Friday, 26 February 2021

कोरोना २

 टाळ्या-थाळ्यांवरून आतापासूनच गजर सुरू झालाय आणि काय काय रँडम डोक्यात येतंय. 

 खरं तर कुणी असंही म्हणू शकेल की जे अविरत काम करत आहेत तो त्यांच्या कामाचाच भाग आहे मोबदला घेऊन केलेला, आणि हे खरेही आहे. पण इतर लोक कमाई बुडाली तरी चालेल पण रिस्क नको म्हणून काम बंद ठेवू शकतात; काही क्षेत्रांमध्ये तसे करता येत नाही. यातही खाजगी व्यावसायिकांना तसे कदाचित करताही येईल, पण असे काही करायचे विचार डोक्यात येत नाहीत हे तितकंच खरंय. आम्हीच नव्हे, इतर स्टाफ, मावश्या, बायोमेडिकल कचरा गोळा करणारे कर्मचारी, औषधं पोहोचवणारे डिस्ट्रिब्युटर्स, कुणीही सुट्टी घेतली नाहीय. गरज पडली तर अडचण नको म्हणून आज आयसीयू मधले सगळे इन्स्ट्रुमेंट्स चेक केले. काही किरकोळ दुरुस्त्या होत्या त्या करण्यासाठी टेक्निशियनही लगेच आले. 

कुणी निंदा कुणी वंदा काम सुरू राहणारच आहे.

मग विचार करता करता असंही वाटलं की कृतज्ञता ही तशी सापेक्ष गोष्ट आहे. साधं हॉटेलमध्ये गेलं तर कुणी वेटरने सर्व्ह केलं की आभार मानतं, कुणी ते आपले नोकर असल्यासारखं वागवतं.

दुसरा भाग असाही आहे की कृतज्ञता मनात असली तरी ती व्यक्त करण्याचे प्रकारही वेगवेगळे आहेत. आवाज करून ती व्यक्त करणे काहींना अनावश्यक, कर्कश्य किंवा नाटकीही वाटू शकतं. पण एकाच वेळी सगळ्या समूहाने मिळून एखादी समान कृती केल्याने solidarity ची भावना वाढते; अशा काही कृती करण्याचे प्रसंग पूर्वीही कुठे कुठे घडले असतील.  इतक्या मोठ्या समूहाला फार साधने न लागता, खर्च न होता, सहजपणे घरातून करण्यायोग्य म्हणून टाळ्या थाळ्यांचा ऑप्शन सुचवला असेल... दुसरा एखादा पर्याय वापरता आला असता कदाचित पण तो काय असता याबाबत काही डोक्यात येत नाहीय. 

अशा प्रतिकात्मकतेची, gestures ची गरज असते का, याबद्दलही मतांतरे असू शकतात. पण जगताना असंख्य प्रतिकात्मक गोष्टी वापरून आपल्या भावना कन्व्हे करत असतो आपण. यातली कुठली पद्धत योग्य कोण ठरवणार. तसा कौतुक म्हणून टाळ्या वाजवणं हा प्रकार बऱ्यापैकी सर्वमान्य आहे. 

इतक्या लोकांनी एकाच वेळी असे केल्याने आवाज होईल हे खरे. साधारण चार पाच मिनिटांमध्ये किती ध्वनिप्रदूषण होईल काय माहीत. 

कदाचित टाळ्यांबद्दल फार आक्षेप नसेल, पण थाळ्या आणि घंटानाद म्हणजे फार कोलाहल वाटेल. गौराई घरी येतात तेव्हा आमच्याकडे ताट वाजवतात मोठ्याने...मलाही तेव्हा नको वाटतो तो आवाज, पण तशीच पद्धत आहे म्हणे.


आवाजाचीही एक गंमत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज वेगवेगळ्या गटांना प्रिय किंवा अप्रिय असतात; आणि वेगवेगळ्या तीव्रतेचे आवाज वयानुसार देखील प्रिय अप्रिय होतात.

गावाकडे लग्न म्हटलं की मोठ्या आवाजात स्पीकरवर ढिन्च्याक गाणी लावल्याशिवाय लगीनघर वाटत नाही. हलगीवाला येऊन वाजवायला लागला की समजायचं विधी सुरू झाले. मोठ्या आवाजात बँडबाजावाल्यांनी दिलेल्या पार्श्वसंगीताच्या संगतीनेच पूजा मांडल्या जातात, हळद लागते; मग गुरुजी आणि काही उत्साही स्वयंघोषित गायकांनी उच्चस्वरांत सुरांशी फटकून म्हटलेल्या मंगलाष्टकांच्या साक्षीने लग्न लागतं आणि बाबूल की दुवाएं लेती जा च्या सुरावटींवर मुलगी सासरी रवाना होते. यात सूर वगैरे काटेकोर नसतात खूपदा, पण बँड आणि मोठा आवाज इज मस्ट. 

शहरी अभिजात वर्गांत मात्र सनईचे मंजुळ सूर असतात, सगळं मापात सुरात असतं. प्रशिक्षित मंडळी सुरात मंगलाष्टके म्हणतात. पण मेहंदी, संगीत वगैरे कार्यक्रमांत मोठ्या आवाजात म्युजिक n डान्स असतो.

 मरणासारख्या दुःखद प्रसंगातही दुःख व्यक्त करण्याचे प्रकार वेगवेगळे. धाय मोकलून रडतात गावी लोक, आठवणी सांगत सांगत. इकडे असे आवाजी दुःख नसते. एखादा अस्फुट हुंदका, नाक ओढल्याचा आवाज बास. दुःख असतंच दोन्हीकडे, एक्सप्रेशन्स वेगळी असतात. 

वयानुरूपही आवाजाचा टॉलरन्स बदलतो.

मला होस्टलवर असताना मोठ्या आवाजात गाणी लावायची सवय होती, पण आता मोठा आवाज शक्यतो नको वाटतो. सध्या मुलं घरी आहेत तर मोठ्याने गाणी लावतायत. त्यात इलेनियम म्हणून कुणी आहे त्याचं crawl outta love असं एक गाणं ऐकून ऐकून शेवटी आवडायला लागलंय... आणि माझी जुनी अँटिक गाणी ऐकून त्यातले गुलाबी आँखे, ओ मेरे दिल के चैन सारखी काही त्यांना आवडायला लागलीत..... त्यामुळं गौरी आगमनाच्या वेळचा तो ताट वाजवल्याचा आवाजही मला accept होईल कधीतरी असं वाटतंय😊.

बाकी इकडे दिवसागणिक लोक जास्त समजूतदारपणे वागत आहेत( अपवाद दुर्लक्षित करायचे, ते असतातच).

पंतप्रधानांच्या कालच्या भाषणात अजून काही ठोस प्लॅन असेल वाटलं होतं; पण बहुतेक ते ब्रिफिंग पेक्षा आवाहन होतं. तेही ठीकच आहे... लोक त्यांच्याशी जोडलेली आहेत; अगदी प्रीमिटिव्ह वाटल्या तरी सामान्य लोकांसाठी आवश्यक अशा सूचना होत्या, लोकांनी तेवढ्या पाळल्या तरी बराच फरक पडेल. 

लढाईत बळेबळे ढकलले जाणे वेगळे, आणि स्वयंप्रेरणेने स्वतः आणि समाजासाठी लढाईला सज्ज होणे वेगळे. ती भावना थोड्या प्रमाणात जरी लोकांमध्ये निर्माण झाली तर चांगली गोष्ट आहे. बुद्धिवादी तर्कनिष्ठ समाज ही आयडियल स्थिती झाली; सध्याचा भावनाप्रधान समाज भावनिक आवाहनांना जास्त प्रतिसाद देत असेल तर त्या घटकाचा उपयोग या क्रायसिसमध्ये करून घ्यायला काही हरकत नाही, येनकेनप्रकारे योग्य लोकसहभाग आणि सहकार्य असणं महत्वाचं.

परिस्थिती अभूतपूर्वच आहे; सकारात्मक अप्रोच ठेवून शक्य तितके आपल्या परीने करत राहायचे. इटलीच्या हॉस्पिटलमधला एक व्हिडिओ सकाळी पाहिला, भीती वाटली खूप...आपल्याकडे ती वेळ न येवो ही प्रार्थना. याचं श्रेय मग उन्हाळा, प्रार्थना, मंत्र, राख, कापूर, मंत्री, देव, अल्लाह.... कुणीही घेवो हरकत नाही; संकटातून सुखरूप पार पडणं एकमेव प्राथमिकता वाटतेय सध्यातरी...

No comments:

Post a Comment