Friday, 26 February 2021

माहेराला जाते मी...

 तीन दिवसांसाठी जायचं म्हटलं तरी किती दिवस तयारी सुरू असते. आजीला आवडणारी काजू कतली घ्यायची असते; एका वहिनीने गोधडी शिवून द्यायचं कबूल केलेलं असतं, ते गाठोडं घ्यायचं असतं सोबत. 

किती आवरलं तरी उशीर होतोच, पोहोचेपर्यंत गाव चिडीचूप झालेलं असतं.

 सकाळ होते; कझिन शब्दात व्यक्त करता येत नाही असे भाऊ भेटतात... एकजण नवी सुरुवात करत असतो आणि त्याच्या खडतर प्रवासाचे आम्ही साक्षीदार ओठावर हसू आणि डोळ्यांत आसू घेऊन त्याच्या सोबतीने नवी स्वप्न पाहत असतो.

कुणाचे कुणाशी काय रिलेशन हे लेकीला समजावून सांगताना, तिच्या कझिन्सची उदाहरणं देताना ही उदाहरणं पुढच्या पिढीत शाबूत आहेत याचं बरं वाटतं..

दोन दिवस स्वप्नातल्यासारखे उडतात भुर्रकन.

आता परतीची आवराआवर करायची असते....सामान वाढत जातं आणि मन जड होत जातं. 

 जुनी मुळं तात्पुरती रुजवायच्या आणि लगेच परत उपटून सावडून घ्यायच्या जगरहाटीचा नव्याने राग येतो...

गाव झोपेच्या कुशीत विसावत असताना आपण काही जुनी, बरीचशी नवी गाठोडी गाडीच्या पोटात धूसर डोळ्यांनी भरत राहतो...

No comments:

Post a Comment