कोरोनाविषयी अफवा/ चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असल्याच्या बातम्या आम्ही आवर्जून व्हाट्सअप्प ग्रुप्सवर पोस्ट केल्या, तेही ऍडमीनच्या विशेष उल्लेखासह. त्यामुळे ग्रुप्सवर आता त्याबद्दलचे खरे-खोटे अपडेट्स आणि उपाय येणे बंद झाले आहे.
पण त्या बदल्यात इतर काही जालीम कार्यक्रम सुरू झाले आहेत.
एका ग्रुपवर रोज रात्री दहा वाजता होममिनिस्टरच्या धर्तीवर टास्क/ प्रश्न सुरू होतात. त्यामुळे वीस-पंचवीस फोटो आणि पाच-सहाशे मेसेज जमा होतायत. बरं त्यात कुणाच्या घरातील कोपऱ्यातल्या खुर्चीवरचा कपड्यांचा ढीग मोठा, कुणाच्या ओट्यावरचा घासलेल्या भांड्यांचा ढीग जास्त, असे टास्क, किंवा शिळ्या भाताला किती प्रकारे फोडणी देऊन कुठल्या वेगवेगळ्या नावाने खपवता येते, असे इनोव्हेटिव्ह प्रश्न नसल्यामुळे भाग घेत येत नाही ही खंत वाटत राहते!
दुसरं म्हणजे घरकाम करतानाचे बाप्यांचे फोटो येतायत; इतक्या कौतुकाने फोटो टाकतायत मित्रलोक जणू काही इतकी वर्षे आम्हाला ही कामं माहीतच नव्हती.
"अरे असा मोठा नळ सोडून भांडी घासतं का कुणी, अन तो फेस किती केलाय.. टब बाथ घ्यायचाय का...", "काय तो नेत्यांसारखा झाडू धरलाय बाई, कोपऱ्यात कचरा तसाच राहिलाय तो बघ आधी...", या एक्सपर्ट कमेंट्स मनातल्या मनात देऊन उघड मात्र ग्रेट, वहिनी लकी हां, अशी कौतुकसुमने उधळतोय ☺️! आता वहिनी याच्या असल्या कामवाढवू कर्तृत्वाचे रीतसर पोस्टमॉर्टेम करणार हे आम्हालाही माहीत असतं पण असो...
आणि रेसिपीच्या फोटोंनी तर कहर केलाय... ताई माई काकू काका दादा, इतकंच काय एवढूशी पोरं पण मॅगी नायतर ती कसली ढालगज कॉफी आलीय त्याचे फोटो टाकून राहिले. आता अशा दुष्काळी दिवसांत होममेड पिझ्झा चे फोटो टाकून का जीव जाळावा अमच्यासारख्यांचा? पण जगात दुष्ट लोकांची कमी नाहीय हेच खरं.
आज सकाळी तर एकाने खरबुजाच्या तीन फोडी, दोन स्लाईस भाजलेले ब्रेड, आणि पाऊण कप चहा, यांचा फोटो टाकून "ब्रेकफास्ट लाईक ए किंग", असा कॅप्शन टाकलाय... आता बोला !
#लॉकडाऊन_टेल्स
No comments:
Post a Comment