Friday, 26 February 2021

स्वयंपाकसाधना

 एखादा पदार्थ करण्यात एखाद्याचा हातखंडा असतो म्हणतात. असं बऱ्याचदा होतं, की कितीही तंतोतंत कृती कॉपी केली तरी चवीत फरक पडतो.

याचं एक कारण हेही असेल, की रेसिपी फॉलो करताना एक गोष्ट राहून जाते... स्पर्श, गंध, दृष्टीचे गणित, जे बहुतेक वेळा काटेकोरपणे दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येत नाही. 

भाकरी करताना पीठ कणकेसारखं मळत नाहीत, थोडं घासत मळतो आपण.. सतत भाकरी करत गेलं की हाताला तो मऊ झालेल्या पिठाचा स्पर्श कळायला लागतो; त्या पॉइंटला पीठ परफेक्ट मळून झालेलं असतं आणि आता न मोडता भेगा न पडता भाकरी थापता येणार असते.

साधा साबुदाणा भिजवतानाही पाणी किती ठेवायचं; एक पेर दीड पेर वर, असं फिक्स प्रमाण नाही. सवय झाली की साबुदाणा धुवून घेतानाच अंदाज येतो.

माझी आजी सुगरण आहे. एरवी पुरणपोळी न आवडणाराही तिच्या हातची पोळी खातोच. पण तिची रेसिपी अंदाज पंचे असते. पसाभर, मूठभर, चिमुटभर, अर्धा डाव, असे प्रमाण सांगते ती. आणि पुरण करताना रंग, वास आणि उलथनं फिरवताना होणाऱ्या स्पर्शावरून कळतं चुटका नीट बसला की नाही. पोळी नीट व्हायची तर पुरण आणि कणिक, यांची कनसिस्टंसी सारखी हवी. "हाताला कळतं करत गेलं की," हे तिचं ठरलेलं वाक्य! फोडणीत मसाले नीट मुरले की नाही हे वासावरून, रंगावरून कळतं.

नेहमीची कांद्याची फोडणी सुद्धा वेगवेगळी असते; पोह्याचा कांदा जस्ट मऊ झालेला, भाजीसाठी थोडा अजून जास्त परतलेला, वाटणासाठी असेल तर चांगला ब्राउन होईस्तोर परतलेला. 

कारळ, जवस, बडीशेप भाजताना हळूहळू हलके होत खुळखुळायला लागतात; भाजताना तो टप्पा आला की कळतं जिन्नस खरपूस भाजलाय. रवा सुद्धा हलका होत जातो ते कळतं.

 लाडवासाठी बेसन भाजताना एक चकवा येतो मध्ये, रंग बदलल्यासारखा वाटतो पण उलथन्याला अजून पीठ जड लागत असतं. तिथं न फसता तूप टाकत टाकत बेसन भाजण्याचा कार्यक्रम सुरू ठेवायचा... एक क्षणाला मग आपले उलथने लोण्यात सुरी फिरावी तसे फिरू लागते... ते फायनल डेस्टिनेशन.

अशा छोट्या छोट्या सिग्नल्सवरून पदार्थाचा अंदाज येत असतो, आणि हे नेमकेपणे कुठल्या रेसिपीत मांडता येत नाही!

No comments:

Post a Comment