#अस्तु... #so_be_it...
#आवडलेलं_काही
हे अस्तु या चित्रपटाचं परीक्षण नाही; आणि लिहिण्याच्या ओघात काही स्पॉइलर्स येऊ शकतात.
सिनेमाचे तांत्रिक पैलू मला कळत नाहीत. पण चित्रपट हा कलाप्रकार फार आवडतो. विरंगुळा म्हणून, प्रत्यक्षात न आलेले अनुभव व्हर्च्युअली जगता येतात म्हणून, कधी काही उत्तरे मिळतात म्हणून, कधी पर्सनल इज युनिव्हर्सल चा प्रत्यय वेगवेगळ्या भाषेतले सिनेमे देतात म्हणून.
पण एखाद्या चित्रपटटातल्या सगळ्याच बाजू इतक्या रिलेट व्हाव्यात असं क्वचित होतं; तो अनुभव अस्तू ने दिला.
जोडीदार कितीही समजूतदार असला तरी आपला जन्मदाता कणाकणाने निसटून जाताना हतबल होऊन बघावं लागणं, त्या बाबतीतले निर्णय घ्यावं लागणं, हे ओझं एकट्याचं असतं.
कुठल्याही नात्यात काही भाग अनोळखीच राहणं, इनसेक्युर वाटणं हेही बऱ्याचदा आपण अनुभवत असतो.
आणि विशेष रिलेट झालेली अजून एक गोष्ट म्हणजे अमृता सुभाषने गायलेली अंगाई... लहानपणी गावी आजीकडून ऐकलेल्या अंगाईगीतांसारखीच सेम!
पण सगळ्यात जास्त भिडला तो त्यात केंद्रस्थानी असलेला कोहम हा प्रश्न आणि आहे हे असे आहे, या स्वीकारापर्यंतचा प्रवास...
थर्ड इयरला असताना मेडिसीनच्या सरांनी वर्गात एक प्रश्न विचारला होता; स्वतःवर वेळ आली तर कुठला रोग तुम्हाला सगळ्यात भीतीदायक वाटेल? माझं उत्तर amnesia होतं.
आपण म्हणजे आपली स्मृती, आणि आपल्या भोवतालाशी आपण कनेक्ट होऊ शकणं, आपला अवेअरनेस... जर या गोष्टी नाहीश्या झाल्या, तर मग जे शरीराचं जगणं असतं त्याला जगणं म्हणायचं? जी माणसं भोवताली आहेत त्यांनी कसं स्वीकारायचं या स्वतःचीही ओळख विसरलेल्या व्यक्तीला? चन्नम्मा मात्र हे सहज स्वीकारते!
सुरुवातीला शास्त्रींच्या बोलण्यात, केवळ वर्तमान खरा आहे असे मानणाऱ्या, अनित्यतेबद्दल सांगणाऱ्या झेन तत्वज्ञानाचा उल्लेख येतो, आणि निरभ्र आकाशासारखं नीरव शांतता पेलणारं मन असू शकतं असं ते म्हणतात. जगण्याच्या तत्वज्ञानाविषयीचे त्यांचे मत त्यातून कळते.
उत्तरार्धात चन्नम्मा अप्पांची अवस्था पाहून 'याचं मूल झालंय', म्हणते. विचारांच्या गुंत्यात न अडकता निसर्गदत्त वात्सल्याने त्यांची आई होऊन जाते, आणि त्यांना सहज कुटुंबात सामावून घ्यायचं ठरवते. नंतर त्यांची हक्काची माणसं मिळाल्यावर तेही स्वीकारते, मायेने पाठवणी करते, काळजी घ्या इतकंच सांगते. तिला कुठलं तत्वज्ञान माहीत नसेल, पण ती ते जगतीय.
ते पाहताना तिच्या रुपात ते निरभ्र आकाशच दिसत आहे असं वाटत राहतं...

No comments:
Post a Comment