वळू चित्रपट आम्हा दोघांना आणि मुलांना बेहद्द आवडला होता. घरात डीव्हीडीवर इतक्यांदा बघितला की तोंडपाठ झाला. अजूनही आम्हा चौघांपैकी कुणीतरी एखादा संवाद म्हणतं आणि मग बराच वेळ आमचा तो थ्रेड सुरू राहतो. गंमत म्हणजे मी खूप जणांना तो पिक्चर रेकमंड केला, पण सगळ्यांनाच काही तो तितका आवडला नाही. मग माझ्या लक्षात आलं की त्यातले बारकावे ग्रामीण भागाशी ओळख असेल तरंच लक्षात येतात, नाहीतर ते विनोद इतके रिलेट होत नाहीत.
पुलं यांच्याबाबतीत माझं लहानपणी असं झालेलं. बटाट्याची चाळ वाचायला घेतलं होतं. विनोदी लेखक म्हणून अतिशय फेमस असणाऱ्या या लेखकाकडून अपेक्षाही खूप होत्या. त्यामानाने ते पुस्तक काही तितके भावेना, आणि त्यातले विनोदही तितके विनोदी वाटेनात.. यापेक्षा द.मा मिरासदार आणि शंकर पाटील फार भारी लिहितात असं वाटलं होतं. कारण शहरी जगाची तितकी ओळखच नव्हती; चाळ नेमकी कशी असते हेच माहीत नव्हतं.
मग एक प्रवासवर्णन वाचलं, आणि बाकी पुलं वाचायचे राहून गेले ते गेलेच.
एका मित्राच्या पोस्टमुळे त्यांची पुस्तकं परत वाचायला सुरुवात केली. आता त्यांनी वर्णलेलं जगही बरंच डोळ्याखालून आणि कानांवरून गेलं होतं. या टप्प्यावर मात्र फार आवडले पुलं.
माझ्या जगण्याचं एक वर्तुळ पूर्ण होत होतं... भाबडेपणा ते प्रॅक्टिकल जगाशी ओळख, मग सगळा स्वप्नाळूपणा संपत जाणं आणि थोडं कडवट होणं; इथपासून ते आयुष्य म्हणजे पूर्ण पॅकेज असतं, सिलेक्टिव्हली घेण्याचा चॉईस नसतो त्यामुळं उगीच वाईटावर फोकस करून कटुता बाळगण्यापेक्षा चांगल्या गोष्टींकडे जास्त पाहावे, थोडा भाबडेपणाही जपावा, थोडा स्वप्नाळूपणाही, अध्येमध्ये दडण्यासाठी थोड्या पळवाटाही असाव्यात, ही समज येऊन हे वर्तुळ पूर्ण होत असताना हा लेखक वाचायला घेतला आणि यावेळी फार रिलेट झाला.
आता आपल्या मर्यादित अवकाशात शक्य तितकं समृद्ध जगण्याची; परीघ ओलांडता येत नसेल हरकत नाही, पण त्याबाहेरच्या वेगळ्या जगाबद्दल समानुभूती ठेवण्याची; जिंदगी गुलझार है यावरची श्रद्धा वृद्धिंगत करण्याची आजन्म शिकवणी सुरू झाली आहे या आजोबांकडे !

No comments:
Post a Comment