डोश्याचे पीठ वापरून प्राजक्ताची फुले बनवलेला फोटो इकडे खूप व्हायरल झाला. मग त्याची मस्करीही वणव्याच्या वेगाने पसरली. अर्थात सध्या फेसबुकवर वणवे कॉमन आहेत. कदाचित मूळ पोस्टकर्तीला हे इतके गाजेल असे वाटलेही नसेल; किंवा शेअर करण्याचा अतिरेक होऊन मग अजीर्ण झाल्यासारखं होऊनही टीका, चेष्टा सुरू झाली असेल.
मला ती फुले बघून निगुतीने हे सगळं करणारीचे कौतुक वाटले. सांगितलं नाही तर पटकन ओळखू येणार नाही इतकी परफेक्ट जमली होती ती फुलं. मला कलाकुसर जमत नाही, त्यामुळंही कदाचित जास्त कौतुक वाटतं अशा गोष्टीचं. वेळखाऊ असेल, पण कुणी कसा वेळ घालवावा आणि अमक्या गोष्टीत गेलेला वेळ हा तमक्या गोष्टीत गेलेल्या वेळेपेक्षा क्वालिटेटिव्हली इन्फेरियर असतो हे कसं आणि कुणी ठरवायचं?
एखादं चित्र, रेखाटन, रांगोळी काढायलाही बराच वेळ लागतो, पण ती प्रोसेस नक्की आनंददायी असते.
यातल्या बऱ्याच गोष्टी स्ट्रेसबस्टरचे काम करतात; क्रिएटिव्ह काही करता येणं इज ए ब्लिस, मग रॉ मटेरियल काही असो.
काही का असेना, पण ती फुलं पाहून मला मात्र लहानपणी बघितलेला रुखवत प्रकार आठवला आणि आठवणींच्या राज्याची छानशी सैर झाली.
आता कुणी फारसं करत नाही, पण आधी रुखवतात बऱ्याच खाद्यपदार्थांपासून केलेल्या वस्तू असायच्या. शेवयांचा नारळ, शेवयांची वेणी हे दोन आयटम हमखास असायचे. रंगीत पापड, कुरडया, वड्या पण असायच्या( धाकट्या चुलत भाऊजयीचे रुखवतातले पापड आमच्यापर्यंत आले, त्याचा फोटो टाकलाय). सुजीचे पीठ( गहू ओलावून मग दळून आणले जायचे; चाळले की मैद्यासारखे शुभ्र पीठ मिळायचे) वापरून बोटवे केले जायचे, थोडे रंगविरहित आणि थोडे रंगीत. त्याच पिठाची छोटी फुले/ लवंग बनवली जायची. अगदी छोटी टिकलीएवढी लाटी, तिची चौघडी करायची आणि मग त्रिकोणाच्या बेसला ट्विस्ट करायचं, की फुल/लवंग तयार!( लिहिता लिहिता फारच हात शिवशिवले म्हणून कणकेचे करून बघितले. कलाकुसर जमत नाही हे डिस्क्लेमर सुरुवातीला टाकले आहे त्यामुळं फोटोतला पदार्थ पाहून हसू नये; यातल्या एक्सपर्ट मुली बनवतात तेव्हा फार सुंदर दिसतात हे!)
महादेवाची साखरेची पिंड हा आयटमही हमखास असायचा.
इतर प्रकारात लोकर, बांगड्या, काचेच्या रंगीत नळ्या, असे काहीतरी वापरून केलेले तोरण असायचे.
नैवेद्य/ पूजेचे ताट झाकण्याचा लोकरी बदकांचा रुमाल असायचा.
हे सगळं मला करता यायचं नाही, पण थोडी लुडबुड करायला मजा यायची. माझी मोठी मावस बहीण बरंच काय काय करायची, आणि तिची एकाग्रता बघून मस्त वाटायचं.
तिने फार किचकट असणाऱ्या मोती विणून बनवायच्या बांगड्या आणि मोत्याची वेणीही केली होती( मला गुगलवर फुलांची वेणी सापडली, तशी डिझाइन आम्ही प्लास्टिक वायरमध्ये मोती विणून केली होती.)
मी फक्त फुलं, पानं, वाळवून त्याची शुभेच्छापत्र बनवायचे आणि ते करताना फार छान वाटायचं. एक दीड वर्षांपूर्वी तो फील येण्यासाठी मी कुणाला द्यायची नसताना अशी कार्ड्स बनवली होती.
माझे वडील स्ट्रेसमध्ये असले की पत्त्यांचा बंगला बनवत बसायचे.
आता फूड डेकोरेशन, गार्निशिंग, या गोष्टींना खूप महत्व आले आहे. आधी गावी असला काही प्रकार नव्हता. अगदी दिवाळी, गौरीपूजन सोडलं तर नैवेद्य भरताना आजी भाताची मुदी करण्यातही वेळ घालवायची नाही, इतकी कामं असायची. पण आजोबांनी जर नैवेद्याचं ताट केलं तर ते इतकं देखणं असायचं की आपण देव असायला हवं होतं असं फार वाटायचं!
(फोटो गुगलवरून साभार.)

No comments:
Post a Comment