बऱ्याच दिवसांपासून 96 या तामिळ चित्रपटाबद्दल वाचण्यात येत होतं. अशात त्याच्या तेलुगू रिमेकबद्दल इथे एक मैत्रिणीची पोस्ट वाचली. मग सलग वेळ काढून बघितलाच. सिनेमा सुंदर आहे, आणि गाणी मधुर. मात्र त्यातली निरागसता, उत्कट प्लेटोनिजम अनुभवायला थोडं टाईम ट्रॅव्हल करून मनाने त्या वयात जावं लागलं.
यातल्या एका गाण्याच्या लिरिक्सचे सबटाईटल्स वाचताना 'आँधी' मधलं 'तेरे बिना जिंदगी से कोई..' आठवायला लागलं; 'रात को रोक लो' ही इच्छा दोन्हीकडे आहे, कारण रात की बात है, और जिंदगी बाकी तो नहीं, अशी स्थिती आहे.
गंमत म्हणजे 'आँधी' मध्येही दीर्घ काळासाठी ताटातूट झालेल्या दोघांची विरहाचे सावट असलेली भेट चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. पण दोन्हीकडच्या परिस्थितींमध्ये फरक आहे. आणि दोन्हीकडे प्रेम अपयशी ठरले तरी कारणं वेगवेगळी आहेत... आणि बहुतेक या कारणांमध्ये अतिशय बहुचर्चित असूनही अचूक व्याख्या न करता येणाऱ्या प्रेम या इलुजिव्ह संकल्पनेचे काही पैलू दडलेले आहेत.
'जानू' मध्ये दोघांची शाळकरी वयातल्या अबोध प्रेमाची अधुरी राहिलेली कहाणी आहे. सहजीवनाची परीक्षा न दिलेली ती झाकली मूठ म्हणजे एक न भरलेली जखम आहे. एकाचे अख्खे मन अजूनही त्या भूतकाळानेच व्यापले आहे; दुसऱ्याने वर्तमानात जगणे स्वीकारले असले तरी मनाच्या तळाशी अजूनही ही जखम भळभळते आहे.
'आँधी' मध्ये दोघांनी प्रेमाला लग्नाच्या सोपानापर्यंत नेलेले आहे. त्यानंतर सहजीवनाच्या अग्निपरिक्षेत मात्र दोघेही होरपळले आहेत आणि फक्त प्रेम पुरेसे नसते; दोन स्वतंत्र व्यक्ती प्रेमात स्वतःचे अस्तित्व विरघळून टाकू शकत नाहीत, हे उमजून त्यांनी स्वतःच्या मर्जीने वेगळ्या वाटा चोखळल्या आहेत.
जानू मधला नायक एका पेटीत त्या काळातल्या वस्तू जशाच्या तश्या जतन करून ठेवतो... प्रेमाचेही तसेच असावे.. निगुतीने जतन करून ठेवले तर मूळ रुपात सुस्थितीत राहील, पण जगण्याच्या लढाईत उतरवले तर ते आहे तसे अढळ राहून तग धरू शकेल याची खात्री नाही. जसे सोन्याचे असते; शुद्ध स्वरूपातले सोने सगळ्यात मौल्यवान, पण त्याचा दागिना घडत नाही. दागिना म्हणून वापरात आणायचं असेल, तर सोन्यात हीण मिसळायला लागते. मग दागिना तयार होतो, पण सोन्याचा कस आधीसारखा राहत नाही!
No comments:
Post a Comment