे देशव्यापी संकट पाहिले नसेल. आपला देश कुठल्या विश्वयुद्धात थेट सहभागी नव्हता. स्वातंत्र्यलढा आपण अनुभवला, पण त्यात पुढे एक पॉजिटीव्ह ध्येय होते आणि त्याकडे पाहून लढण्याची जिद्द होती. स्वातंत्र्याचे नेमके इम्प्लिकेशन्स सगळ्यांना माहीत नसतील, पण असंख्य लोकांची त्या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्यांवर श्रद्धा होती..


दुसऱ्या महायुद्धाच्या कठीण काळात इंग्लंडमधल्या लोकांची काय मनःस्थिती असेल? अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मनोधैर्य टिकवण्यासाठीच्या काय प्रेरणा असतील? जेव्हा समूहावर मोठे संकट येते तेव्हा कुठल्या घटकाचे महत्व सगळ्यात जास्त राहत असेल... स्वयंशिस्त, ज्ञान, आज्ञा पाळण्याची वृत्ती, ऐक्याची भावना, बंधुभाव, श्रद्धा ... ? 

आपले एकजिनसी नसणे हा या लढाईतला अडसर ठरेल का? एक धर्म पाळणारे समूह, एकेश्वरी धर्म पाळणारे समूह यांच्यात बंधुतेची भावना जास्त असते का? अशा आपत्तीना तोंड देताना या घटकाचा मतैक्य होण्यासाठी काही उपयोग होतो का?

अजूनही पक्षीय अभिनिवेषाच्या परिघात विचार करणारे आणि बेजबाबदारपणे आचरण करणारे; असे लोक एकदिलाने, दृढनिश्चयाने, जबाबदारीने वर्तन करत या लढ्याला सज्ज होतील? 

की सगळे एकमेकांची अक्कल काढण्यात आणि शेखचिल्ली बनण्यात धन्यता मानतील... 

एपिडेमिक किती मोठा असणार, हे फक्त आरोग्य यंत्रणा आणि सुविधांवर नाही, तर या गोष्टींवरही अवलंबून असणार आहे...