Friday, 26 February 2021

महिला दिन वगैरे

 #कलाईडोस्कोप

***

माँ उशीर होतोय!

झालाय डबा अरे, टेबलवर पोहे ठेवलेत घे खाऊन पटकन.

बाय.

फोन, डबा घेतला ना रे, बाय.

अहो चहा घ्या पटकन, जरा लवकर जायचंय मला हॉस्पिटलला. 

-------   -------   -------   -------  -------   ------

अरे वा फुलांनी स्वागत वगैरे, काय विशेष?

मॅडम आज विमेन्स डे ना.

अरे हो की, आज कन्सेशन द्या हां प्रत्येकीला.

हो मॅडम. 

***

मॅडम तुम्हाला बघून छान वाटतं, इंस्पायरिंग.

हं,  थँक्स. जॉब कसा सुरूय?

सोडला मॅडम, दगदग होत होती.

अगं मग काय उपयोग.

***

हॅलो?

ताई मी लवकर येते आज कामाला, दुपारी भावाकडं जायचंय, आई आजारी हाय.

हं.

अन ह्यांचा फोन आला तर सांगा मला तुमी ती साडी दिलीय. 

कुठली गं?

अवो मीच आईला लुगडं घेतलंय, तर हे म्हणत्यात इतके पैशे कशापायी घालवले. माजे पैशे असूनबी ह्येचा जाच. मी म्हनले तुमी दिलेली हाय.

बरं.

***

मॅडम, तुमची फीस पुढच्यावेळी देते, सध्या जरा अडचण आहे. 

काही प्रॉब्लम?

काही नाही हो मॅडम हे मोजून पैसे देतात महिन्याला, जरा शॉपिंग जास्त झाली...मी देते नक्की, तुमच्या सोसायटीच्या शेजारीच आहे आमची पण सोसायटी. 

ठीक आहे.

***

अहो गरोदरपण म्हणजे आजार नव्हे. थोडी हालचाल असू द्या. वॉक घ्या रोज, घरातली छोटी मोठी कामं करत जा.

मॅडम आमच्याकडे सगळ्या कामाला सर्व्हंट्स  आहेत. 

आणि मॅडम ही फार नाजूक आहे, ते घरकाम वगैरे नाही जमणार हिला. आणि वॉकिंग सूट नाही होत तिला.

....  मग जे काही एक्सेस वेटगेन असेल त्याचे साईड इफेक्ट्सही होतील याची तयारी ठेवा.

***

मॅडम

हं बोल. झाले का सगळे पेशन्ट्स?

आहेत दोन तीन, बीपी घेतलाय.

मॅडम पुढच्या महिन्यात सुट्टी लागेल.

अरे हो, कॉंग्रेट्स, मग पुढे कँटीन्यू करणारेस ना, सासर इथलेच ना तुझे?

हो, येईन मी परत मॅडम, लिंक तुटली की तुटतेच नाहीतर. पण ना मॅडम, मला भीतीच वाटतेय; छान चाललंय माझं, लग्न करून सगळं उगीच डिस्टर्ब् होईल वाटतंय.....

.....      अगं नाही होणार, बघू आपण काहीतरी....

***

हॅलो?

किती वेळ आहे ममा? आपल्याला त्या सरांकडे जायचंय, वन ओ क्लॉक पर्यंत.

हं, आवरून ठेव आलेच.

------ ------ ----- ---- ---- ---- -----

ममा आज विमेन्स डेचे खूप ऑफर्स आहेत, मी इव्हनिंगला बाहेरून काहीतरी मागवणार आहे पक्का. 

हं.

ए तू एटी इयर्सची का नाहीय?

का गं बाई?

अगं माँ, MOD मध्ये तुमचं जितकं एज असेल ना तितकं परसेन्ट डिसकाउंट मिळणार आहे.

देवा.... !


हॅप्पी वूमेन्स/विमेन्स डे वगैरे ....

नाव आहे चाललेली, कालही अन आजही

(आज आरती प्रभू यांची जयंतीही आहे)

No comments:

Post a Comment