सूफी बाजाच्या कव्वाल्या हा प्रकार आवडायला लागला की माणूस चांगलाच नादावतो. गाजलेल्या कव्वाल्यांची वेगवेगळी व्हर्जन्स ऐकताना फरीद अयाज आणि अबू मुहम्मद ही जोडगोळी माहीत झाली. त्यांच्या कव्वालीच्या घरगुती मैफिलींचे व्हीडिओ युट्युबवर आहेत. ते पाहताना तो माहौल फार भावला. गायकी तर अस्सल आहेच. तेव्हा सिराज औरंगाबादीची एक चीज ऐकली होती आणि ती ऐकताना कबीर फार आठवला होता.
काल एका फेसबुक पोस्टमध्ये त्या गाण्याची लिंक होती ती ऐकतानाही हाच अनुभव आला.
यातले काही शेर ऐकताना कबीराचे काही दोहे अंधुक आठवले. अर्थ तंतोतंत सारखा नसला तरी भावार्थ साधारण तोच.
सूफी तत्वज्ञान बऱ्याचदा कबिराच्या साहित्यात डोकावते आणि ही कव्वाली सूफी अंगाने जाणारी आहेच, त्यामुळे साम्य जाणवले असावे. कव्वाली या प्रकारात शब्दशः अर्थ घेतला तर ती प्रयेसीला उद्देशून असते, पण रूपकात्मक विचार केला तर आध्यात्मिक अर्थ निघतात... त्या अंगाने विचार केला तर ही साम्यस्थळं जाणवतील.
(अर्थात सगळ्यांना तसे वाटेल असे नाही; ओढून ताणून संबंध जोडला असंही वाटू शकतं😊. पण ही सगळी शोधयात्रा माझ्यासाठी फार आनंददायी ठरली. उर्दू, कबिराची खास पंचमेल खिचडी नावाने ओळखली जाणारी भाषा, आणि मराठीत अर्थ मांडण्याचा प्रयत्न करताना झालेली तारांबळ, ही मुशाफिरी करताना जाम मजा आली. म्हणून हे शेअर करत आहे😊)
----------------
"ख़बर-ए-तहय्युर-ए-इश्क़ सुन न जुनूँ रहा न परी रही
न तो तू रहा न तो मैं रहा जो रही सो बे-ख़बरी रही "
( ~~ एकदा प्रेमाच्या अद्भुत अविष्काराची प्रचिती घेतल्यावर ना सुंदरीचे भान राहिले ना (तिच्यामुळे मला लागलेल्या) वेडाची जाणीव उरली,
न तुझे अस्तित्व उरले न माझे, केवळ बेहोशीची स्थिती उरली~~)
कबीर दोहा : 'जब मैं था तब हरि नहीं अब हरि है मैं नाहीं ।
प्रेम गली अति सांकरी जामें दो न समाई
----------------
"नज़र-ए-तग़ाफ़ुल-ए-यार का गिला किस ज़बाँ सीं बयाँ करूँ
कि शराब-ए-सद-क़दह आरज़ू ख़ुम-ए-दिल में थी सो भरी रही "
(~~तुझ्या नजरेतल्या दुर्लक्षाची तक्रार मी कुठल्या तोंडाने करू?
(कारण) तुझ्या अभिलाषेच्या शेकडो मद्यप्याल्यांनी माझे हृदय अजूनही भरलेलेच आहे~~)
कबीर दोहा: हम तुम्हरो सुमिरन करै, तुम हम चितबौ नाहि
सुमिरन मन की प्रीति है, सो मन तुम ही माहि।
(~~ मी तुझे नित्यस्मरण करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस,
पण स्मरण म्हणजे मनाचे प्रेम आहे आणि माझे मन सदैव तुझ्यापाशीच आहे~~)
-----------------------
"वो अजब घड़ी थी मैं जिस घड़ी लिया दर्स नुस्ख़ा-ए-इश्क़ का
कि किताब अक़्ल की ताक़ पर जूँ धरी थी त्यूँ ही धरी रही "
(~~ तो क्षण विलक्षण होता जेव्हा प्रेमाच्या उपायाची दीक्षा घेतली,
त्या क्षणापासून शहाणपणाचे पुस्तक एका कोनाड्यात कायमचे पडून राहिले~~)
कबीर दोहा: "चतुराई हरि ना मिलय, येह बातों की बात
निसप्रेही निर्धार का, गाहक दीनानाथ।"
--------------------
किया ख़ाक आतिश-ए-इश्क़ ने दिल-ए-बे-नवा-ए-'सिराज' कूँ
ख़तर रहा न हज़र रहा मगर एक बे-ख़तरी रही
(~~ प्रेमाच्या ज्वालेने सिराजच्या या दीन हृदयाला भस्म केले
आता ना कुठली भीती उरली न शंका, आता फक्त निःशंक निर्भयता मागे राहिली~~)
"सिर राखे सिर जात है, सिर कटाये सिर होये
जैसे बाती दीप की कटि उजियारा होये।"
(डोके वाचवण्याची धडपड केली तर ती असफल होते, पण ते अर्पण करायची तयारी केली की उलट डोके शाबूत राहते,
जसे दिव्याच्या वातीचे टोक कापले की तो अजून प्रकाशमान होतो)
No comments:
Post a Comment