#संकटसमयी_आपण २
घरच्या आघाडीवर....
एकवीस दिवस तर ठरलेले आहेत; त्यापुढेही घरात राहणं लांबेल का, हे माहीत नाही. माणूस वाईट बातमीपेक्षाही अनिश्चिततेला फार भितो. त्यामुळे सगळीकडे चलबिचल जाणवत आहे. पण सध्या फार पुढचा विचार न करता डोके शांत ठेवणे गरजेचे आहे. कुणालाही अचूक अंदाज येत नाहीय.
एक दिनक्रम ठरवून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याने स्ट्रेस कमी होतो आणि काहीतरी रुटीन सुरू आहे ही फीलिंग येते. जे वर्क फ्रॉम होम नाहीयेत त्यांनीसुद्धा रुटीन आखून घ्यायला हवं.
काल रात्री मुलांशी बोलले. जशी त्यांना घरकामाची सवय नाही तशी मलाही एकटीने सगळं करण्याची सवय नाही, मावशी होत्या म्हणून निभत होतं, हे समजावून सांगितलं.
घरातल्या कामांमध्ये त्यांनाही हातभार लावायला सांगणार आहे. बाकी आपल्याकडे कामाला येणाऱ्या मदतनीस किती काम करतात आणि यांच्यामुळं आयुष्य किती जास्त कम्फर्टेबल आहे हे परत जाणवून डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येत आहेत. देव त्यांना सुखरूप ठेवो!
सामान साठवलं नव्हतं, त्यामुळे एखाद-दुसरी वस्तू संपत आहे. पण त्याशिवायही काम सुरू ठेवता येतं हा साक्षात्कार होतोय.
रेसिपी थोडी मॉडिफाय केली तरी चव बिघडत नाहीय. चाललंय तोवर चालू देणार. अगदीच सगळं संपत आलं की मग किराणा दुकानात जाणार आहे. कदाचित ती वेळ येणार नाही, घरपोच सामान मिळण्यासाठी काहीतरी यंत्रणा सुरू होईल असे वाटत आहे. जेवणाचे मेनू साधे ठेवणार आहे, चारी ठाव स्वयंपाकाचा अट्टाहास करणार नाहीय. जिन्नस पुरवून वापरणार आणि स्वतःला खूप जास्त दमवणार नाही. थोडा वेळ तरी वाचन करायला, काही छान बघायला/ऐकायला बाजूला काढणार.
दुसरे काम म्हणजे फोनवर बोलणे. पेशंट्सचे फोन तर आहेतच, पण नातेवाईक, परिचित यांचेही फोन आहेत. जमेल तितकी माहिती देतोय, सूचना देतोय... पॅनिक न होता काळजी घ्यायला सांगतोय. काही वयस्कर नातेवाईकांना स्वतःहून फोन करतोय आणि माहिती देतोय. घरी जे जिन्नस आहेत त्यात भागवा, सगळं सामान संपल्याशिवाय दुकानांमध्ये गर्दी करू नका सांगतोय.
भीतीपेक्षा समज आणि जबाबदारीची जाणीव वाढली तर यंत्रणांवरही अनावश्यक ताण येणार नाही; त्याहून महत्वाचं म्हणजे जीव वाचेल.
व्यवसाय असा आहे की दोघांपैकी एकाला तरी बाहेर जावे लागते. दोन्ही आघाड्यांवर परीक्षा पाहणारा काळ आहे. अज्ञानात सुख असतं हे पटतंय.... कधीकधी फार टेन्शन येतं. पण मग स्वतःला जाणीवपूर्वक डायव्हर्ट करते. पुस्तकं आहेत, आणि संगीत आहे. फेसबुकही आहेच अर्थात. इकडे आलं की सहप्रवासी भेटल्यासारखं वाटतं. काही पॉजिटीव्ह, काही विनोदी पोस्ट्स वाचून उभारी येते. पण या सगळ्यात इथले स्वघोषित तज्ञ,भविष्यवेत्ते आणि रुदाल्या, राजकीय पोळी भाजून घेणारे, यांची नकारात्मकता मात्र नको वाटतेय. काही कन्स्ट्रक्टीव्ह सूचना असतील तर चांगलं असतं, पण सतत वाईटच बघणे वाईटच ऐकणे वाईटच बोलणे त्रास देते. आणि कुठलेही सरकार असते तरी हेच मत राहिले असते.
त्यामुळे फेसबुकच्या स्नुझ ऑप्शनचा सढळ वापर करणार आहे. अर्थात प्रत्येकाला प्रतिक्रिया व्यक्त करायचा अधिकार आहेच, आणि तो कसा वापरायचा याचाही. फक्त अशा प्रसंगांमध्ये मला या गोष्टी हतोत्साहित करणाऱ्या वाटतात, म्हणून हे स्वसंरक्षण.
एका महिन्यासाठी हे आयसोलेशनही गरजेचे आहे.
परत एकदा माझं आवडतं वाक्य...
There are many passive denouncers, few whistle blowers, ...and very few working reformers .
निद्रादेवीच्या रुष्ट होण्याचा दुर्मिळ अनुभव सध्या घेतेय. पहाटेही फार लवकर आपोआप जाग येते आहे. फ्रेश मेंदूत परत नव्याने फ्रेश गणितं,आकडेवारी आणि काळजी. अशावेळी युट्युबवर काहीतरी छान बघणे ही थेरपी आहे.
आज "ये सफर बहुत है कठीण मगर" हे आवडतं गाणं ऐकलं... जरा बरं वाटलं....होपफुल...
"नहीं रहनेवाली ये मुश्किलें
ये हैं अगले मोड़ पे मंज़िलें
मेरी बात का तू यकीन कर,
ना उदास हो मेरे हमसफर...."
No comments:
Post a Comment