सासर आयुष्यात आलं त्याला वीस वर्षे झाली. इतक्या वर्षांत काही झालं तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन माहेरी जाण्याचा शिरस्ता कधी चुकला नाही. साधारण मार्चपासून " पोरांच्या परीक्षा कधी संपतायत?", चे फोन सुरू व्हायचे. मग सगळी जुळवाजुळव करत, घरीदारी एक आठवड्याची तरी रजा अरेंज करायचे.
फोनवर दरवेळी " यंदा उन्हाळी कामं नको काढायला, असंही आता कुणी फार खात नाही; यंदा निवांत राहू." असं आई आजीला बजावलं जायचं.
तिकडं पोहोचलं की मात्र तिथलं ठरलेलं वेळापत्रक आपोआप सुरू व्हायचं. पहिल्या एक-दोन दिवसांत खाली जुन्या गावात दौरा निघायचा... जिथं वर्षानुवर्षे जातोय ते कापड दुकान, मग फॅमिली डॉक्टर काकांच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्यांना भेटणं, मग मिलन बँगल स्टोअर, सत्कार शू इम्पोरियम आणि मणियार जनरल स्टोअर्स. काही ठिकाणी पुढची पिढी आलीय, काही ठिकाणी माझ्या लहानपणी असणारे अजून गादीवर आहेत; या सगळ्या दुकानांमध्ये मला काहीतरी सामान घ्यायचं असतंच... हे सगळं न मिळणाऱ्या पुण्याच्या कुठल्या भागात मी नेमकी राहते असा प्रश्न या लोकांना नक्की पडत असेल!
घरी निघताना मंडईत चक्कर मारून थोड्या भाज्या, बरेच बटाटे, लसूण, लोणच्यासाठी लागणारं सामान आणि काळं तिखट( गरम मसाला) करण्याचे जिन्नस घ्यायचे. मग सगळ्या पिशव्या सावरत घामाने निथळत वरात घरी निघायची.
मग मात्र पूर्ण घरात राहण्याचा कार्यक्रम... रोज एक काहीतरी करणे, वाळवणे यात दिवस कमी पडायचा. शेवटच्या एकदोन दिवसांत अंगणातल्या कैऱ्या काढून लोणचं करायचा कार्यक्रम व्हायचा. तक्कू मात्र शेजारच्या काकू मलगोबा कैऱ्या द्यायच्या, त्याचाच करायचो. दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकेत आजीच असायची; आई आणि मी सेकंड लीड ...
हा इतका नियमितपणे सुरू असलेला प्रघात इतका गृहीत धरलेला होता, की गावी जाणं कधी अशक्य होऊ शकेल, असा विचारच कधी मनाला शिवला नाही.
आयुष्य फार अनिश्चित असतं; आपण कल्पनाही करू शकत नाही अशा मार्गाने संकटं येतात.
ही अनिश्चितता स्वीकारत 'बहारें फिर भी आएंगी', यावर श्रद्धा ठेवावी लागते... यातही येणारी बहार कदाचित आधीपेक्षा वेगळी असेल, याचीही मनाची तयारी हवी...

No comments:
Post a Comment