सगळ्या स्टाफला त्यांच्या घरी सोडून ड्रायव्हर दादा यावेळी गाडीची चावी द्यायला येतात. सोसायटीच्या मेनगेट जवळ जाऊन चावी घेतली आणि आज जरा गार्डन जवळ टेकले.
माळीबुवा रजेवर आहेत; त्यामुळं खूप खेळून दंगा मस्ती करून घरी आलेल्या पोरांसारखी अस्ताव्यस्त झालीय बाग. गवत वाढलंय; नेहमी सुबक ट्रिम केलेली शोभेची झाडंही नवीन मिळालेलं स्वातंत्र्य घेत मनसोक्त वाढलीयत. ब्युटी इन कॅओस का काय म्हणतात तसं हेही साजिरं दिसतंय.
'या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें..' ची आठवण करून देणारी हवा सुटलीय. नेहमीच्या मानाने सामसूम आहे अगदी. एरवी हसून दोन शब्द बोलणाऱ्या वॉचमनचा मास्कच्या आड लपलेला चेहरा अनोळखी भासतोय.
बिल्डिंग खाली असलेली रातराणी मात्र बहरलीय. फोन घेऊन जात नाही खाली, त्यामुळं फोटो घेता आला नाही, पण सकाळी मेमरीत दिसली होती तशीच फुललीय तंतोतंत.
सुधीर मोघेंची ही कविता फार आठवतेय सध्या...
प्रत्येक जन्मणारा क्षण
शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो…
उमलती फुले इथे जी, ती ती अखेर वठती
लावण्य रंग रूप, सारे झडून जाती
तो गंध तो फुलोरा, अंती धुळीस मिळतो
तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…
जी वाटती अतूट, जाती तुटून धागे
आधार जो ठरावा, त्यालाच कीड लागे
ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…
तरीही फिरुनी बीज, रुजते पुन्हा नव्याने
तरीही फिरुनी श्वास, रचती सुरेल गाणे
तरीही फिरुनी अंत, उगमाकडेच वळतो
तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…
- सुधीर मोघे -

No comments:
Post a Comment