जीव ही फार सापेक्ष गोष्ट आहे. बऱ्याच शाकाहारी लोकांना एखाद्या प्राण्याला मारून खाणं चुकीचं वाटतं; मांसाहारी लोकांचे म्हणणे असते की जीव तर वनस्पतींमध्येही असतोच की. एकदा परभक्षी म्हटल्यावर कुठलातरी जीव भक्षण करणे आलेच. यातही बरेच मांसाहार करणारेसुद्धा प्रत्यक्ष प्राणी मारण्याची प्रक्रिया बघू शकत नाहीत, अस्वस्थ होतात.
मानवी जीवांच्या संदर्भात जीव कुणाचा, यावरही आपली संवेदना अवलंबून असते; कुठल्यातरी धाग्याने समानुभूती अनुभवली की त्या जिवाविषयी जास्त कळकळ वाटते.
चेहराहीन जीवघेण्या बातम्या तितक्या विचलित करत नाहीत जितक्या एक चेहरा लावून येणाऱ्या बातम्या करतात.
मानवी आयुष्याबद्दल संवेदना काळसापेक्षही असावी. टोळ्यांचा काळात माणसं मृत्यूबद्दल इतकी संवेदनशील नसावीत.
जेव्हा आयुष्यमान कमी होते, रोगराईने बरीच माणसं, मुलं दगावायची तेव्हाही मृत्यू आजच्याइतका अस्वस्थ करत असेल मागे असणाऱ्यांना, कुणास ठाऊक.
सध्याचा काळात मानवी जीवनाचे मोल आजपर्यंतच्या इतिहासात बहुतेक सगळ्यात जास्त असेल.
अजून जन्माला न आलेल्या बाळांबाबतही संवेदनशीलतेची फार रेंज असते. अगदी कमी आठवड्यांचा गर्भपात झाला तरी एक व्यक्ती गेल्याइतकी दुःखी होणारी जोडपी आहेत. कधी चार साडेचार महिन्यांचा गर्भ निर्विकारपणे नको म्हणणारीही आहेत. एखाद्या बाळाला जन्मप्रक्रियेत गुंतागुंत होऊन गंभीर इजा झाली आणि पुढील आयुष्यात त्याचे पडसाद उमटण्याची भीती असेल, तर त्याला जगवण्याचे किती प्रयत्न करायचे हे ठरवण्यासाठी दोन मिनिटं ते दोन दिवस वेळ घेणारी कुटुंबं आहेत.
जिथे सोनोग्राफीसारख्या तपासण्या करताना समरस होऊन छबी पाहिलेली असते, त्यांची सहसा बाळाशी जास्त अटॅचमेन्ट होते.
बालमृत्यूचे प्रमाण जास्त असतानाच्या काळात मुलांच्या मृत्यूचे आघात कसे पचवत असतील लोक?
माझा स्वतःचा अनुभव असा, की गर्भाचे अवयव तयार झालेले असले की गर्भपातानंतर तो गर्भ बघताना अस्वस्थ वाटतं.
आता गर्भपाताची कालमर्यादा वीस आठवड्यांवरून चोवीस आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. इतकेच नव्हे तर काही अपवादात्मक परिस्थितीत ती मर्यादा चोवीस आठवड्यांपेक्षा जास्त वाढवलेली आहे. अर्थात हे करण्यामागे सबळ कारणे आहेत आणि बऱ्याच केसेसमध्ये हा निर्णय उपकारकच ठरणार आहे.
पण बरेचसे गर्भपात गर्भनिरोधक साधनांचे अपयश हे कारण देऊन होतात आणि त्यातही खरे कारण अपघाताने, निष्काळजीपणामुळे राहिलेला गर्भ हे असते. अशा केसेसमध्ये मूल नको आहे हे खूप उशिरा ठरवलं तरी गर्भपात शक्य होणार आहे.
अशा उशिरा केलेल्या गर्भपाताचे स्वरूप मात्र संवेदनशील मनासाठी थोडे डिस्टर्बिंग असणार आहे.
No comments:
Post a Comment