तब्बल अडीच महिन्यांनी तिचा अबोला संपला. तिचा आवाज ऐकू आला आणि कान तृप्त झाले; एखादी अप्रतिम सुरावट ऐकतोय असं वाटायला लागलं...
आता एरवी वॉशिंग मशीनचा आवाज हा कर्कश प्रकारात मोडू शकतो.... तो सुरेल वाटण्यासाठी अडीच महिने हाताने कपडे धुण्याची तपस्या झालेली हवी!
आधी लॉकडाऊनमुळे आणि मग काही दिवस आमच्या अडचणींमुळे मेकॅनिक येऊ शकत नव्हते. शेवटी काल तो सुदिन उगवला. दुपारी साबळे भाऊ आले( हे आमचे ऑल राऊंडर इलेक्ट्रिशियन कम मशीन रिपेअरर कम अजून बरंच काही; ते handyman का काय म्हणतात तसे). मशीनच्या ड्रम मध्ये लिकेज होता, तो त्यांनी रिपेअर करायला घेतला. धुवायचे सगळे कपडे बादलीत भरून, "आजपासून काय तुम्हाला हात लावत नसते मी", म्हणत मी निवांत बसले.
दुपार उलटून गेली, ढल गया दिन हो गयी शाम झाली, तरी ड्राय बाल्कनीतून काही खबर येईना. हिंदी सिनेमात डॉक्टर तोंडावरचा मास्क खाली घेत ऑपरेशन थिएटरमधून गंभीर चेहरा करून बाहेर येतात, तसे रात्री आठ वाजता साबळे भाऊ बाहेर आले, आणि बॅड न्यूज दिली, 'इथे नाही होणार, ड्रम घरी नेतो.'
मोठ्या टेचात दूर लोटलेल्या बादलीतल्या कपड्यांना परत अटेंड करावं लागलं.
आज सकाळी येऊन त्यांनी दुरुस्त केलेला ड्रम बसवला आणि जीव सिंकमधल्या भांड्यांत पडला. पण ट्रायल घेताना परत लक्षात आलं ड्रम नीट झाला, आता हिटर लीक होतोय!
भाऊंना विचारलं, 'आज कपड्यांचं काय करू, धुवून टाकू की थांबू?'
त्यांना मशीन दुरुस्तीच्या आव्हानापुढे माझा प्रश्न किरकोळ वाटला असणार.
पण कसं असतं, उपाय नाही म्हटल्यावर माणूस सहन करतं; पण एकदा उपाय दृष्टिपथात आला की पेशन्स ठेवणं कठीण व्हायला लागतं !
सुदैवाने ते लिकेज छोटं होतं. प्रॉब्लम अरलडाईट लावून सुटला. मग त्याला वाळायला वगैरे ठेवलं, आणि शेवटी आज रात्री ठीक आठ वाजता वॉशिंग मशीन व्यवस्थित सुरू झाली...
कितीतरी दिवसांनी मशीनच्या मंजुळ स्वरांनी घर भरून गेले आहे!
No comments:
Post a Comment