झोपताना वारं वारं करत लेकाने पडदे बाजूला सारलेले असतात.
मग पहाटे उठून उजेड डोळ्यावर येऊ नये म्हणून पडदे नीट लावायचे ...
या साधनेचे फळ म्हणून की काय आज निसर्गदेवतेने अप्रतिम नजारा दाखवला... पूर्वेला सुर्याएवजी चंद्रोदय झालेला, सोबत शुक्राची चांदनी लखलखत होती. नीरव शांतता, क्वचित एखाद्या पाखराचा आवाज , समोर निळाई आणि चंद्राची कोर... भान हरपायला झालं.
असाच चंद्र हंपीला दिसला होता; तीन वर्षांपूर्वी...
अडीच दिवसांत हम्पी दर्शन दाटीवाटीने बसवलं होतं, आणि प्रत्येक ठिकाणी उशीर होत होता. खूप छान विस्तृत माहिती देणारा गाईड, आणि स्तिमित करणारी विलक्षण मॉनुमेंट्स, यामुळं वेळ लागणं अपरिहार्य होतो.
महानवमी डिब्बा नावाच्या चौथाऱ्याजवळ पोहोचलो तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाली होती, कुणी टुरिस्ट दिसत नव्हते. आम्ही पायऱ्या चढून चौथऱ्यावर गेलो.
क्षितिजावर चंद्र दिसत होता; आम्ही जमिनीच्या काही फूट वर होतो ... काहीतरी विलक्षण शांतता होती त्या क्षणांमध्ये; बडबड करणारी लेकही शांत होत तिच्या दादाला बिलगली होती. समाधी अवस्था काय असते मला माहीत नाही, पण ते क्षण फार वेगळे होते... काळ थांबल्यासारखे, आणि जगात दुसरं काही नाही, फक्त आकाश आणि चंद्र इतकंच काय ते अस्तित्वात आहे असं वाटायला लावणारे.
ती शांतता अनुभवण्यासाठी तरी हंपीला परत जायला हवं असं मला फार वाटायचं.
आजच्या चंद्रोदयात तसंच हरवून जायला झालं.. मग जाणवलं भावनांना विशिष्ट चौकटीचे बंधन नसते...एखादी भावना एका विशिष्ट फ्रेमवर्कमधून आली तरंच खरी असे नाही; लेबल वेगळं असूनही मनात तो भाव जागृत होऊ शकतो...!

No comments:
Post a Comment